Sunday, September 13, 2009

मिसेस पिअर्सन

सईबाई

 

बरेच दिवस झाले काही लिहिले नाही. तसे लिहिण्यासारख्या अनेक गोष्टी घडल्या .... विषय मनात घोळत होते. सेनेटर केनेडींचा मृत्यु, भारताने बनवलेली स्वदेशी अणुपाणबुडी, जसवंतसिंहांचे विधान आणि भाजपाची आत्मघातकी वाटचाल आणि बरेच काही.

 

परंतु आज एक फक्त छोटीशी गम्मत सांगतो ...

 

परवा तुझी आई सिद्धुला आणायला दुपारी शाळेत गेली. सिद्धोबा आता दुसरीत गेला आहे. मिसेस पिअर्सन त्याच्या वर्गशिक्षिका तुझ्या आईला म्हणाल्या, "काहो तुम्ही सिद्धार्थला रोज मारता का?" हा प्रश्न ऐकुन सोनालीचा चेहेरा अगदी पांढरा पडला. इथे लहान मुलांना पालकदेखील मारु शकत नाहीत. त्याबद्दल तुरुंगाची हवा खावी लागेल आणि मुलांवरचा पालकांचा हक्क संपुष्टात येउ शकतो. आपण भारतिय पालक तरीदेखील आपला परंपरागत "छडी लागे छम छम" हा न्याय मुलांना लावत असतो. त्यामुळे तुझ्या आईचा चेहेरा अगदी चोरी करताना पकडल्यासारखा झाला.

 

मिसेस पिअर्सन च्या लक्षात आले की तिचा विनोद सोनालीच्या लक्षात आला नाही.... मग तिने लगेच सांगीतले की सिद्धार्थ वर्गात इतका चांगला वागतो की विश्वास बसणार नाही. शिस्तबद्ध, शांत, हुशार, उत्साही इतर मुलांना मदत करणारा, भांडण मारामार्या न करणारा इत्यादी इत्यादी. मिसेस पिअर्सन च्या आधीच्या मागच्या ४ वर्षात सर्वच शिक्षिका असेच म्हणत आल्या आहेत. त्यामुळे मला त्याचे काहीच विशेष वाटले नाही.

 

मला विशेष वाटले ते आईने जेव्हा सिद्धुला विचारले की मिसेस पिअर्सन असे का म्हणाल्या तेव्हा सिद्धु म्हणाला ..."आज मला चांगल्या 'बिहेविअर' बद्दल 'प्राइझ' मिळाले. आणि ते देताना मिसेस पिअर्सनच्या डोळ्यात पाणी होते."

 

सिद्धुचे ते शब्द माझ्या अगदी काळजाला भिडले. मला माझ्या लहानपणापासुनच्या सर्व शिक्षिकांची आठवण झाली - सरदार लक्ष्मीबाई रास्ते प्रशालेतील आपटेबाई, तल्हारबाई, देवधरबाई, भोंडेबाई तसेच नुमवीतील ताथवडेकरबाई .... या सर्व शिक्षिका आणि त्यांनी आपण काही शिकावे म्हणुन केलेला जीवाचा केलेला आटापीटा आठवला. आज आपण जे काही आहोत त्यामागे आपल्या आईवडिलांनंतर आपल्या शिक्षक-शिक्षिकांचे मोठे ऋण आहे.

 

सिद्धुच्या मिसेस पिअर्सनच्या डोळ्यातले पाणी हे सिद्धुच्या पूर्वजन्मीचे संचीत आणि या जन्मीचे ॠण आहे.