सलोनीराणी,
विमानतळही अगदीच लहान होता. पुढचे विमान माऊई आणि तेथुन थेट कवाईचे होते. तोपर्यंत दुसऱ्या विमानाची वाट पहात थांबलो. शेवटी थोडे उशीरा परंतु आयलंड एअर चे छोटेसे विमान आले. कोना ते कवाई (लिहुई - विमानतळ) हे अंतर विमानाने जेमतेम दीड तास होते ... तेदेखील माऊईचा स्टॉप धरुन. विमान इतके छोटे होते की आम्हाला विमानात सगळीकडे वजन सारखे व्हावे अश्या पद्धतिने बसवले. इंजिन्सदेखील पंख्याची होती. विमान हवेत गेल्यावर हवाईच्या हवाई सुंदरीने खास पेरुचा रस आणि खोबऱ्याची कॉफी देऊन आमचे स्वागत केले. त्यांचा आस्वाद घेता घेता ती हवाईची माहिती देऊ लागली ते आम्ही ऐकु लागलो.
पहिल्यांदा काहुलावे बेटाबद्दल ती म्हणाली "हे बेट निर्मनुष्य आहे कारण दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने सैन्याच्या दारुगोळा प्रशिक्षणासाठी याचा वापर केला. ताज्या पाण्याच्या कमतरतेमुळे या बेटावर तशीही कमीच लोकवस्ती होती इथे. त्यामुळे हे बेट तसेही क्षेपणास्त्र चाचणी साठी चांगले होते. १९९० पासुन अनेक निदर्शनांनंतर लाइव्ह फायर ट्रेनिंग वर बंदी आणण्यात आली. परंतु एव्हाना हे बेट मनुष्यवस्ती साठी उपयुक्त राहिले नाही."
पाहता पाहता माऊई दिसु लागले. असे वाटले की कालच इथे येऊन गेलो आहोत. माऊईवर विमान क्षणभर उतरले ... आणि तिथल्या प्रवाश्यांना घेऊन अर्ध्या तासाच्या आत आम्ही कवाई कडे प्रयाण केले. वीस मिनिटांच्या अंतरावर डावीकडे प्रथम लनाई बेट दिसले. लनाई हे हवाईमधील अगदीच अनटच्ड बेट असल्यामुळे इथे खुपच महागडी रिसॉर्ट्स आहेत की जी अतिश्रीमंतांनाच परवडतात. इथली लोकसंख्या जेमतेम ७ हजार आहे आणि हवाईची मुळ संस्कृती इथे टिकुन आहे - इति हवाई सुंदरी! अरे हो ... आणि इथेच डोल कंपनीची अननसाची भलीमोठी शेती देखील आहे.
लनाईनंतर उजवीकडे लगेच मोलोकाई देखील होते परंतु दिसले नाही. मोलोकाईवर हवाईमधील एका वसाहतीमध्ये पूर्वी वेगळे केलेल्या कुष्ठरोग्यांना ठेवले जाई. अजुनही इथे सात कुष्ठरोगी आहेत. वर्षातुन फक्त एकदाच त्यांना वर्षभर पुरतील अश्या जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जातो.
थोडे पुढे गेले तर परत उजवीकडे ओवाहु बेट दिसले. हनलुलु हे शहर ओवाहु बेटावरील मुख्य शहर आहे. हनलुलु ही अमेरिकेच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचे जन्मगाव ही हवाईची राजधानी आहे. ९५% लोकसंख्या इथेच आहे. असो परंतु इथे आपली गाडी अजुन ६ दिवसांनी येणार आहेच. त्यामुळे त्याबद्दल नंतर...
अजुन वीस मिनिटात कवाईला पोहोचलो देखील. कवाईला उतरण्याआधी वायव्य दिशेला (उत्तर-पश्चिम) नि-हाऊ हे बेट दिसले. हे बेट पर्जन्यछायेत असल्यामुळे इथले लोक १८ व्या शतकात कवाईला स्थलांतरीत झाले. त्यानंतर सिनक्लेअर आणि आज रॉबिन्सन कुटुंबिय इथे रहातात. ते आणि अमेरिकन सैनिकतळ मिळुन १३० लोक असावेत.
No comments:
Post a Comment