Friday, April 10, 2009

फॉरएव्हर यंग !!

प्रिय सलोनी
मागच्या महिन्यात टीव्हीवर एका शंभर वर्षांच्या आजोबांची बातमी पाहिली. आजोबा अगदी तरुण माणसाला लाजवतील असे उत्साही दिसत होते. अजुनही ते कुठेतरी एके ठिकाणी कार्यालयात काम करत होते. कदाचीत स्वयंसेवक असतील ... टीव्हीवरुन त्यांच्या मुलाखतीत ते सर्वांना एक संदेश देत होते की मंदीमुळे खचून जाऊ नका, उठा आणि नव्या जोमाने कामाला लागा. ही परिस्थिती कायम अशीच राहणार नाही. परिस्थितीसमोर हतबल होऊ नका.
कशामुळे बरे त्यांना हा अधिकार मिळाला असावा? मला वाटते या आजोबांनी १९०९ ते २००९ या शतकात अनेक बर्या वाईट गोष्टींचा अनुभव गाठीशी बांधला आहे. त्यांनी पहिले तसेच दुसरे महायुद्ध, १९३२ ची महामंदी, अनेक नैसर्गीक आपत्ती पाहिल्या तसेच वायुवेगाने बदलणारी तन्त्रज्ञानाची प्रगतीही पाहिली होती! अमेरिकीची समृद्धी अनुभवली तसेच माणसांची मुल्ये बदलतानाही पाहिली होती. एवढे सगळे अनुभवुनही किंवा पचवुनही त्यांच्या बोलण्यावागण्यात इतका उत्साह दिसत होता की मला आमच्या लहानपणीची दूरदर्शनवर झळकणारी डाबरच्यवनप्राशची जाहिरात आठवली ! "साठ सालके बूढे ? या साठ सालके जवान? इनकी रगरगमे जोश और तंदुरस्ती का राज ... डाबरच्यवनप्राश!!"
या आजोबांसारखे आणखी बरेच आजी आजोबा इथे शंभरी गाठताना दिसतात. सर्वच काही इतके निरोगी किंवा उत्साही नसतात. पण भारताच्या तुलनेत अश्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आपल्याकडे एकदा माणसे साठीकडे झुकु लागली की त्यांची मानसिकताच बदलते. शरीरापेक्षा ती मनानेच जास्त खंगतात. आता काय आमचे आयुष्य संपले असे म्हणत उरलेले दिवस कसेबसे ढकलतात. याउलट इकडे कित्येक साठीतील मंडळीदेखील आपल्या आईवडिल किंवा सासुसासर्यांना घेउन सहलीला जाताना दिसतात. बरेच वेळा काही आजारामुळे अपंगत्व आले तर आपल्या जोडीदाराबरोबर अगदी हसत हसत जबाबदार्या उचलत मजेत आयुष्य व्यतीत करतात. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत (म्हणजे अगदी ७५-८० पर्यंत!) स्वत:च गाडी चालवतात. गरजेच्या वस्तुंची खरेदी करतात, घरात नोकर चाकर नसल्यामुळे स्वत:ची कामे स्वत:च करतात, सिनेमाला किंवा फिरायलाही जातात, कुठल्याही सणासुदीला उत्साहाने घर सुशोभीत करतात, जमेल तशे नातवंडांसाठीही खरेदी करतात. दुर्दैवाने जर कुणाला जोडीदाराची साथ संपली असेल तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत स्वत:चे आयुष्य स्वत:च सावरत असतात. आणि जेव्हा अगदी अशक्य होते तेव्हा वृद्धाश्रमामध्ये जातात. अर्थातच अपवाद असतात. परंतु सहसा परिस्थिती अशी असते.
माझ्या एका मैत्रीणीचे ऍन्जेलाचे आईवडिल सत्तरी ओलांडलेले आहेत. वडिलांना डोळ्याने फारच कमी दिसते. तर आईला स्म्रृतिभ्रंश झाला आहे. तरिही ते दोघे जमेल तसे मजेत आणि उत्साहात जगत आहेत. सोबतीला त्यांचा एक प्रामाणिक कुत्रादेखील आहे. इथे प्राण्यांचीही काळजी घेतात, अगदी मुलांप्रमाणे. कायद्यानुसारही ते आवश्यक आहे म्हणा! ऍन्जेलाचे वडिल हे सर्व अगदी हसतमुखाने करतात.
ही आणि अशी बरीच उदाहरणे बघितली की प्रश्न पडतो ... काय बरे रहस्य असावे या माणसांच्या चिरतारुण्याचे? इथे स्वावलंबनाला बरेच महत्व आहे. तसेच माणसेही अभिमानी असल्यामुळे दुसर्यांची मदत घेणे त्यांना रुचत नाही. मेंदु तल्लख ठेवण्यासाठी ते भरपूर वाचन करतात अथवा निरनिराळे छंद जोपासतात किंवा विविध संस्थांसाठी स्वयंसेवक म्हणुन काम करतात. त्यामुळे त्यांचा वेळ तर चांगला जातोच, पण समाजाला मदतही होते तसेच रिकामेपण आणि एकटेपणाची तीव्रता कमी होते.
सर्वांना असे जगणे जमतेच असे नाही. कदाचीत येथील लोकांची "मी" भोवतालची संस्कृती असे आयुष्य जगणे भाग पाडत असेल. पर्याय नाही म्हणुन म्हणा किंवा दुसर्यांच्या नजरेत आपण अयशस्वी ठरु नये म्हणुन म्हणा ... परंतु स्वावलंबनाला येथे पर्याय नाही.
कारणे काहीही असोत ... दाद द्यावीशी वाटते ती इथल्या माणसांच्या सकारात्मक दृष्टीकोनाला आणि येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या जिद्दीला!!
आई

No comments: