Wednesday, January 14, 2009

कशासाठी हा प्रपंच?

२ डिसेंबर २००८
४ आठवड्यांपूर्वी सोनालीची डौक्टरांकडे नियमीत वैद्यकीय तपासणी करून आम्ही घरी परत येत होतो। अचानक मला वाटले की या नवीन बाळाला मागील ८ वर्षे कशी काय कळणार? MBA साठी २००० साली नोकरी सोडून मी मिशिगनला आलो। अमेरिकन विद्यापीठातले ते दिवस, न्यूयार्क इंटर्नशिप, ९११ ची भीषण परिस्थिति, सिद्धार्थचा जन्म, बुश यांची पुनर्निवड, फिनिक्स एरिजोना येथे स्थलांतर आणि अक्षरशः शेकडो सहली यांमार्फत अमेरिकेतील जे अपूर्व आणि अमूल्य अनुभव आले त्याला तोड़ नाही। मागील ८ वर्षांत बरेच काही कमावले। ज्ञान, अनुभव, पुरेसा पैसा - व्यावसायीक आणि वैयक्तिक दोन्हीही। सर्वात महत्वाचे म्हणजे सिद्धार्थचा जन्म आणि आता सलोनिचा। आता भारतात ताबडतोब परतण्यची इच्छा आहे। बहुधा २००९/१० मध्ये नक्कीच परत जाऊ. २०-२५ वर्षे भारत आणि ८-१० वर्षे अमेरिकेतील जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर दोन्ही संस्कृति आणि समाज यांची मर्म आणि वर्म स्थाने थोडीफार नक्कीच कळु लागली आहेत ।
या लिखाणामागे फार काही भव्य दिव्य उद्देश काही नाही आहे। सिद्धार्थ आणि सलोनी यांना भविष्यात आपल्या आईवडिलांनी अमेरिकेत काय अनुभवले, काय शिकले, काय कमावले आणि काय गमावले याचा प्रांजळ आढावा घेता यावा याकरिता हा सर्व प्रपंच।

तशी प्रत्येक पिढी आपापले प्रारब्ध घेउन येते आणि घडवतेहि। आपल्या लिखाणामुळे कोणाला काय उपयोग होइल हा अहंकाराच वाटावा ... आणि असेलही। परन्तु हेही खरेच की ही वेडी माया आणि आंधळे प्रेमही असू शकते। आणि या प्रेमामुळेच ही लेखनाची उर्मी निर्माण झाली आहे।

जगाच्या प्रगतीचा वेग दर २० वर्षांनी दुप्पट होतो आहे म्हणे। आमच्या डोळ्यासमोर अमेरिकेमधील जीवनमान कमालीचे बदलून गेले आहे। वस्तुंची रेलचेल, समाजाची मानसिकता, जागतिकीकरण, दहशतवाद, गरीब राष्ट्रांची प्रगति, आणि प्रगत राष्ट्रांच्या वाढत्या समस्या .... अनेक बाजूंनी बदलाचा वेग प्रचंड आहे। समस्या अनेक आहेत। परन्तु आशेचे किरण त्याहुनही अधिक आहेत। ही नवीन पिढी अधिक "वसुधैवकुटुम्बकम" असणार आहे। जगातील सर्वच बर्र्यावाईट घटनांचे प्रतिबिम्ब या पिढीच्या आयुष्यावर खुप लवकर पडणार आहे । संस्कृति, राष्ट्रवादास छेद देणारे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदल, सर्व जगाची क्षितिजे वेगाने विस्तारित राहतील। केवळ यासाठी हा सर्व लेखनप्रपंच अथवा उद्योग। भारत आणि अमेरिकेच्या सुंदर, बलशाली गोष्टींची भविष्यात सांगड़ घालण्यासाठी हे लेखन उपयुक्त व्हावे अशी इच्छा ।

भारत आणि अमेरिका हे एक अर्थाने अगदी विभिन्न परन्तु एक अर्थाने अगदी एकसारखे देश आहेत। सहिष्णुता, प्रागातिकता, आत्मविश्वास याबाबत बर्यापैकी एकसारखे; परन्तु भौतिकवाद आणि आध्यात्म, व्यक्ति आणि समाज, उपलब्ध आणि प्रारब्ध याबाबत अगदी टोकाचा फरक! आज जागतिकी करणाच्या रेट्यामुळे हे दोन देश एकत्र येऊ पाहात आहेत।

सर्व जगाला अतिशय आशास्पद शक्यतांच्या निर्मितीची बीजे रोवली जात आहेत। आमच्या आणि पुढील पिढ्यांना विश्वसंस्कृतिच्या सृजनामध्ये आपापला खारीचा वाट उचलायचा आहे। सिद्धार्थ आणि सलोनी यांना देखिल मागे राहून चालणार नाही।

त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक बांधिलाकिसाठी हे सर्व लेखन त्याना सप्रेम भेट!

1 comment:

साधक said...

सहीये...तुमचा परत जाण्याचा निर्णय छान आहे. तुमच्या कडे पाहून मी ही प्रेरणा घेतली आहे. मी पण काही वर्षांनी परत जाईन.