Thursday, January 29, 2009

निरोगी भव!

२९ जानेवारी २००९
सलोनिबाई, २ आठवडे आजारी होतो म्हणुन रजा घेतली होती तुमची। अमेरिकेत बाकी सर्व काही छान आहे. परंतु इथे आजारपण मात्र काही खूप चांगला अनुभव नाही आहे। तसा कुठे आहे म्हणा । वैद्य आणि वकील यांची पायरी न चढलेलीच बरी - होकी नाही?
इथे अरिजोना मध्ये तर आजारपण एकदमच विचित्र असते। चिकटून रहाते। मिशिगनला मी कधीच आजारी पडलो नही। परन्तु इथे आल्यापासून बारीक़ सारिक काही तरी चालू असते। हवेचा गुणधर्म असावा।
असो ...तर आठवड्यांपूर्वी घशात काहीतरी खवखवले ... परन्तु दुर्लक्ष केले। हळुहळु कॉफ सुरु झाला आणि नंतर एक दिवस अन्थरुणच धरले। मग मात्र धावपळ करून डॉक्टर कड़े पळालो. त्याने पण सुरुवातीला अरिथ्रोमायासिन दिले। त्याने काही फरक पडला नाही .... मग त्यानंतर १० दिवस आता अमोक्सिसिलिन खातो आहे। इथे अमेरिकेत लोकांची जाडी जास्त त्यामुले इथली औषधे देखिल अगदी तीव्र असतात। १०० मिलीग्राम वगैरे नाही तर चांगली ८०० मिलीग्राम। बोला आता!! त्यामुले बर्र्याचदा आपल्या भारतीय पिंडाला ते पचत नाही अगदी शब्दशः! मळमळ उलटी चक्कर झोप .... सगळे काही होते। आणि मला इतके नाही पण सोनालीला तर खूपच जास्त। असो ... तर त्या ८०० मिलीग्राम च्या गोळ्यांमुळे आता जरा बरे वाटते आहे .... थकवा आहे आणि उष्णता झाल्यामुळे घामोळ्या आल्या आहेत। परन्तु दुखणे ९०% गेले आहे।

या सर्व काळात काम मात्र चालूच राहिले। १ दिवस सूटी घेतल्यासारखे केले पण तरीही काही मीटींग्ज आणि एमैल्स इत्यादि केलेच। अमेरिकन लोकांची आरोग्याबाबत अगदीच आबाळ आहे मात्र। एक तर इथे वैद्यकीय सेवा अतीशय महाग .... इन्शुरन्स शिवाय पर्याय नाही। इन्शुरन्स म्हणजे विमा । आमच्या ३ जणांच्या कुटुम्बाच्या विम्याचा वर्षाचा हप्ता एकूण १४००० डॉलर्स आहे। पैकी आम्ही ४००० भरतो आणि कम्पनी १०००० भरते। परन्तु इतके पैसे आगावू भरून देखिल नंतर पुन्हा प्रत्येकवेळी डोक्टरकडे गेलो की को-पे म्हणुन १५ डॉलर्स अणि प्रत्येक चाचणीचे २०% पैसे आपण भरावे लगत। ही झाली पैश्याची बाजू .... सुदैवाने आपण चांगल्या कंपनी मध्ये नोकरी करतो म्हणुन आपल्याला हे परवडते. परन्तु बरेच अमेरिकन लोक वर्षाकाठी जेमतेम २०-४० हजार डॉलर्स कमावतात.... त्यांच्या कंपनीला विमा परवडेलच असे नाही. आणि विमा पुरवण्याचे कायद्याने बंधन देखिल नाही। त्यामुले औषधोपचाराशिवायच जगण्याची पाळी आलेली कित्येक कुटुम्बे आहेत । त्यात इथे फास्ट फ़ूड वगैरे गोष्टींमुळे आणि एकुणच सुखकर आयुष्यामुळे जाडीचे प्रमाण जास्त। त्यामुले अनेक रोगांना आमंत्रण मिळते. अमेरिकेत २/३ माणसे जाड आहेत आणि १/३ माणसे अति जाड आहेत। त्यामुले आरोग्य सेवांवर पण ताण येउन त्या अधिकाधिक महाग आणि गैरसोयिच्या बनत चालल्या आहेत। कुठे ही डॉक्टर कड़े गेले तर १-२ तास त्या ओफिसात वाट पाहत बसावे लगते। इमरजेंसी मध्ये तर ३-४ तास वाट पहावी लगते। आणि म्हणे इमर्जन्सी! इमर्जन्सी मध्ये इतकी वाट का ... तर इन्शुरन्स नसलेले लोक हॉस्पिटल च्या इमर्जन्सी मध्ये जातात कारण कायद्यानुसार हॉस्पिटलला उपचार करणे भाग आहे। तुमच्याकड़े पैसे आहेत की नाही याची खात्री आधी न करता उपचार करणे भाग आहे। त्यामुले गरीब लोक हॉस्पिटल मध्ये जाऊन उपचार करून घेतात अणि मग पैसे भरता आले तर भरतात, नाही तर भांडत बसतात। त्यामुले इमर्जन्सी मध्ये नेहेमीच गर्दी असते। बर तुम्ही गरीब नसलात तरी सोपे नाही। इथे डोक्टरांनी पण आरोग्य सेवेचा बाजार मांडला आहे। त्यामधिल सेवा निघून गेली आहे आणि डॉक्टर पेशंट मध्ये फक्त व्यवहार राहिला आहे। त्यामुले फसवणुक सर्रास चलते। आणि बर्याचदा पैसे गेल्याचे दुख्ख नसते। परन्तु आपल्या आरोग्याचा खेळ होऊ नये अशी इच्छा।
ओबामा प्रेसीडेंट झाल्यानंतर काही आशा पल्लवित जरूर झाल्या आहेत। सरकार शक्यतो या विषयात पडू इच्छित नाही। इथली धाटनीच अशी आहे की फुकट गोष्टींचा या सर्वाना तिटकारा आहे। त्यांच्या मते ज्याने त्याने आपली भाकरी कमावावी आणि खावी। आणि हे अतीशय स्तुत्य आहे। फक्त त्याचा इतका अतिरेक ही नको की समाजातील दुर्बल घटक अगदीच मागे राहतील....
असो .... आज इतके पुरे।
सल्लू तुला एक सांगायचे च राहिले... ओबामा नावाचा माणूस अमेरिकेत प्रेसीडेंट (अध्यक्ष) झाला आहे। It is very exiting for the USA and the world. परन्तु त्याबद्दल नंतर पुन्हा!

Sunday, January 18, 2009

सलोनी, सरस्वती, सोफिया की एमीली ?

७ जानेवारी २००९
नवीन वर्षाच्या शुभेच्छा सलोनी तुला! तुझे हे पहिलेच वर्ष .... नाही का? अगदी नवीनतमच तर। खरे तर मागील वर्ष अगदीच वाईट गेले। वैयक्तिक नाही म्हणत मी। मागील वर्षात जी आर्थिक उलथापलत झाली त्यात हजारो अब्ज डॉलर्स ची सम्पत्ती धुळीस मिळाली। आणि जगभर। करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या। आणि बहुधा ही तर फ़क्त सुरुवात आहे। २००९ मध्ये मंदी तीव्र होणार आहे असे जाणकार म्हणतात। परन्तु मी मात्र या वर्षाकडे अगदीच उत्कंठेने पहात आहे। सलोनीचा जन्म एप्रिल किंवा मे मध्ये होइल। आतापर्यंत तिघांचे असलेले आमचे त्रिकोणी कुटुंब चौकोनी होइल। सिद्धार्थ देखिल अगदी सज्ज झाला आहे। प्रेमळ आणि काळजीवाहु स्वभाव आहे त्याचा। सलोनी हे नाव त्यानेच ठेवले। मी मारे कमला, सरस्वती, एमीली, सोफिया अश्या नावांच विचार करत होतो। तसा मी पारंपारिक आहे। संस्कृती, धर्म, परम्परा यातील चांगल्या आणि उपयुक्त गोष्टीना चिकटून राहणे मला आवडते। त्यामुळे मला नेहेमीच देवी देवतांची नावे आवडतात। शेक्सपीयर म्हणतो 'नावात काय आहे?'। ते खरेही आहे। परन्तु हेही खरे आहे की नावामधुन आईवडील आपल्या बालकाविशयीच्या भावना आणि आकांक्षा व्यक्त करीत असतात। देवी देवतांची नावे घेतली की मला त्यांचे उत्तम गुणच डोळ्यापुढे येतात। म्हणुन कमला, सरस्वती इत्यादींचा विचार ! सिद्धार्थचे नाव सिद्धार्थ ठेवले नसते तर रामचंद्र किंवा श्रीराम ठेवले असते। प्रभु रामचंद्र आणि गौतम बुद्ध या पुरुषोत्तमांनी आपली भूमी पावन केली आहे। गौतम बुद्ध होऊं गेले यात काहीच संशय नाही। श्रीराम प्रभुन्च्या अस्तीत्वाचा ठोस पुरावा नसला तरीही ते भारताचा आत्मा बनाले आहेत। आणि तेच अधिक महत्वाचे आहे।

सोफिया अथवा एमीली च्या मागे थोड़ा वेगळा विचार आहे। ८ वर्षे अमेरिकेत राहून इथेही आमची थोड़ी नाळ जुळली आहे। अगदी रोपटे रुजून तरारून फुलून मुळीच आले नाही आहे। किम्बहुना मातृभूमीच्या आठवणीने व्याकुळ होउन झुरुन गेले आहे। भौतिक सुखांच्या कृत्रिम खतांमुळे ते बाहेरून टवटवीत दिसले तरी आतून दुख्खी आहे। परन्तु कसे का होइना आठ वर्षे या देशात आम्ही राहिलो, बव्हंशी अमेरिकेने चांगलीच वागणूक दिली, प्रसंगी प्रेम आणि मदतही केली। त्यामुळे काही प्रमाणात आमची मुळे इथे थोड़ी फार नक्कीच रुजली आहेत। आणि म्हनुनच पाश्चिमात्य नावांचा विचार मनात आला। जेव्हा भविष्यात भारतात परत जाऊ तेव्हा मनाचा एक कप्पा अमेरिकेसाठिही झुरेलच। आणि तेच योग्य आहे ... तेच मानवी आहे। परन्तु आता ही सर्व नावे मागे पडली आहेत। सिद्धार्थ ला डावलणे 'मुश्किल ही नहीं बल्कि नामुमकिन हैं' ।
आणि सलोनी हेच नाव सर्वात सुंदर आहे अशीच आमची खात्री पटत चालली आहे।

ख्रिसमस

१९ डिसेम्बर ०८

आता ख्रिसमस जवळ येत चालला आहे। आपल्याकडे दीवाळीचे जसे महत्व तसे इथे ख्रिसमसचे। सप्टेम्बर महिन्याच्या सुमारास झाडांची पाने झपाट्याने रंग बदलतात। थंडीची ती पहिली चाहूल। उन्हाळ्यानंतरची ही चाहूल सुरुवातीला गोड वाटते। सप्टेम्बर ते ओक्टोबर चा हा काळ निसर्गाच्या रंगांची उधळन पहाण्यात भुर्रकन निघून जातो। नोव्हेम्बरच्या सुरुवातीला कधीतरी एखाद्या रात्रीच्या पावसात ती रंगांची सर्व उधळण उतरवून झाडे थंडिसाठी सज्ज होतात। मग समजायचे की आता थंडीची आयुधे वापरायला लागा। आइस स्क्रेपर, कार आणि घरातला हीटर, जकैट्स, ग्लोव्ह्स इत्यादी इत्यादी। बोडकी झालेली झाडे सुरुवातीला विचित्र वाटतात। कधी कधी भयाण सुद्धा वाटतात। परन्तु पहिला हिमवर्षाव लवकरच होतो आणि घरे गाड्या रस्ते झाडे सर्वकाही बर्फाची चादर लपेटून बसतात। सर्वच वातावरण एकदम प्रसन्न होउन जाते।

अर्थ आणि अनर्थ - पुढे 2

१३ डिसेम्बर ०८
कालच बातमी आली की मेडोफ नावाच्या एक अतिशय धनाढ्य माणसाने चालविलेला हेज फंड कोसळला। हेज फंड म्हणजे शेयर बाजारात जास्त फायद्याच्या आशेने अतीशय जास्त जोखिम पत्करून गुंतवणुक करण्याचे एक तंत्र। मेडोफचा हेज फंड ५५ अब्ज डॉलर्स (२५०००० कोटि रुपये!) चा होता। ही मेदोफ़ नावाची व्यक्ति कोणी साधी सुधी व्यक्ति नव्हे। NASDAQ ची स्थापना करून शेयर बाजाराचे व्यवहार कंप्यूटर द्वारे करण्याचा शोध याने लावला। अश्या व्यक्तीने या हेज फंड मधील ५५ अब्ज डॉलर्स चा घोटाळा केला। १९७० ते २००८ या कालावाधितिल इथल्या अर्थव्यवस्थेच्या मानबिन्दुन्पैकी एक अश्या या व्यक्तीने मागील काही वर्षांमध्ये गुन्तवणुकदारान्ची अभूतपूर्व फसवणुक का बरे करावी?
CITIGROUP , AIG, Merryl Lynch, Bear Sterns, Countrywide, Washington Mutual अश्या केवळ नामान्कितच नव्हे तर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ मानल्या जाणार्या कंपन्यांवर दिवाळखोरिची वेळ का यावी?

आर्थिक तज्ञ तांत्रिक कारणे सांगतील। अतिरेकी आर्थिक जोखिम, वित्तपुरवठ्याचा अभाव इत्यादी इत्यादी। ही कारणे खरी आहेतही। परन्तु या कारणांमागे राजकीय कारणे आहेत, आणि राजकीय कारणांमागे मनुष्यस्वभावाशी निगडित कारणे आहेत। तांत्रिक कारणान्ची उपाययोजना करताना राजकीय आणि इतर वैचारिक कारणान्ची उपाययोजना देखिल आवश्यक आहे। नाहीतर याच प्रश्नांची वेगळ्या स्वरूपात पुनरावृत्ती होऊ शकते।

Thursday, January 15, 2009

अर्थ आणि अनर्थ

३ डिसेम्बर ०८
आज सकाळी सकाळी राजीवचा फ़ोन आला। साधारणतः २ वर्षांपूर्वी राजीवशी ओळख झाली। एक मित्राच्या घरी जेवण आणि गप्पांचा कार्यक्रम होता तिथे राजीव भेटला। राजकारण अर्थव्यवस्था या विषयांवर गप्पा इतक्या रंगल्या की नंतर भेटी होत गेल्या आणि गट्टी जमली । बर्याचदा आम्ही सहकुटुम्ब भेटतो। कधी आमच्या अपार्टमेन्ट मध्ये तर कधी राजीवच्या घरी। अमेरिकेत माणसे तशी दुर्मिळ । त्याहून दुर्मिळ म्हणजे इतर भारतीयांचा सहवास आणि मैत्री। त्यामुळे शुक्रवार/शनीवार/रवीवार या दिवशी सर्वचजण एकमेकांना भेटायला उत्सुक असतात। त्यानिमित्ताने मोठ्यांच्या गप्पा होतात आणि लहान मुलांना मित्र मैत्रीणी मिळतात।
परन्तु आजच्या फोनचा विषय अगदीच गंभीर होता। राजीव एका प्रख्यात विमा कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणुन काम करतो आहे। कंपनीच्या वरिष्ठांनी त्याला सांगितले की २ आठवड्यांनंतर त्यांने फक्त घरुनच काम करायचे। इतकेच नाही तर त्याचा आरोग्य विमा आणि इतर काही सवलती सर्व काढून घेण्यात येतील। त्यामुले यापुढे राजीवला त्याच्या बायकोच्या (नम्रता) वर थोडेफार अवलंबून रहावे लागणार आहे। नम्रता माझ्याच कंपनी मध्ये काम करीत होती। परन्तु काही महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीने आपला काही भाग एक दुसऱ्या कंपनीला विकला। त्यामध्ये नम्रताच्या नोकरिचेही हस्तांतर झाले। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये नम्रताचीही नोकरी जाऊ शकते।
एकंदरीत हे सर्व अमेरिकेतील सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या सामान्य माणसांवर होत असलेल्या परिणामांचे द्योतक आहे। सध्या अमेरिकेत अभूतपूर्व आर्थिक उलथापालथ चालू आहे। अगदी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तम्भान्ना धक्का देणारी उलथापालथ आहे ही। मागील २१ वर्षे म्हणजे १९८७ सालापासून अमेरिकेने अत्यन्त उदार वित्तपुरवठ्याचे धोरण स्वीकारले। वित्तपुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेतिल विविध घटकांना पोषण पुरवणारा रक्तप्रवाहच जणू। योग्य वित्तपुरवठ्यामुळे समाजातील विविध घटक व्यक्ति आणि संस्था एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांची सुलभरीत्या आदान प्रदान करू शकतात। जितकी जास्त उत्पादने आणि सेवा तितका अधिक वित्तपुरवठा आवश्यक। परन्तु जरूरीपेक्षा जास्त वित्तपुरवठा चलनफुगवटा निर्माण करू शकतो। अमेरिकेत मात्र याहून अधिक धोकादायक गोष्टी घडल्या। अमेरिकेच्या मुळालाच धक्का लागेल अश्या गोष्टी घडल्या।

परन्तु त्या आधी अमेरिकेच्या आणि एकंदरीतच पाश्चात्य देशांचे यशाचे गमक समजुन घेतले पाहिजे। पाश्चात्य अर्थव्यवस्थांचे अनेक यशोगुण आहेत। संशोधन, नाविन्य, उत्पादकता, न्यायप्रवण प्रशासन, उद्योगाभिमुख धोरण, आणि सर्वात महत्वाचे अतिशय संतुलितरित्या आजमावण्यात येणारी कायदा यंत्रणा।

संतुलित अश्याकरिता की कायद्याने इतकेही कड़क असू नये की समाजातील कल्पकता कोमेजुन जावी। अणि इतके ही शिथीलअसू नये की अराजकता माजेल आणि व्यक्तिगत संपत्तीचे रक्षण करण्याची शाश्वती नसल्यामुळे कल्पकता आकुंचन पावेल। दोन्ही ठिकाणी कल्पकतेचे वर्धन आणि उपयोजन अभिप्रेत आहे। कारण समाजातील राहणीमान कल्पकतेच्या सुयोग्य उपयोजनामुळे वाढत जाते। भारतातून इकडे येउन 8 वर्षे झाली. परन्तु आजही जेव्हा आम्ही परत जातो तेव्हा असे दिसते की ९९ % भारतीयांच्या समस्या त्याच आहेत ज्या ८ वर्षांपुर्वी होत्या। आईटी बीपीओ मुळे सम्पत्ती आल्याचा भास् जरूर आहे परन्तु काही ठरावीक शहरी समाज घटकांपलिकडे राहणीमान कितपत सुधारले आहे? मुद्दा वादाचा जरूर आहे, परन्तु आशय इतकाच की भारतातील न्याय अर्थ आणि प्रशासन यांची घड़ी योग्य नसल्यामुळे आणि जात-पात-प्रांत भेद यांच्या प्राबल्यामुळे कल्पकता अगदी मृतवत झाली आहे। माझ्या मते आपल्याकडील गरिबिचे ते प्रमुखच नव्हे तर एकमेव कारण आहे. याउलट उत्तम न्यायव्यवस्था हे जगातील सर्वच प्रगत देशांचे लक्षण आहे। अगदी आपल्याकडे सुद्धा चाणक्याने सांगितले आहे की "सरकार / शासनाचे उद्दिष्ट समानता नाही तर मास्त्यन्यायाला टाळणे आहे।" विविधता आणि असमानता हा निसर्गाचा गुणधर्म आहे। परन्तु त्या विविधातेचा आणि असमनातेचा गैरफायदा घेउन कोणी समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय करू नये। समुद्रात भले मोठा मासा लहान माश्याला खात असेल परन्तु मनुष्यत्वाला ते मान्य नाही।
अमेरिकेतील सध्याच्या या आर्थिक उलथापालाथी मागे न्याय आणि प्रशासनातील ढिसाळपणाच कारणीभूत आहे। १९८७ पासून रिपब्लिकन पक्षाच्या सरकारांनी अर्थव्यवस्था, प्रशासन, न्यायव्यवस्था, उद्योगधंधे आणि निगडित कायदे या सर्वान्मधुन शासनाला हद्दपार करण्याचे धोरण स्वीकारले। याचा काही प्रमाणात फायदा जरुर झाला परन्तु त्याचा अतिरेक केला गेल्यामुले तोटाच जास्त झाला असे आता दिसू लागले आहे। यातील सर्वात जास्त दृश्य परिणाम म्हणजे अमेरिकेतील बलाढ्य अर्थसंस्था एकामागोमाग एक ढासळत गेल्या। २००८ साल या दृष्टीने लक्षात ठेवले जाईल की मागील २५ वर्षातील मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सरकारचा अंकुश सर्वच संस्थांमधुन कमी केल्यामुले अर्थव्यवस्था बेलगाम वेगाने धावली आणि गाडी रुळावरुन घसरली।

Wednesday, January 14, 2009

कशासाठी हा प्रपंच?

२ डिसेंबर २००८
४ आठवड्यांपूर्वी सोनालीची डौक्टरांकडे नियमीत वैद्यकीय तपासणी करून आम्ही घरी परत येत होतो। अचानक मला वाटले की या नवीन बाळाला मागील ८ वर्षे कशी काय कळणार? MBA साठी २००० साली नोकरी सोडून मी मिशिगनला आलो। अमेरिकन विद्यापीठातले ते दिवस, न्यूयार्क इंटर्नशिप, ९११ ची भीषण परिस्थिति, सिद्धार्थचा जन्म, बुश यांची पुनर्निवड, फिनिक्स एरिजोना येथे स्थलांतर आणि अक्षरशः शेकडो सहली यांमार्फत अमेरिकेतील जे अपूर्व आणि अमूल्य अनुभव आले त्याला तोड़ नाही। मागील ८ वर्षांत बरेच काही कमावले। ज्ञान, अनुभव, पुरेसा पैसा - व्यावसायीक आणि वैयक्तिक दोन्हीही। सर्वात महत्वाचे म्हणजे सिद्धार्थचा जन्म आणि आता सलोनिचा। आता भारतात ताबडतोब परतण्यची इच्छा आहे। बहुधा २००९/१० मध्ये नक्कीच परत जाऊ. २०-२५ वर्षे भारत आणि ८-१० वर्षे अमेरिकेतील जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर दोन्ही संस्कृति आणि समाज यांची मर्म आणि वर्म स्थाने थोडीफार नक्कीच कळु लागली आहेत ।
या लिखाणामागे फार काही भव्य दिव्य उद्देश काही नाही आहे। सिद्धार्थ आणि सलोनी यांना भविष्यात आपल्या आईवडिलांनी अमेरिकेत काय अनुभवले, काय शिकले, काय कमावले आणि काय गमावले याचा प्रांजळ आढावा घेता यावा याकरिता हा सर्व प्रपंच।

तशी प्रत्येक पिढी आपापले प्रारब्ध घेउन येते आणि घडवतेहि। आपल्या लिखाणामुळे कोणाला काय उपयोग होइल हा अहंकाराच वाटावा ... आणि असेलही। परन्तु हेही खरेच की ही वेडी माया आणि आंधळे प्रेमही असू शकते। आणि या प्रेमामुळेच ही लेखनाची उर्मी निर्माण झाली आहे।

जगाच्या प्रगतीचा वेग दर २० वर्षांनी दुप्पट होतो आहे म्हणे। आमच्या डोळ्यासमोर अमेरिकेमधील जीवनमान कमालीचे बदलून गेले आहे। वस्तुंची रेलचेल, समाजाची मानसिकता, जागतिकीकरण, दहशतवाद, गरीब राष्ट्रांची प्रगति, आणि प्रगत राष्ट्रांच्या वाढत्या समस्या .... अनेक बाजूंनी बदलाचा वेग प्रचंड आहे। समस्या अनेक आहेत। परन्तु आशेचे किरण त्याहुनही अधिक आहेत। ही नवीन पिढी अधिक "वसुधैवकुटुम्बकम" असणार आहे। जगातील सर्वच बर्र्यावाईट घटनांचे प्रतिबिम्ब या पिढीच्या आयुष्यावर खुप लवकर पडणार आहे । संस्कृति, राष्ट्रवादास छेद देणारे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदल, सर्व जगाची क्षितिजे वेगाने विस्तारित राहतील। केवळ यासाठी हा सर्व लेखनप्रपंच अथवा उद्योग। भारत आणि अमेरिकेच्या सुंदर, बलशाली गोष्टींची भविष्यात सांगड़ घालण्यासाठी हे लेखन उपयुक्त व्हावे अशी इच्छा ।

