Sunday, September 26, 2010

अलास्का - भाग १

सलोनीराणी

मागच्या महिन्यात तु भारतातुन परत आलीस. तुझी पहिली भारतभेट! तुम्ही तिघे तिथे आणि मी इथे. मला अतिशय कंटाळा आला. परंतु मला अतिशय आनंददेखील झाला की तुला भारतात जायला मिळाले. मला इथे तश्या काही टवाळक्या कमी नव्हत्या. १५ ऑगस्टचा इंडिया असोसिएशन चा "इंडिया नाईट" चा कार्यक्रम होता. त्याची तयारी करायची होती. यावर्षी इंडिया असोसिएशनचे काम करत असल्यामुळे प्रत्यक्ष नियोजनामध्ये भाग घ्यायचा होता. कार्यक्रम सुंदरच झाला. दरवर्षी सहसा बॉलिवुड गाण्यांचा भडिमार असतो, तो यावर्षी पहिल्यांदाच कमी करून विविध प्रकारांना वाव दिला. सर्वात मुख्य म्हणजे १५ ऑगस्ट चे महत्व कळेल अश्या पद्धतीने कार्यक्रम राबवला.आणि अहो आश्चर्यम! दरवर्षी मध्यंतरानंतर सभागृह रिकामे व्ह्यायला लागते तसे घडले नाही. अगदी शेवटपर्यंत भरपूर गर्दी होती. लोकांना चांगली गुणवत्ता आवडते आणि कळते देखील. "अमेरिकन प्रेसिडेंट" नावाच्या चित्रपटात मायकेल डग्लस म्हणतो - "People don't drink sand because they are thirsty. They drink sand because they don't know the difference."

अगदी खरे आहे हे. जोपर्यंत कोणी येऊन दुसऱ्या पद्धतीने गोष्टी करुन दाखवत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. असो ... परंतु कार्यक्रम अप्रतिम झाला असे अनेक लोक येऊन म्हणाले. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात असताना ९१ साली आम्ही १५ ऑगस्टचा कार्यक्रम केला होता. तेव्हा काश्मिरी पंडितांची व्यथा लोकांपुढे मांडली होती. तेव्हाचे फर्ग्युसनचे मुख्याध्यापक कार्यक्रम पाहुन म्हणाले "मी इथे ३०-४० वर्षे आहे. परंतु असा कार्यक्रम या महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहतो आहे." पुन्हा तेच! हो की नाही? जर आपल्याला काही वेगळे वाटत असेल दिसत असेल रुचत असेल तर ते लोकांना करुन दाखवायला पाहिजे. भाषणे देऊन काही होणार नाही.

असो .. परंतु या कार्यक्रमामध्ये मंडळाच्या एका कार्यकर्त्याने केलेली ही युट्युब क्लिप! फिनिक्स १५ ऑगस्ट २०१० कार्यक्रमामधली एक चित्रफिततर या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमामुळे मी थोडाफार व्यस्त होतो. परंतु कधीतरी मनावर घेतले की तुम्ही सर्व भारतात जाउन येत आहात तर तुम्ही परत आल्यावर आपण कुठेतरी जाऊ. तसे आता अमेरिकेत प्रमुख गोष्टी पाहुन झाल्या आहेत. यलो स्टोन नॅशनल पार्क, माऊण्ट रशमोर, फ्लोरिडा आणि अलास्का मुख्यत: राहिले आहेत (होते!). सहजच पाहिले तर अलास्का जमण्यासारखे होते. म्हणुन अलास्काची तिकिटे काढली. तर सिद्धोबा भारतातुन म्हणतो आईला "आई तु आणि सलोनी आणि बाबा अलास्का ला जा. मी इथेच राहतो आणि मग तुम्ही मला अलास्कावरुन पिक-अप करा!" एकंदरीतच साहेबांना भारतात सुख भरपुर आहे हे सांगणे न लगे. अर्थातच ते शक्य नव्हते.

तुम्ही २७ ऑगस्टला परत आलात. तुमचा जेट लॅग संपतोय न संपतोय तोच ४ सप्टेंबरला आपण अलास्कासाठी परत विमानतळावर हजर! तुझी आई मला म्हणते - "सलोनी मोठी झाल्यावर आपल्यावर चांगलीच रागावणार आहे. कोलरॅडो, हवाई आणि आता अलास्का. तिला काहीच आठवणार नाही." मला वाटते आठवणार नाही हे खरे आहे. परंतु You are still breathing the air whereever you go. And I am sure its makings its way into your heart and into your soul. त्यासाठीच भारतात जायचे ... त्यासाठीच इतके फिरायचे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय अनुभुती येत नाही. कळत नाही. मोठे झाल्यावर तुम्ही पुन्हा तिथे आणि अजुनही कुठे कुठे जाणार आहातच परंतु आत्ताच त्याची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला आपलेच ते श्रेष्ठ वाटु लागते. माझी सोमवार पेठ, माझे पुणे, माझे फिनिक्स यापलिकडे ही एक जग आहे. तिथे गेल्याशिवाय कसे कळणार?

अलास्काचे विमान दुपारी निघाले तरीही तिथे पोहोचेपर्यंत ११:३० वाजले रात्रीचे. रात्रीच्या अंधारात विमान ऍंन्करेजच्या जवळ येऊ लागले तशी वैमानिकाने घोषणा केली. खिडकीतुन बाहेर पाहिले तर मिट्ट काळोख. थोड्यावेळाने एक अरुंद प्रकाशाची रेष दिसली. मग दूरवर विखुरलेले दिवे दिसु लागले. कुठल्याही प्रकारे हे अमेरिकन शहर वाटत नव्हते. सहसा कुठल्याही अमेरिकन शहरामध्ये खूपच झगमगाट असतो. अगदीच "तारोंकी बारात". परंतु ऍन्करेज मात्र त्यामानाने अगदी खेडे वाटावे असे!!

