Sunday, February 8, 2009

कार्तिकी गायकवाड

सलोनी, या वीक एंड ला एक खूपच सुंदर कार्यक्रम होता। सा रे गा म प little champs या स्पर्धेची महा-अन्तिम फेरी होती। फ़क्त अन्तिम का नाही? "महा"च का? हे मला तरी कळत नाही। आपल्याकडे विशेषणे थोडी जास्तच वापरली जातात। परन्तु असो.... मी तर या कार्यक्रमाच्या अगदीच प्रेमात पडलो बुवा।

२ महिन्यांपूर्वी इथे ख्रिसमस च्या सुटिमध्ये सोनाली ने मला या कार्यक्रमाचे वेड लावले। watchindia.tv या वेब साईट वरून झी मराठी वाहिनी इथे पाहता येते। तिथे आम्ही हां कार्यक्रम पाहू लागलो। इतकी लहान मुले इतके छान गातात आणि इतकी सुंदर मराठी गाणी, जुनी गाणी, भजने, भारुड इत्यादि पाहून अत्यानंद झाला। कोण म्हणतो मराठी भाषा किंवा संस्कृति र्हास पावते आहे? या मुलांचे गाणे पाहून आणि श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहून मराठी भाषेचे अणि संस्कृतीचे भवितव्य उज्ज्वलच आहे असे म्हणावेसे वाटते।

तशी सर्वच मुलेविशेषतः अन्तिम फेरीत पोचलेली पाच मुले उत्तमच - नव्हे असाधारण - होती। परन्तु कार्तिकी गायकवाड हे अगदी विशेष प्रकरण। सुरेश वाडकरान्च्या भाषेत "भूत" आहे। तिचे स्वर आणि भाव यांना तोड़ नाही। ताल आणि लय हे ज़मणे त्यामानाने सोपे आहे। परन्तु स्वरान्वर पकड़ मिळवायला भल्या भल्याना जन्म जातो। आणि त्यापलीकडे भाव व्यक्त करणे हे अजूनही अवघड! कार्तिकिची सर्वच गाणी केवळ सुर लय आणि तालात नव्हती तर अगदी थेट काळजाला जाऊन भिडणारी होती। "घायाळ पक्षिणी", "उघड्या पुन्हा जाहल्या", "लिंगोबाचा डोंगर" या गाण्यांनी तर कहर केला। ही ३ गाणी माझ्या मते मूळ गाण्यांपेक्षा उत्तम गायली कार्तिकिने। याव्यतिरिक्त अजून तिचे एक वैशिष्ट्य म्हणजे कार्तिकिने तिच्या वडिलांनी संगीत दिलेली आणि सहसा लोकांनी न ऐकलेली गीते गायली। गाजलेल्या गीतान्वर टाळ्या मिळवणे त्यामानाने सोपे आहे। परन्तु कुणी न ऐकलेली गाणी लोकांना आवडावीत यातच कार्तिकिचे असाधारणत्त्व दिसते। "कांदा मूळा भाजी", "घागर घेउन", "राधे चाल चाल", "खोटे नाटे बोलू नका" एक ना अनेक, कार्तिकिने सुंदर भजने गवळणी भारुडे सादर करून लोकांना वेड लावले।

स्पर्धेला थोडेसे गालबोट लागले असेल तर ते म्हणजे SMS द्वारे मतदान करण्याच्या पद्धति मुळे कार्तिकी बाहेर फेकली गेली होती। आळंदिच्या या मुलीला SMS सुरुवातीला खूप कमी आले। आपल्याकडे अजूनही SMS आवर्जून पाठवावेत असा वेळ, पैसा, फुरसत समाजातील सर्व घटकांकडे नाही। आणि अजूनही आपण थोड़े अनुदार आहोत की आडनावे पाहून भेदभाव करतो। परन्तु झी वरील सर्व मान्यवरांच्या कृपेने कार्तिकी ला परत बोलावण्यात आले आणि पुढे तिने इतिहास घडवला

यामध्ये मला असा पण एक विशेष आनंद झाला की भारतात आपण मुलांना भावना व्यक्त करायला बंधने घालतो... त्याच्या अगदी विरुद्ध असा हां कार्यक्रम झाला। मुले मुक्त कंठाने गायली आणि स्वत: ला अभिव्यक्त करू लागली। आणि अगदी फक्त पुणे आणि मुंबई च नाही तर रत्नागिरी, अलीबाग, आलंदी, लातूर .... ! हेच योग्य आहे आणि त्यातच मजा आहे। सर्व लोकांना आणि सर्व घटकांना समाजात स्थान असले पाहिजे आणि त्यांच्या गुणांना वाव मिलला पाहिजे।

परदेशात राहून कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींचा असा हां जास्त आनंद होतो। कार्तिकी चा विजय म्हणजे माझ्या मते अनेक गोष्टींचा विजय होता। अभिव्यक्तिचा बंधनावर, लोकसंस्कृतिचा अभिजनांवर, मराठी संस्कृतीचा हिंदीच्या आक्रमणावर आणि मराठी माणसाच्या उदारपणाचा संकुचितपणावरचा हां विजय।

अगदी छान वाटले। वीक एंड धन्य झाला।