Saturday, April 11, 2009

सलोनीची गुगली आणि आमची धावपळ

सलोनीबाई
दर काही दिवसांनी डॉक्टरांकडे पळवल्याशिवाय तुला काही चैनच पडत नाही. परवा तुझ्या आईने मला ऑफिसमध्ये फोन केला की प्लेटलेट ची चाचणी न करता आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्ह्यायला सांगीतले आहे. दुपारचा एक वाजला होता. तातडीने दुकान बंद करुन आमची स्वारी घरी निघाली. वाटेत मित्रमंडळींना फोनाफोनी झाली. सिद्धु शाळेतच होता त्याला घेउ का वगैरेची तशी काळजी नव्हती... घरी येता येता वाटेत थंड पेय म्हणुन एखादा ऑरेंज ज्युस आणायला सांगीतले तिने. साखरयुक्त थंड पेय पिले तर बाळ (अर्थात तुम्ही!) जागे होऊन लाथा मारायला सुरुवात करते म्हणे!
मागच्या काही रक्तचाचण्यांमध्ये तुझ्या आईचा प्लेटलेट काऊण्ट कमी येत असे. परंतु परवा ती चाचणीच काम करेनाशी झाली. सगळ्या प्लेटलेट्स एकमेकांमध्ये गुंतु लागल्या आहेत. त्यामुळे आम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
घरी जाऊन सोनालीला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचलो. तिथे ट्रियाज (म्हणजे गरोदर स्त्रियांसाठीचा बाह्यरुग्ण विभाग) मध्ये पहिल्यांदा नॉन-स्ट्रेस टेस्ट झाली. ही आता नेहेमीचीच झाली आहे. यामध्ये त्यांनी तुझे हृदयाचे ठोके मोजले. १३० सरासरी होते. त्यामुळे एकंदरीत ठीक होते. नंतर प्लेटलेट्सच्या एक अद्ययावत चाचणी साठी रक्त काढुन घेतले आणि अल्ट्रासाऊण्ड साठी आम्हाला एका कक्षात पाठवले. अल्ट्रासाऊण्ड टेक्निशियन २ तासांनी आली तोपर्यंत मी तिथल्या छोट्याशा टीव्हीवर बातम्या इत्यादि पाहिले. तशी इथली रुग्णालये सुसज्ज असतात. वस्तुंचा भडिमार असतो. परंतु त्याहुनही महत्वाचे म्हणजे कधी काय करायचे हे अगदी लिहुन ठेवले असते. त्यामुळेच अमेरिकेत कंपन्या (किंवा कोणत्याही संघटना) अगदी सामान्य कर्मचार्यांकडुनही चांगल्या गुणवत्तेचे काम करुन घेउ शकतात! असो .... तर अल्ट्रासाऊण्ड तंत्रज्ञ आली ... भारतीय होती. दिल्लीची होती (माहेर डेहराडुन) ... २० वर्षांनंतरही डेहराडुन विसरलेली दिसत नव्हती! तिने कुठेही नेता येइल असे एक अल्ट्रासाऊण्ड यंत्र आपल्याबरोबर आणले त्याने वेगवेगळ्या चाचण्या केल्या. खरे सांगायचे तर तिला काही विशेष कळत होते असे वाटले नाही. तुझ्या आईच्या शब्दात सांगायचे तर बोलायला राघु आणि कामाला आग लागु! असो.. तर एकंदरीत तीही चाचणी योग्य झाली. एव्हाना प्लेटलेट्सचा निकाल आला ... ११२ प्लेटलेट्स... नॉट बॅड!
एकुण काय तर घरी जायला हरकत नाही.
असो .... आता पुढचे ३ आठवडे हॉस्पिटलमध्येच येउन प्लेटलेट्सची चाचणी करायची आहे.
मध्यंतरी सिद्धोबाला त्याच्या एका मित्राची आई (गुज्जु लोक आहेत) त्यांच्या घरी घेउन गेली .... तो तिकडेच दंग. या सर्व गोष्टींचा त्याला गंधही नव्हता ... तिकडेच तो जेवला .... कराटेच्या क्लासला ही गेला .... रात्री उशिरा जाऊन त्याला आम्ही घेउन आलो. इकडे अमेरिकेत असा हा आपला भारतीय समाज एकमेकांना धरुन राहतो. स्वाभाविक आहे परंतु तरिही हृद्य आहे. रक्ताची नसली तरी अतिशय मोलाची नाती इथे मिळुन जातात. हेच सगे हेच सोयरे.
ता.क. - तुझी मामी लंडनहुन विमानात बसली आहे. अजुन ६ तासात विमानतळावर जाऊ आम्ही आणायला. खास तुझ्यासाठी म्हणुन मामाला टाटा करुन ती इकडे येते आहे. यु बेटेर बेहव विथ हर ऑल युर लाईफ! अथर्वही अर्थात तिच्याबरोबर आहेच. सिद्धोबाचे काऊण्टडाऊन गेले १० दिवस चालु आहे हे सांगणे न लगे.

2 comments:

Anonymous said...

मनःपुर्वक शुभेच्छा..

आदिती said...

सलोनीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा!