Sunday, March 28, 2010

जपान

सलोनी

 

आत्ता मी विमानात जपानबद्दल एक लघुपट पाहिला. ऍन्थनी बोर्डेन नावाचा एक बल्लवाचार्य (अर्थात शेफ) आहे. त्याची "नो रेझर्व्हेशन्स" नावाची एक मालिका आहे. आत्ता जो भाग पाहिला तो जपान बद्दल होता. काही खरोखरीच चांगल्या गोष्टी ऐकल्या त्याबद्दल काही .....

 

जपान हे एक अद्भुत रसायन आहे. मिशिगन स्टेट मध्ये एमबीए करत असताना माझी आयजी तकागी शी ओळख झाली. आयजी माझ्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठा माझा जपानी मित्र. मिशिगन स्टेट मध्ये आमची ओळख झाली. ओसाका गॅस कंपनीमध्ये तो कामाला होता. त्या कंपनीने त्याला शिक्षणासाठी मिशिगन ला पाठवले होते. शिक्षणाचा खर्च कंपनी करत होती. अधिक ८०% पगार देखील त्याला देत होती. त्याची बायको तोमोए (ही सामुराई घराण्यातील होती) आणि मुलगी युका. तुझी आई जेव्हा लान्सिंगला आली तेव्हा आपल्याकडे कार नव्हती. त्यामुळे आयजी माझ्याबरोबर तिला घ्यायला बरोबर आला. आयजी ची गाडी (निसान) इतकी छोटी होती की सगळे सामान ठेवल्यानंतर तुझ्या आईला युकाच्या कारसीट मध्ये बसावे लागले. सोनबाला युकाचे नाव कळल्यावर ती म्हणते "येउ का"! आणि खी खी करुन हसु लागली. असो ... परंतु त्या प्रसंगानंतर आयजी शी चांगली ओळख झाली.

 

तोपर्यंत जपानी लोक फक्त टीव्ही मध्येच पाहिलेले! आयजीचे इंग्लीश अगदी जुजबी होते. त्यावर तो अमेरिकेत आला हे म्हणजे खूप धाडस करण्यासारखे होते. त्यामुळे तो बऱ्याचदा माझ्यावर अवलंबुन असायचा. किंबहुना पुढची दोन वर्षे आम्ही बहुतेक प्रोजेक्ट्स एकत्र केले. माझ्या भाषाविषयक वर्चस्वाच्या मोबदल्यात मला आयजी ने अमा.....प मदत केली. कुठलाही प्रोजेक्ट असो ... आमच्या टीमची पहिली भेट व्ह्यायच्या आधी आयजी ६०-७०% काम करत असे. कितीही क्षुल्लक गोष्ट असु देत आयजी त्यावर चारपाच तास काम करत असे .... एकदा रात्री दोन तासांच्या कामासाठी म्हणुन आयजी मी आणि अजुन एक चीनी मित्र एका वर्गात बसलो होतो. विषय होता..."लास व्हेगास च्या एका कसिनो चे दिवे किती वेळा बदलले तर पैश्याची सर्वात जास्त बचत होईल!" कसिनो मध्ये लक्षावधी आणि करोडो दिवे असतात. प्रत्येक दिव्याला एक आयुष्य असते. परंतु एक दिवा विझला की बदलत बसले तर दिव्यांपेक्षा बदलण्याचा खर्च जास्त. त्यामुळे सगळे दिवे एकदम बदलतात. तर याचे गणित मांडताना सरासरी दिव्याचे आयुर्मान काढायचे होते. थोडेफार संख्याशास्त्र वापरायचे होते इत्यादि इत्यादि. आयजी आणि दुसरा चीनी मित्र (शांग्ड्रं - अर्थात सायमन) रात्रीचे २ वाजले तरीही गणित मांडत बसलेले. माझ्या पद्दतीने काढलेले उत्तर ९०-९५% अचूक होते. परंतु त्यांना अजूनही अचुक उत्तर हवे होते. शेवटी मी चिडुन घरी आलो. दुसऱ्या दिवशी आयजी ने मला पत्र लिहुन माझी माफी मागितली की माझा वेळ घेतला!! नेकी और पुछ पुछ असावी तर अशी. वास्तविकत: कष्ट त्याचे जास्त परंतु तरीही माफी त्याने मागितली. असो ..

 

परंतु आयजीचा हा कष्टाळुपणा पाहुन मी गोंधळायचो. कष्टाळु असायला हरकत नाही...किम्बहुना आग्रह असावा; परंतु त्याबदल्यात मिळणारा मोबदला हा पुरेसा असायला हवा अशी माझी धारणा. किंबहुना कुठल्याही व्यावसायिकाची देखील अशीच धारणा असते. सगळे प्रोजेक्ट्स करता करता आयजी थकुन जायचा. झोप मिळत नाही अशी तक्रार करायचा (फक्त माझ्या जवळ ..... कारण आम्ही तितके चांगले मित्र झालो होतो.). हळुहळु मला कळु लागले. जपानी समाजामध्ये केवळ यश मिळवणे पुरेसे नाही. तर यश कष्ट करुन मिळवलेले असायला हवे. यशापेक्षा ध्यास महत्वाचा. किंबहुना अपयश देखील चालेल .... परंतु तुमचा प्रयत्न कसा आहे हे महत्वाचे.

 

कुठलातरी जपानी खेळ आहे धनुष्य बाणावर आधारीत. यामध्ये धनुष्य अगदी ६-८ फूट उंच असते. बाण घ्यायचा प्रत्यंचा ओढायची आणि लक्ष्यभेद करायचा हा क्रम. परंतु इतकाच नाही. तर बाण प्रत्यंचे मधुन गेल्यानंतर देखील धनुर्धारीचा हात कसा खाली येतो हे महत्वाचे. बाण सुटलेला आहे. लक्ष्याचा भेद घेईल किंवा नाही ही घेणार.. परंतु तरिही हे अतिशय महत्वाचे की धनुर्धारीची नजर कुठे आहे. पाय कसे आहेत. प्रत्यंचा कशी सुटली आणि कानामागुन हात कसा मागे जाउन शरिरापाशी आला.

 

अगदी वेगळे तत्वज्ञान आहे हे. शरीर मन आणि आत्म्याच्या एकात्मिक विकासाचे आणि त्यामधुन अत्युत्कृष्टता साधण्याचा प्रयत्न करण्याचे. पाश्चिमात्य आणि विशेषत: अमेरिकेच्या विचारसरणीशी अगदी विरोधी अशी विचारसरणी. "रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट" ला नाकारणारी.

 

ऍन्थनी बोर्डेन च्या आज पाहिलेल्या लघुपटात हेच जाणवले. पूर्ण जपानी संस्कृतीच उत्कृष्टतेचा ध्यास घेणारी आहे. ते स्पष्ट करताना त्याने केंडाल (लाकडी तलवारीची युद्धकला), सुशी करण्याची पाककला, इकेबाना (जपानी पुष्परचना) आणि सामुराई तलवार तयार करण्याचे शास्त्र अशी चार उदाहरणे दाखवली. प्रत्येक ठिकाणी एका मोठ्या व्यक्तीकडुन त्याने या गोष्टींचे मर्म समजावुन घेण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला हे जाणवले ..... की उत्कृष्टतेचा ध्यास अगदी लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिल्याशिवाय केला जाऊ शकत नाही. केंडालमध्ये प्रतिस्पर्ध्याची मानसिकता त्याच्या काठीच्या टोकाची स्पंदने जाणुन घेतली तर कळते. परंतु त्यासाठी दीर्घ आणि सूक्ष्म अभ्यास हवा. इकेबानामध्ये केवळ पुष्परचना महत्वाची नाही तर अवकाश देखील महत्वाचे .... सामुराई तलवार एकच पाते पुन्हा पुन्हा घडी घालुन पुन्हा पुन्हा भट्टीतुन काढावे लागते. आणि तेही अगदी हळुवारपणे.

 

जाता जाता या सर्व दिग्गजांना बोर्डेन एक प्रश्न विचारत होता. "तुमच्या क्षेत्रात अत्युत्कृष्टता कशी असते. त्याची व्याख्या काय". त्या त्या क्षेत्रात २०-३०-४० वर्षे सरस काम करणाऱ्या त्या सर्व माणसांचे उत्तर मात्र एकच होते. "आम्ही तेच समजावुन घेण्याचा प्रयत्न करत आहोत."

 

आयजी मला त्यावेळी बावळट वाटायचा. त्याला विमानतळावर सोडायला गेलो शेवटचे तेव्हा जाता जाता मला म्हणाला ... "तू खूप कार्यक्षम आहेस. (कमी वेळात जास्त काम करणारा आहेस.) मी तुझ्याकडुन हे शिकायला हवे.".

 

मागे वळुन बघता, मला वाटते खरेतर मीच त्याच्याकडुन काहीतरी शिकलो. आयजी जपानला जाताना थोडासा खट्टु होता. अमेरिकन संस्कृतीमधील मोकळेपणा/स्वातंत्र्य त्याला मोहवुन गेले होते. पुन्हा एकदा अपेक्षांचे ओझे वागवाव्या लागणाऱ्या समाजात त्याला जायचे नव्हते. परंतु पर्याय नव्हता.

 

नंतर अधुन मधुन त्याचे फोन्स एमेल्स येत राहिले. अजूनही अधुन मधुन संपर्क होतो. सिद्धुचा जन्म झाला त्यावेळी आयजी ने सिद्धुला खास जपानी देवळातुन नवजात बालकांना द्यायच्या पहिल्या "चॉपस्टिक्स" दिल्या होत्या. जपानला गेल्यावर आयजी आणि तोमोएला एक मुलगा झाला. त्याचे नाव "शोई" ठेवले आहे.

 

मला म्हणशील तर मिशिगन स्टेट मध्ये शिक्षणाव्यतिरिक्त सर्वात अधिक मौल्यवान काय मिळवले असेल तर हे असे अनुभव आणि असे मित्र!

 

 

 

 

मामाची फिनिक्सवारी

सलोनीराणी

 

बऱ्याच दिवसांनंतर लिहायला घेतले आहे. दिसामाजी सोडा .. महिन्यामाजी सुद्धा काहीतरी लिहित जावे असे म्हणायला सुद्धा जागा ठेवली नाही असे लोकांनी म्हणु नये म्हणुन आज लिहायला घेतले. तसे पण काहीतरी लिहिण्यात मला स्वारस्य नसते म्हणुन लिहिण्यात कुचराई झाली असे म्हणायला मात्र नक्कीच जागा आहे.असो .... दुसरे काही सांगण्याआधी मागच्या काही दिवसांचा आढावा...

 

८ मार्च ला तुला पाह्यला म्हणुन मामा, मामी, आजोबा आजी आणि अथर्व खास इकडे आले. आजी आजोबा येणारच होते. वाटेत मामाकडे लंडनला १० दिवस गेले आणि मग इकडे येणार होते. मामा "गड्या आपुला गाव बरा" म्हणत भारतात चालला होता. तेव्हा तिकडे जायच्या आधी एकदा फिनिक्सासनी येऊन जावे आणि तुला पहावे असे त्याला खूप वाटु लागले. त्याच्या आयबीएम (इंडिया) च्या लोकांनी हा कायमचा परत चालला म्हणुन त्याला बराच त्रास दिला परंतु स्वारी त्यांना पुरुन उरली आणि शेवटी या सगळ्या बारदानाचं फिनिक्सभूमीवर अवतरण झालं. ओडिसीमध्ये खरे तर ८ जण जास्तीतजास्त बसु शकतात .... परंतु सिद्धोबाला अगदी भारतीय पद्धतीने डबल शीट बसवुन आम्ही नुसते घरीच नाही तर सेडोना, ग्रॅण्ड कॅनियन इत्यादी ठिकाणी देखील फिरलो. बाकी ठिकाणी नियमांचा आग्रह घरणाऱ्या तुझ्या आईला इथे मात्र पोलिसाने पकडले तर दंड भरायची तयारी होती! असा हा माहेरचा महिमा ... काय सांगु तुला. असो ...

 

अखेरिस मामा मामी अथर्व १७ तारखेला भारतात परत गेले. नऊ दिवसात देखील प्रचंड धमाल आली. एका घरात नऊ माणसे म्हणजे घर अगदी भरुन गेले होते. परंतु खरोखरीच मजा आली. एक दोनदा आमच्या शेजाऱ्याने एका गाडीत इतके लोक कसे म्हणुन भुवया उडवलेल्या दिसल्या. परंतु मी देखील भुवया उडवुन त्याला हाय म्हटले आणि गाडी गॅरेज मध्ये घातली. या अमेरिकन लोकांना फार प्रायव्हसी चे वेड. माझ्या बॉसला जेव्हा कळते की भारतातुन लोक १-२ महिन्यांसाठी येणार आहेत तेव्हा तो खुदुखुदु हसु लागतो ... आणि म्हणतो ... "आय डोण्ट थिंक दॅट इज सच अ गुड आयडिया". इथे व्यक्तीवादाचा इतका अतिरेक झाला आहे की अमेरिकेत लोकांना एकमेकांच्या सहवासातील आनंद कळेनासा झाला आहे की काय असे वाटते. आणि या बाबतीत अमेरिकन लोक अगदी खास आहेत. इतर पाश्चात्य लोक असे नाही आहेत. अगदी युरोप, लॅटिन अमेरिकेत सुद्धा लोक बऱ्यापैकी समाजप्रिय आहेत. अमेरिकेतील व्यक्तीवाद आणि प्रायव्हसीच्या कल्पना मला तरी अनैसर्गीक वाटतात. मला वाटते जसजसा बाह्य जगाशी अमेरिकेचा जास्त संबंध येईल तसतसे हे लोक सुधारतील. असो ..

 

सेडोना ग्रॅण्ड कॅनियन व्यतिरिक्त अपाचे ट्रेल, टुसॉन ला देखील गेलो. अजून जास्त दिवस असले असते तर मामा साहेबांना कॅलिफोर्निया दाखवण्याची इच्छा होती. असो .. परंतु नुसते घरात राहण्यातही मजा असते. आता फक्त आजी आजोबा आणि आपण चौघे उरलो आहोत. ते अजून सव्वा महिना असतील. बहुधा ब्राईस आणि झायॉन कॅनिअन ला जाऊ पुढच्या आठवड्यात....