भारत आणि अमेरिका हे एक अर्थाने अगदी विभिन्न परन्तु एक अर्थाने अगदी एकसारखे देश आहेत। सहिष्णुता, प्रागातिकता, आत्मविश्वास याबाबत बर्यापैकी एकसारखे; परन्तु भौतिकवाद आणि आध्यात्म, व्यक्ति आणि समाज, उपलब्ध आणि प्रारब्ध याबाबत अगदी टोकाचा फरक! आज जागतिकी करणाच्या रेट्यामुळे हे दोन देश एकत्र येऊ पाहात आहेत।

सर्व जगाला अतिशय आशास्पद शक्यतांच्या निर्मितीची बीजे रोवली जात आहेत। आमच्या आणि पुढील पिढ्यांना विश्वसंस्कृतिच्या सृजनामध्ये आपापला खारीचा वाट उचलायचा आहे। सिद्धार्थ आणि सलोनी यांना देखिल मागे राहून चालणार नाही।

त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक बांधिलाकिसाठी हे सर्व लेखन त्याना सप्रेम भेट!

Tuesday, January 13, 2009

प्रारंभ

3० नोव्हेंबर २००८

सलोनी ! तिचा अजून जन्मही झाला नाही आहे। परन्तु भलतेच लाडिक प्रकरण होणार आहे ते यात काही संशय नाही। पाच दिवसांपूर्वी म्हणजे २५ तारखेला सोनालीची ultrasound (sonography) झाली। २० आठवड्यापर्यंत बाळाची प्राथमिक तपासणी करतात। यामध्ये ultrasound द्वारे बाळाचे सर्व अवयव आणि वाढ याचा बरयापैकी अंदाज घेता येतो । अमेरिकेत भारतासारखी कायद्यानुसार लिंगातापसणीला बंदी नसल्यामुले आम्ही टीव्ही च्या पडद्याकडे पाहत होतो। मधुनच एखादी अस्पष्ट आकृति दिसे। आणि ultrasound करणारी तन्त्रज्ञa आम्हाला बाळाचे पाय हात ह्रदय इत्यादि गोष्टी दाखवत होती। त्यातील २५% च नीट कळले। परन्तु तिला तरी आपले बाळ (गर्भावस्थेतिल) नीट दिसते आहे म्हणुन आमचा आनंद ओसंडून चालला होता। अधुनमधुन बाल लाथा मात्र भरपूर मारीत होते। जेमतेम ८-९ इंच आणि २५० ग्रामचा तो जीव! परन्तु त्याला त्याचे हृदय Liver आतडे सर्वकाही होते। बहुधा म्हणूनच १६ व्या आठवड्यानंतर Ultrasound करत असावेत। जेणेकरून बाळाच्या / गर्भाच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करता यावी। आम्ही आदल्या रात्री देवळात जाऊन देवाला प्रेमळ दम देऊन आलो होतो की या बाळाची चांगली काळजी घे म्हणून। मी तसा निश्चिंत (अथवा सोनालीच्या लेखी निष्काळजी) होतो। परन्तु जसजसे गर्भाच्या वाढिचे आणि आरोग्याचे योग्य चित्रण पुढे येऊ लागले तसतसे मन निश्चिंत झाले। "ओ.के. तुम्हाला गर्भाचे लिंग जानूं घ्यायचे आहे का? " मागील ४ महिन्यांची उत्कंठा ओसंडून चालली होती। मी आणि सोनालीने प्रश्न पूर्ण व्हायच्या आताच होकार दर्शविला। त्या तन्त्रज्ञ बाईने एक मंदा स्मित करीत बाळाचा तपास पुन्हा चालू केला। बराच वेळ हात पाय डोके यांच्या अस्पष्ट आकृत्या येत राहिल्या। शेवटी ५-१० मिनीटांनंतर तिने टीव्ही वरचे चित्र स्थिर केले। आणि कुठले तरी ३ बारीक ठीपकेवाजा रेशांकडे एक बाण काढून टाइप केले .... "Congratulations! I am a Girl."

आणि त्याबरोबरच आमचे शिक्कामोर्तब झाले की बाळाचे नाव सलोनिच असणार आहे!