Sunday, October 25, 2009

आमचेही (स्वाईन फ्लु) लसीकरण!

सलोनी

या आठवड्यात तुझी ६ महिन्यांची तपासणी झाली. त्यावेळी तुझ्या तपसणिव्यतिरिक्त सिद्धुला "स्वाईनफ्लु" ची लसदेखील दिली. त्यामुळे थोडे निश्चिंत वाटले. सध्या स्वाईनफ्लुने बराच हाहाकार झाला आहे जगभर. भारतात पुणे तर अगदी २-४ आठवडे बंद पडले इतकी परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे तुझ्या डॉक्टरांनी सिद्धुला लस द्यायची का म्हटले तर आम्ही ताबडतोब संमती दिली.

काल ऑफिसवरुन आलो तर टीव्हीवर बातम्यांमध्ये सांगीतले की या वीकएण्डला फिनिक्समध्ये ४० ठिकाणी स्वाईनफ्लुची लस देण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही आपल्या घराजवळचे एक ठिकाण शोधले. तिथे सकाळी ८ वाजल्यापासुन लस देण्यात येणार आहे असे गूगल वर वाचले. लसीचा तुटवडा असल्यामुळे दुसर्या दिवशी लवकर जाऊन तिथे लस मिळण्यासाठी "नंबर" लावायचा असे ठरले.

खरे तर शनिवारी सकाळी ८ वाजता घराबाहेर पडणे म्हणजे अगदी पहाटे उठल्यासारखे वाटते. परंतु स्वाईनफ्लुचा धसकाच असा काही आहे की मी ७ वाजताच उठलो. सर्वांना घेउन सिग्ना या आरोग्यविमा कंपनीच्या केंद्रात लस घेण्यासाठी आमची स्वारी रवाना झाली. तसे अमेरिकेत पहाटे पहाटे नंबर लावण्याचे प्रसंग तसे कमी एका हाताच्या एकाच बोटावर मोजण्याइतकेच (अर्थात एकच) असतात. ते म्हणजे थॅन्क्सगिव्हिंग या सणाच्या दिवशी प्रचंड सवलतीच्या दरात पहाटे ६ ते १० पर्यंत ज्या वस्तु मिळतात त्यांच्या खरेदी साठी लोक पहाटे उटुन किंवा १ दिवस आधीपासुन दुकानासमोर रांगा लावतात तेवठेच. बाकी अमेरिकन लोकांना रांगा लावायला आवडत नाहीत. जे असेल ते सगळ्यांना मुबलक आणि तात्काळ उपलबद्घ असावे ही बर्याचदा वृत्ती असते. रांगा लावणे हा रशिया आणि त्यांच्या नादाने आपणही जी काही समाजवादी वाटचाल केली त्याच्या कृपेने आपल्या सहनशक्तीला चालना आणि बळकटी आणणारा प्रकार तसा अस्सल समाजवादी आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन अर्थात तात्काळ मन:तृप्ती हा अगदी खास अमेरिकन प्रकार. काहींना बालिश वाटेल परंतु बरे वाटते लहान मुलांसारखे मनात आणले की गोष्टी हजर! त्यातुन पुन्हा क्रेडिट कार्ड चा वापर करुन तर परवडेत नसेल तरीही लोक खरेदी करतात. असो तर "तात्काळ मन:तृप्तीचे" तोटेदेखील आहेतच. परंतु दारिद्र्याने खंगुन मरण्यापेक्शा भोगवादाच्या धुंदीत गुरफटुन जाणे तुलनेने नक्कीच कमी वाईट!

