Saturday, August 22, 2009

गोंधळ ... वंशाचा !

सलोनीबाई

मी विचित्र आहे की सर्वच बापमंडळींच्या डोक्यात हे येते हे मला माहित नाही. परंतु सिद्धुच्या जन्मानंतर आणि आता तुझ्या जन्मानंतर माझ्या मनात लगेच कुतुहलवजा प्रश्न आला की सिद्धु किंवा तु कुणाशी लग्न करणार आहात? तुमचा भावी जोडीदार कसा/कशी असेल? प्रश्न वेडगळ असेलही. परंतु अमेरिकेतील भारतिय सहसा इथे येउन अधिक पारंपारिक होतात. माझा एक भारतिय मित्र आहे - किशन. त्याची आई ब्रिटिश आणि वडिल भारतिय. लग्नानंतर त्याची आई पूर्णपणे भारतिय बनली. अगदी साडी वगैरे व्यवस्थीत घालुन सहजपणे भारतिय समाजात वावरते. सिद्धुचा एक वर्गमित्र असाच मिश्र आहे. आई इटॅलिअन आणि वडिल भारतिय. त्याची आईदेखील आपल्या भारतिय समाजात अगदी सहजपणे वावरते. परंतु तरिही भारतियांचा ओढा सहसा आपल्या भारतिय समाजाकडे असतो. माझा १/२ भारतिय + १/२ ब्रिटिश मित्र स्वत:ला भारतिय अमेरिकन समजतो. इतकेच नाही तर लग्न करताना मला म्हणाला की त्याला पूर्ण भारतिय मुलीशीच लग्न करायचे आहे (अर्थात - वडिल आणि आई भारतिय!). याचे कारण असे की तो स्वत: ५०% भारतिय वंशाचा आहे आणि त्याची मुले त्याला भारतिय वंशाचीच असावी असे वाटते. पुढे जाऊन त्याने खरोखरीच अश्याच मुलीशी लग्न केले. त्यावर तुझी आई म्हणते - "आता त्यांची मुले ७५% भारतिय होणार!"

किशनची विचारसरणी बरोबर की चूक हा मुद्दाच नाही आहे. मला वाटते की सर्वांना आपापला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. आणि आईवडिलांना त्यांचे मत असण्याचा अधिकार आहे. अंतिमत: ज्याला लग्न करायचे आहे त्यानेच ठरवायचे कुठे बळी जायचे !!

अमेरिकेत मागच्या ४०० वर्षांमध्ये जगभरातुन लोक येऊन अगदी चांगली खिचडी झाली आहे. नक्की कोण कुठले हे सांगणे अशक्य आहे. परवा माझ्या बरोबर काम करणारी ऍन मक्ग्वायर नावाच्या एका बाईबरोबर गप्पा मारता मारता कळले की तिची मुले आठ वंशांची आहेत!!! ऍनचा नवरा आयरीश+फ्रेंच+इटॅलिअन+ ग्रीक आहे. आणि ऍन स्वत: ब्रिटिश+जर्मन+चेरोकी (एक अमेरिकन इंडिअन जात)+स्पॅनिश आहे. सांगताना पण दम लागतोय! परंतु अमेरिका ही अशीच आहे. कुणाला विचारले की तुम्ही नक्की कुठले तर सर्वच जण गोंधळतात. कारण उत्तर कोणालाच नक्की माहित नसते. आपले मूळ शोधण्यासाठी लोक इथे हजारो डॉलर्स खर्च करून युरोप आणि जगभर जातात. आणि हा गोंधळ अमेरिकेला अतिशय उपयुक्त ठरतो कारण आपण मूळचे कुठले हे जरिही लोकांना माहित नसले तरिही आपण अमेरिकन आहोत हे सर्वांनाच कळते. अर्थात अमेरिकेला नावे ठेवत ठेवत इथे राहणारा ही अमेरिकनच असतो. हे म्हणजे अगदी हिंदु धर्मासारखे आहे ... आपण जसे नास्तिकांनादेखील हिंदुच मानतो तसे...

ऍनला मी सांगु लागलो की भारतात ८४ साली आमच्या घरी टिव्ही आला. त्यावेळी हम लोग आणि इतर मालिकांमधील उत्तर भारतिय नावे वाचुन आम्हाला कशी गंमत वाटायची. १९९० साली मी बंगळूरला (बेंगाळुरु!) हवाई दलाच्या मुलाखतीसाठी गेलो होतो तेव्हा हिंदीतुन बोलले तर किती तिरस्कार केला जायचा. आणि आता जाऊन बघा! इतकेच काय तर २००० साली पुणे सोडले आणि अमेरिकेत आलो आणि २००३ साली परत गेलो तेव्हा असे वाटले की पुण्याचे मराठीपण अगदी निघुन गेले आहे. आणि वाईटही वाटले. परंतु आता तितके वाईट वाटत नाही कारण हेच खरे आहे की वंश आणि संस्कृती यामध्ये शुद्धाशुद्धतेच्या कल्पना पोकळ आहेत. दोन्ही गोष्टी प्रवाही आहेत आणि असल्या पाहिजेत. इतर जे प्रवाह येतील त्यांना सामावुन घेतले पाहिजे. उगाच संकुचितपणा बाळगण्यात अर्थ नाही.

अर्थात याचा अर्थ असाही नाही की आपल्या संस्कृतीला तिलांजली द्यायची. किंबहुना उलट अनेक धाग्यांचा पिळ देत देत हे वस्त्र अधिक घट्ट करायचे.

भारतातील हे बदल ऐकुन ऍन मला म्हणाली की अमेरिकेत ज्या गोष्टीला ४०० वर्षे लागली तो बदल भारतात ४० वर्षात घडतो आहे असे वाटते आहे. मला वाटते तिचे म्हणणे खरे आहे.

आपण मराठा की ब्राह्मण की बंगाली की तमिळ यापेक्षा पुढची पिढी गोंधळलेली जन्माला येवो. त्यांना फक्त एकच समजो की आपण भारतिय आहोत. मला वाटते भारतासाठी ते अतिशय हितकारी होईल.

मला कुणी विचारले की सलोनीने कोणाशी लग्न करावे तर मी म्हणेन निर्व्यसनी, कर्तबगार आणि चांगले विचार आचार असणार्र्या शक्यतो भारतियाशी! शक्यतो भारतियाशी का? तर आमचा कंफर्ट झोन तो आहे. भारतिय परंपरा सहिष्णु आणि हजारो वर्षांची आहे. आणि इतर सर्व गोष्टी समान असतील तर तो धागा तुम्ही बळकट करावा. परंतु निर्णय तुमचा आहे आणि त्याला अजुन चिक्क्कार येळ हाये.

Friday, August 21, 2009

सिन्थॉल कॉन्फिडन्स!!

काल नेहेमीप्रमाणे भाज्या वगैरे आणायला आम्ही ली ली नावाच्या इथल्या एका एशियन सुपर मार्केट मध्ये गेलो. व्हिएतनामी मालक आहे. मूळचा चीनी असावा. भन्नाट दुकान चालते. सर्व पद्धतीचे आशियाई अन्नप्रकार मिळतात. आपले भारतिय देखील. अगदी चितळेंची बाकरवडी देखील २.२९ डॉलर्समध्ये मिळु लागली आहे!

 

सर्व खरेदी करुन परत येताना मागुन हाक आली. "बाबा इकडे ये ना." म्हटलं आता काय सिद्धोबाला सापडले इथे? तर तो मला भारतिय साबण दाखवत होता. नीम, लिरिल, चन्द्रिका, हमाम, गोदरेज सिन्थॉल, म्हैसूर सॅण्डल सोप ... मजा वाटते अलिकडे आपले हे साबण इथे मिळु लागल्यापासून. "अरे आत्तच तर डेटॉल घेतला होता ना मागच्या आठवड्यात. सारखा सारखा कश्याला इंडियन सोप पाहिजे." - इति मी. भारतिय साबण दीड दोन डॉलर्सला एक वडी असल्यामुले मजा म्हणुन कधीतरी ठिक आहे अशी माझी समजुत. परंतु सिद्धोबाचा निर्णय झाला होता की त्याला एक साबण घ्यायचा आहे. त्यामुळे मी त्याला मदत करू लागलो कुठला साबण घ्यायचा. "अरे हा घे... चंदनाचा असतो." - म्हैसूर सोप कडे बोट दाखवत मी म्हटले. "नाही तर हा पण चांगला आहे" - चंद्रिका. "नाही तर हा बघ तुला आवडेल" - लिरिल.

 

"बाबा आपण हा घेउ. याने कॉन्फिडन्स वाढतो!!"

 

मी उडालोच! गोदरेज सिंथॉल सिद्धुच्या हातात होता.

 

आम्ही मागच्या वर्षी भारतात आलो तेव्हा सिद्धुने ही जाहिरात पाहिली असणार आहे.

 

आज सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये गेल्यावर पाहतो तर आधीचा साबण संपायच्या आत सिंथॉलचे उद्घाटन झाले होते. बाथरुममधुन बाहेर पडतो तो सिद्धु डोळे चोळत सिद्धु मला म्हणतो "बाबा कुठल्या साबणाने अंघोळ केली?" "वा! अरे झोप तरी पूर्ण झाली का? पहिला प्रश्न साबणाबद्दल". तोपर्यंत सिद्धोबाची स्वारी बाथरुममध्ये रवाना झाली होती.

 

नंतर शाळेत जाताना त्याला सनस्क्रिन लावायला लागली त्याची आई तर म्हणतो "अग अग थोडेच लाव. माझा कॉन्फिडन्स जाईल ना". सोनालीने हसु आवरले.

 

पण टिव्ही चा मुलांवर किति प्रचंड पगडा आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

 

काल याहू फायनान्स वर अश्याच विषयावर एक लेख आला होता. लॉरा क्रॉले नावाची एक वृत्तपत्रकार आहे. ती सहसा मनुष्य स्वभाव आणि आर्थिक विषय यांच्या संबंधांबद्दल लिहिते. कालचा लेख खूप सुंदर होता. विषय होता - स्व-नियंत्रण. तिच्या मते टिव्ही केबल इत्यादि साधनांच्या आहारी जाऊन मुलांचे स्वत:वरचे नियंत्रण कमी होते. पराधिनता वाढते. आणि आयुष्यात यशस्वी होणारी माणसे बुद्धिमत्ते पेक्षा स्वनियंत्रण अधिक वापरतात. मी विचार करु लागलो.

 

असो ... सिद्धोबाचे साबणाचे लहानसे निमित्त झाले. दोष त्याचा नाही. माझाच आहे कारण मीच स्वत: दिवसातला निम्मा अधिक फावला वेळ टीव्ही नाही तर इंटरनेट वर घालवतो.

 

संध्याकाळी सिंथॉल वापरुन बघतो. बर्याच वर्षांमध्ये नाही वापरला! कॉन्फिडन्स नाही पण नॉस्टॅल्जिया जरूर येईल.

Tuesday, August 11, 2009

रॉबर्ट मॅक्नमारा

इतिहासाचा अभ्यास ही अगदी विलक्षण गोष्ट आहे. इतिहास कधी मनोरंजक असतो तर कधी दु:खद. कधी विसरू नये असा तर कधी आठवु नये असे वाटवे असा. अगदी शब्दश: अर्थ बघायचा झाला तर इतिहास म्हणजे -

"हे असे होते" - इति: + अस.

 

परंतु हा झाला आपला भाबडेपणा. वस्तुस्थिती अशी आहे की इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो. ज्ञात इतिहासाच्या मागे असत्याचे पडदे विणलेले असतात ज्यांच्यामागे जेत्यांची कृष्णकृत्ये अलगद दडवलेली असतात. त्या असत्याला भेदून सत्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करणारी राष्ट्रे जगात सन्मान्य ठरतात आणि आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ उज्ज्वल करतात.

 

६ जुलै या दिवशी जगाच्या इतिहासातिल एक कृरकर्मा काळाच्या पडद्याआड अगदी अलगद गेला. त्याचे नाव रॉबर्ट मॅक्नमारा. मॅक्नमारा हा १९६०-१९६८ या काळात अमेरिकेचा संरक्षणमंत्री होता. अतिशय बुद्धिमान असलेल्या मॅक्नमाराला जॉन एफ केनेडी या तेव्हाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिले. तेव्हा मॅक्नमारा फोर्ड मोटर कंपनीमध्ये सर्वोच्च पदावर अध्यक्ष म्हणुन काम करत होता. तो अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार होता. परंतु व्यक्तिचे मोजमाप तेवढेच असले असते तर आपण हिटलरचे देखील कौतुकच केले असते.

 

दुर्दैवाने मॅक्नमारा याची कारकीर्द ४०-५० लाख निरपराधी व्हिएतनामी कंबोडिअन आणि लाओस लोकांच्या मृत्युस कारणीभूत ठरली. १९५० च्या पुढे अमेरिका आणि रशिया यांच्या शीत युद्धातील एक अतिशय काळे पर्व व्हिएतनामच्या भूमीवर उगवले. व्हिएतनामची समाजवादी वाटचाल अमेरिकेला पचली नाही. स्थानिक जनतेला स्वातंत्र देण्याच्या बहाण्याने अमेरिकन सरकारने स्थापन केलेले दक्षिण व्हिएतनाम मधील कळसुत्री सरकार लोकांच्या पसंतीस उतरत नव्हते. त्यामुळे अखेरिस गल्फ ऑफ टोंकीन मध्ये न घडलेल्या हल्ल्याबद्दल कांगावा करत अमेरिकेने उत्तर व्हिएतनामविरुद्ध युद्ध पुकारले.

 

या युद्धामध्ये एकुन ४०-५० लाख नागरिक आणि सैनिक मृत्युमुखी पडले. जगाच्या इतिहासातील सर्वात क्रुर आणि भीषण हल्ल्याला व्हिएतनामी जनतेला सामोरे जावे लागले. कुठल्याही नीतीची चाड न बाळगता अमेरिकेने प्रचंड बॉम्बहल्ले आणि रासायनीक अस्त्रे निर्लज्जपणे वापरून आपल्या पशुवृत्तीचे किळसवाणे दर्शन घडवले. या हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या नागरिकांच्या मृत्युची जबाबदारी अमेरिकेने नेहेमीच्या पद्धतीने झिडकारुन टाकली आहे. धरणे अन्नसाठा यांवर मुद्दाम हल्ले केले गेले. जंगलांमध्ये दडुन बसणार्या व्हिएतकॉंगच्या सैनिकांना नमवण्यासाठी जंगलेच्या जंगले एजंट ऑरेंज हे रसायन आणि बॉम्बींग्जमार्फत उद्ध्वस्त करण्यात आली. बंदी घातलेले ऍंण्टी पर्सोनेल माइन्स (सुरुंग) पेरले की ज्यामुळे पुढची ५० वर्षे (आणि अजुनही) निरपराध व्हिएतनामी नागरीक आपले हात पाय आणि प्राण गमावत आहेत.

 

हे सर्व करत असताना सर्व नैतिक मुल्यांना तिलांजली दिली गेली (तिलांजली द्यायला मुळात नैतिक मुल्ये होती का हा प्रश्न वेगळा!). या युद्धामध्ये एकच निकष होता आणि तो म्हणजे अमेरिकेचे नुकसान. उत्तर व्हिएतनाममध्ये विरोध अधिक प्रखर होता त्यामुळे तिथले हल्ले हे अधिक नियोजनबद्ध होते. त्याउलट दक्षिण व्हिएतनाममध्ये नगण्य विरोध असल्यामुळे तिथे कार्पेट बॉम्बींग्ज केले गेले. किंबहुना ज्या लोकांना वाचवण्याची भाषा केली गेली त्याच लोकावर बॉम्ब टाकुन त्यांना मारणे हे त्यांच्या कसे भल्याचे आहे असा अजब युक्तीवादही केला गेला. रॉबर्ट मॅक्नमारा हा त्या सर्वामागचा एक महत्वाचा सुत्रधार होता. इतर महत्वाचे सुत्रधार म्हणजे तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष लिंडन जॉहन्सन आणि परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर.

 

एकंदरीतच अमेरिकेचे हे फार मोठे वैगुण्य (नव्हे विकृती) म्हणावी लागेल की इथे सत्याचे अधिष्ठान नाही. नैतिकता आणि मानवी मुल्ये हे फक्त अमेरिकन जिवांनाच लागु आहे. बाकी सर्वांचे जगणे किड्यामुंग्यांपेक्षाही स्वस्त. न्याय हा फक्त सबळांचाच अधिकार आहे. दुर्बळांनी सबळांच्या मर्जीने जगावे अशीच सामाजीक आणि राजकीय जडणघडण. हे पाहिले की या देशाला सुसंस्कृत म्हणावे का असा प्रश्न पडतो.

 

आणि व्हिएतनामच नाही तर मागील ६० वर्षांमध्ये अमेरिकन सरकारांनी जगभर हुकुमशहांना हाताशी धरुन आपली पोळी भाजुन घेतली आहे. यादीच द्यायची झाली तर - पाकिस्तान (झिया), इन्डोनेशीया (सुहार्तो), फिलिपिन्स (मार्कोस), चिले (पिनोशे), पनामा (नोरिएगा), इराक (सद्दाम हुसेन), लायबेरिआ (चार्ल्स टेलर) ही काही ठळक उदाहरणे देता येतील.

 

व्हिएतनाम मध्ये जेव्हा स्वत:चे १०० एक सैनिक दिवसागणिक मरु लागले तेव्हा अमेरिकेने व्हिएतनाम मधुन माघार घेतली. परंतु असे करताना व्हिएतनाम हा देश नामशेष होईल असा पूर्ण आटापीटा केला.

 

मॅक्नमारा हा इतर कोणत्याही देशाचा नागरीक असता तर आतापर्यंत त्याला युद्ध गुन्हेगार म्हणुन जाहीर करुन पकडुन शिक्षा व्ह्यायला हवी होती. परंतु अमेरिकेची अशी धारणा आहे की ते करतील तेच योग्य. त्यामुळे या पाप्याला शांतपणे मरण आले. अगदी झोपेत अलगदपणे मृत्यु पावला.

 

यावर आपण विमनस्क व्ह्यायचे की विचारमग्न व्ह्यायचे हे आपण ठरवायचे. न्याय झाला पाहिजे आणि आज आणि आत्ता झाला पाहिजे ही आपली इच्छा रास्त आहे. परंतु दुर्दैवाने जगाचा न्याय वेगळा आहे. समस्त मानवजातीचा इतिहास जसा गौरवशाली आहे तसाच काळाकभिन्न देखिल आहे. सर्वच क्रुरकर्म्यांना त्यांच्या पापाची फळे मिळतातच असे नाही. परंतु त्यामुळे मानवी मुल्यांवरचा विश्वास डळमळीत होऊन चालणार नाही.

 

दुसरे असे की अनेकदा चांगल्या माणसांकडुन वाईट कृत्ये घडु शकतात. मॅक्नमाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार माणुस होता. परंतु त्याचे कौशल्य चुकीच्या ठिकाणी वापरले गेले आणि त्याला गंधही नव्हता की आपण काही चूक करतो आहोत. त्याच्या लेखी करोडो माणसांचे बळी हे केवल एक "स्टॅटिस्टिक" होते. ही असली बुद्धिमत्ता काय कामाची की जिला मानवी भावना आणि वेदनांची जाणिव नाही. इथे भांडवलवादाच्या मर्यादा जाणवु लागतात. नोअम चोम्स्की नावाच्या एका राजकिय विश्लेषकाच्या मते मॅक्नमारा या व्यक्तीपेक्षा एकुन पाश्चात्य समाजातील नैतिक मुल्यांबद्दल असलेला आंधळेपणा हा अधिक चिंतनाचा विषय आहे. सर्वच गोष्टी फायदा तोट्यात बसवण्यात मुल्यांचा बळी देणारी समाजव्यवस्था अजून बरीच सुधारायला हवी हे नक्की. चर्चिलने म्हटले आहे "लोकशाही सर्वात वाईट शासनप्रकार आहे. परंतु इतर सर्व प्रकार त्याहुनही वाईट आहेत." !!

 

भांडवलवादाचेही तसेच आहे. अमेरिकेच्या मागील ६० वर्षांमध्ये केलेल्या पापकृत्यांमागे भांडवलवादच आहे. अगदी इराक युद्धाचे कारण देखील दुसरे तिसरे काही नसुन ऑईल हेच आहे. परंतु भांडवलवादी लोकशाहीव्यतिरिक्त इतर सर्व मार्ग आत्तापर्यंत तितके यशस्वी ठरले नाही आहेत. तुलनेने अधिक सहिष्णु असलेली ही सध्याच्या काळातील व्यवस्था आहे इतकेच काय ते.

 

   

Sunday, August 9, 2009

ब्लॅक ऍंण्ड व्हाईट

प्रिय सलोनी

 

आज आम्ही एक जुन्या हिन्दी चित्रपटातील गाण्यांचा एक सुंदर कार्यक्रम पाहिला. "ब्लॅक ऍंण्ड व्हाईट" त्याचे नाव.

 

तसे परदेशात असल्याचा हा एक मोठा फायदाच म्हणायचा की बरेचसे कलाकार - चित्रपट, नाट्य, संगीत, साहित्य इ. क्षेत्रांमधील - अगदी घरबसल्या जवळुन पाहण्याची ऐकण्याची संधी येते. भारतात सहसा हजारोंच्या संख्येने उपस्थिती असलेल्या कार्यक्रमांमध्ये तो "पर्सनल" टच ठेवणे कठीण असते. इथे कलेचा आस्वाद अगदी जवळुन घेता येतो. सर्वच कार्यक्रमांना जाणे जमतेच असे नसले तरिही आम्ही जमेल तसे अधुन मधुन याचा लाभ घेतो.

 

तर यावेळी ब्लॅक ऍंण्ड व्हाईट हा १९४५-१९६८ मधील अवीट गोडीच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. फिनिक्स मधील महाराष्ट्र मंडळाने इथल्या टेम्पी सेंटर ऑफ आर्ट्स मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. कलाकार सर्वच चांगले होते ... परंतु मुख्य आकर्षण म्हणजे हृशिकेष रानडे आणि विभावरी आपटे या सध्या सारेगमपमध्ये गाजलेल्या कलाकारांचे होते. हृषिकेश हा सिद्धुचा विशेष आवडता गायक त्यामुळे सिद्धु सारखा हट्ट करत होता की आपण त्याला जाऊन भेटु. ते काही जमले नाही. परंतु बुधवारी कोणाच्या तरी घरी शांता शेळकेंच्या कवितांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे तिथे त्याला हृषिकेश शी दोन शब्द बोलायला मिळेल असे वाटते. बघु.

 

परंतु कार्यक्रम अगदी सुंदर. रानडेबुवा खरोखरीच उत्तम गातात. आणि राहुल सोलापुरकरचे निवेदन अप्रतीम! सिद्धोबाला राजीव नम्रता च्या घरी ठेवला होता त्याला मी इंटरव्हलमध्ये घेउन आलो इतका आवर्जुन पहावा असा कार्यक्रम. सलोनी, तु तर झोपली होतीस. परंतु तुझ्या आणि सिद्धोबाच्या कानावर आपले संगीत पडावे नव्हे नसानसात जावे अशी इच्छा!

 

कुठेतरी अश्या कार्यक्रमांद्वारे आपली नाळ परत जोडली जाते आणि आपल्याला आपल्या भाषा संस्कृतीचे पोषण मिळते. आणि ते मिळाल्यावर कळते की आपण किती भुकेले आहोत या गोष्टींसाठी. भारतात असताना आपल्या चोहोबाजुंना ही गंगा वहात असते त्यावेळी कौतुक नसते. शाळेत जाताना लहानपणी शनिवारी सकाळी किती चांगल्या गोष्टी आपोआप कानावर पडायच्या. संस्कृत बातम्या, मनाचा शोध, संताची वचने ... संस्कृत बातम्या विशेष आठवतात. "इयम आकाशवाणि. संस्कृत वार्ता: श्रुयंताम. प्रवाचक: बलदेवनंदसागर: / किंवा विजयश्री" अजुनही तश्याच बातम्या लागत असतील का? सर्वच घरांमधुन पुणे स्टेशन लावलेले आणि त्या संस्कृत बातम्या अगदी सोमवारातुन नुमवीत पोहोचेपर्यंत सगळ्या घरातुन ऐकत ऐकत शाळेत जायचो. त्याची टिंगल टवाळीदेखील करायचो. श्रीनंद बापट या माझ्या संस्कृतप्रेमी मित्राला मी एकदा टवाळखोरपणे म्हटले देखिल की "संस्क्रृत बातम्यांमध्ये -'युनायटेड स्टेट्सं प्रेसिडेंटं बीइइइइइल क्लिंटण महोदया' - असे आज मी ऐकले त्यात संस्कृत शब्द महोदय: सोडले तर किती आहेत." तर त्यावर बापट गुरुजी मोठ्यांदा हसले होते. (श्रीनंद माझा संस्कृत चा गुरु! त्याबद्दल पुन्हा कधीतरी!). परंतु ही टिंगल टिवाळी बाजुला ... भारतात असताना कळत नकळत खुप चांगल्या गोष्टी कानावर पडत असत. अगदी घरात सुद्धा अप्पा मागील तीस एक वर्षे गीतेचा रोज एक अध्याय वाचताहेत. त्यामुळे नकळत आम्हालाही गीता अगदी ओळखीची वाटते. कधीही कुठेही काही कानावर पडले तर श्लोकाचे पुढची ओळ संस्कृत मध्ये नाही तर निदान मराठीततरी आठवते.

 

इथे अमेरिकेत मात्र या गोष्टींची उपलब्धता मर्यादीत आहे. परंतु तरीही आपला समाज तो धागा बळकट करण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमाला आणि कलाकारांना धन्यवाद आणि शुभेच्छा.