Thursday, February 26, 2009

ओबामा - ३७ दिवसांचा आढावा

काल ओबामाचे ३७ दिवस पूर्ण झाले अध्यक्ष होउन। या ३७ दिवसात इकडे अमेरिकेत अर्थव्यवस्था अधिकाधिक गंभीर होत चालली आहे। आता तर इथल्या ९९% बँका दिवाळखोर झाल्या आहेत। त्यांच्या आर्थिक ताळेबंदाकडे पाहता त्यांच्याकडे बरीच बुडीत कर्जे आहेत आणि बरीच मालमत्तेची किम्मत घसरली आहे असे दिसते आहे। असो ... तर त्यामुळे ओबामा सरकारचा इकडे अगदी कस लागणार आहे यात काही संशय नाही।

ओबामाची विचारसरणी निःसंशय समाजवादी आहे। त्यामुळे सरकारी खर्च वाढेल। कल्याणकारी योजना वाढतिल। श्रीमंतांवर कर वाढतील। कंपन्यांवर बंधने येतील। भारताच्या दृष्टीने प्रतिकूल म्हणजे ... जागतिकिकरणावर सुद्धा बंधने येतील। H1B वर बंधने येतील...

यात लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की ओबामा हां काही भारताचा नेता नाही आहे। तो अमेरिकेचा ज्यात फायदा आहे तेच करणार। त्याची काही काही वक्तव्ये ही भारताच्या दृष्टीने घातक आहेत। उदाहरणार्थ काश्मीर बाबत ओबामा ची हस्तक्षेप करण्याची वृत्ति दिसते। भारताने सावध राहिले पाहिजे।

असो। परन्तु काल ओबामाचे सीनेट आणि कांग्रेस समोर संयुक्त भाषण झाले। सेनेट म्हणजे आपल्याकडची लोकसभा आणि कांग्रेस म्हणजे राज्यसभाच जणू। फरक इतकाच की यांची कांग्रेस भारताच्या राज्यसभेसारखी शक्तिहीन नाही। अमेरिकन सरकारचे सर्व खर्च कांग्रेस मंजूर करते ... त्यामुळे त्यांचाकडे बरीच राजकीय ताकत आहे। तर कालच्या भाषणाच्या आशायापेक्षा मला सांगण्यासारखे विशेष हे वाटते की सभागृहातील सभ्यता आणि आदर जो इथे जपला जातो त्याचे खरेच कौतुक वाटते। अमेरिका ही खरोखरच जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आहे। तिच्यात दोष आहेत। परन्तु सर्व जगात इथले सरकार नक्कीच जास्त कल्याणकारी आहे।

ओबामांच्या भाषणाच्या आधी सर्व सदस्य स्थानापन्न झाले होते। ओबामांच्या आगमनाच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश येउन पुढच्या बाकांवर बसले। त्यावेळी सुद्धा टाळ्यांच्या गजरात त्या सर्वांचे स्वागत झाले। बरेच सदस्य ओबामांचे स्वागत करता येइल अशी बाके पकडण्यासाठि १-२ तास आधीच आले होते। सर्वात शेवटी ओबामा आणि त्यांचे ३७ कैबिनेट मंत्री (सेक्रेटरी) यांचे आगमन झाले। त्यावेळी त्यांचे जे स्वागत झाले ते बघण्यासारखे होते। विरोधी पक्षाचे अगदी बुजुर्ग सदस्य सुद्धा उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत करते झाले। सभागृहाच्या दरवाज्यापासून ते मंचावर जायला ओबामांना १० मिनिटे लागली ... तरीही टाळ्यान्चा गजर चालूच होता। पुढे भाषण करतानाही बर्याचदा विरोधी पक्षान्निही मनापासून दाद दिली। इथल्या राजकारणातील ही जी परिपक्वता आणि सभ्यता आहे त्याला तोड़ नाही। राजकारणासाठी राजकारण सहसा केले जात नाही .... आणि जनाताही खपवून घेत नाही। मला १९९९ च्या सुमारास आपल्याकडे झालेली लोकसभेतील मारामारी आठवली। आणि शरम आणि संताप दोन्ही भावना मनात उठल्या। आपल्याकडे - त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच थोडी तरी सुसंस्कृतता राहिली आहे। बाकी राज्यांमध्ये आणि विशेषतः बिहार, यु पी, इत्यादि ठिकाणी अगदीच वाईट परिस्थिति आहे। मला वाटते की जनता जसजशी जास्त जागरुक होते आणि जसजशी समाजात समानता आणि उद्यमशीलता येते तसतसे राजकारणी लोकांना सुद्धा सुधारावेसे वाटेल। यथा प्रजा तथा राजा !!

असो ... तर भारतातील राजकारणही असेच सुसंस्कृत आणि लोककल्याणकारी व्हावे अशी मनापासून इच्छा।

No comments: