Saturday, November 12, 2011

दोन घटना - समता आणि बंधुत्व

प्रिय सलोनी,

पुन्हा एकदा विमान प्रवास! पुन्हा एकदा लिखाण.

२ आठवड्यांपूर्वी नोकरी बदलली. आत मी अधिकृतरीत्या सल्लागार झालो. (सल्लागार म्हणजे सल्ला घेणारा गार!) मला वाटते माझ्यासाठी हे चांगले काम आहे. आमचा बोलायचा धंदा. प्रवास खूप जास्त आहे. अगदि दर आठवड्याला म्हणजे खूप जास्त होते. सिद्धु तर लगेच मला मिस करायला लागला. तूसुद्धा सकाळी म्हणालीस, "बाबा तू कामाला जाऊ नकोस." बघु एखादे वर्ष हे करून. हळू हळू अंगवळणी पडेल.

परन्तु एक गोष्ट मला लगेच खटकली ती अशी की माझा लॅपटॉप १४ इंचाचा दिला आहे. त्यावर विमानात काहीही काम करता येत नाही. पूर्वी माझा १२ इंच लॅपटॉप होता तो अगदी चांगला होता.

असो ... तर मागच्या आठवड्यात देखील विमान प्रवास घडला. आता सध्या न्युअर्क बंद. आणि नॅशव्हिल चालू. रविवारी गेलो होतो नॅशव्हिलला. गुरुवारी घरी परत आलो. विमान फिनिक्सपर्यंत पोहोचायला उशिर झाला. मला विमानातील सर्वात शेवटच्या रांगेतील सर्वात शेवटची सीट मिळाली. विमान गेट ला लागले. परंतु आमची स्वारी सर्वात शेवटी उतरणार यात काहीच शंका नव्हती. चिडचिड करुन उपयोग नव्हता. विमानात कधी कधी मला क्लॉस्ट्रोफोबिक व्ह्यायला होते ..नेहेमी नाही .. परंतु त्या दिवशी तसे काहीसे झाले होते.

हळु हळु लोक उतरायला लागले. काही मंडळी नेहेमी प्रवास करणारी .. त्यांच्या गतीने झटपट उतरत होती. परंतु काही "स्लो मोशन" मंडळी अगदी निवांत - आस्ते कदम - गायी म्हशी मंडईतुन जश्या धिम्या गतीने पुढे सरकतात - तशी जात होती. माझ्यापासुन ५ रांगा पुढे एक म्हातारबुवा बसले होते. ८५-९० तरी वय असावे. ते अगदी ९० अन्शात वाकलेले होते. त्यांच्या पुढची रांग रिकामी झाली तसे मला वाटले आता ते आजोबा सगले लोक जाईपर्यंत थांबतील. परन्तु आजोबांना काही थांबायचे नव्हते. ते उठायला लागले. मी मनात म्हटले आता काही खरे नाही.

आजोबांचे वय इतके की ते उठायचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना उठता येईना. पाय लटपट लट्पट करत होते. अर्धे उठायचे परत खाली बसायचे. असे ५-७ वेला झाले. माझी थोडीशी चिडचिड झाली. परन्तु इतर माणसे गप्प बसुन होती. मागच्या सर्व रांगा शांत्पणे आजोबांची उठायची वाट पहात होत्या. शेवटी एका बाईने आजोबांना दंडाला धरुन उठायला मदत केली.

त्यानंतर ते गृहस्थ हळु हळु दोन रांगांमधुन चालत चालत पुढे गेले. ५ मिनिटे तरी लागली असतील.

मला खरोखरीच कौतुक वाटले सर्व लोकांचे. कोणी चिडचिड दाखवली नाही. भले त्या आजोबांना उठता येत नव्हते, परन्तु त्यांचा जाण्याचा क्रम होता, आणि त्यांची उठण्याची इच्छा होती तर इतर कोणी त्यांना म्हणाले नाही की "थांबा. तुम्हाला वेळ लागेल. आम्हाला आधी जाऊ द्या." इथे अमेरीकेत मला खरोखरीच या गोष्टीचे खूप कौतुक वाटते. खरोखरीची समानता. सर्वांचा आदर. आणि सर्वांचा आत्मसन्मान जपण्याची वृत्ती.

