Monday, June 6, 2011

अलास्का - भाग २

अलास्काला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. फिनिक्स-अ‍ॅन्करेज थेट विमान असले तरीही आमचे विमान सॅन फ्रान्सिस्को, सिअ‍ॅटल, अ‍ॅन्करेज असे होते. त्यामुळे तीन तास पुढे असुनही अ‍ॅन्करेजला पोहोचेपर्यंत आम्हाला रात्रीचे ११:३० वाजले. अमेरिकेत कुठेही गेले तर सर्व गोष्टी उपलब्ध असतात. परंतु अ‍ॅन्करेजला पाहिले तर चांगली होटेल्स कमी आहेत. शेरटन मिळाले आणि आम्हाला तेच हवे होते. परंतु बाकी ब्रॅण्ड्स दिसली नाहीत विशेष. शेरटन चांगले होते. आम्हाला क्लब फ्लोअर मिळाल्यामुळे नाश्ता आणि संध्याकाळच्या स्नॅक्सची सोय चांगली झाली. तिथे एक अल्बेनिआचा माणुस आमचा शेफ/वेटर होता. त्याने पाच दिवस चांगली सेवा दिली.  त्याला मदर टेरेसा अल्बेनिआची होती असे म्हटले तर तो भयंकर खुश झाला. एकंदरीतच जुन्या सोव्हिएट युनिअनमधल्या कोणत्याही माणसाशी काहीही बोलायला गेले तर ते एकदम जिव्हाळ्याने बोलतात. परवा कोलम्बसला मेरिअट्ची शटल बस विमानतळावर मागवली तर ड्रायव्हर आर्मेनिआचा होता. त्याला विचारयचा अवकाश की आर्मेनिआ म्हणजे अझरबैजानच्या शेजारी का? तर स्वारी एकदम सुरुच झाली. असेच असते .. दुसऱ्या लोकांमध्ये आपल्याला उत्सुकता असेल तर संभाषण सहसा लगेच साधले जाते. तर हा अ‍ॅन्करेजचा अब्लेनिअन वेटर ... तो ख्रिश्चन आणि त्याची बायको मुस्लिम होती. ते दोघे अमेरिकेत पळुन आले - अस्थिरता आणि वांशिक दंगलींना कंटाळुन. त्यांचा मुलगा आता अमेरिकेन मिलिटरी मध्ये नोकरी करत आहे. या माणसाला राज कपूर ची गाणी आठवत होती. मी त्याला मौसम बीता जाये चा संदर्भ दिला.या गाण्याची चाल एका रशिअन क्रांती गीतावर आधारीत आहे. तो अतिशय आनंदला. राज कपूर वर असलेला समाजवादाचा प्रभाव अगदी जाणवतो. कोणीतरी म्हटले आहे की माणुस तारुण्यात समाजवादी आणि मोठेपणी भांडवलवादी असावा.

असो .. दुसऱ्या दिवशी उठलो थोडे निवांतच. पुढचे पाच दिवस अ‍ॅन्करेज मध्येच मुक्काम ठोकुन आसपासची ठिकाणे न्याहाळण्याचा बेत होता. पहिल्या दिवशी हॅचर पास आणि माटानुस्का ग्लेशिअर पहायला बाहेर पडलो. हॅचर पास हे साधारण ३५०० फुट उंचीवरचे टालकिट्ना माऊण्टेन्स मधली सर्वात उंच खिंड आहे. माटानुस्का ग्लेशिअर अलास्कामधील रस्त्यावरुन दिसणारे एकमेव (अल्मोस्ट!) ग्लेशिअर आहे. इतर सर्व ग्लेशिअर्स बहुधा समुद्रात जाऊन क्रुझने पहावी लागतात. हॅचरपासला जाणारा रस्ता नक्कीच सुंदर होता. परंतु ढग आले आणि पाऊस पडु लागल्यामुळे आम्ही वर उंचीवर पोहोचलो तेव्हा खालाचे दृश्य काही दिसले नाही. वाटेत परतीच्या प्रवासामध्ये इन्डेपेन्डेन्स माईन म्हणुन एक खाण होती. अलास्कामध्ये सुरुवातिपसूनच खाण-उद्योग जोरात आहे. सोन्याच्या शोधात आलेल्या लोकांनी खाजगी खाणी सुरु केल्या तशी ही खाण असावी. परंतु आम्हाला ग्लेशिअर बघण्यात जास्त रस होता त्यामुळे मोहरा आम्ही माटानुस्का ग्लेशिअर कडे वळवला. अ‍ॅन्करेजच्या उत्तर-पुर्वेला शंभर एक मैलावर हे ग्लेशिअर आहे. जाताना डोंगर रांगा उंच उंच होत जातात. आपणही त्यांसोबत वर वर जात असतो. आम्ही मावळी मंडळी.. आमची भव्यतेची कल्पना रायगड राजगड अशी. परंतु अलास्का (आणि अगदी कोलोरॅडोमध्येसुद्धा) पर्वत म्हणजे १०,००० फुटांचे सहज आहेत. सिंहगड, राजगड, रायगड तुलनेने २-३-४ फुटाहुन अधिक नाहीत. अर्थात हिमालय मात्र किसिसे कम नहीं. जगातील टॉप टेन मधील सर्व शिखरे हिमालयात आहेत (पाकिस्तान्यांना काराकोरम ही वेगळी पर्वत रांग वाटते). ती वगळली तर जगातील सर्वोच्च दहापैकी ८ तरी शिखरे हिमालयात आहेत. पायथाच मुळी १४-१५००० हजार फुट असावा. परंतु हिमालयाचे अगदी दुरुन दर्शन घेतले आहे. त्यामानाने कोलोरॅडो आणि अलास्का अगदी जवळुन बघितले आणि पर्वतांची उंचच उंच शिखरे पाहुन मन नम्र व्ह्यायला होते. हवाई आणि अलास्का दोन्ही अप्रतिम जागा आहेत. परंतु अगदी वेगळ्या. हवाईचे सौंदर्य हे नाजुक आणि मनोहारी आहे. अलास्काचे भव्य आणि रौद्र आहे.

असो तर... माटानुस्काला जाता जाता उजवीकडे नदी आणि विस्तीर्ण तैगा होते. लहानपणी तैगा हा प्रकार फक्त पुस्तकात वाचलेला.परंतु अलास्कामध्ये प्रत्यक्ष पाहिला! तैगा म्हणजे अर्क्टिक आणि टंड्राच्या खालची इकोसिस्ट्म. हे माझे सामान्य ज्ञान! आर्क्टिक म्हणजे अगदी बर्फाळ. टंड्रा म्हणजे बर्फाळ आणि थोडेसे गवत आणि झुडुपे. परंतु तैगा मध्ये सुचिपर्णी वृक्ष दिसु लागतात. तर आमचा रस्ता डोंगराच्या कडेवरुन आणि नदीच्या बाजुने जात होता आणि नदिपलिकडे मैलोनमैल तैगा पसरलेले. सप्टेंबर महिना असल्यामुळे फॉल सुरु झालेला आणि सर्व तैगा पिवळे दिसत होते. आम्ही खुप उंचावर असल्यामुळे गवताच्या भाल्यांसारखे दृष्य होते खाली. दुरवर १०-१५ मैल अंतरावर माटानुस्का ग्लेशिअर मुंगीच्या गतिने सरकत येते आहे! त्या गतिला मुंगी म्हणणे म्हणजे पुलंच्या भाषेत सश्याच्या टाळुला गंडस्थळ म्हणण्यासारखे! ग्लेशिअर पासुन ९० अंशात पुन्हा उजवीकडे पाहिले तर पर्वत रांगाच्या मध्यावर ढग इतके खाली उतरले होते की आम्ही ढगांच्या वर आहोत असा भास होत होता. तिथे उतरुन थोडे फोटो काढले आणि माटानुस्का कडे पुन्हा रवाना झालो. वाटेते एक लाकडी पुल पार करुन आमची गाडी पुढे गेल्यावर मात्र एका ठिकाणी रस्ता थांबला होता. त्यामुळे अगदी ग्लेशिअर पर्यंत जाता नाही आले तरीही एका ग्लेशिअर व्ह्युपॉइंट्वरुन चांगली माहिती कळली. असे करुन आमची स्वारी होटेल वर परतली.


दुसऱ्या दिवशी प्रिन्स विलिअम साऊण्ड टुर आणि अल्येस्का स्काय ट्रेन करायचे ठरवले. प्रिन्स विलिअम साऊण्ड हा अलास्काच्या दक्षिणेला असलेला समुद्रापासुन डोंगररांगानी अडवला गेलेला एक मोठा जलाशय आहे. समुद्राचेच पाणी परंतु मध्ये मोठी डोंगररांग असल्यामुळे वादळांपासुन सुरक्षीत. हा जलाशय ५०-१०० मैल पसरलेला आहे आणि मध्ये डोंगररांगा विखुरलेल्या आहेत. प्रत्येक डोंगरावर एक असे अनेक ग्लेशिअर्स इथे आहेत. हे सर्व ग्लेशिअर्स इथे मोठ्मोठ्या व्हॅलिज तयार करतात. किंबहुना जगात जिथे कुथे अगदी चित्रपटात दाखवतात तशी अगदी भांड्यासारखी व्हॅली दाखवतात ती नक्कीच कधी काळी ग्लेशिअर्समुळे तयार झाली अशी माहिती या टुर मध्ये कळली. प्रिन्स विलिअम साऊण्ड ला जायचे तर व्हिटिअर नावाच्या गावात जाऊन मग क्रुझ घ्यावी लागते. व्हिटिअर एका डोंगराच्या मागे असल्यामुळे तिथे जाण्याचा एकच मार्ग आहे - तो म्हणजे व्हिटिअर टनेल. या ट्नेलमध्ये एक मजेशीर गोष्ट अशी अनुभवली की रेल्वे आणि कार दोघांसाठी एकच बोगदा आणि तोही एकेरी आहे. त्यामुळे एकावेळी एकाच बाजुची वाहतुक चालु असते. आणि आपली कार रेल्वे ट्रॅकवरुन जाते. २.५ मैल लांबीचा हा बोगदा अमेरिकेतील सर्वात मोठा आहे (अपवाद फक्त बॉस्ट्न च्या बिग डिग बोगद्याचा!). बोगद्यात शिरायच्या आत आम्ही उजवीकडे पोर्टेज ग्लेशिअर पाहिले आणि त्यानंतर व्हिटिअरला जाऊन साऊण्ड टुर केली. अलास्का सहलीतला सर्वात जास्त स्मरणीय अशी टुर होती ती. वीसेक तरी ग्लेशिअर्स पाहिली. एका ग्लेशिअरच्या अगदी १०० मीटर जवळ जाऊन त्याचे बर्फाचे कडे पाण्यात कोसळताना पाहण्यात मजा येते परंतु हे धोकादायक असु शकते कारण कधी कधी एखाद्या मोठ्या १० मजली इमारतीसारखा कडा पाण्यात तुटुन पडला तर एखादी मिनी त्सुनामी येउन तुमची बोट उलटवु शकते. त्याव्यतिरिक्त ही ग्लेशिअर्स आवाज देखील करतात. जेव्हा ग्लेशिअर्स पुढे सरकतात तेव्हा सर्व भाग एकच वेगाने पुढे जात नाहीत. त्यामुळे किंवा कधी कधी आत अडकलेल्या हवेमुळेदेखील ग्लेशिअर्स अगदी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज काढत मार्गक्रमण करत असतात.

भुकंप हे अलास्काचे दुसरे वैशिष्ट्य. इथे ७-८-९ चे भुकंप अनेकदा होऊन गेले आहेत. व्हिटिअर हे साउथसेन्ट्रल अलास्कामध्ये आहे. १९६४ साली इथे ९.२ रिश्टर स्केलचा भुकंप झालेला. तो इतका मोठा होता की त्याने भौगोलिक नकाशाच बदलुन जातो. अलास्काचा आजचा नकाशा हा अश्या अनेक उलथापालथींचा परिणाम आहे. किंबहुना जगात अनेक ठिकाणी जिथे आज समुद्र आहे तिथे कधी काळी जमीन होती. आणि जिथे आज जमीन आहे ते भाग समुद्राखाली होते. परंतु आपले अस्तित्वाला आपण इतके चिकटुन असतो की आपल्याला हे कळतच नाही काळाच्या चित्रपटामध्ये आपले संपूर्ण आयुष्य हा एक पापणी लवते तसा एक क्षण आहे. आपण त्यातुन अर्थ काढत बसतो शंभर गोष्टींचे आणि भावनावश होतो. भारतिय तत्वज्ञान हे निराशावादी नाही. परंतु पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये निहिलिझम सारख्या विचारधारा जीवनाला निरर्थक आणि निरुद्देश समजतात. त्यामुळे अर्थातच नैतिकतेला आव्हान देणारे तत्वज्ञान दिसुन येते. आयन रॅण्ड सारखे लोक वेगळे .. जे नैतिकता मानतात परंतु धर्माधिष्ठित नैतिकता त्यांना मान्य नसते. परंतु निहिलिस्ट तत्वज्ञान मानणारा माणुस नैतिक आणि अनैतिक यातला फरकच मानत नाही. मला फार काही कळत नाही या विषयांमधले. कधी अभ्यास केला नाही याचा परंतु वरकरणी भारतिय विचारसरणी ही उदात्त परंतु स्वप्नाळु वाटते. त्याउलट पाश्चात्य विचारसरणी ही व्यवहार्य परंतु आत्मकेन्द्रिंत आणि अमानवी वाटते.

असो ... परंतु अलास्काचा निसर्ग इतका भव्य आणि रुद्र आहे की विचारता सोय नाही. साऊण्ड टुर करुन आम्ही परत येता येता अल्येस्का रिसॉर्ट ची स्काय ट्रेन केली.

तिसऱ्या दिवशी फक्त झु पाहिले आणि अ‍ॅन्करेज म्युझिअम पाहिले. झु तसे काही विशेष नव्हते. परंतु म्युझिअम अप्रतिम होते. अलास्का, टंड्रा इथल्या मुळच्या लोकांना इन्युईट म्हणतात. त्यांची संस्कृती, त्यांचे जीवन, कला अगदी पाहण्यासारखे होते. मानवाच्या कल्पकतेची आणि चिकाटीची कमाल आहे की इतक्या थंड वातावरणात हे लोक कसे तग धरुन राहिले हजारो वर्षे! याव्यतिरिक्त एक गोष्ट माझ्या स्मरणात राहिली. अलास्कामध्ये गोऱ्या लोकांनी त्यांचा इतिहास चित्ररुपाने टिकवुन ठेवला आहे. त्यांच्या ज्या मोहिमा इकडे आल्या ते स्वत:बरोबर चित्रकार घेऊन येत असत आणि आपल्या अनुभवांची चित्रे काढत असत. ती चित्रे जशीच्या तशी टिकवुन आहेत. मी १९९७ साली ऑस्ट्रेलिआ मध्ये गेलो तिथेदेखील हे पाहिले. यांचा इतिहास जेमतेम २०० वर्षांचा .  परंतु इतक्या अभिमानाने जपला असतो. "हे माझ्या आजोबांचे भांडे. याच्यामध्ये ते कॉटन ठेवत असत!" - कांगारु आयलंडवरच्या ट्रीपमध्ये तो टुअर गाईड सांगत होता. आता याच्या आजोबांनी कुठे काय केले याचे मला का घेणे? "ही पावश्यांची इंदु. तरुणपणी मरण पावली. हिच्या स्मृतीस मी वंदन करतो." - आरती प्रभुंच्या ओळी आठवल्या. इतर लोक त्या कवितेतुन काय अर्थ काढतात मला माहित नाही. परंतु मला तर ती कविता म्हणजे नवकवींवर आणि मुक्तछंदावर केलेली सणसणीत टीका वाटते. असो.. पण तो वेगळा विषय होईल.

परंतु कधी कधी पाश्चात्यांचा इतिहासाचा आवाका  हास्यास्पद वाटला तरीही तो खुप अर्थपूर्ण आहे. मी सोमवारात राह्यचो तिथे १०० मीटरच्या वर्तुळात कमीत कमी तीन देवळे होती जी किमान दोनशे वर्षे जुनी होती. सिद्धेश्वर, नागेश्वर, त्रिशुंड्या गणपती. परंतु आम्हाला त्याचे कधीच काहीच वाटले नाही. किंबहुना जी गोष्ट तीनशे वर्षांपेक्षा जुनी नाही ती जुनी नाहीच मुळी अशी आपली धारणा. अलिकडे जग इतक्या वेगाने पुढे जाते आहे की आम्ही १० वर्षांपूर्वीची अमेरिका आठवुन थक्क होतो की आपण अमेरिकेत कसे रहात होतो!

असो परंतु परकीय आक्रमणांमुळे सुद्धा आपण आपला इतिहास विसरलो आहोत आणि त्यामुळे वर्तमानाचे भान राहिले नाही असे वाटते प्रकर्षाने. आणि पर्यायाने भविष्याला तिलांजली. आपल्याकडे इंग्रजांनी जमेल तितका इतिहास जाळला आणि नष्ट केला. उरलेला इतिहास जवाहरलाल नेहेरु विद्यापीठातील कम्युनिस्टांनी विकृत बनवला आहे. आणि जर तरीही काही उरलेच तर ते उजव्या विचारसरणी च्या लोकांनी पुराणाच्या पलिकडे अतिरंजीत केले आहे की खरे काय आणि खोटे काय आणि त्यातुन काय शिकावे हेच कळत नाही.

एकंदरीतच इतिहास हा नेहेमीच राजांचा राहिला गेला आहे. किंवा देव देवतांचा (परंतु तो इतिहास नाही). पाश्चात्य समाजामध्ये रेनेसान्स नंतर एक एगॅलिटेरिअन संस्कृती आली तेव्हापासुन त्यांच्या इतिहासाचा केंद्रबिन्दु सामान्य माणुस झालेला आहे. अर्थात लिंकन, रुझवेल्ट, चर्चिल मंडळी आहेत. परंतु इथे इतिहासाची पाळेमुळे अगदी दूरवर आणि खोलवर पसरली आहेत. त्याचे नाते थेट सामान्य जनते पाशी आहे.

भारतात तसा इतिहास शिकल्याशिवाय आपल्यामध्ये आत्मविश्वास, आत्मसम्मान जागृत होणार नाही. आणि इतिहासाबद्दल एक तटस्थ भुमिका निर्माण होणार नाही.

असो .. परंतु अलास्का वारीमध्ये मला एकदम याचे वाईट वाटले की पाश्चात्यांनी त्यांचा किती सुक्ष्म इतिहास जपुन ठेवला आहे. आणि आपल्याकडे शिवाजी महाराजांचा लाल महाल कसा होता याचे नक्की वर्णन नाही. बाकी तर सोडुनच द्या.

शेवटच्या दिवशी आम्ही स्युअर्ड इथे एक्झिट ग्लेशिअर पाहिले आणि वाइल्ड लाइफ टुर करणार होतो परंतु एक्झिट ग्लेशिअरच्या नादात उशीर झाला. नंतर धावत पळत एअरपोर्ट गाठला.

बऱ्याच गोष्टी पाह्यच्या राह्यला. डेनाली पार्क, क्रुझ, ग्लेशिअर लॅंण्डिंग, अरोरा बोरिअलिस. परंतु जे काही पाहिले त्याने मन प्रसन्न झाले.

अरे हो आणि एक गोष्ट राहिलीच ... होटेल मध्ये लिफ्ट ने जाता येता सलोनी लिफ्ट थांबली की म्हणायची "चिंग!" ... म्हणजे ... लिफ्टच्या बेलचा आवाज! वय वर्षे १८ महिने... एक एक आठवणी. बघता बघता आज सव्वा दोन वर्षांची झाली. इट्स फन! असो ... सो लॉंन्ग!


2 comments:

अपर्णा said...

मस्त कव्हर केलंय पोस्टमध्ये आणि फ़ोटोपण छान आहेत....मला बरीच माहिती मिळाली..फ़क्त आता बहुतेक आम्हाला पुढचा उन्हाळा गाठावा लागेल कारण यावर्षी इथे माझी आई आहे आणि तिला थंडीच्या ठिकाणी जायचं नाहीये...

बाल-सलोनी said...

अपर्णा... प्रिन्स विलिअम साऊण्ड जरुर करा. किमान ५ रात्री, जमले तर ७-१० अशी ट्रिप व्यवस्थीत होईल. अर्थात १० दिवसांमध्ये सुद्धा सर्व पाहता येईलच असे नाही. परंतु त्या जागेचा फील येण्यासाठी दोन-तीन दिवस तरी एका ठिकाणी तंबु ठोकुन राहावे लागते!

गुड लक!