Thursday, April 9, 2009

एक मित्र .. इरफान

प्रिय सलोनी
मागच्या १-२ दिवसात अनपेक्षीतपणे इरफ़ानशी परत संपर्क झाला.
इरफ़ान मुझफ्फर हा माझा मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भेटलेला एक मित्र. मुळचा पाकिस्तानमधील लाहोर आणि रावळपिंडीचा. अतिशय बुद्धिमान आणि त्यामुळे अर्थाच बुद्धीजीवी या सदरात मोडणारा. कालच कळले की तो आता सोरोस फाउण्डेशन या एका संस्थेचे काम करतो. ही संस्था जागतिक पातळीवर होणार्या घडामोडींवर नजर ठेवते आणि जगातील सरकारे तिथल्या जनतेचे हित कसे जोपासतील यासाठी प्रयत्न करतात. सोरोस हा एक हंगेरियन अब्जाधीश आहे. तो ओबामाचा खुप मोठा समर्थक आहे. असो ... तर इरफ़ान हा मुळचा असा आहे. मला आठवते आहे आमची पहिली भेट दुसर्या एका मित्राच्या घरी जेवणाच्या निमित्ताने गेलो असता झाली. तिथे राजकारणाच्या गप्पा मारत असताना आमचे सुर जुळले.
पाकिस्तानी लोकांबद्दल असलेली एक अढी दुर व्ह्यायला लागली. इरफ़ान हा मुळचा पाकिस्तानी लष्करात कॅप्टन की मेजर होता. पाकिस्तानी मिलिटरी अकॅडेमी मध्ये पहिल्या की दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इरफ़ानचे भवितव्य उज्ज्वल होते. पाकिस्तान लष्करात भरती होणे हा प्रगतीचा एकमेव मार्ग आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. लष्करातील लोकांना मान, सन्मान आणि पैसा कमावण्याच्या संधी (भल्या आणि बुर्या दोन्ही) जास्त असल्यामुळे गुणी आणि धडाडीच्या सर्व तरुणांसारखाच इरफ़ानसुद्धा लष्करात भरती झाला. परंतु त्याच्या जीपला एकदा झालेल्या एका अपघातात त्याचा एक पाय किंचीत अधु झाला. आणि इरफ़ानला लष्कराचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर त्याने अमेरिकेत येउन गणित कसे शिकवावे या विषयावर पीएचडी केली. परंतु बुद्धिमान असला तरीही संशोधन किंवा अध्यापन या दोन्हीपेक्षा इरफ़ानचे मन राजकारणात जास्त रमते त्यामुळे सोरोस फाउण्डेशनचे काम.
भारत आणि पाकिस्तान यांचे संबध तसे तणावाचे त्यामुळे पाकिस्तानी माणसे कशी असतील याचा एक साचा आपल्या मनात असतो. इरफ़ानने माझ्या मनातल्या त्या प्रतिमेच्या नक्किच पलिकडे गेला. त्याचे कुटुंब मुळचे लखनौचे. फाळणीनंतर पाकिस्तानला जावे लागल्याची वेदना बर्याचदा जाणवायची. भारताबद्दल बर्याचदा प्रेम, कधितरी टीका परंतु कडवटपणा कधीच जाणवला नाही. आम्ही खुलेपणाने एकमेकांच्या देशाचे गुणगौरव, समर्थन आणि टीकाही करत असताना एकमेकांबद्दल सद्भावनाच असे.
मागील काही दशकांमध्ये पाकिस्तानाची दहशतवादाकडे होणारी अधोगति पाहुन त्याला खुप दु:ख व्ह्यायचे. भारताच्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर तर तो विरोधाभास अधिकच गडद होत असे. पाकिस्तानात परतुन काही करण्याची इच्छा असली तरीही परतण्यासारखी परिस्थिती तिथे नक्किच नाही. इरफ़ान परत गेलाही काही प्रोजेक्टसच्या निमित्ताने. परंतु काही महिन्यातच परत आला.
माझे एमबीए पूर्ण झाल्यानंतर आम्ही फिनिक्सला आलो तरिहि संपर्क चालु होता. मध्यंतरी संसदेवर झालेल्या हल्ला आणि पाकिस्तानच्या इतर कुरापती यांचे प्रतिबिंब कुठेतरी आमच्या नात्यात उमटते. कधीतरी तात्पुरता दुरावा होतो परंतु तरीही स्नेह आणि सद्भावना कायम राहतात.
मैत्री ही अशीच असते. कधी दुरावा, कधी अबोला ... परंतु निष्कपट मन असेल तर प्रेम कायम राहते आणि कधितरी परत एकदा मित्र एकत्र यायला वेळ लागत नाही.

1 comment:

Sachin_Gandhul said...

एक मित्र .. "इरफान"
.
. excellent ,,,, keep it up