Sunday, January 18, 2009

सलोनी, सरस्वती, सोफिया की एमीली ?

७ जानेवारी २००९
नवीन वर्षाच्या शुभेच्छा सलोनी तुला! तुझे हे पहिलेच वर्ष .... नाही का? अगदी नवीनतमच तर। खरे तर मागील वर्ष अगदीच वाईट गेले। वैयक्तिक नाही म्हणत मी। मागील वर्षात जी आर्थिक उलथापलत झाली त्यात हजारो अब्ज डॉलर्स ची सम्पत्ती धुळीस मिळाली। आणि जगभर। करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या। आणि बहुधा ही तर फ़क्त सुरुवात आहे। २००९ मध्ये मंदी तीव्र होणार आहे असे जाणकार म्हणतात। परन्तु मी मात्र या वर्षाकडे अगदीच उत्कंठेने पहात आहे। सलोनीचा जन्म एप्रिल किंवा मे मध्ये होइल। आतापर्यंत तिघांचे असलेले आमचे त्रिकोणी कुटुंब चौकोनी होइल। सिद्धार्थ देखिल अगदी सज्ज झाला आहे। प्रेमळ आणि काळजीवाहु स्वभाव आहे त्याचा। सलोनी हे नाव त्यानेच ठेवले। मी मारे कमला, सरस्वती, एमीली, सोफिया अश्या नावांच विचार करत होतो। तसा मी पारंपारिक आहे। संस्कृती, धर्म, परम्परा यातील चांगल्या आणि उपयुक्त गोष्टीना चिकटून राहणे मला आवडते। त्यामुळे मला नेहेमीच देवी देवतांची नावे आवडतात। शेक्सपीयर म्हणतो 'नावात काय आहे?'। ते खरेही आहे। परन्तु हेही खरे आहे की नावामधुन आईवडील आपल्या बालकाविशयीच्या भावना आणि आकांक्षा व्यक्त करीत असतात। देवी देवतांची नावे घेतली की मला त्यांचे उत्तम गुणच डोळ्यापुढे येतात। म्हणुन कमला, सरस्वती इत्यादींचा विचार ! सिद्धार्थचे नाव सिद्धार्थ ठेवले नसते तर रामचंद्र किंवा श्रीराम ठेवले असते। प्रभु रामचंद्र आणि गौतम बुद्ध या पुरुषोत्तमांनी आपली भूमी पावन केली आहे। गौतम बुद्ध होऊं गेले यात काहीच संशय नाही। श्रीराम प्रभुन्च्या अस्तीत्वाचा ठोस पुरावा नसला तरीही ते भारताचा आत्मा बनाले आहेत। आणि तेच अधिक महत्वाचे आहे।

सोफिया अथवा एमीली च्या मागे थोड़ा वेगळा विचार आहे। ८ वर्षे अमेरिकेत राहून इथेही आमची थोड़ी नाळ जुळली आहे। अगदी रोपटे रुजून तरारून फुलून मुळीच आले नाही आहे। किम्बहुना मातृभूमीच्या आठवणीने व्याकुळ होउन झुरुन गेले आहे। भौतिक सुखांच्या कृत्रिम खतांमुळे ते बाहेरून टवटवीत दिसले तरी आतून दुख्खी आहे। परन्तु कसे का होइना आठ वर्षे या देशात आम्ही राहिलो, बव्हंशी अमेरिकेने चांगलीच वागणूक दिली, प्रसंगी प्रेम आणि मदतही केली। त्यामुळे काही प्रमाणात आमची मुळे इथे थोड़ी फार नक्कीच रुजली आहेत। आणि म्हनुनच पाश्चिमात्य नावांचा विचार मनात आला। जेव्हा भविष्यात भारतात परत जाऊ तेव्हा मनाचा एक कप्पा अमेरिकेसाठिही झुरेलच। आणि तेच योग्य आहे ... तेच मानवी आहे। परन्तु आता ही सर्व नावे मागे पडली आहेत। सिद्धार्थ ला डावलणे 'मुश्किल ही नहीं बल्कि नामुमकिन हैं' ।
आणि सलोनी हेच नाव सर्वात सुंदर आहे अशीच आमची खात्री पटत चालली आहे।

2 comments:

साधक said...

Mi pan mazya putani sathi naav shodhato ahe...Amhi Ovi tharavlay

saloni said...

Sundarach ahe. Ek tari ovi anubhavavee!!

Shubheccha.