Sunday, May 22, 2011

इंग्लंडच्या राणीची आयर्लंडवारी

बाबाचा लिखाणातला उत्साह संपला की काय अशी दाट शंका यावी इतक्या अंतराने आज लिहितो आहे.

या आठवड्यात इंग्लंडची राणी आयर्लंडला गेली. आयर्लंड वर इंग्लंडचे मागील ४०० वर्षे या ना त्या स्वरुपात राज्य आहे. पैकी दक्षिण आयर्लंड म्हणजे अंदाजे ५/६ भूभाग स्वतंत्र आहे. तर १/६ उत्तर आयर्लंड यु के अर्थात युनायटेड किंगडमच्या अंतर्गत आहे. ही विभागणी बऱ्यापैकी धर्मावर आधारित आहे. उत्तर भाग मुख्यत: प्रोटेस्टंट ख्रिश्चन तर दक्षिण भाग मुख्यत: कॅथॉलिक. दक्षिण भाग आयरिश पणा जपणारा. तर उत्तर भागावर इंग्लंडचा प्रभाव.

असो .. तर इंग्लंडची राणी आयर्लंडला गेली तब्बल शंभर वर्षांनंतर! त्याआधी राणी व्हिक्टोरिआ किंवा राजा जॉर्ज गेले असतील तीच शेवटची भेट.

इकडे अमेरिकेत १०% लोक आयरिश वंशाचे आहेत. अगदी केनेडी मंडळी कट्टर आयरिश आहेत. त्यामुळे साहजिकच आयर्लंडला राणी गेली तेव्हा इथल्या बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळाली.

शंभर वर्षात बराच बदल झाला आहे. सर्वात पहिले म्हणजे राणीला अभिवादन काही मिळाले नाही. फक्त हस्तांदोलनावर समाधान मानावे लागले. राणी अगदी आयरिश लोकांचा हिरवा रंग परिधान करुन गेली. परंतु आयरिश लोक काही फार "इम्प्रेस" झाले नाहीत. रस्ते अगदी सुने सुने होते. त्यामानाने आपण भारतात अगदी दुतर्फा रांगा लावुन राणीचे स्वागत केले ५-१० वर्षांपूर्वी. अर्थात सर्वच लोक स्वागतार्ह आले नव्हते. हरयाणा आणि दिल्ली मध्ये काही लोक राणीची गाडी जात असताना रस्त्याच्या कडेला वेगळ्या कारणासाठी बसले होते तेव्हा राणी थोडी अनईझी झाली असे तिचा अटॅशे म्हणाला होता! पण असो तरीही एकंदरीत आयरिश लोक मात्र अक्षरश: बहिष्कार घालुन घरी थांबले. राणी थोडी नाराज झाली असेल. परंतु तरीही मोठेपणा दाखवत ती आयरिश वॉर मेमोरिअल ला भेट देऊन आली. ५०००० आयरिश सैनिक आणि नागरिक इंग्लंडविरुद्ध लढताना मरण पावले त्यांना राणीने अभिवादन केले. भारतात मात्र जालियनवाला बागेला राणीने ना भेट दिली ना खेद  व्यक्त केला. माफी तर खूप दूरची गोष्ट. असो ... परंतु तो वेगळा विषय होईल.

राणीचे आयर्लंडला जाणे, हिरवा रंग घालणे, फक्त हस्तांदोलन करण्यात समाधान मानणे आणि आयरिश बहिष्काराकडे दुर्लक्ष करुन आपल्याच देशाविरुद्ध लढलेल्या सैनिकांना मानवंदना देणे यात वरकरणी पाहता कोणाला तिचा दुबळेपणा दिसेल. परंतु  खरेतर यातच तिची आणि संपूर्ण "विन्डसर" घराण्याची ताकत दिसुन येते.

