Monday, July 25, 2011

पुन्हा हवाई - भाग ३ (कवाईचे हिन्दु मंदिर)

आपण सुर्यास्त पाहताना पिअर वर भेटलेल्या "सिसिलिअन" बाईने आपल्याला हिन्दु टेम्पल ऑफ कवाईला जरुर भेट द्यावी असा सल्ला दिला. आपण तिथे जाणार होतोच. परंतु तिच्या सल्ल्यामुळे निश्चय अजुनच पक्का झाला. देवळानंतर बोटीने कवाई च्या बेटाला फेरा मारण्याचा बेत होता. आपण कवाईच्या बेटाला रस्त्याने पूर्ण वळसा घातला होता. परंतु मोठमोठ्या पर्वतांमुळे कवाई पाहताना जर संपुर्ण बेटाचे सौंदर्य न्याहाळायचे असेल तर रस्त्याने, आकाशातुन तसेच समुद्रातुन पाहणे आवश्यक आहे. त्याशिवाय कवाईचा अनुभव पूर्ण होत नाही.  बोटीची सफर आरक्षित करण्यासाठी फोन केला तर लक्षात आले की ना-पाली किनाऱ्याजवळचा समुद्र इतका उधाणलेला असतो की पाच वर्षाखालील मुलांना बोटीवर घेऊन जाण्यास मनाई आहे. मग विचार केला की आकाशातुन हेलिकॉप्टर ची सफर करायची तर कमीत कमी दर डोई २५० डॉलर्स मोजावे लागणार होते. शेवटी छोट्या विमानाचे दर योग्य म्हणजे १२५ डॉलर्स आणि दादाला शंभर आणि तुला चकटफु होते. विमानाची सफर आरक्षित केली. खरेतर कवाई हेलिकॉप्टरनेच बघायची इच्छा होती कारण हेलिकॉप्टर हे कमी उंचीवर आणि कड्याकपारींच्या अगदी जवळ जाऊन स्थिर राहु शकते. परंतु अगदिच काही न पाहण्यापेक्षा बरे असे समजुन विमानाने जाण्याचे ठरले.

त्या दिवशी अगदी लवकरच होटेल सोडले. देऊळ आणि विमानसफर ही दोन्ही आकर्षणे लिहुई विमानतळाजवळच होती. परंतु मध्ये कापा या गावामध्ये ट्रॅफिक जॅम मध्ये बराच वेळा जातो. देवळात जाण्याचा रस्ता खूपच मोहक होता. देऊळही खुपच सुंदर वातावरणात वसलेले आहे. देवळात प्रवेश करण्याआधी जर कोणीही आखुड कपडे घातले असतील तर प्रथम लुंगीसारखे "सरॉन्ग" नावाचे वस्त्र नेसावे लागते. हे देऊळ खरेतर नुसते देऊळ नाही तर एक मठ आहे. त्याचे नावच मुळी "कवाईज हिन्दु मोनॅस्टरी" असे आहे. एकनाथांनी जरिही मठांवर कडकडित टीका केली असली तरीही परदेशातील हा मठ बघुन बरे वाटले कारण कुठेतरी धर्माच्या रक्षणासाठी संरचना शिस्त आणि कर्मठपणा आवश्यकदेखील आहे (इति बाबा!).
कवाईचे हे देऊळ अगदि पारंपारिक दक्षिण भारतिय तमीळ शैव परंपरेतील आहे. या देवळाची स्थापना गुरुदेव (गुरुडेव - इति मठातिल अमेरिकन रहिवासी) शिवाय सुब्रह्मण्यस्वामी यांनी केली. गुरुदेव जन्माने आणि वर्णाने श्वेतवर्णीय असुनदेखील वयाच्या वीसाव्या वर्षी, १९४७ साली, श्री लंका आणि भारतामध्ये हिन्दु धर्माचा अभ्यास करण्यासाठी गेले. पुढे दोन वर्षांनी सिद्धयोगी आणि शिवभक्त ज्ञानगुरु योगस्वामी (श्री लंका) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संन्यास घेतला. पाश्चीमात्य देशांमध्ये हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदेव अमेरिकेला परतले.
मंदिर आणि मठासाठी शांत निसर्गरम्य जागेच्या शोधात गुरुदेव माऊईला पोहोचले. परंतु तिथे होटेल्समध्ये जागा नसल्यामुळे, ते कवाईला आले. इथे फिरत असताना सध्याची ४५८ एकर जागा त्यांच्या दृष्टीस पडली. शिष्याला सांगुन त्यांनी जागेच्या मालकाला जागाविक्रीसंदर्भात अपेक्षित मोबदला विचारले असता मालकाने जागा विकायला नसल्याचे स्पष्ट सांगीतले. गुरुदेवांना देवळासाठी हीच जागा योग्य वाटल्याने त्यांनी पुन्हा शिष्याकरवी एक ठरावीक रक्कम मोबदला म्हणुन देऊ करुन ही जागा विकत घेण्याची इच्छा प्रकट केली. शिष्य परत जागामालकाकडे जायला कचरला परंतु गुरुदेवांना नाही कसे म्हणायचे म्हणुन परत गेला. थोड्या दिवसांनी जागामालकाचे मन आपोआप वळले आणि योग्य मोबदल्यात त्याने ही जागा देवळासाठी दिली.
जागा घेतल्यावर, मग देवळाचे आणि मठाचे सर्व बांधकाम हे बंगळुर्मध्ये तिथला पांढरा ग्रेनाईट वापरुन केले. अजुनही काम चालु आहे. बंगळुर मध्ये तयार केलेले हे भाग समुद्रमार्गे कवाईत आणुन इथे भारतिय कारागिरांनी जोडले आहेत. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीलाच एक उंच विजयस्तंभ दिसतो. भारतात फक्त जैनांच्या मंदिरांमध्ये आपण तो पाहिलेला. त्या स्तंभानंतर लगेचच एक भव्य नंदी पूर्ण पाषाणातुन घडवलेला. किमान ६ फुट तरी उंच मुर्ती ६ फुट उंचीच्या चौथऱ्यावर विराजमान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सहा फुट उंचीची ब्रॉन्झची नटराज मुर्ती आणि शिवलिंग आहे. गुरुदेवांनी ५० वर्षांहुन अधिक काळ हिन्दु धर्माच्या सेवेला वाहुन घेतले. ते अतिशय शिस्तबद्ध आणि पारंपारिक गुरु म्हणुन प्रसिद्ध होते. २००१ साली त्यांचे देहावसान झाल्यावर मठाची सुत्रे सद्‍गुरु बोधिनाथ यांच्याकडे आली.

मंदिराचे आवार स्वच्छ, निसर्गरम्य आणि पक्षांच्या किलबिलाटाने गजबजलेले आहे. मठात बहुतेक गोरेच लोक पाहुन आम्हाला गंमत वाटली. ते अगदी मनोभावे या मंदिराची सेवा करताना दिसतात. त्यांचे राहणीमान सुद्धा अगदी साधे आहे. बहुतेक स्त्रीया रंगीबेरंगी साड्या तर पुरुष पांढरी लुंगी नेसुन वावरताना दिसतात. अश्याच एका पांढऱ्या रंगाची साडी नेसलेल्या, कपाळावर काळे गंध लावलेल्या आणि गळ्यात रुद्राक्ष घातलेल्या एका गोऱ्या शालिन तसेच मृदुभाषिक स्त्रीशी ओळख झाली. तिचे नाव चामंडी. अमेरिकन नाव विचारले नाही. वय वर्षे अवघे ८५ परंतु दिसायला ६५-७०ची दिसत होती. ती मुळची कॅलिफोर्निआ ची. भारतात २-३ वेळा नवऱ्यासोबत जाऊन हिन्दु धर्माचा अभ्यास करुन आलेली. तिच्याशी बोलता बोलता कळले की तिला २ मुले आणि ४-५ नातवंडे आहेत. नवरा गेल्यानंतर तिने स्वत:ला या मठासाठी वाहुन घेतले आहे.
मंदिराचा सर्व खर्च देणग्यांतुन किंवा मठात असलेल्या हिन्दु धर्माच्या माहितीप्रकाशनांच्या विक्रीतुनच होतात. मठाची संपूर्ण माहिती घ्यायची असेल आणि तेथील कामकाज पाहायचे असेल तर आरक्षण करावे लागते. अथवा फक्त दर्शनावर समाधान मानावे लागते.
मंदिराचा परिसर बघताना एक-दीड तास कसे गेले ते कळलेच नाही. सर्व मठाची आरक्षित सहल करायला हवी होती अशी हळहळ जरुर वाटली. परंतु बाहेर पडताना मन अगदी प्रसन्न झाले. या गोऱ्या माणसांचे हिन्दु धर्मावरील प्रेम (नव्हे भक्ती) बघुन आनंदही वाटला. तसे पाहिले तर इथे बऱ्याच माणसांचे योगसाधनेवरचे प्रेम पाहिले होते. परंतु मठ उभारणीपासुन ते तन्मयतेने तो चालवत हिन्दु धर्माच्या प्रसारासाठी झटणारे गोरे लोक पाहण्याची ही पहिलीच वेळ!
घड्याळाचा काटा भराभर पुढे सरकत होता. आपल्यालाही विमानाची नियोजित सहल करायची होती त्यामुळे वेळेत विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. आपली गाडी परत एकदा नागमोडी रस्त्याने विमानतळाकडे धावु लागली. मोठमोठे डोंगर व त्यातुन वाहणारे छोटे मोठे धबधबे बघत विमानतळ कधी आला ते समजलेच नाही.

Friday, July 22, 2011

सेव्हन अप, सिएरा मिस्ट आणि १५००० डॉलर्स

सलोनीराणी, तुझी आई सध्या हवाई बद्दल लेख लिहिते आहे. परंतु मध्यंतरी हा अजुन एक लेख .. अर्थात विमानातुनच!

 

परवा एक गंमतीशीर बातमी वाचण्यात आली. कॅनडामध्ये एका माणसाने एका विमान कंपनीवर खटला भरला की त्याने त्यांना सेव्हन अप प्यायला मागीतले आणि त्यांनी सिएरा मिस्ट दिले. न्यायालयाने या माणसाच्या बाजुने निकाल दिला आणि त्याला तब्बल पंधराएक हजार डॉलर्स नुकसान भरपाई दिली आणि वर ७५ सेन्ट्स - सेव्हन अपची किंमत म्हणुन!

 

बातमी वाचुनच मला कळले की हे दिसते तेव्हढे सरळ प्रकरण नाही. बातमी रंजित - अतिरंजित आणि रक्तरंजित करण्यामध्ये सर्वच वर्तमानपत्रे आघाडीवर असतात. भारत काय किंवा अमेरिका काय! परंतु एमबीए करताना न्याय हा एक विषय आम्हाला होता. त्या विषयाचा अभ्यास करताना शिकलो की वर्तमान पत्रात काय लिहिले या वरुन कोणी दोषी किंवा निर्दोषी आहे असे म्हणणे अगदी चुकीचे आहे.

 

त्या वर्गाच्या पहिल्याच तासाला अ‍ॅन लिव्ही या आमच्या शिक्षिकेने असा एक चांगला धडा दिला की तो कधी विसरणार नाही. तिने वर्गातल्यापडद्यावर वेगवेगळे मथळे असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्या दाखवल्या. मथळे थोडेसे वेगवेगळे परंतु साधारण सारखेच होते. "बाईने आपल्या मांडीवर कॉफी सांडली आणि मॅक्डोनल्डवर खटला भरुन करोडो डॉलर्स उकळले". बातमी वाचुन ९०% माणसे म्हणतील अमेरिकेत कोण कोणावर कशाहीबद्दल खटला भरतात आणि न्यायालयांनी पण अक्कल गहाण टाकली आहे. काही निकाल लावतात. आमच्या शिक्षिकेने आम्हाला विचारले की किती लोकांना ही बातमी वाचुन असे वाटते आहे की त्या बाईला भरपाई मिळायला हवी? काही लोकांनी हात वर केले. तिने पुन्हा विचारले, "किती लोकांना वाटते की न्यायालयाची अक्कल चरायला गेली आहे!" - उरलेल्या लोकांनी हात वर केले. त्यावर ती म्हणाली "दोन्ही उत्तरे योग्य नाहीत. अशी वर्तमान पत्रातील बातमी वाचुन काहीच सांगता येणे कठीण आहे. त्यासाठीच न्यायालयाच्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने पुराव्याने दोष सिद्द केला गेला पाहिजे. तेव्हा खरी घडलेली गोष्ट अशी होती.

 

एक ७०-७५ वर्षाची वृद्ध स्त्री मॅक्डोनल्डच्या ड्राईव्हथ्रु मध्ये आली. तिने कॉफी मागीतली. मॅक्डोनल्डच्या कर्मचाऱ्याने कॉफी दिल्यावर तिने तो कप दोन पायांच्या मध्ये ठेवला आणि पैसे काढु लागली. वृद्ध असल्यामुळे शरीराला कंप होता आणि तो कप तिच्या दोन पायांच्या मध्ये लवंडला. कॉफीचे तपमान १६५ अंश फॅरेनहाईट होते. त्यामुळे त्या स्त्रीच्या कमरेपासुन मांडीपर्यंत थर्ड डिग्री बर्न्स झाले. थंडी असल्यामुळे आणि वृद्ध असल्यामुळे त्या स्त्रीने थर्मल्स घातले होते. त्या थर्मल्समध्ये ती सगळी कॉफी शोषली गेली आणि त्यामुळे कोणाला काही कळेपर्यंत आणि ते थर्मल्स काढेपर्यंत चांगलाच उशीर झाला. तोपर्यंत त्या उष्णतेने तिला अजुनच भाजत राहिले आणि पुढे ती वृद्धा उरलेल्या आयुष्यासाठी अपंग झाली.

 

मग यात मॅक्डोनल्डचा दोष कसा काय? तर मॅक्डोनल्डला कॉफी एका विशिष्ट तपमानाला विकण्याची अनुमती होती. परंतु सरकारी नियम धुडकावुन लाऊन मॅक्डोनल्ड कॉफी १५-२० अंश जास्त गरम विकत असे. असे करण्याचे कारण म्हणजे कॉफी जास्त काळ गरम राहते आणि ग्राहक तिचा जास्त काळ आस्वाद घेऊ शकतात. आणि अर्थातच म्हणुन लोक मॅक्डोनल्ड कॉफी विकत घेतील. न्यायालयाने नियम धुडकावल्याबद्दल आणि त्या वृद्धेला झालेल्या वेगनांबद्दल मॅक्डोनल्डला दोषी ठरवले. आणि त्या वृद्धेला शारीरीक आणि मानसीक आणि आर्थिक नुकसानभरपाईखातर मॅक्डोनल्डला मोठा दंड ठोठावला. इतकेच नाही तर शिक्षात्मक (प्युनिटिव्ह) दंड त्याच्या कित्येक पट ठोठावला.

 

हे सगळे ऐकुन आम्ही सर्व थक्कच झाले. माझे तर डोळेच उघडले. त्यामुळे मी आता कुठलीही बातमी वाचुन कधीच कोणाला दोषी किंवा निर्दोषी ठरवत नाही.

 

असो ... तर मग या कॅनडाच्या माणसाचे काय झाले? तर त्याचे असे झाले की तो माणुस होता फ्रेंच. कॅनडा हा देश इंग्रज आणि फ्रेंच लोकांचा देश आहे. दोन्ही भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव आहे आणि मराठी कानडी लोकांपेक्षा जास्त कुरबुर चालते तिथे. केबेक नावाच्या प्रांतात फ्रेंच लोक जास्त आहेत. त्यांनी निवडणुक घेतली की कॅनडापासुन वेगळे व्ह्यायचे की नाही. अगदी अर्ध्या टक्क्याने की काय परंतु केबेक कॅनडापासुन वेगळे होता होता वाचले. परंतु तरीही फ्रेंच लोकांमध्ये अतिशय असंतोष आहे. तर या माणसाचे म्हणणे असे की त्याने फ्रेंच भाषेतुन त्या विमान सुंदरीला सेव्हन अप मागीतले. तिने कळलेन कळल्यासारखे करुन त्याला सिएरा मिस्ट दिले. इतकेच नाही तर संपुर्ण विमानप्रवासातच त्या विमान कंपनीशी फ्रेंच भाषेत त्याला व्यवहार करणे अगदी अवघड झाले होते. कोणत्याही सूचना, पाट्या फ्रेंच भाषेत नव्हत्या. त्याव्यतिरिक्त  त्याला टोरोंटो आणि अन्य शहरामध्ये देखील सगळीकडे वाईट अनुभव आले. इंग्लिश बोलल्याशिवाय त्याला कुठेही कामे करता आली नाहीत आणि वर उपेक्षेची वागणुक मिळाली. कॅनडामध्ये बरेच फ्रेंच लोक असल्यामुळे त्यांना फ्रेंच भाषेतुन सेवा उपलब्ध करुन द्यायला हव्यात असे त्याचे म्हणणे न्यायालला पटले. आणि त्याची मानसीक, सांस्कृतिक आणि भाषिक हानी केल्याबद्दल न्यायालयाने विमान कंपनीला १०-१५००० डॉलर्सचा दंड ठोठावला.

 

अर्थात त्यावर इंग्रज मंडळींनी अतिशय मार्मिक टीका केली हे सांगणे न लगे. साहेबामध्ये काही फार मोठे गुण आहेत. साहेबाची जात अतिशय संयमी आणि मार्मिक आहे. तोल ढळणे हे इंग्लिश माणसाचे लक्षण नाही. त्याउलट मराठी माणुस काही झाले की एकदम रस्त्यावर. त्यामुळे पाट्या मराठीत असाव्यात अशी साधी मागणी देखील मान्य होत नाही. आणि आपला आवेश हा आवेश कमी आणि अभिनिवेशच जास्त असतो. खरोखरीच माणुस आग्रही असेल कशाच्याबाबत तर तो आग्रह साध्या साध्या गोष्टींतुन दिसतो. अमेरिकेत मारे गणेशोत्सव आणि गौरी आणि काय काय साजरे करायचे आणि सकाळमध्ये त्याचे भारंभार लेख लिहायचे. आणि सगळ्यांचे मथळे अगदी ठरावीक - "पॅरिसमध्ये दिवाळी साजरी" "पीट्सबर्गमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष" - "सिडनीमध्ये .... ". आणि ९०% लोकांच्या पोरांना धड मराठी बोलता येत नाही. असो .. टीका करण्याची गरज नाही. परंतु सगळ्या समाजालाच एक जो पीळ असायला हवा तो कमी पड्तो आणि मग आपण रडत बसतो की आमच्या संस्कृतीवर आणि भाषेवर आक्रमण होते आहे. आम्हीच आमच्या भाषेचा आग्रह धरला नाही तर काय दुसऱ्यांनी धरायचा!

 

असो त्यावरुन आठवले. सिद्धोबा आजकाल मराठी अक्षरे गिरवतो आहे. मराठी बोलता चांगले असल्यामुळे स्वारी लिहायला पटकन शिकेल असे वाटते आहे. ... पुरे आता इथेच थांबतो.

 

 

Friday, July 15, 2011

पुन्हा हवाई - भाग २

दुसऱ्या दिवशी आपण सगळे जरा निवांतच उठलो. ब्रेकफास्ट झाल्यावर तू आणि दादा पोहायला गेलात. तोपर्यंत मी स्वैपाक करुन ठेवला. हो.... स्वैपाकच! कारण आपण १ बेडरुम आणि किचन असा स्वीट घेतला होता. कुठेही फिरायला जातानादेखील पोटाची काळजी घ्यावीच लागते. नाहीतर कितीही आव आणला तरीही निसर्ग बघुन मन भरेल पण पोट नाही. कवाईत अतिशय महागाई आहे. त्यातुन आपण जिथे राहिलो ते प्रिन्सव्हिल अगदि सुंदर, ना-पाली किनाऱ्याजवळचा सधन लोकवस्तीचा भाग होता. त्यामुळे महागाई भयंकर. दीड डॉलर्सला एक बटाटा, ६.५ डॉलर्स ला दुध. ४ डॉलर्सला एक ब्रेड इत्यादि इत्यादि ..... असो....

मी फिनिक्सवरुनच भाजी साठी लागणाऱ्या गोष्टी - नान आणि खिचडीचे सामान आणले होते. त्यामुळे आपल्याला एव्हढा त्रास झाला नाही. जेवण करुन थोडी विश्रांती घेऊन काय पाह्यचे याचे संयोजन केले. तसा आधी रिसर्च केला होताच परंतु मग वाटले की सरळ स्थानिक माणसांनाच विचारले तर? हॉटेलच्या कॉन्सिअर्ज मधुन माहिती घेऊन बाहेर पडेपर्यंत दिवस संपत आल्यामुळे जवळच "हाना-ले बे"वर सुर्यास्त बघायचे ठरले. दहा मिनिटात तिथे पोहोचलो. सुर्यास्ताची वेळ झाली होतीच. नुकतीच पावसाची एक सर येउन गेली होती. लगबगीने पिअर(पाण्याच्या आत १०० एक मीटर पर्यत बांधलेला लाकडी पूल आणि त्याच्या शेवटी असलेला चौथरा) कडे जायला लागलो. तर एक गोरी बाई म्हणाली, "मागे पाहिलेस का? दुहेरी इन्द्रधनुष्य दिसतंय!" आम्ही पहिल्यांदाच असे इन्द्रधनुष्य बघत असल्यामुळे मी त्याबद्दल तिला कुतुहलाने विचारले. त्यावर ती म्हणाली की इथे बऱ्याचदा असे  पूर्ण क्षितिजाला व्यापुन टाकणारे दुहेरी इंद्रधनुष्य दिसते. कधी कधी तर तिहेरीही दिसते! अश्याच गप्पा मारत असताना आम्ही फिनिक्स वरुन आलो आहोत हे कळल्यावर ती आम्हाला सांगु लागली,"मीही तिथुनच आले आहे." मग कळले की ही बाई अभियांत्रिकीची पदवी घेऊन इंटेल मध्ये काम करत होती. तरुणपणीच कवाईला २० व्यावर्षी फिरायला म्हणुन आली आणि कवाईच्या प्रेमातच पडली आणि इथेच स्थाईक झाली. आता एका शाळेमध्ये (हाय स्कुल) विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवते. गप्पा मारता मारता तिने विचारले आम्ही मुळचे कुठुन आलो. भारतीय म्हणल्यावर ती म्हणाली की मी कल्पना करु शकते की पालक म्हणुन तुम्हाला काय आव्हानांना  सामोरे जावे लागत असेल. माझे आईवडिलदेखील तुमच्यासारखेच मला घेऊन अमेरिकेला आले. त्यांना त्यांच्या सिसिलिअन संस्कृतीचा अतिशय अभिमान होता. त्यामुळे मी जसजसी मोठी होत गेले आणि अमेरिकन मुला मुलींसारखी वागु लागले तेव्हा माझे वडिल चिडुन मला म्हणत, "ओह.... यु अमेरिकन...." त्यांना वाटे की मी सिसिलिअन पद्धतीनेच वागावे. तिचे हे बोलणे ऐकुन आम्ही म्हणालो, "सिसिलि म्हणजे इटली ना?". त्यावर आपला सात्वीक संताप आवरत ती म्हणाली "नाही. सिसिली मागची फक्त १००-१५० वर्षे इटलीचा भाग आहे. परंतु खरेतर सिसिली वेगळा आहे." आम्ही कपाळावर हात मारला आणि मनात हसु फुटले. शेवटी माणसे इथुन तिथुन सारखीच!

अश्याच थोड्याफार गप्पा होई पर्यंत आता चांगलाच अंधार झाला होता. त्यामुळे आपण होटेल वर परतलो.

आत्तापर्यंत माऊई चेच सौंदर्य सरस वाटत होते. परंतु आज फिरल्यावर लक्षात आले की कवाई देखील तितकेच सुंदर आहे. तशी दोन्हीची तुलना करणे योग्य नाही कारण माऊई हे बऱ्यापैकी सपाट, सरळ रस्ते असलेले, उसाच्या शेतीने बहरलेले बेट आहे. तर कवाई म्हणजे मोठमोठे पर्वत, नागमोडी रस्त्यांचे, नारळाच्या बनांनी नटलेले बेट आहे. दोन्हींचे सौंदर्य तितकेच मोहक आहे.

तिसऱ्या दिवशी आपण पॅसिफिकमधील ग्रॅण्ड कॅनिअन म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या वायमेया कॅनिअन ला गेलो. आपण रहात असलेल्या ठिकाणापासुन ही कॅनिअन अतिशय जवळ आहे. परंतु उत्तरेला रस्ता थांबतो कारण ना-पाली किनाऱ्यावर २-४ ह्जार फुट उंचीचे डोंगर थेट अगदी समुद्रालाच भिडतात. कॅनिअन त्या डोंगरांच्या एका बाजुला आणि प्रिन्सव्हिल दुसऱ्या बाजुला असल्यामुळे संपुर्ण बेटाला वळसा घालुन जावे लागते. रस्ता अतिशय वळणावळणाचा असल्यामुळे कॅनिअन ला पोहोचेपर्यंत तुम्ही दोघे अगदी कंटाळुन गेला होता. कॅनिअनला पोहोचल्यावर तुम्ही दोघे कोंबड्यांच्या मागे पळण्यातच गुंग होता. अरे हो ... कवाईला रूस्टर कंट्री असे देखील म्हणतात. कारण जागोजागी कोंबडे सगळ्या कुटुंबासह फिरताना दिसतात. कधीतरी कुठल्यातरी वादळानंतर इथे कोंबड्या आल्या म्हणे आणि त्यानंतर त्यांची संख्या वाढतच गेली म्हणे!

कॅनिअन १६ किलोमीटर लांब आणि 3600 फुट खोल आहे. कॅनिअन सुंदरच आहे परंतु आपण ग्रॅण्ड कॅनिअन ३०-४० वेळा तरी पाहिल्यामुळे आपण काही वायमेया बघुन प्रभावित झालो नाही. ग्रॅण्ड कॅनिअन ४० मैल रुंद, १ मैल खोल आणि ३०० मैल लांब आहे!

वायमेया कॅनिअन मधे बरेचसे हायकिंग ट्रेल्स आहेत. कदाचित ते करता आले असते तर जास्त मजा आली असती. परंतु तुला घेऊन ते शक्य नव्हते म्हणुन मग फक्त १/२ - ३/४ मैल ना-पाली किनाऱ्याच्या कडेकडेने डोंगरपठारावरचा एक ट्रेल केला. परत कारकडे येता येता वाटेत माउण्ट वाई-आले-आले पर्वतावर फोटो काढला. ही जागा जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणुन प्रसिद्ध आहे. पॅसिफिक समुद्रातुन पाण्याची वाफ आणि त्याचे ढग होऊन या डोंगरांच्या फनेलसारख्या आकारामुळे इथे येउन बरोबर थंड होतात आणि रोज दुपारी पाऊस पडतो. स्थानिक पर्यटन विभाग जरीही जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणुन या जागेचा प्रचार करत असले तरीही गिनिज बुक मध्ये नोंद झालेली पहिली दोन ठिकाणे भारतात मेघालयात आहेत. माऊण्ट वाई-आले-आले हा कवाईतील  दुसऱ्या क्रमांकावरील उंच पर्वत असुन १९१२ पासुन इथे ६८३ इंच इतका सरासरी पाऊस झाला आहे. चेरापुंजी आणि इथल्या पावसातला फरक म्हणजे इथला पाऊस रोज पडतो परंतु चेरापुंजीचा पाऊस ऋतुकाळानुसारच पडतो.

कॅनिअन बघुन परत होटेल वर पोहोचेपर्यंत रात्र झाली. दुसऱ्या दिवशी काय बघायचे याचे नियोजन करुन उरलेला वेळ आपण होटेल वरच घालवला.


Saturday, July 2, 2011

पुन्हा हवाई - भाग १

सलोनीराणी,

दादाच्या स्प्रिंगब्रेक मध्ये १४ मार्च ते २१ मार्च आपण हवाईला जाऊन आलो. बाबा नुकताच भारतात कामानिमित्त जाऊन आल्यामुळे डिसेंबरमध्ये कुठेही जाता आले नव्हते. त्यामुळे एक चांगली सहल करण्याचे ठरले. अजुनही कित्येक वर्षे ठरवुन देखील "यलोस्टोन नॅशनल पार्क" किंवा माऊण्ट रशमोर चा योग जुळुन आला नाही आहे. या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी हिवाळा योग्य ऋतु नसल्यामुळे शेवटी परत एकदा हवाईलाच जाण्याचे ठरले. मागच्यावेळी हवाईला (माऊईला) गेलो तेव्हा वाटले की अजुन ३-५ दिवस तरी राहायला हवे होते. हवाईसारख्या निसर्गरम्य ठिकाणी कुठेही गेले तरीही निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्यासाठी निवांतपणा हवाच. याचा प्रत्यय कोलोरॅडो आणि अलास्का सहलींमध्ये आलाच होता. त्यामुळे यावेळी ७ दिवस तरी जायचे ठरले. पैकी कवाई बेटावर ५ दिवस आणि हनलुलु आणि आणि बिग आयलंड वर प्रत्येकी १ आणि २ दिवस रहायचे ठरले.

प्रथम फिनिक्स वरुन आपण कोना या बिग आयलंडवरच्या विमानतळावर पोहोचलो. सहा तासांचा प्रवास असला तरीही हवाई ३ तास मागे असल्यामुळे तो दिवस वाया जाणार नव्हता. बिग आयलंड हे हवाईचे सर्वात मोठे बेट आहे. साधारणत: ६०-७० मैल रुंद असे हे बेट आहे. विमानतळावर उतरताना आजुबाजुला लाव्हारसामुळे करपलेले डोंगर पाहुन क्षणभर निराशाच झाली. परंतु ब बिग आयलंडचे तेच आकर्षण आहे. इथे जिवंत ज्वालामुखी आहे. असो .. परंतु ते परतीच्या प्रवासात पहाणार होतो.

विमानतळही अगदीच लहान होता. पुढचे विमान माऊई आणि तेथुन थेट कवाईचे होते. तोपर्यंत दुसऱ्या विमानाची वाट पहात थांबलो. शेवटी थोडे उशीरा परंतु आयलंड एअर चे छोटेसे विमान आले. कोना ते कवाई (लिहुई - विमानतळ) हे अंतर विमानाने जेमतेम दीड तास होते ... तेदेखील माऊईचा स्टॉप धरुन. विमान इतके छोटे होते की आम्हाला विमानात सगळीकडे वजन सारखे व्हावे अश्या पद्धतिने बसवले. इंजिन्सदेखील पंख्याची होती. विमान हवेत गेल्यावर हवाईच्या हवाई सुंदरीने खास पेरुचा रस आणि खोबऱ्याची कॉफी देऊन आमचे स्वागत केले. त्यांचा आस्वाद घेता घेता ती हवाईची माहिती देऊ लागली ते आम्ही ऐकु लागलो.

पहिल्यांदा काहुलावे बेटाबद्दल ती म्हणाली "हे बेट निर्मनुष्य आहे कारण दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने सैन्याच्या दारुगोळा प्रशिक्षणासाठी याचा वापर केला. ताज्या पाण्याच्या कमतरतेमुळे या बेटावर तशीही कमीच लोकवस्ती होती इथे. त्यामुळे हे बेट तसेही क्षेपणास्त्र चाचणी साठी चांगले होते. १९९० पासुन अनेक निदर्शनांनंतर लाइव्ह फायर ट्रेनिंग वर बंदी आणण्यात आली. परंतु एव्हाना हे बेट मनुष्यवस्ती साठी उपयुक्त राहिले नाही."

असे म्हणत असतानाच उजवीकडे मोलोकिनी नावाचे समुद्र विवर दिसले. चंद्रकोरीसारखे हे विवर खरोखरीच सुंदर आहे. इथे समुद्र अतिशय शांत असल्यामुळे बरेच प्रवासी माऊईहुन बोटीने येऊन स्नोर्केलिंग स्कुबा डायव्हिंग करतात आणि समुद्री जीवन अगदी जवळुन पाहतात.

पाहता पाहता माऊई दिसु लागले. असे वाटले की कालच इथे येऊन गेलो आहोत. माऊईवर विमान क्षणभर उतरले ... आणि तिथल्या प्रवाश्यांना घेऊन अर्ध्या तासाच्या आत आम्ही कवाई कडे प्रयाण केले. वीस मिनिटांच्या अंतरावर डावीकडे प्रथम लनाई बेट दिसले. लनाई हे हवाईमधील अगदीच अनटच्ड बेट असल्यामुळे इथे खुपच महागडी रिसॉर्ट्स आहेत की जी अतिश्रीमंतांनाच परवडतात. इथली लोकसंख्या जेमतेम ७  हजार आहे आणि हवाईची मुळ संस्कृती इथे टिकुन आहे - इति हवाई सुंदरी! अरे हो ... आणि इथेच डोल कंपनीची अननसाची भलीमोठी शेती देखील आहे.

लनाईनंतर उजवीकडे लगेच मोलोकाई देखील होते परंतु दिसले नाही. मोलोकाईवर हवाईमधील एका वसाहतीमध्ये पूर्वी वेगळे केलेल्या कुष्ठरोग्यांना ठेवले जाई. अजुनही इथे सात कुष्ठरोगी आहेत. वर्षातुन फक्त एकदाच त्यांना वर्षभर पुरतील अश्या जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जातो.

थोडे पुढे गेले तर परत उजवीकडे ओवाहु बेट दिसले. हनलुलु हे शहर ओवाहु बेटावरील मुख्य शहर आहे. हनलुलु ही अमेरिकेच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचे जन्मगाव ही हवाईची राजधानी आहे. ९५% लोकसंख्या इथेच आहे. असो परंतु इथे आपली गाडी अजुन ६ दिवसांनी येणार आहेच. त्यामुळे त्याबद्दल नंतर...

अजुन वीस मिनिटात कवाईला पोहोचलो देखील. कवाईला उतरण्याआधी वायव्य दिशेला (उत्तर-पश्चिम) नि-हाऊ हे बेट दिसले. हे बेट पर्जन्यछायेत असल्यामुळे इथले लोक १८ व्या शतकात कवाईला स्थलांतरीत झाले. त्यानंतर सिनक्लेअर आणि आज रॉबिन्सन कुटुंबिय इथे रहातात.  ते आणि अमेरिकन सैनिकतळ मिळुन १३० लोक असावेत.

लिहुई विमानतळावर उतरल्यावर भाड्याची कार घेऊन होटेलवर जाऊ लागलो. आपण कवाईच्या उत्तर भागात प्रिन्सव्हिल मध्ये राह्यचे नक्की केले होते. लिहुई दक्षिणेला असुन तिथे रोज पाऊस पडतोच असे नाही. परंतु कवाईच्या उत्तर भागात रोजच पाऊस पडत असल्यामुळे इथे अगदी हिरवेगार असते. संपुर्ण बेटावर एकच मुख्य रस्ता असल्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नव्हता. ४० मिनिटात होटेलवर पोहोचलो. एव्हाना सुर्यास्त झाला होता. आपण सगळे कंटाळलो असल्यामुळे जेवण करुन झोपी गेलो.