Sunday, September 27, 2009

झोयाचा गरबा

सलोनी

 

काल इथे मंदिरात अष्टमीनिमित्त गरबा होता. सिद्धुच्या ऍबॅकसच्या गणिताच्या शिकवणीनंतर आपण सर्व मंदिरात गेलो. अगदी अचानकच ठरले जायचे. तिथे पोहोचलो आणि एक एक मंडळी भेटत गेली. राजीव, गुंजन, प्रशांत, निलेश, प्रवीण आणि सर्वात आश्चर्य म्हणजे आसिफ आणि त्याची बायको झीनत आणि मुले झोया आणि अझीम.

 

सुरुवातीला मला कळेना आसिफ इकडे मंदिरात कसा? नंतर वाटले की गुंजनला भेटायला आला असेल. गुंजनशी ओळख असिफच्या घरी झालेली त्यामुळे माहित होते की ते दोघे एकत्रच अमेरिकेत आले ९८ साली तेव्हापासुनची मैत्री.

 

परंतु नंतर जेव्हा लहान मुलांचा गरबा चालु झाला मंदिरात तेव्हा कळले की असिफपेक्षा हा पटेलभाई गरबा खेळायला आला आहे :-) झोया एकदम झोकदार रक्तवर्णी चुडिदार घालुन आली होती. ४ वर्षाच्या मानाने पोरीचा नखरा - अवधुत गुप्तेच्या भाषेत - च्या मारी धुम फटॅक होता. मजा आली सर्व मुलांना गरबा नाचुन ... सिद्धु देखील नाचला. त्याला देखील मजा आली आणि त्याला पाहुन आम्हाला आनंद वाटला.

 

असिफचे मंदिरात सहकुटुंब गरबा खेळायला येणे मला खुप आवडले. त्याला गरबा आवडतो हे महत्वाचे ... मग ते हिंदुंच्या मंदिरात असले म्हणुन काय झाले. लान्सिंग (मिशिगनला) एमबीए नंतर २ वर्षांनी गेलो तेव्हा इरफानने माझ्या बरोबर तिथल्या मंदिरात येउन नमस्कार करुन प्रसाद वगैरे घेतला. त्यात भक्तिभाव असेलही किंवा नसेलही परंतु केवळ माझ्याबरोबर येण्यात त्याला आनंद होता हे त्याला माहित होते. आणि त्यासाठी तो बरोबर आला.

 

मला वाटते - आपल्याला काय आवडते हे महत्वाचे. आणि त्याचा शोध घेणे महत्वाचे. काय आवडत नाही आणि कशाचे आपल्याला वावडे आहे आणि कशाने आपल्याला राग येतो इत्यादि गोष्टींची यादी निरर्थक आहे. त्यापेक्षा नेमके काय आवडते आणि नेमके काय हवे आहे आपल्याला यावर लक्ष द्यावे.

 

बारावीत असताना मी दिवसाचे नियोजन केले होते आणि काही त्या नियोजनामध्ये काही "निर्धार" होते. त्यापैकी एक निर्धार म्हणजे "दुरदर्शन (टीव्ही)" पाह्यचा नाही. माझ्या एका मित्राला चेतनला जेव्हा ते कळले तेव्हा तो म्हणाला, "तुझ्या अभ्यासाचे नियोजन भारी आहे... हे करायचे नाही ते करायचे नाही ठरवतोस. त्यापेक्षा काय करायचे ते ठरव की!" त्याचे शब्द मला अजूनही स्पष्ट आठवतात. माझ्या डोळ्यात खरोखरीच अंजन घातले त्याने. पुढे जाऊन स्वारी बी.जे. मेडिकलमधुन डॉक्टर आणि पुढे कर्करोगतज्ञ झाली. मजा वाटते आठवुन की त्याच्या १-२ वाक्यांनी मला किती शिकायला मिळाले.

 

असो ... परंतु सांगायचा मुद्दा हा की आयुष्यात काय आवडते याचा शोध घेणे खूप महत्वाचे. काय आवडत नाही याचा विचारसुद्धा नको. आणि मग आवडीच्या गोष्टी करायला वेळ पुरणार नाही.

 

शनिवारी ऑलिव्ह गार्डनमध्ये जेवायला गेलो तेव्हा बाहेर पडल्यावर उजवीकडे एक बोगनवेल सारखी वेल दिसली. तिच्या फांदीच्या टोकावर छान फुलोरा फुलला होता. मी तुझ्या आईला दाखवला. इंग्लीशमध्ये फुलोर्याला इन्फ्लोरसन्स म्हणतात. फांदीच्या टोकाला येतो तो वेगळा, मध्ये येतो तो वेगला आणि देठापाशी येतो तो वेगळा. परंतु मला याचे नाव काही आठवेना. बहुधा अपेशियल म्हणत असावेत असे मी तिला म्हटले. बीएस्सीच्या पहिल्यावर्षापर्यंत वनस्पतीशास्त्र विषय घेतला होता. परंतु दुसर्या वर्शात एक विषय सोडावा लागतो. गणित भौतिकी आणि संख्याशास्त्रापुढे मला वनस्पतिशास्त्र नाइलाजाने सोडावा लागला. तसा अतिशय आवडीचा विषय होता माझ्या. परंतु अशी द्विधा मनस्थिती असणे चांगले (गधा मनस्थितीपेक्षा!). इंग्लिशमध्ये त्याला स्वीट डिलेमा म्हणतात तसे! मी ७-८ वर्षे जेव्हा ५-१० वी च्या मुलांना शिकवले तेव्हा मला हाच सर्वात मोठा प्रश्न पडायचा की बर्याचदा विद्यार्थ्यांना काहीही तीव्रतेने आवडते का असे पाह्यला जावे तर एका रिकाम्या हंड्यात बोलल्यासारखे आपलाच आवाज आपल्याला परत ऐकु यावा. शिक्षक म्हणुन त्याची वेदना जास्त जाणवली.

 

असो .. जास्त भाषण नको ... असिफला काल मंदिरात पाहुन हे असे एकामागोमाग विचार आले इतकेच काय.

No comments: