Saturday, April 4, 2009

व्यक्तिस्वातंत्र्य

चिकु
दादाची एक टीचर ऍन्जेला माझी जवळची मैत्रीण झाली. ऍन्जेला ही घटस्फोटीत आणि दोन मुलांची आई. एक-दीड वर्षापूर्वी आम्ही अश्याच गप्पा मारत होतो. मी गप्पा मारताना दर वेळी तिच्या कुटुंबाची चौकशी करत असे. यावेळी चौकशी करताना मला ती थोडीशी अस्वस्थ दिसली म्हणुन मी तिला विचारले तेव्हा ती मला सांगु लागली की ऍन म्हणजे तिची मुलगी शिक्षण सोडुन शिकागोला स्थाईक होण्याचे ठरवत आहे. ऍनला संगीताची खुप आवड म्हणुन ती युनिव्हर्सिटी ऑफ ऍरिझोनामध्ये संगीत क्षेत्रात पदवीचा अभ्यास करत होती. अमेरिकेत पदवी शिक्षण खुपच महाग असते त्यामुळे कमी लोक पदवीचे शिक्षण घेताना दिसतात. ऍन्जेलाची तर मुळीच ऐपत नव्हती परंतु ऍनने स्वबळावर शिष्यवृत्ती मिळवुन आणि छोट्यामोठ्या नोकर्या करत बरेचसे शिक्षण संपवत आणले होते. आत फक्त एकच सत्र बाकी होते. इथे बर्याच तरुण मुली/मुले रेस्टॉरंट्समध्ये वेटर/वेटरसेस च्या नोकर्या करतात. ऍन व तिच्या काही मैत्रीणी तेच करत होत्या. भरघोस मिळणार्या टिप्समुळे तिच्या मैत्रिणी शिक्षण सोडुन हीच नोकरी पुढे चालु ठेवण्यासाठी म्हणुन शिकागोसारख्या मोठ्या शहरात स्थलांतरीत झाल्या होत्या. आता ऍनचेही अभ्यासात लक्ष लागेनासे झाले होते. फारसे काही न करता पैसा कमवता येईल असे तिला वाटु लागले होते. म्हणुन तिने शिकागोला जाण्याचा निर्णय घेतला होता. कदाचीत महागडे पदवी शिक्षण व पैसा कमवण्याची घाई आणि चटक हीच मुख्य कारणे असावीत ऍनसारख्या कॉलेजड्रॉपआउट्समागे!
ऍन्जेलाला वाटत होते की ऍनने शिक्षण पूर्ण करावे कारण आता फक्त सहा महिन्यांचाच प्रश्न होता. पण ऍन मात्र तिच्याच विश्वात होती. तिला हे सर्व काही कळत नव्हते की कळवुन घ्यायचे नव्हते? असो ...
हे ऐकुन मी ऍन्जेलाला म्हणाले, " अगं तु सांग ना तिला समजावुन." तेव्हा ऍन्जेला मला म्हणाली, "आता ती बर्यापैकी मोठी झाली आहे. तिचे निर्णय तिनेच घ्यायला हवेत. त्यात मी काहीही बोलु शकत नाही. मी फक्त पर्याय समोर ठेवु शकते आणि परिणामांबद्दल सांगु शकते. बाकी सर्व तिनेच ठरवावे."
मी हे सगळे ऐकुन थक्कच झाले. कारण इथे फार कमीजण शिक्षण घेतात. त्यामुळे इथल्या पदवीधर लोकांना चांगल्या व भरभराटीच्या काळात तरी नोकरी मिळवण्यासाठी फारसे झगडावे लागत नाही. ऍनने शिक्षण पूर्ण केले असते तर फक्त तिच्याच क्षेत्रातच नव्हे तर कुठेही तिला पटकन नोकरी मिळाली असती. सध्या ऍन शिकागोमध्ये "स्टारबक्स" या कॉफीच्या दुकानात काम करते. पैसे पुरत नाहीत म्हणुन सतत आईकडे पैश्यांची मागणी करते. मध्यंतरी मला ऍन्जेला सांगत होती की ती ऍनला रोजच्या वापराला जे पैसे पाठवत होती त्यातुन ऍन चक्क दारु खरेदी करत होती! माझ्या डोक्यात विचार आला की ऍन्जेला हे सर्व वेळीच थांबवु शकली असती. परंतु आपल्या मुलीच्या निर्णयक्षमतेला आणि अहंकाराला धक्का लागु नये म्हणुन अथवा तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणुन वागु देउन तिच्या निर्णयात ढवळाढवळ नको म्हणुन तिने हे सगळे टाळले. हे कितपत योग्य आहे? अमेरिकन माणसांच्या दृष्टीकोनातुन विचार कराल तर १००% बरोबर. आणि भारतीयांच्या दृष्टीने विचार कराल तर ..... !! ??
हा फरक मुख्यत: दोन देशांमधील भिन्न संस्कृतींमुळे आहे. अमेरिकन माणसे कुठलाही निर्णय घेताना "मी" म्हणुनच विचार करतात. तर भारतीय माणसे स्वत:ला "आम्ही" म्हणुनच बघत असतात. कुठलाही निर्णय घेताना आपल्या निर्णयाचा भोवतालच्या माणसांवर काय परिणाम होईल? लोक काय म्हणतील? इत्यादि इत्यादि....
आपल्याकडे साध्या साध्या गोष्टींबाबतही निर्णय घेणे अवघड होऊन जाते. सहज सोप्या दिसणार्या गोष्टींमध्ये गुंता वाढत जातो. जर कुणीही स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायचे ठरवले तर त्या व्यक्तीला अगदीच स्वार्थी ठरवले जाते. मग त्या व्यक्तीशी इतरांचा वागण्याबोलण्याचा रोखच बदलतो. त्यामुळे असे निर्णय घेणार्या व्यक्तीलाही आपण फार मोठा काहीतरी अपराध केल्याची भावना निर्माण होते. एकुण काय तर निर्णय घेण्याची क्षमताच मारली जाते.
जर वरील गोष्टींचा सखोल विचार केला तर वाटते की स्वत:चा निर्णय स्वत: घेणे आणि येणार्या परिणामांना सामोरे जाणे असे करणे गरजेचे आहे. परंतु असे करताना आयुष्यात मोठी किंमत चुकवावी लागणे हे जसे चुकीचे आहे तसेच आपल्या संस्कृतीप्रमाणे मुलांना मुले झाली तरी मोठे होऊ न देणे हेही तितकेच चुकीचे आहे. बरेच वेळा डोक्यात विचार येतो की दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी घेऊन आपण जर त्यांचा मध्य साधला तर सगळ्यांचाच फायदा होणार नाही का? गरज आहे ती प्रत्येकाने थोडे बदलायची!

आई

No comments: