Friday, April 17, 2009

राशोमोन

प्रिय सलोनी

एमबीए करत असताना इंटर्नशिपसाठी मिशिगनहुन ३ महिने अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर स्टॅम्फर्ड नावाच्या एका शहरात राहण्याचा योग आला। २००१ मध्ये मे ते ऑगस्ट असे आम्ही तिथे राहिलो। स्टॅम्फर्ड न्युयॉर्कपासुन ३० मैलावर कनेटिकट राज्यात आहे. तिथेही सार्वजनिक वाचनालय होतेच. अर्थात आम्ही त्याचे सदस्य लगेच झालो. त्या वाचनालयातुन एकदा "राशोमोन" हा एक चित्रपट आणला त्याबद्दल आज तुला मला काही सांगायचे आहे. या चित्रपटाने माझ्या विचारांना एक नवीन चांगली दिशा दिली.

राशोमोन हा अकिरा कुरासावाचा चित्रपट। अकिरा कुरासावा एक महान जपानी चित्रपट दिग्दर्शक होता. जिवंत, खिळवुन ठेवणारे चित्रपट हे त्याचे वैशिष्ट्य. प्रकाश, नेपथ्य, आवाज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कॅमेर्याच्या हालचालीतुन प्रसंगाला उठाव आणण्याची त्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती. राशोमोन हा चित्रपट या सर्व तांत्रिक बाबत सरस होताच. परंतु त्याहीपलिकडे या चित्रपटाने पाश्चात्य जगाला हादरवुन टाकले ते त्या चित्रपटाच्या आशयाने.

आपण आयुष्यात जे काही निर्णय घेतो ते सोपे असतील तर आपल्याला बरे वाटते। साधे सोपे नियम सगळ्यांनाच आवडतात. जास्त गुण चांगले, कमी गुण वाईट. जास्त पैसे असणे श्रेयस्कर, कमी असणे वाईट. निरोगी चांगले, रोगी वाईट इत्यादि. त्यामुळे आपल्याला कळते की आयुष्यात कशाचा पाठलाग करायचा! परंतु जग असे काळे पांढरे असे असते तर किती बरे झाले असते. गम्मत अशी आहे की पांढर्यापासुन काळ्यापर्यंतच्या वेगवेगळ्या छटा आहेत इथे. इतकेच नाही तर अनेक रंगांच्या छटा आहेत. त्यामुळे रोजच्या आयुष्यात काय खरे काय खोटे, काय श्रेयस्कर आणि काय त्याज्य याचा विचार सोपा नाही.

राशोमोन चित्रपटात साधारण हाच विषय हालाळला आहे। यात एकच घटना अनेक व्यक्तींच्या दृष्टीकोनातुन दाखवली गेली आहे. चित्रपटात अगदी मोजकी म्हणजे ५-६ पात्रे आहेत. घटनेचे वर्णन मी करत नाही कारण ते तितके महत्वाचे नाही. परंतु तीच घटना ज्यावेळी प्रत्येक पात्र कथन करते तेव्हा प्रत्येकवेळी वेगळाच दृष्टीकोन समोर येतो. चित्रपटाच्या शेवटी आपण विचार करत राहतो की कोणता दृष्टीकोन खरा आणि कोण नक्की खोटे बोलत आहे! आणि मग कळते ... की सत्य हे असेच आहे. काही तरी घटना घडली हे नक्की. परंतु नेमके काय घडले याचा आपण केवळ अंदाज बांधण्याचा प्रयत्न करु शकतो. सत्याचा शोध घेउ शकतो ... त्यापर्यंत पोहोचुच असे नाही.

१९५० साली जेव्हा हा चित्रपट व्हेनिसच्या महोत्सवात दाखवला तेव्हा प्रचंड गाजला। पाश्चात्य मनाला ही विचारसरणी अगदी क्रांतीकारक वाटली.

तशी पाश्चात्य जगाची धारणाच सरळसोट आहे। इथे नियमबद्धता खूप महत्वाची. आधुनिक शास्त्रे असो वा मानवी जीवन असो ... नियमांमुळे आचार विचार व्यवहार यांमध्ये सुसुत्रता आणि निश्चितता येते. निश्चिततेमधुन स्थैर्य आणि स्थैर्यातुन प्रगती होते. आधुनिक शास्त्र बव्हंशी नियमांवरच अवलंबुन आहे. पुन:प्रत्ययातुनच शास्त्राचे नियम सिद्ध होतात. सफरचंद खालीच पडते. आणि रोजच खालीच पडते. यामध्ये एक नियम आहे जो त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे मानवी मनाला आपल्या भोवतालच्या जगाचे आकलन करणे सोपे जाते. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानातही हीच क्रांती घडली की ज्याने विज्ञानाला शक्याशक्यतेच्या परिघात आणुन सोडले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हायजेनबर्ग वगैरे प्रभृतींनी क्वांटम फिजिक्सचा शोध लावला. या विज्ञानानुसार कोणत्याही वस्तुचे अस्तित्व हे अनेक शक्यतांचा केवळ एक परिपाक असते. कुठल्याही वस्तुचे अस्तित्व हे ठामपणे सिद्ध करणे अशक्य आहे अगदी ती वस्तु तुमच्या डोळ्यासमोर असेल तरीही. आइनस्टाईनसारख्या महान शास्त्रज्ञानेदेखिल त्यावर विश्वास ठेवला नाही सुरुवातीला. परंतु काळाच्या ओघात त्याने आणि सर्वच शास्त्रज्ञांनी क्वांटम फिजिक्स मधील तत्वे मान्य केली.

जर वस्तुंबाबत ही अवस्था तर मानवी मनाचे काय!! सत्य जाणुन घ्यायची मानवी मनाची तगमग स्तुत्य आहे, श्रेय आहे आणि आवश्यकही आहे. परंतु आपण केवळ सत्याकडे वाटचाल करु शकतो. अंतिम सत्य अमुकच आहे हे ठामपणे सिद्ध करणे मात्र अशक्य आहे. दोन दिवसांपूर्वी मी जे काही म्हणालो की "सत्याची कास धरण्याचे सामर्थ्य आणि सत्याचा ठाव घेण्याची पात्रता तुला लाभो" त्याजोडीला हीसुद्धा इच्छा की सत्याचा ध्यास असू देत ... परंतु पूर्ण अथवा अंतिम सत्यावर आपला अधिकार नाही हेदेखिल समजुन घे.

1 comment:

Anonymous said...

नुकताच प्रर्दशीत झालेला 'व्हॅन्टेज पॉईंट' हॉलीवुडपट किंवा जर्मन चित्रपट 'रन लोला रन' बऱ्यापैकी असाच. घटना एकच पण विवीध दृष्टीकोनातु