Wednesday, April 1, 2009

अमेरिकेचे प्राणिप्रेम

प्रिय सलोनी
एक महिन्यापूर्वी कनेटिकट नावाच्या एका राज्यात एक विचित्र घटना घडली. एका स्त्रीने एका चिंपाझी माकड पाळले होते. त्या माकडाने त्याच्या मालकीणीच्या एका मैत्रीणीवर हल्ला केला. तिचे नाक, चेहेरा ओरबाडला, चावला .. इत्यादि. संपूर्ण वर्णन खूप भीषण आहे. आणि त्याची इथे जरुरी नाही. इतकेच पूरे आहे की ती स्त्री आज एक महिन्यानंतरही हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात आहे आणि अजूनही ती पूर्णपणे शुद्धीवर नाही.
अमेरिकेत या अश्या काही गोष्टी आहेत की कपाळाला हात लावायची पाळी येते. त्या माकडाला त्याच्या मालकीणीने असे पाळले होते की तो जणु काही तिचा मुलगाच होता. त्याला कपडे घालायची. आणि तो तिच्या घरात तिचा मुलगा म्हणुन राह्यचा (अशी तिची समजुत!). शेवटी त्याच्यातले श्वापद जागृत झाले आणि जे घडु नये ते घडले.
९११ कॉल नंतर अर्थात पोलिस आले आणि त्या माकडाला अखेरीस गोळ्या घालुन ठार केले.
अमेरिकेचे हे श्वापद-प्रेम/वेड इतर सर्व गोष्टींप्रमाणे अतिरेकी आहे. अमेरिकेत खाजगी पाळलेल्या वाघांचीच संख्या कित्येक हजारात आहे. वाघ, अजगर, चिंपाझी का पाळावेसे वाटतात कळत नाही. काही वर्षांपूर्वी रॉय नावाच्या एका जगप्रसिध्द प्राणिप्रेमी माणसाला त्याच्याच वाघाने हल्ला करुन असे काही जायबंदी केले की रॉय कायमचा अधु झाला आहे. हे सर्व हजारो प्रेक्षकांसमोर घडले लास व्हेगास मध्ये जिथे रॉयचा जगप्रसिद्ध खेळ मिराज नावाच्या कॅसिनोमध्ये होत असे. तरी त्या वाघाचा फक्त गैरसमजच झाल होता; त्याला रॉयला फक्त तोंडात पकडुन दूर न्यायचे होते. खरोखरच जर त्या वाघाला रॉयला मारायचे असते तर त्याला २-४ सेकंद पूरले असते कदाचीत.
इथे कुत्रे मांजराचे लाड तर खूपच असतात. त्यांना स्वेटर काय घालतील, गॉगल काय घालतील. सर्वच काही अजब वाटायचे आम्हाला सुरुवातीला. परंतु नंतर कळु लागले की अश्या रितीने प्राण्यांवर प्रेम करून इथले लोक त्यांच्या आयुष्यातील माणसांची उणीव भरुन काढतात. स्पर्धा, व्यक्तिस्वातंत्र्य, वस्तुवाद, आणि व्यक्तिवाद यांचा अतिरेक असल्यामुळे बर्याचदा नात्यांमध्ये कृत्रीमपणा असतो. घटस्फोटांचे प्रमाण भरपूर आहे. लग्न न करण्याचेही प्रमाण बर्यापैकी आहे. सामाजिक आणि आर्थिक जडणघडणच अशी आहे की एकाकीपणच वाढावे. भले मोठे रस्ते, घरे, गाड्या. प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी! १ महिन्याच्या मुलाला देखिल आपली खोली असते त्यात झोपवतात. ज्याला त्याला स्वत:चीच कार. एकाच घरात अनेक टीव्ही जेणेकरुन ज्याला जे हवे ते त्याने बघावे. माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे ही व्याख्या चुक आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती.
चिंपांझीला असे पाळणे जणु काही ते तुमचे मुल आहे, हे एकाकीपणातुन आलेल्या मानसिक रोगाचे लक्षण आहे हे मान्य होणार नाही अमेरिकन जनतेला.
सत्तेपुढे आणि पैश्यापुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे काही काळ तरी अमेरिकन लोकांना स्वत:च्या या उणीवा आणि त्यावरचे साधे उपाय समजणे कठिण आहे. भारतातील जीवन त्यामानाने संतुलित वाटते. भौतिकदृष्ट्या प्रगत नाही परंतु तरीही मने प्रसन्न आहेत. इथली गुन्हेगारी जशी कल्पनेपलिकडची असते तशी भारतात अजुनतरी दिसत नाही. कारण त्यामानाने आपण अजूनतरी इतके वस्तुवादी झालो नाही आहोत.
मला वाटते की भारताने भरपूर प्रगती करावी. परंतु अमेरिकेत सर्वच काही चांगले आहे असे नाही. सगळीकडेच अमेरिकेचा आदर्श घेण्याची गरज नाही. अमेरिकन लोकांची कल्पकता, धाडस, कष्टाळुवृत्ती, उदारपणा वाखाणण्यासारखे आहेत. परंतु कधी कधी काही गोष्टींचा अतिरेक केला जातो ते सांभाळले म्हणजे झाले.
काल म्हणालो तेच इथे पण लागू आहे. आपले नेमके प्रश्न काय आहेत ते सोडवताना आपल्या पद्धतीने सोडवले पाहिजेत. पाश्चात्यांच्या स्वैराचाराला अर्थ नाही. पैसा आणि सत्ता आहे म्हणुन विवेकाला सोडचिठ्ठी देण्याची गरज नाही. वस्तुंच्यामागे धावता धावता एकमेकांचा हात सोडण्याची गरज नाही.

No comments: