Wednesday, August 17, 2011

पाणी टंचाई

सलोनीराणी, ही बातमी अशी हॉट ऑफ द प्रेस! ह्युस्टन शहरात उष्णतेमुळे दिवसाकाठी ७०० वेळा जलवाहिन्या फुटत आहेत सध्या! जलवाहिनी फुटते आणि अमेरिकेत?? !! मला अगदी नववधु पहिल्यांदा माहेरी गेल्यावर तिला कसे वाटेल तसे भरुन आले! अर्थात पाण्यामुळे "भरुन" आले हाच शब्द जास्त चांगला!

तर झाले असे आहे की सध्या अमेरिकाभर उष्णतेची लाटच आहे. इथे अ‍ॅरिझोनामध्ये बसुन आम्हाला काही कधी कळतच नाही की लाट आहे की काय? इथे उष्णतेची लाट नसणार तर कुठे असा विचार करुन आम्ही (एसी मध्ये) गप्प बसतो! परंतु जर युएसए टुडे चे शेवटचे पान पाहिले तर माझ्यासारख्या आळशी आणि जरा मंद लोकांसाठी एक अप्रतिम रंगीत नकाशा असतो अमेरिकेचा की ज्यावर सगळीकडची तापमाने रंगांनुसार दाखवली असतात. उष्ण म्हणजे लाल आणि जांभळा म्हणजे थंड. तर काल मी खरे तर तो नकाशा पाहिला एका दुकानात बसल्याबसल्या. सगळ्या अमेरिकाभर लाल आणि दस्तुरखुद्दांच्या राज्यामध्ये चक्रमी आणि विक्रमी तापमान होते. बकहेड मध्ये ११२ अंश फॅरेनहाईट! त्यामुळे ह्युस्टन किंवा न्युयॉर्कवासिंना ९७ किंवा १०० तपमान असेल तर त्याबद्दल फारशी काही सहानुभुती अर्थातच नव्हती माझ्याकडे. (हे अमेरिकेचे असे तपमानाचे देखील विचित्र. सगळे जग सेल्सिअस मोजते आणि इथे फॅरेनहाईट. परंतु मला असे वाटते की याद्वारे ते स्वत:च्या बाजारपेठेचे संरक्षण करतात. असो ... पण तो दुसरा विषय होईल.

तर ह्युस्टन मध्ये दिवसा ७०० जलवाहिन्या कश्या फुटताहेत. तर इथे पाण्याला खुपच दाब असतो. घरातल्या सगळ्या नळांना अगदी दाबुन पाणी येते. आणि २४ तास पाणी असते. आणि हे सगळीकडेच ... अगदी मागासातील मागास राज्यात देखील हीच परिस्थिती. ह्युस्टन मध्ये गेले १४-१५ दिवस रोज विक्रमी तपमान होते आहे. त्यामुळे जनता हैराण होऊन पाण्याचा जास्त वापर करते आहे अर्थातच. त्यामुळे नळावर जास्त दाब येऊन ते फुटु लागले आहेत. अर्थात काय तर इतके लोक इतके पाणी वापरु लागले तर त्या बिचाऱ्या नळांनादेखील काही आयुष्य आहे. तसेच सगळ्या अमेरिकाभरच नळ वगैरे असल्या गोष्टी यांनी कधी ४०-५०-७० वर्षांपुर्वी करुन ठेवल्या आहेत त्या आता जुन्या होत चालल्या आहेत. त्यामुळे देखील फुटणे स्वाभाविक आहे.

त्यामुळे आता ह्युस्टनमध्ये पाणीटंचाई आणि पाणीवाटप सुरु झाले आहे म्हणे. अर्थात इथली टंचाई म्हणजे काय तर दिवसातुन बागेला एकदाच पाणी द्या. दोन वेळा देऊ नका. खरेच. अ‍ॅरिझोनामध्ये देखील कधी कधी असे आवाहन करतात. तर यांची ही कमाल पाणीटंचाईची.

अ‍ॅरिझोनामध्ये बाकी वाळवंट असले तरीही उत्तरेला कोलोरॅडो पठार पसरले असल्यामुळे तिथल्या डोंगरांमध्ये चिकार बर्फ पडतो हिवाळ्यात. त्याचेच पाणी उन्हाळ्यात कोलोरॅडो आणि साल्ट रिव्हर अश्या दोन मुख्य नद्यांमार्फत अनुक्रमे नेवाडा-कॅलिफोर्निआ आणि अ‍ॅरिझोना राज्यांना पुरवले जाते. या नद्यांवरची धरणे अशी प्रचंड आहेत की मागील पंधरा वर्षे इथे दुष्काळ आहे आणि तरीही पाणीटंचाई अशी नाही. १९१०-२०-३० च्या दशकांमध्ये अमेरिकेच्या या नैऋत्य भागामध्ये असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले आणि मोठे तंत्रज्ञानदेखील विकसीत झाले. गोलाकार भिंतीची धरणे, बर्फाचा वापर करुन सिमेंट लवकर पक्के करण्याची क्रिया, मोठमोठ्या क्रेन्स, टनेल्स तयार करण्याची यंत्रे एक ना अनेक. हे सगळे तंत्रज्ञान इथेच विकसीत झाले. त्याची फळे पुढच्या पिढ्या आजतागायत उपभोगताहेत. आणि आपल्याकडे भारतामध्ये नर्मदा बचाओ करत विकासकामांना खीळ घालत बसतात लोक वर्षानुवर्षे. आणि अमेरिका आणि इतर राष्ट्रे असल्या "निर्बुद्द" समाजसेवकांना शंभर पुरस्कार देऊन त्यांचा अहंकार जोपासतात आणि भारताला मागे ठेवतात. चीनने "थ्री गॉर्जेस" धरण जे काही बांधले आहे त्यावर अशीच टीका केली आहे अमेरिकेने. परंतु स्वत:कडे ३०-४० वर्षे दुष्काळ पडला तरीही पाणी कमी पडेल अशी धरणे बांधुन ठेवली आहेत. तिथे नाही लहान धरणांचे तत्वज्ञान लागु पडत. ते तत्वज्ञान फक्त विकसनशील देशांना. परंतु अमेरिकेला दोष देण्यात अर्थ नाही. आपला फायदा कश्यात आहे हे आपणच ओळखले पाहिजे. चीनी लोक भोळसट नाहीत. आपण भोळसट, आळशी आणि वैचारिकदृष्ट्या अजुनही गुलामगिरीतच आहोत. असो !

तर ह्युस्टन मध्ये तब्बल ४० माणसांची फौज काम करते आहे आणि दिवसाकाठी ७०० गळत्या थांबवत आहेत. खरे खोटे त्यांना माहित. कसे करतात देव जाणे. परंतु ४० म्हटल्यावर अगदी पुण्यातल्या वेटरने फक्त बटाटेवडा मागवल्यावर जसे तुच्छतादर्शक म्हणावे "बस? इतकेच?" त्याच तुच्छतेने परंतु थोड्याश्या कौतुकाने देखील मी मनात म्हणालो - "बस ४० च ?" साहेबाचा कामाचा आवाका बाकी आहे म्हणायचा!

6 comments:

Anonymous said...

पुरे करा हो तुमचे अमेरिका कौतुक. इकडे आमचा देश पेटलाय त्यावर लिहा.

बाल-सलोनी said...

"तुमचा" देश पेटलाय तर तुम्ही लिहा की राव! इथे बसुन लिहिले तर परत म्हणाल "अमेरिकेत बसुन तारे काय तारे तोडताय ... पुड्या सोडताय .. कंड्या पिकवताय ...बोअर मारताय ..."

बाकी आपण आमचे गावबंधु की काय? पुणे तिथे काय उणे?

Anonymous said...

आमचं लिहून झालंय साहेब. नुसतं लिहून नव्हे तर प्रत्यक्ष खड्ड्यांवर उतरलो होतो आम्ही.

या वेळी तोडलेत तारे तरी चालेल. लिहा अण्णांवर.

बाल-सलोनी said...

अज्ञात वीरा तुला सलाम! पुढचा लेख अण्णांवर!

भानस said...

मिशिगन व शिकागोच्या थंडीत एक तप काढून नुकतेच अ‍ॅरिझोनात आलोय. :) आलो तेच नेमके इथल्या सगळ्यात उष्ण मौसमात. मस्त होरपळलोत :( सात महिने थंडीपेक्षा हे परवडले असे म्हणून एसीत बसून सुसह्य करतोय. :D:D

बाल-सलोनी said...

भानस, सुस्वागतम! आम्ही देखील मिशिगन मध्ये होतो पूर्वी. २००३ ला इकडे आलो. शनिवारी इंडिया असोसिएशन चा कार्यक्रम आहे. तिकडे आलात तर कदाचित भेट होईल.