असो .. तर सकाळी सकाळी सिग्नाच्या केंद्रात लस घ्यायला आम्ही चौघेही रवाना झालो. तिथे पोहोचलो तर आमच्या आधीच तिथे दोनएकशे लोक उभे होते. गाडी पार्क करायला जेमतेम कुठेतरी जागा मिळाली. अमेरिकन माणसांमध्ये शंभर दोष असतील परंतु आळस मात्र नाही आहे. आम्ही खरेतर १० मिनिटे आधीच पोहोचलो परंतु त्याआधीच पार्किंग लॉट भरुन गेला होता. रांगेत सर्वजण लेकुरवाळे होते. काही गरोदर बायकादेखील होत्या. आज फक्त त्यांनाच लस मिळणार होती ज्यांना जास्त गरज आहे. त्यात पाच वर्षांखालची मुले, किंवा कोणत्याही वयाची आजारी मुले/माणसे, गरोदर स्त्रिया आणि तान्ह्या मुलांचे पालक इत्यादिंचा समावेश होता. ही गोष्ट खरेच विचार करण्यासारखी आहे .... अमेरिकेत मागच्या आठवड्यात ९० लोक मेले स्वाईन फ्लु ने. अमेरिकेत स्वाईन फ्लुची तीव्रता भारतापेक्षा जास्त आहे. परंतु भारतात जसे पुणे बंद पडले तसे इथे घडले नाही. कारण कुठल्याही समस्येला धीराने आणि पद्धतशीरपणे सामोरे कसे जायचे याचे प्रशिक्षण इथे अनेकदा दिले जाते. अगदी ९११ घडले आणि तेव्हा त्या दोन इमारतींमधुन हजारो माणसे शांतपणे ७०-८० मजले उतरुन खाली आली आणि स्वत:चा जीव वाचवला. इथे शिस्त आणि समन्वय यांचे शिक्षण मुद्दामहुन दिले जाते. वर्षातुन किमान एकदा आग लागल्यावर इमारतीतुन कसे शांतपणे बाहेर पडायचे याचे शिक्षण दिले जाते. आपल्याकडे बर्याचदा जत्रा, मेळावे आणि यात्रा यामध्ये गर्दी आणि चेंगराचेंगरी होते. स्वाईन फ्लु मुळे कामे बंद पडणे हा काहीसा सामाजीक दक्षतेचा अभाव दर्शवतो. मुंबई वरच्या अतिरेकी हल्यांमध्ये या तयारीचा अभाव विशेष दिसुन आला. असो.. तो एक वेगळाच विषय अहे. परंतु मुख्य काय तर शांतपणे धीराने आणि तयारीने समस्येचा सामना करणे महत्वाचे.

थोड्यावेळाने एक गार्ड येउन सर्वांना काही माहितीपत्रके देउन गेला. अमेरिकेत काम तसे शिस्तीत असते. आंधळेपणाने कुठेही काहीही कुणी करत नाही. लस देणारा आणि घेणारा दोघांवर माहिती देण्याची आणि घेण्याचे कायदेशीर बंधन आहे. आणि इथेच नाही तर बहुतांशी सर्वच गोष्टींमध्ये. कुणीही कुणाची फसवणुक करु नये हा उद्देश आणि सर्वांनी जाणतेपणी निर्णय घ्यावेत यासाठी हा प्रपंच.

हळु हळु रांग पुढे सरकु लागली. थंडी होती. त्यामुळे सर्व मंडळी जॅकेट्स स्वेटर इत्यादि घालुन आलेली. आम्ही मात्र चौघेही साध्या कपड्यांमध्ये बाहेर पडलेलो. ऍरिझोना आहे म्हणुन चालतंय. मिशिगन ला हे करुन दाखवा. मिशिगनला घरातुन बाहेर २० पावलांवर पत्र पेटी उघडुन पत्रे घेउन परत येण्यासाठी जॅकेट आणि शुज घालण्याची गरज पडायची. ऍरिझोना मध्ये हाच प्रकार उन्हाळ्यात घडतो. रात्री ९ वाजता देखील गरम झळया येत असतात. पुण्याच्या सुंदर हवेला सोकावलेला जीव कुठेही गेला तरीही कुरकुर केल्याशिवाय रहात नाही. त्याला आम्ही पुणेकर चिकित्सकपणाचे नाव देऊन समोरच्याचे तोंड बंद करतो. असो ..

रांगेत समोर नवरा बायको मुले दोन असे एक आमच्या सारखेच चौकोनी कुटुंब उभे. बायकोने नवर्याला कारमधुन कॉफी आणुन दिली. त्यावर तो थॅंन्कयु म्हणाला. आपल्याच बायकोला! हे आपल्याला रुचत नाही आणि कळत आणि वळतही नाही. मी पहिल्यांदा परदेशात गेलो ते ऑस्ट्रेलियामध्ये. तिथे पहिल्यांदा आयुष्यात कळले की शिष्टाचार म्हणजे काय. तोपर्यंत शिष्टाचार म्हणजे फक्त "शिष्ट आचार" असे वाटायचे. आणि नुमवी आणि मुळात पुण्याचे पाणी असल्यामुळे "शिष्ट आचारात" कसुर कधीच झाली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियात ९७ साली दुकानात - आपल्याकडे जसे "काय पाहिजे" असे त्रासिक मुद्रेने विचारले जाते - तसे न विचारता - "आपण बरे आहात का" असे विचारल्यावर अतिशय दचकायला व्हायचे. आईशप्पथ हा विनोद नाही. मला खरोखरीच असे वाटायचे की मी बरा आहे पण तु का विचारतेस? त्यामुळे आमची स्वारी ऑस्ट्रेलियाहुन परतली त्यानंतर एका मित्राच्या घरी कसबा पेठेत जेवायला गेली आणि तिथे त्याच्या आईने वाढल्यावर तिला मी अगदी ऑस्ट्रेळल्या भाषेत थॅन्क्यु म्हणल्यावर डोक्यात लाटणे घालु का असा चेहेरा केला होता. अर्थात कसब्यात डोक्यात लाटणे काय दांडकेही बसु शकते कारणाशिवाय तो भाग वेगळा. परंतु तात्पर्य काय तर शिष्टाचार चांगला आहे ... परंतु नथिंग बीट्स प्रेम आणि आपुलकी. अमेरिकन/युरोपिअन लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी नाही असे नाही. परंतु दे हॅव अ लॉन्ग वे टु गो ऑन दॅट फ्रंट. तसेच भारतिय/पौर्वात्य देशांमध्ये व्यवहारातील शिष्टाचार वाढण्याची गरज आहे.

रांग हळु हळु पुढे सरकत होती. गाड्यांचा ओघ चालुच होता. आमच्या पुढचे कुटुंब बहुधा पूर्व युरोपियन (रोमेनिया इ.) होते. मागचे मेक्सिकन+अमेरिकन. त्यामागे भारत/पाक/बांगला मुस्लिम. आमच्या दोन घरे पुढे फिलिपिनो किंवा चीनी... अमेरिका ही अशी भेळ आहे. आमच्या मागच्यांचा दोन वर्षांचा मुलगा येऊन माझ्या पायाला धरुन खेळु लागला. मागे वळुन पाहिले तर खजील होऊन त्याची आई मला म्हणाली "ऊप्स! रॉन्ग डॅड!" आम्ही सगळे हसलो.

अखेरीस आम्ही आत मध्ये पोहोचलो. तेव्हा कळले की आम्हाला देखील स्वाईनफ्लु ची लस मिळेल कारण आम्ही एका सहा महिन्यांच्या बाळाची काळजी घेत आहोत. कुणाला तरी आणि विशेष करुन सरकारला आमच्या (बव्हंशी तुझ्या आईच्या) कष्टांची जाणीव आहे हे पाहुन मला गहिवरुन आले. दोन मिनिटात फॉर्म भरले, लस घेतली आणि बाहेर आलो.

लवकरात लवकर सर्वांना ही लस मिळावी आणि दहशतीचे वातावरण निवळावे अशी इच्छा!

Thursday, October 8, 2009

राणीचे हात स्वच्छ!

सलोनी

आज मी तुझ्याशी नोबेल सन्मानाविषयी बोलणार आहे ... आता तु म्हणशील, "मला तर अजुनही गादीमध्ये तोंड घातले म्हणुन श्वास गुदमरतो म्हणुन तोंड बाहेर काढावे हे सुद्धा कळत नाही .... तर नोबेल सन्मान कसला डोंबल्याचा सांगतोस". परंतु बाबामहाराज तुला तोंड फुटायच्या आत सगळी बडबड पूर्ण करुन घेणार आहेत ..कारण इतर मित्रांच्या मुलींची बडबड पाहता मला पुढे किती बोलायला मिळेल शंका आहे! असू देत .. परंतु विषय खरोखरच छान आहे. आणि तुला जेव्हा कळेल तेव्हा कळेल.

तर झाले असे ... की काल भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. खर्या अर्थाने सांगायचे तर नोबेल पारितोषिकाची खरी मजा भौतिकशास्त्राशी संबंधीत विषयांमध्ये कांकणभर अधिकच आहे. बाकी रसायन, वैद्यकीय, शांतता आणि अर्थशास्त्रामध्ये पण हे पारितोषिक दिले जाते ... परंतु भौतिकीमध्ये दिलेली पारितोषिके अधिक स्मरणिय ठरली आहेत.

२० वे शतक हे भौतिकशास्त्राचे सुवर्णयुग होते. अणुची संरचना, प्रकाशाचे गुणधर्म, सापेक्षतावाद इतकेच नाही तर मानवाच्या आकलनाच्या मर्यादा सिद्ध करणारा अनिश्चिततावाद अश्या अनेक क्रांतिकारक शोधांचे हे युग! फर्ग्युसनमध्ये भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना अश्या अनेक सिद्धांताचा अभ्यास करताना भारवले गेलेलो आम्ही, अगदी परमानंदातच बुडालेलो. तेव्हा जाणवले की ज्ञानाचे उद्दिष्ट केवळ ज्ञान मिळवणे हेच आहे. त्याचा व्यावहारिक उपयोग होऊ शकतो, केला जातो आणि करावादेखील. परंतु केवळ ज्ञानसाधनेमध्येही अतिशय आनंद आहे. किंबहुना अस्सल संशोधक व्यवहारी उपयोगी संशोधनाला हलके समजतात. गणितात केवळ आकड्यांचा अभ्यास करणारी एक शाखा आहे - नंबर थिअरी. अगदी आत्ता आत्ता पर्यंत नंबर थिअरी ही केवळ बुद्धीचा कस लावणारी परंतु बर्यापैकी व्यवहारशून्य शाखा म्हणुन संबोधली जायची. त्यामुळे अस्सल गणितज्ञांच्या दृष्टीने ती अगदी सर्वोच्च शाखांपैकी एक होती. कार्ल गाउस या महान गणितज्ञाने असे विधान केले की, "नंबर थिअरी ही गणिताची राणी आहे. आणि राणीचे हात नेहेमीच स्वच्छ राहतात!" अर्थात ... व्यावहारीक उपयोगांमध्ये ज्ञानाचे उपयोजन केल्याने ज्ञान अपवित्र होते! कोणाला पटो ना पटो ... अस्सल संशोधक मात्र या विचारधारणेशी एकनिष्ठ राहतात. किंबहुना या विचारधारणेशी एकनिष्ठ राह्तो तो अस्सल संशोधक.

असो ... तर मागील २०-३० वर्षे त्यामानाने भौतिकशास्त्रामध्ये कोरडी गेली. अगदी मूलभूत वाटावे असे शोध लागले नाही आहेत. तथाकथीत मूलभूतकणांचा शोध घेता घेता असे आढळुन आले की त्यांची संख्यादेखील २-४-१० नाही तर शेकड्यांमध्ये आहे. सध्या शास्त्रज्ञांनी हे मान्य केले असावे की ते थकथीत मूलकण अजूनही लहान कणांद्वारे बनले असतात. यातील बरेचसे कण हे डोळ्याला तर सोडाच परंतु परिक्षागृहातदेखील दिसले नाही आहेत. केवळ तर्काच्या आधारे त्यांचे अस्तित्व सिद्ध केले आहे! कोणी म्हणेल मग त्याचा उपयोग काय? पण उपयोग असायलाच हवा का? उपयोग .... उपयोग म्हणजे या शरीराचे चोचले.... कोणी तर ग्रीक तत्वज्ञ म्हणाला आहे की, "आय थिंक देअरफोर आय ऍम". मी विचार करतो म्हणून मी आहे! तर ही जिज्ञासाच खरी! जॅकोबी नावाच्या गणितज्ञाला विचारले की तुम्ही गणिताचा अभ्यास का करता. त्यावर त्याने उत्तर दिले ...."टू ऑनर द ह्युमन स्पिरिट" - मनुष्यत्वाच्या सन्मानाप्रित्यर्थ! आपल्याकडेही मुक्तिचे चार मार्ग सांगितले आहेत - ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि योगमार्ग. पैकी ज्ञानमार्ग हाच सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. पाश्चात्य संस्कृतिमध्ये जीवनाचे उद्दिष्ट आनंद मानले आहे. भारतिय संस्कृतिमध्ये ज्ञान हे उद्दिष्ट मानले गेले आहे. आपली पुरातन ज्ञानाधिष्ठित संस्कृति ज्ञान संकुचित ठेवल्यामुळे ज्ञानोपासनेपासुन दूर गेली हे मोठे दुर्दैव.

असो ... परंतु आज भौतिकशास्त्राचे पारितोषिक दोन वेगवेगळ्या शोधांसाठी दिले गेले. पहिला शोध होता संगणिकिकृत छायाचित्रकारितेसाठी आणि दुसरा प्रकाशसंदेश पोहोचवणारे काचतंतु (अर्थात ... फायबर ऑप्टिक ) शोधुन काढण्यासाठी दिला गेला.

दोन्ही शोध अतिशय महान आहेत त्यांनी मानवी जीवन सुखकर झाले आहे.... परंतु माझा जीव कुठेतरी हळहळला (उगाचच ! हो की नाही!). भौतिकशास्त्राची संगत सोडली ९३ साली.... परंतु प्रेम तिथेच आहे. अस्सल संशोधक होता नाही आले तरीही त्यांची वेदना कळु शकते.

दुसर्या टोकाने विचार करायचा झाला तर आपल्याकडे असेही राजे होऊन गेले आहेत (खरे खोटे पुराण जाणे) राजा रन्तिदेवांसारखे जे म्हणतात, "न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम कामये दु:खतप्तानाम प्राणिनां आर्तिनाशनम" - मला राज्य नको, स्वर्ग नको आणि मुक्तिही नको. फक्त दु:खितांचे दु:ख हरण करण्याची इच्छा आहे.

राजा रंतिदेव बरोबर की कार्ल गाऊस? मला वाटते दोघेही बरोबर आहेत. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे "जो जे वांछिल तो ते लाहो". मी इतकेच म्हणेन की तुला दोन्हीची गोडी लागो, आणि एकाचा ध्यास लागो.