Sunday, August 9, 2009

ब्लॅक ऍंण्ड व्हाईट

प्रिय सलोनी

 

आज आम्ही एक जुन्या हिन्दी चित्रपटातील गाण्यांचा एक सुंदर कार्यक्रम पाहिला. "ब्लॅक ऍंण्ड व्हाईट" त्याचे नाव.

 

तसे परदेशात असल्याचा हा एक मोठा फायदाच म्हणायचा की बरेचसे कलाकार - चित्रपट, नाट्य, संगीत, साहित्य इ. क्षेत्रांमधील - अगदी घरबसल्या जवळुन पाहण्याची ऐकण्याची संधी येते. भारतात सहसा हजारोंच्या संख्येने उपस्थिती असलेल्या कार्यक्रमांमध्ये तो "पर्सनल" टच ठेवणे कठीण असते. इथे कलेचा आस्वाद अगदी जवळुन घेता येतो. सर्वच कार्यक्रमांना जाणे जमतेच असे नसले तरिही आम्ही जमेल तसे अधुन मधुन याचा लाभ घेतो.

 

तर यावेळी ब्लॅक ऍंण्ड व्हाईट हा १९४५-१९६८ मधील अवीट गोडीच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. फिनिक्स मधील महाराष्ट्र मंडळाने इथल्या टेम्पी सेंटर ऑफ आर्ट्स मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. कलाकार सर्वच चांगले होते ... परंतु मुख्य आकर्षण म्हणजे हृशिकेष रानडे आणि विभावरी आपटे या सध्या सारेगमपमध्ये गाजलेल्या कलाकारांचे होते. हृषिकेश हा सिद्धुचा विशेष आवडता गायक त्यामुळे सिद्धु सारखा हट्ट करत होता की आपण त्याला जाऊन भेटु. ते काही जमले नाही. परंतु बुधवारी कोणाच्या तरी घरी शांता शेळकेंच्या कवितांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे तिथे त्याला हृषिकेश शी दोन शब्द बोलायला मिळेल असे वाटते. बघु.

 

परंतु कार्यक्रम अगदी सुंदर. रानडेबुवा खरोखरीच उत्तम गातात. आणि राहुल सोलापुरकरचे निवेदन अप्रतीम! सिद्धोबाला राजीव नम्रता च्या घरी ठेवला होता त्याला मी इंटरव्हलमध्ये घेउन आलो इतका आवर्जुन पहावा असा कार्यक्रम. सलोनी, तु तर झोपली होतीस. परंतु तुझ्या आणि सिद्धोबाच्या कानावर आपले संगीत पडावे नव्हे नसानसात जावे अशी इच्छा!

 

कुठेतरी अश्या कार्यक्रमांद्वारे आपली नाळ परत जोडली जाते आणि आपल्याला आपल्या भाषा संस्कृतीचे पोषण मिळते. आणि ते मिळाल्यावर कळते की आपण किती भुकेले आहोत या गोष्टींसाठी. भारतात असताना आपल्या चोहोबाजुंना ही गंगा वहात असते त्यावेळी कौतुक नसते. शाळेत जाताना लहानपणी शनिवारी सकाळी किती चांगल्या गोष्टी आपोआप कानावर पडायच्या. संस्कृत बातम्या, मनाचा शोध, संताची वचने ... संस्कृत बातम्या विशेष आठवतात. "इयम आकाशवाणि. संस्कृत वार्ता: श्रुयंताम. प्रवाचक: बलदेवनंदसागर: / किंवा विजयश्री" अजुनही तश्याच बातम्या लागत असतील का? सर्वच घरांमधुन पुणे स्टेशन लावलेले आणि त्या संस्कृत बातम्या अगदी सोमवारातुन नुमवीत पोहोचेपर्यंत सगळ्या घरातुन ऐकत ऐकत शाळेत जायचो. त्याची टिंगल टवाळीदेखील करायचो. श्रीनंद बापट या माझ्या संस्कृतप्रेमी मित्राला मी एकदा टवाळखोरपणे म्हटले देखिल की "संस्क्रृत बातम्यांमध्ये -'युनायटेड स्टेट्सं प्रेसिडेंटं बीइइइइइल क्लिंटण महोदया' - असे आज मी ऐकले त्यात संस्कृत शब्द महोदय: सोडले तर किती आहेत." तर त्यावर बापट गुरुजी मोठ्यांदा हसले होते. (श्रीनंद माझा संस्कृत चा गुरु! त्याबद्दल पुन्हा कधीतरी!). परंतु ही टिंगल टिवाळी बाजुला ... भारतात असताना कळत नकळत खुप चांगल्या गोष्टी कानावर पडत असत. अगदी घरात सुद्धा अप्पा मागील तीस एक वर्षे गीतेचा रोज एक अध्याय वाचताहेत. त्यामुळे नकळत आम्हालाही गीता अगदी ओळखीची वाटते. कधीही कुठेही काही कानावर पडले तर श्लोकाचे पुढची ओळ संस्कृत मध्ये नाही तर निदान मराठीततरी आठवते.

 

इथे अमेरिकेत मात्र या गोष्टींची उपलब्धता मर्यादीत आहे. परंतु तरीही आपला समाज तो धागा बळकट करण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमाला आणि कलाकारांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

No comments: