Wednesday, April 15, 2009

ग्रॅण्ड कॅनियन

सलोनी,

तुझी आमची डोळाभेट (!) जवळ येत चालली आहे. माहित नाही पुढे अजुन किती लिखाण
करण्याची संधी मिळेल. तसे काही विशेष रुपरेषा ठेवुन हे लिखाण केले नाही
त्यामुळे अमेरिकेतील आमच्या वास्तव्याचा अगदी सर्व आलेख मांडता आला नाही. आता
उरलेल्या थोड्या दिवसांमध्ये मात्र काही अगदी आवर्जुन उल्लेख कराव्या अश्या
गोष्टी मांडेन. आज तुला ज्याच्या उल्लेखाशिवाय आमचे अमेरिकन अनुभवविश्व आणि
भावविश्व अगदी अपूर्ण राहील अश्या ग्रॅण्ड कॅनियनबद्दल सांगणार आहे.

भारतात असल्यापासुनच ग्रॅण्ड कॅनियनबद्दल बरेच ऐकुन होतो. निसर्गाचा सर्वात
मोठा चमत्कार, करोडो वर्षांच्या पंचमहाभूतांच्या लीलांमधुन निर्माण झालेले एक
अद्भुत आश्चर्य इत्यादि इत्यादि. ग्रॅण्ड कॅनियन पाहण्याची इच्छा नक्कीच होती
परंतु कधी पाहण्याचा योग येइल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आणि योगायोगाने मला
एमबीएनंतर ऍरिझोनामध्ये नोकरी मिळाली आणि मागील ६ वर्षांत ग्रॅण्ड कॅनियन एकदा
दोनदा नाही तर कमीत कमी २० एक वेळा पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली.

खरोखरच ग्रॅण्ड कॅनियन ही नुसती पाहण्याची गोष्ट नाही. तर अनुभवण्याची गोष्ट
आहे.


फिनिक्सपासुन जेमतेम ३ १/२ तासांच्या अंतरावर म्हणजे २४० मैलावर असल्यामुळे
मागील ६ वर्षांच्या फिनिक्सच्या वास्तव्यात आम्ही ग्रॅण्ड कॅनियनला दर ३-४
महिन्यात किमान एकदा तरी गेलो आहोत. फिनिक्स समुद्रसपाटीपासुन १००० फुट उंचीवर
तर ग्रॅण्ड कॅनियन ६-७००० फुटांवर! त्यामुळे फिनिक्समधील वाळवंटी वातावरणाचा
ग्रॅण्ड कॅनियनच्या आसपास मागमूसही दिसत नाही. दिसतात ती सूचिपर्णी वृक्षांच्या
वातावरणासारखी झुडुपे. फिनिक्समध्ये जे काही तापमान असेल त्यापेक्षा २०-३० अंश
फॅरेनहाईट कमी तापमान असते ग्रॅण्ड कॅनियनला.

ग्रॅण्ड कॅनियनचे पहिले दर्शन (होय दर्शनच) मला ४ जुलै २००३ ला झाले. मी
सोनाली सिद्धु गिरीष आणि सुचेता ग्रॅण्ड कॅनियनला गेलो होतो. ती आम्हा
सर्वांचीच पहिली वेळ होती. पहिल्यांदा काही कळत नाही नक्की आपण काय पहायला
चाललो आहोत. फक्त सर्व बाजुने मोकळ्या वातावरणाचा अंदाज जरूर येतो. अगदी
ग्रॅण्ड कॅनियनच्या काठापासुन २० फुटावर जसे पोहोचलो तसे एकदम परमेश्वराचे
दर्शन व्हावे तसे अजस्र पसरलेल्या एका खाईचे दर्शन झाले. ३०० मैल लांब, २० मैल
रुंद आणि १ मैल खोल अशी ही कॅनियन म्हणजे घळ आहे. कोलोराडो राज्यात हिवाळ्यात
पडणारे बर्फ उन्हाळ्यात वितळते आणि मग दक्षिणपश्चिमेकडे युटाह,
ऍरिझोना आणि कॅलिफोर्निया या राज्यांमधुन जाते। मागील करोडो वर्षांपासून वाहणार्या या पाण्याच्या प्रवाहांनी कोलोराडो नदीच्या रुपाने इथल्या संपूर्ण भूभागावर असा काही ठसा उमटवला आहे की
त्याला तोड नाही. त्याचे वर्णन करायला आपले शब्द बापुडे होतात त्यामुळे मी इथे
फक्त मी काढलेली काही छायाचित्रे मांडतो आहे.

ग्रॅण्ड कॅनियन हा सांगण्याचा विषयच नाही. तो अनुभवल्याशिवाय कळणे कठीण आहे.
इथे आले की आपण स्वत:च्या आणि परमेश्वराच्या एक पाऊल जवळ जातो असे मला मनोमन
वाटते. हिमालयाच्या सानिध्यात तेच अनुभवायाला मिळाले .. परंतु तेव्हा बराच लहान
होतो. शाळेतले दिवस होते ते. त्यानंतर राजगड, रायगड, ढाक भैरी, आणि अगदी
सिंहगडावरील "विंड पॉईंट" यांनीसुद्धा बरीच साथ दिली! चांगल्या गुरुबाबत जे
म्हटले जाते तेच निसर्गाच्या बाबतीत लागु आहे ... की मौन हेच त्याचे व्याख्यान
असते आणि तरिही आपल्या सर्व शंकाचे निराकरण आपोआप होत जाते. अमेरिकेतला असला
तरी निसर्ग तो निसर्गच. इथला निसर्ग भारतातल्या मानाने बराच रौद्र आहे. परंतु
तरिही त्याची भीती नाही वाटत. आदर वाटतो. मन अंतर्मुख होते.

अमेरिकेतील तश्या या एकाकी आणि रुक्ष जीवनात ग्रॅण्ड कॅनियनने नक्कीच वेगळाच
रंग भरला.


आता इथे येणे इतके नित्याचे झाले आहे की सिद्धुलाही इथे ३-४ महिन्यातुन एकदा
नाही आले तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते. एक वेगळे नातेच निर्माण झाले आहे या
कॅनियनशी. अगदी स्नेहाचे नाते. संस्कृतमध्ये स्नेहाची व्याख्या कुणीतरी
सुभाषितकाराने अशी केली आहे "दर्शने स्पर्शने वापि श्रवणे भाषणेपि वा । यत्र
द्रवत्यंतरंग स स्नेह इति कथ्यते॥" ज्याच्या दर्शनाने, ज्याच्या स्पर्शाने,
ज्याबद्दल ऐकल्याने किंवा नुसत्या ज्याच्या उल्लेखाने अंतरंग हळवे होते तिथे
स्नेह आहे असे समजावे.

ग्रॅण्ड कॅनियन हॅज अ व्हेरी व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट ऍण्ड अ व्हेरी
स्पेशल कनेक्शन विथ मी. तुझेसुद्धा असे नाते कुठेतरी कधीतरी निसर्गाशी जुळावे
अश्या शुभेच्छा!

2 comments:

Sachin_Gandhul said...

ग्रॅण्ड कॅनियन !!! हा अनुभव आम्हीही घेवुच..
very nice...

बाल-सलोनी said...

jaroor! dhanyavaad!