जगाच्या इतिहासात ६००-७०० वर्षे टिकली अशी बहुधा दोनच राजघराणी असावीत. एक म्हणजे ओटोमन (तुर्कस्तान) आणि दुसरे म्हणजे ब्रिटिश राजघराणे. पैकी ओटोमन घराणे अगदीच घराणे म्हणता येइल. कारण अगदीच वडिलांनंतर मुलगा किंवा भाऊ गादीवर आले असे ३० पिढ्या घडले. परंतु ब्रिटिश हे थोडेसे व्यापक घराणे आहे. कधी मुलगा, कधी मुलगी, कधी पुतण्या कधी पुतणी असे लोक गादीवर येत गेले. परंतु सांगण्याचा मुद्दा असा की इतकी वर्षे सत्ता टिकवणे सोपे नाही. कटकारस्थाने, परकीय आक्रमणे, अंतर्गत लाथाळ्या, शिथिलता एक ना अनेक अडथळे येऊ शकतात. इतिहास तज्ञ सर्व साम्राज्यांना साधारण २०० वर्षांचा कालावधी देतात. त्यानंतर साधारण सर्व साम्राज्ये ढासळलेली दिसतात. भारतात खिलजी, मुघल, मराठे, शीख, किंवा भारताबाहेर रोमन, मंगोल या सर्वांचीच साम्राज्ये २-३ शतके फारतर टिकली. अलेक्झॅण्डर चे तर १०-२० वर्षेच टिकले.

मग प्रश्न असा आहे की इंग्लंडच्या राजघराण्यामध्ये असे काय आहे की ते ६-१० शतके टिकले आहे? अर्थात मध्ये १६५० च्या सुमारास क्रॉमवेलची क्रांती झाली आणि राजाला (चार्ल्स १) फासावर (की गॅलोजवर) चढवले गेले. परंतु १०-१२ वर्षात परागंदा झालेले वंशज राजनिष्ठांच्या मदतीने परत गादीवर आले. असो.. तर हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि असा प्रश्न पडायला हवा.

मला असे वाटते. की इंग्लंडच्या राजघराण्यामध्ये अतिशय लवचिकता. व्यावहारिक शहाणपण आणि धोरणीपणा आहे. शिस्त धैर्य आणि मुत्सद्दीपणा तर आहेच. शिस्त म्हणजे कायद्याचे आद्य स्वरूप. सर्वच साम्राज्ये शिस्तीशिवाय उभी रहात नाहीत. चंगीझ खान म्हणे कुठल्या मोहिमेवरुन परत आल्यावर त्याच्या मेव्हण्याने केलेला भ्रष्टाचार पाहुन खुप चिडला आणि त्याने त्याच्या मेव्हण्याला ज्याला तात्पुरती सुत्रे दिली होती राज्याची, त्याला त्याने मारुन टाकले. शिवाजी महाराजांनी स्वकीयांना शासन केले. मुसक्या बांधणे, हात पाय तोडणे किंवा चंद्रराव मोरेला मारला तसे ठार मारणे अघोरी वाटते. परंतु राज्य करायचे म्हणजे शाश्वती हवी, शिस्त हवी. ब्रिटिशांच्या देखील भारतातील कारभार हा शिस्तबद्ध होता. अन्याय होत होते. परंतु तरीही कायदा होता. किंबहुना भारतात राज्य चालवण्यासाठी जो कामगार वर्ग त्यांनी आणला त्यात आयरिश लोक बरेच होते. अ‍ॅलन ह्युम हा आयरीश होता ज्याने कॉन्ग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यामुळे आयरीश लोकांना भारताबद्दल एक प्रकारची सहानुभूती होती. त्यामुळे भारत भर सुधारणा देखील घडल्या. ब्रिटिश आले नसते तर भारताची किती प्रगती झाली असती? सांगणे कठीण आहे. परंतु एक मात्र नक्की. की भारतातील राजे कमी पडले. तैनाती फौजा आणि तनखा लावुन घेऊन त्यांनी आपले राजेपण घालवले. इतकेच नाही तर ब्रिटिशांनी भारताबाहेर जाताना देखील नवीन सरकारला कळ लावुन सर्व राज्ये बरखास्त करायला लावली आणि राजेशाही पूर्णपणे संपवली. त्यात दु:ख मानण्याचे काहीच कारण नाही. परंतु मला असे वाटते की कॉन्ग्रेस हा तसा पढतमुर्खांचा आणि पुढे भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष सत्तेवर आल्यामुळे भारतने आपले जगामधील योग्य स्थान अजुनही मिळवले नाही. नेहेरु आणि इतर मंडळी देशभक्त असतील ... परंतु ते समाजातील "एलिट" होते. बव्हंशी ब्राह्मण आणि शिकलेल्या वर्गातील लोक होते. परंतु राज्य चालवण्याचा त्यांना अनुभव नसल्यामुळे भारताचे राजकिय धोरंण कायमच गुळमुळीत राहिले तोपर्यंत जोपर्यंत जसवंतसिंहांसारखा माणुस परराष्ट्रमंत्री झाला नाही. असो .. परंतु सांगण्याचा मुद्दा असा की आपले राज्यकर्ते ब्रिटिशांच्या तुलनेत कमी पडले आणि त्यातुन पारतंत्र्य आले. आणि पुढे स्वातंत्र्यानंतरही आपल्याला राज्य चालवणे तितके चांगले जमले नाही आहे. मग तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो, एकजुटीचा असो, संरक्षणाचा असो की आर्थिक प्रगतीचा असो.

ब्रिटिश राजांनी जनतेचा कल ओळखुन हळुहळु आपल्या सत्तेचे विकेंद्रिकरण केले. प्रथम मॅग्ना कार्टा, त्यानंतर चार्टर्ड राईट्स (अर्थात लुटण्याचा हक्क आणि विभागणी) जसे पेशव्यांनी शिंदे होळकरांना दिले तसे, पुढे अप्पर हाऊस आणि त्यानंतर लोअर हाउस. मला असे वाटते की ब्रिटिश राजांनी काळाची पावले ओळखुन सत्ता हातातुन जाऊ दिली. आणि आपली सत्ता दुसऱ्या स्वरुपात निर्माण केली. उदाहरणार्थ, पूर्वी सत्ता शस्रांमध्ये होती, पुढे ती राजकीय झाली, त्यापुढे ती आर्थिक आणि प्रसारमाध्यमांपर्यंत पसरली. आणि आज माहिती तंत्रज्ञानामध्ये ती ताकत आली आहे. आज ब्रिटिश राजघराण्याकडे १००-१२५ शिपाई असतील. तेदेखील नामधारी. परंतु अजुनही राणी हे एक सत्ता केंद्र आहे. अजूनही ती किताब देते लोकांना, हेड ऑफ स्टेट चा सन्मान मिळतो देशा परदेशात. हे कसे? तर त्यांच्या घराण्याची पाळेमुळे आता इतर सत्ता केंद्रामध्ये पसरली आहेत. आणि जसजसे जग अधिक लोकशाही मार्गाकडे जाते आहे तसतसे सत्तेचे विकेंद्रिकरण अटळ आहे.

दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट की जी ब्रिटिश राजांनी केली आणि इतरांनी केली नाही किंवा तेवढ्या यशस्वी रीत्या केली नाही ते म्हणजे धर्माला मुठीत ठेवणे. धर्म ही सुद्धा एक सत्ता असते. आणि हे लक्षात आल्यामुळे ब्रिटिश राजांनी चर्च ऑफ इंग्लंड काढले. ते प्रोटेस्टंट होते. त्यांना रोमवरुन आदेश नको होते. भारतात देखील अकबराने दीन-ए-इलाही धर्म का काढला? किंवा जैनांचे २४ तिर्थंकार कोण होते? शिखांचे १० गुरु कोण होते? किंवा गौतम बुद्ध कोण होते? तर ही सर्व उदाहरणे राजांनी धर्माची सत्ता झुगारण्यासाठी आपला स्वत:चा धर्म उभारण्याचे केलेले प्रयत्न आहेत. त्यात थोडाफार तत्वज्ञान बदल करायचा. परंतु मुख्य कारण सत्तासंघर्ष आहे. तत्वज्ञान नाही. परंतु आपण इतिहासाकडे असे पहातच नाही. असो ..

परंतु राणीच्या आयर्लंड भेटीवरुन असे काही विचार डोक्यात आले. राणी आणि श्रीमान फिलिप जगप्रसिद्ध गिनिज ब्रुअरीमध्ये गेले. राणीने गिनिजला तोंड मात्र लावले नाही.

4 comments:

mannab said...

आपण लिहिलेला लेख आवडला. अत्यंत डोळस विचार आणि इतिहासाची सफर त्यातून घडली. असा लेख नुसता अनुदिनीवर काही वाचकांनी वाचणे योग्य नाही. एखाद्या वृत्तपत्राच्या रविवार अंकात तो शोभून दिसेल. आपली परवानगी गृहित धरून हा लेख माझ्या मित्रांना अग्रेषित करत आहे. अर्थात आपल्या अनुदिनीच्या संदर्भासह.
मंगेश नाबर.

बाल-सलोनी said...

मंगेशजी धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत. तोडके मोडके विचार आहेत. तुम्हाला आवडले हे वाचुन बरे वाटले. अग्रेषित शब्द मला आज मिळाला! त्याबद्दल धन्यवाद!

Naniwadekar said...

श्री पराग जगताप: ठोकळ निष्कर्ष काढायला माझी हरकत नाही. पण काही मुद्‌दे बरोबर मांडलेच नाहीत, असे मला वाटते. चंगीज़ खाँ आणि शिवाजी यांचा ज़ो शिस्तीबाबत उल्लेख झाला तिचा ब्रिटिश राजघराण्याशी काय संबंध आहे? ते लोक शिस्तप्रिय आहेत, असे म्हणतात. सगळा गोरा समाज़च एकूण शिस्तप्रिय आहे. त्याचे श्रेय या घरण्याला कसे ज़ाते?

आर्थिक, तांत्रिक इत्यादि सत्ताकेन्द्रांत या घराण्याची पाळेमुळे कशी पसरली आहेत? पैशासाठी हे लोक सरकारवर अवलंबून आहेत. आणि प्रचारमाध्यमांचा या घराण्याला भयंकर त्रास झाला आहे.

नवीन धर्मांच्या उदयामागे तत्त्वज्ञान नाही, हा निष्कर्ष कशावरून काढला? बुद्‌धाला कोणती सत्ता हवी होती? मुसलमान देशांत सत्ताधीशांनी धर्म मुठीत ठेवला आहे, की धार्मिक सत्ताकेन्द्रांचा त्यांच्यावर वचक आहे? आज़ युरोपात धर्म सत्ताधीशांच्या मुठीत आहे, की लोकांनी तो झुगारून दिलेला आहे?


ब्रिटिशांच्या शिस्तीचे आपण खूप कौतुक करतो, आणि ते रास्तही आहे. विशेषत: भारतीयांच्या बेशिस्तीपुढे ती शिस्त उठून दिसते. ते लोक मात्र स्वत:विषयी म्हणतात: 'The British created an empire in a fit of absent-mindedness'.

- नानिवडेकर

बाल-सलोनी said...

नानिवडेकरजी अभिप्रायाबद्दल धन्यवाद. वेगळे विचार मांडता आपण.

सर्वप्रथम मी एक सामान्य पोटभरु माणुस आहे. कोणी अभ्यासु विचारवंत नाही. त्यामुळे या विषयातला तज्ञ नाही. मला जे समजते ते स्वैर विचार आहेत इतकेच काय. काही चुकेचे असतीलही. आणि कोणी चुक दाखवली तर आनंदच आहे.

आपन म्हणता ते बरोबर आहे. शिस्त हे वेगळे वैशिष्ट्य म्हणुन नाही तर आवश्यक गुणधर्म म्हणुन सांगितले! सर्व गोरा समाजच शिस्तप्रिय आहे.

पाळेमुळे कशी पसरली आहेत? तर अप्रत्यक्ष रित्या. याचा अर्थ असा नाही की राणि महालामध्ये बसुन जगाच्या घडामोडी घडवते आहे. परंतु त्यांना इंग्लिश जनता पोसते आहे म्हणजे अजूनही निष्ठावंतांची संख्या भरपूर आहे ज्यांना राजघराणे असावे असे वाटते.

नविन धर्मांच्या मागे तत्वज्ञान नाही कसे? आहेच मुळी. परंतु मतभेत तात्विक नाहीत. मतभेदांची मुळे कर्मकांडापेक्षा सत्तासंघर्षात असावीत असे माझे मत आहे. का? कारण सर्व २४ तिर्थंकर, १० गुरु आणि बुद्ध स्वत: क्षत्रिय होते. अकबराला काय वेळ जात नव्हता तेव्हा त्याने दीन-ए-इलाही काढला! सेम विथ चर्च ओफ़ इंग्लंड! आपल्याकडे परशुरामाला पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय का करावी लागली? त्यानंतर राम येतो आहे परशुरामाचा पराभव करतो ... इतकेच नाही तर व्हिलन रावण ब्राह्मण आहे! यातुन संघर्ष दिसुन येतो. इतकेच काय तर चाणक्याने नंद घराण्याचा पराभव केला तेव्हा घोषणा केली - "नन्दांतम क्षत्रिय कुलम". तर हा संघर्ष आहे. त्याला तत्वाचे अधिष्ठान देणारे देतील. आजदेखील अमेरिका दहशतवादाविरुद्ध चा लढा "इव्हिल" विरुद्धचा लढा आहे हे आवर्जुन सांगते!

परंतु जे देश आज प्रगत आहेत त्यांनी धर्म मुठीत ठेवला आहे ही वस्तुस्थिती आहे. अमेरिकेतील फार राईट चा उदय ही अमेरिकेच्या अस्ताची नांदी आहे.

असो ... पुरे अजुन काही नंतर लिहिन!