Monday, September 28, 2009

विंचवाचे बिह्राड


सलोनीबाई

 

एक आठवडा झाला नवीन घरात राह्यला येऊन. तुझ्या जन्मानंतर इतक्या वस्तु वाढल्या आहेत की घरात जागा कमी पडु लागली आहे. त्यामुळे घर बदलण्याची गरज पडली.

 

तसेही अमेरिकेत लोक सरासरी ८-९ वेळा आपली राहण्याची जागा बदलतात. आपल्याकडे पूर्वी पोटासाठी अनेक शहरे फिरणारी माणसे बव्हंशी सैन्याशी संबंधीतच असायचे. बाकी तुरळक इतर सरकारी नोकर अथवा अतिशय उच्चपदस्थ व्यावसायिक इत्यादि. परंतु बर्याचदा थोड्याशा विस्तारीत पंचकोश्रीच्या बाहेर सहसा माणसे जात नसत. आमचे आजोबा सासवड सोडुन पुण्यात नोकरी करायला आले म्हणजे परदेशात गेल्यासारखेच झाले असणार आहे सासवडकरांना !! आत्तासुद्धा संगणक अभियंते सोडले तर नोकरीनिमित्त दुसर्या राज्यात जाणारी माणसे खूपच कमी (एकुण लोकसंख्येच्या मानाने). हे बदलालया हवे. गुणवत्तेला आकर्षीत करण्यासाठी सगळीकडे समान प्रगती आणि समान संधी उपलब्ध असायला हवी.

 

असो ... तर अमेरिकेत हे आपले सातवे पुनर्वसन !! लान्सिंग -> न्युयॉर्क -> लान्सिंग -> फिनिक्स -> टेम्पी -> चॅण्डलर -> चॅण्डलर असे हे आपले विंचवाचे बिह्राड फिरते आहे. सुरुवातिला दोन सुटकेसेस घेऊन आलेला मी ... त्यानंतर तुझ्या आईच्या दोन सुटकेसेस ... पहिल्यांदा लान्सिंग ते न्युयॉर्क गेलो तेव्हा १९९३ सालची निस्सान अगदी खच्च भरुन गेली होती आणि वर उरलेले सामान लान्सिंगलाच स्टोरेज मध्ये ठेवलेले. त्यानंतर बघता बघता सिद्धोबाचे सामान आमच्या दोघांच्यापेक्षा जास्त झाले. आणि आत्ता हे घर हलवले तर दोन बेडरुमच्या अपार्टमेंटमध्ये ४ बेडरुम इतके सामान निघाले. अगदी भाड्याचा ट्रकदेखील खच्च भरुनही सगळे सामान पुरले नाही. शेवटी आपल्या व्हॅनने ७-८ चकरा माराव्या लागल्या. आणि यावर कडी म्हणजे पंचवीस एक पोती भरुन सामान फेकुन दिले कारण ते अनावश्यक आहे असे लक्षात आले.

 

पंचवीस पोती अनावश्यक सामान !!! अर्थात कचरा !!! आपण इतक्या कचर्यात रहात होतो ??? !!! बापरे !

 

बघ. कळतदेखील नाही की खरोखरीच कशाची गरज आहे. उगाच संचय करुन ठेवतो आपण. "ही माझी तिसरीतली अंडरवेअर!" आता त्याच्यात कशाला जीव गुंतवायचा? पण नाही ... मन विचित्र असते. ते भलत्या सलत्या गोष्टींमध्ये गुंतते. भूतकाळ नाहीतर भविष्यकाळ यांचा विचार करत करत आजचे जगणे विसरते. "लाईफ इज व्हॉट पासेस अस बाय व्हाईल वि आर प्लॅनिंग अबाऊट इट." किती खरे आहे.

 

असो ... त्यामुळे मला दर काही दिवसांनी अशी कचरामोहिम काढायला फार आवडते. आमच्या कंपनीमध्ये मी व्यवसाय परिवर्तन (अर्थात बिझनेस ट्रांस्फॉर्मेशन) चे काम करतो. त्याचे महत्वाचे सुत्र हेच आहे की काळाच्या ओघात अनेक इष्ट अनिष्ट गोष्टींचे गाठोडे निर्माण होते. त्यामधील इष्ट गोष्टी ठेवायच्या आणि अनिष्ट टाकुन द्यायच्या.

 

असो ..

 

तर आपले विंचवाचे बिह्राड नवीन ठिकाणी पोहोचवण्यासाठी यावेळी कामगार मदतीला लावले. १५ डॉलर्स एका तासाला या दराने... चार्ली नावाचा ५५-६० वर्षांचा माणुस आणि एरिक नावाचा त्याचा ३५ एक वर्षांचा मदतनीस. ऍरिझोनाच्या १०३ डिग्री फॅरेनहाईटमध्ये दोघांनी इतके मन मोडुन काम केले की मला आणि सोनालीलाच त्यांची दया आली. आम्ही वारंवार थोडावेळ विश्रांती घ्या असे म्हणुनदेखील ते काही थांबले नाहीत. मध्येच त्यांना कोक-पेप्सी इत्यादि थंड पेये आणुन दिली ती मात्र घेतली त्यांनी. अमेरिकन कामगाराइतका कष्टाळु कामगार जगात कुठेही नाही. यामागे आर्थिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. परंतु त्याचा उहापोह पुन्हा कधी.

 

चार्ली आणि एरिकने स्वत:हुन त्यांचा ट्रक आणला, तसेच सामान चठवण्यासाठी एक ट्रॉली आणि सामान बांधण्यासाठी पट्टे पण आणले. खरे तर त्यांना १५ डॉलर्स तासाच्या दराने आणलेले. त्यांना हे सगले करायची काहीच गरज नव्हती. परंतु तरीही त्यांनी आमच्या फायद्याचा विचार केला. काम करतानाही कुठेही वेळ घालवणे नाही. आणि ट्रकमध्ये सामान तर इतके अचूक रचले की एक फुट देखील जागा राहिली नाही कुठे. संगणकशास्त्र आणि गणितात एक कूटप्रश्न आहे याविषयावर ... त्याचे नाव "नॅपसॅक प्रॉब्लेम". यामध्ये एका ठराविक जागेत जास्तीत जास्त वस्तु भरायच्या असतात. संगणकालादेखील हा कूटप्रश्न सोडवायला सोपे नाही. मी चार्ली आणि एरिक ला ते सांगीतले तर ते खूष झाले.

 

परंतु खरेच ... आता तो एरिक दहावी सुद्धा पास नसेल. परंतु त्याने ट्रकमध्ये इतके सुंदर सामान लावले की संगणकाच्या - सदाशिवच्या भाषेत - तोंडात मारावे, आणि कसब्याच्या भाषेत - कानशील ..... वगैरे वगैरे. पण आहे की नाही गम्मत. माणसाचा मेंदु अचाट आहे. आपण अनेक अचाट गोष्टी अगदी लीलया करत असतो. साधे चालायला शिकवले त्या जपानी यंत्रमानवाला (नाव विसरलो !) तर काय शास्त्रज्ञांना आनंद! आणि आमची सईबाई पाचव्या महिन्यात आईच्या हातातला फोन हवा आणि तो खूप लांब आहे म्हणुन आईचा हात ओढते!!

 

असो...

 

सामान आता नवीन घरी येउन पडले आहे. आता हळुहळु लागेल. सिद्धोबा प्रचंड खूष झाला. त्याचा आनंद बघुन धन्य वाटले. याचसाठी केला होता अट्टाहास!

 

त्यानंतर भाड्याचा ट्रक परत केला. आणि त्यानंतर अपार्टमेंटची स्वच्छता मोहीम. इथे भाड्याचे घर अगदी चकाचक करुन परत द्यावे लागते. नाही तर दंड होतो. त्यामुळे आम्ही एका मेक्सिकन सेविकेला (म्हणजे मराठीत मेड!) पाचारण केले (आईशप्पथ गाढवाचे लग्न आठवले). त्या बाईने पण अफलातुन काम केले. १४५ डॉलर्स गेले... पण आपले कंबरडे वाचले. जाता जाता तिची पण तोंडभरुन स्तुती केली. तर ती घरी जाऊन तिची व्हिजिटिंग कार्ड्स घेऊन आली. त्यावर तिचा इमेल आयडी, फोन, सेल फोन, फॅक्स सगळे होते. मजा आहे. तंत्रज्ञान हे असे अगदी सफाईकामगारांपर्यंत पोचले असेल तर हा देश का पुढे नाही जाणार.

 

असो ... तर आता नवीन घरात नवीन सामान आणायची तयारी चालली आहे. दसर्यानिमित्त कालच ४६ इंची फ्लॅट स्क्रीन घेतला. भन्नाट टीव्ही आहे. आणि त्यावर आज ब्रेट फार्व्ह ने दोन सेकंद कमी असताना टचडाऊनचा जो झेल फेकला आणि सामना जिंकला ते एचडी मधुन पाहणे म्हणजे अगदी अफलातुन. अगदी स्वर्गच!

 

6 comments:

rohinivinayak said...

chhaan lihile aahe. kharach aapla jeev nirjiv goshntin madhe khup adakat rahato. pan he radu de te rahu de ase karat kititari kachra aaplya gharat sathvat rahato :) khare aahe. eki kadun dusrikade rahayla gelo tar kititari vela mage valun aple rahate ghar aapan baghat rahato nahi ka?

rohini gore

Anonymous said...

.जुन्या गोष्टी फेकुन देणं जरा जिवावरच येतं. हाच अनुभव माझा पण आहे. पोस्ट एकदम झकास...

भानस said...

पोस्ट मस्तच झाली आहे. जुन्या गोष्टींमधल्या आठवणी, त्यातले आपण व आपले जवळचे यात खरेतर जीव अडकलेला असतो त्यामुळेच आता हे कधीही लागणार नाही याची जाणीव असूनही आपण मागे सारत राहतो.
नवीन घराबद्दल अभिनंदन व विजयादशमीच्या शुभेच्छा!

ब्रॆट फार्व्ह ने शेवटचे दोन सेकंद केलेला असतानाचा टच डाऊन्चा थ्रो अप्रतिमच होता. आमच्या घरातला आरडाओरडा टिपेला पोचलेला.:) एचडीवर तो पाहण्यातला आनंद भन्नाटच. आम्ही दोघेही डाय हार्ड फॆन ब्रॆटचे.:)

बाल-सलोनी said...

RohiniVinayak, Bhanas Aani Mahendraji

sarvaanaa dasaryachya shubhechcha. lekhabaddal bolayache tar baryachada eka gharatun dusarya gharat boxes na ughadata nele jaataat. tyamule ghar halavane hee atishay yogya vel aahe anavashyak goshti phekun dyaayachee. kadhi kadhi utsahat mee jara jaastach goshtee phekun deto to bhaag vegala !!

mahendraji ... tumachya paanwaalyachya lekhaachee chori yaa vishayavar mee ek lekh lihayala ghetala paraMtu rahun gele. kadachit lihin kadhitari.

Bhanas, bret favre ne daakhavun dile why he is the best! mee manatalya manat mhanatach hoto kee maagachya superbowl sarakha yaavelee kaahitari chamatkar ghadu det. And then it happened. Unbelievable.

leena said...

Apratim lihila ahe...
Junya wastu madhe apalya athwani adakaleya asatat...Majya kade hi bahrpur junya goshti thwalyat...Pan fekun dyachi icha ajeebaat hot nahi...

बाल-सलोनी said...

leena, dhanyavad.