आजोबांना कोणी लगेच मदत केली नाही कारण कधी कधी लोकांना दया आवडत नाही. विशेषत: अमेरिकेत. इथे सामर्थ्याला मान आहे. आणि दया दाखवणे म्हणजे दुर्बळ आहोत असे सूचीत केल्याचे समजतात लोक. म्हणुन त्याना दया आवडत नाही. तसेच कोणी अरेरावी देखील केली नाही. "अहो आजोबा ... कसली घाई आहे... कुठे जायचे... थांबा की..." अश्या कॉमेंट्स आल्या नाहीत कारण अमेरिकन माणसे दुसऱ्याच्या आणि स्वत:च्या दोघांच्या हक्काबद्दल जागरुक आहेत. आदर करतात दुसऱ्याच्या मताचा.

तुझ्या आईनेच दोन आठवड्यांपूर्वी सांगीतलेली गोष्ट: कुठेतरी अमेरीकेत एक बाई तिच्या बाळाला घेउन चालली होति बसमधुन. बाळ खूप जोरात रडत होते. त्यामुळे चिडुन बसचालकाने त्या बाईला सांगीतले की बाळाला शांत कर नाहीतर खाली उतर. तीला बाळाला शांत करणे जमले नाही. त्यामुळे ती खाली उतरली. ते पाहुन बसमधील इता प्रवाश्यांना इतका राग आला की ते सर्वच जण खाली उतरले. पुढे काय झाले ते इतके महत्वाचे नाही. बहुधा त्या बाईला पुन्हा बसमध्ये त्याने घेतले असणार आणि कदाचीत त्याला निलंबीत देखील केले गेले असावे. परंतु महत्वाची गोष्ट ही की सर्व लोकांनी त्या स्त्रीची असहायता ओळखली आणि बसचालकाची अरेरावी चालु दिली नाही.

या दोन्ही गोष्टी अमेरीकन लोकांबद्दल खूप काही चांगले सांगुन जातात. स्वत:चा आणि दुसऱ्याचा सन्मान जपणारे लोक आहेत इथे. दुर्बल असेल तर चालेल परन्तु जिद्द असलेल्या व्यक्तिला मनसोक्त पाठिंबा देणारे लोक आहेत इथे. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची कदर करणारे लोक आहेत इथे. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या हक्कांसाठी उभे राहणारे लोक आहेत इथे.

६० च्या दशकात समान संधी आणि समान प्रवेश या साठी कायदे केले गेले अमेरिकेत. त्यांद्वारे धर्म लिंग वय आनि शारिरीक सबलता यांच्या द्वारे भेदभावला पूर्ण बंदी घातली गेली. त्यामुळे आज अपंग सर्व सार्वजनिक ठिकाणांचा उपभोग घेऊ शकतात. कुठल्याही दुकानात त्यांना जाता येईल अशी सुविधा, बसेस मध्ये त्यांची गाडी चढवता येईल अशी लिफ्ट किंवा रॅम्प , सभागृहांमध्ये वेगळी आसनव्यवस्था ... एक ना दोन. गरोदर बायकादेखील त्यात आल्याच. सिद्धु पोटात असताना मिशिगनमध्ये आम्ही देखील अपंगाचे (आणि गरोदर स्रीयांचे) पार्किंग वापरायचो जेणेकरुन तुझ्या आईला जास्त चालावे लागु नये म्हणुन.

अमेरीकेत खरोखरीच अनेक दोष देखील आहेत. परंतु अमेरीकेवर टीका करताना अमेरीकेचा हा सुंदर मानवी चेहेरा देखील पहावा.

2 comments:

Here you can find something different said...

अतिशय सुंदर लेख आहे....मी ही काही महिने अमेरिके मध्ये होतो...आपण त्यांच्या कडून जे शिकायला पाहिजे ते शिकत नाही....

बाल-सलोनी said...

अभिप्रायाबद्दल धन्यवाद तुषार. मलाही असेच वाटते!