अलास्का हा खरा तर रशियाचा प्रांत. १८४८ मध्ये अमेरिकेने तो विकत घेतला. इथला कडक उन्हाळा म्हणजे ७०-७५ फॅरेनहाईट म्हणजे जास्तित जास्त २५-२८ अंश सेल्सिअस असे तपमान! त्यामानाने थंडीमध्ये अगदी ८० फूट (होय फूट!) म्हणजे ९०० एक इंच बर्फ पडतो काही ठिकाणी. त्यामुळे इतका सर्व बर्फ बऱ्याचदा वितळतच नाही. त्याचीच मग ग्लेशिअर्स म्हणजे हिमनद्या तयार होतात. नद्या यासाठी की हे बर्फाचे हजारो फूटाचे थर गुरुत्वाकर्षणाने डोंगर-उतारांवरुन मुंगीच्या गतीने का होईना परंतु पुढे पुढे सरकत राहतात. आणि असे सरकत असताना ते खालची जमीन खरवडुन काढतात आणि अश्या पद्धतीने मोठमोठ्या दऱ्या तयार होतात. असो ... परंतु सांगायचा मुद्दा असा की अलास्का ला ग्लेशिअर्स पाहण्यासाठी बरेच लोक जातात. त्याव्यतिरिक्त पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे अरोरा बोरिअलिस - म्हणजेच नॉर्दर्न लाईट्स - म्हणजेच उत्त्र ध्रुवीय किरणप्रपात !! पृथ्वी म्हणजे एक मोठा चुंबकच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर वैश्विक किरण मोठ्या प्रमाणावर आकर्षीत होतात. रात्रीच्या काळोखात ६० मैल उंचावर या किरणाचे आकाशात जे काही नृत्य चालते ते अगदी अद्भूत असते. अर्थात ते पाहण्यासाठी ध्रुवाच्या जवळ जावे लागते आणि रात्रीच्या काळोखातच हा चमत्कार पहावा लागतो. याव्यतिरिक्त अलास्का मध्ये पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे इथले वन आणि समुद्री जीवन. व्हेल मासे उन्हाळ्यात अलास्कात येतात आणि अलास्काचा कडक हिवाळा सुरु होण्याच्या आत हवाई ला रवाना होतात. तसेच ग्रिझली बेअर (म्हणजे अस्वल) हा एक दुरुनच बघण्यासारखा विषय आहे! कारण हे ग्रिझली बेअर ८-१० फूट उंच आणि प्रसंगी प्राणघातक असू शकते. डेनाली नॅशनल पार्क मध्ये विशेषत: यांची संख्या प्रचंड आहे. डेनाली नॅशनल पार्क हे अलास्काचे अजून एक आकर्षण. अमेरिकेतील (आणि कदाचित) जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान (उद्यान कसले जंगलच)आहे हे. साधारणत: १०,००० चौरस मैल आकार असावा. इथेच उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा पर्वत - माऊंट डेनाली देखील आहे. साहेबाने त्याला आपले नाव लगेच देऊन टाकले - माऊंट मकिनली. परंतु अजूनही त्याला माऊंट डेनाली म्हणुनच ओळखले जाते.

असो ... तर असा हा अलास्का ... रशियाला काही जपणे जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी तो अमेरिकेला विकला. १८४८ ते २० व्या शतकापर्यंत इथे खनिजे आणि लाकुड आणि मुख्य म्हणजे सोने मिळेल म्हणुन अमेरिकेने बरेच प्रयत्न केले. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर अलास्कामध्ये खनीज तेल आणि नैसर्गीक वायु चे प्रचंड मोठे साठे मिळाले तेव्हापासुन हा भाग विकसीत व्ह्यायला सुरुवात झाली. अलास्का थोडासा विचित्र जागी आहे. मुख्य अमेरिकेच्या वर कॅनडा आणि त्याच्या पश्चिमेला थोडासा वर अलास्का! अर्थात मुख्य अमेरिकेपासुन तुटलेला. १९८० पर्यंत ऑपरेटर असिस्टेड फोन होते. त्यानंतर आम जनतेला थेट फोन मिळाले. १९६० पासुन ऍन्करेज झपाट्याने विकसित झाले. मागच्या काही वर्षांमध्ये वॉल-मार्ट मुळे इथे सर्व वस्तु उपलब्ध होऊ लागल्या आहेत आणि त्याही वाजवी दरात. अलास्काच्या वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की रशियामध्ये हा प्रदेश राहिला असता तर अशी प्रगती होणे अवघड होते! वस्तुवाद काही अगदीच टाकाऊ नाही :-)

असो .... आपल्या सहलीचे वर्णन आता पुढच्या लेखात....9 comments:

अपर्णा said...

हे काय?? अलास्का सफारीबद्दल पुढे काहीच नाही?? पेटंटच्या गडबडीत सलोनीचे बाबा बिझी झाले अस दिसतंय...

बाल-सलोनी said...

खरंच ! पूर्वी मेडलिन अल्ब्राईट बद्दल असेच झाले. पहिला भाग लिहिला आणि पुढे काहीच नाही...

आता इतके आठवेल की नाही कुणास ठाऊक. परंतु लिहायला पाहिजे हे खरे.

तुम्ही जर अमेरिकेत असाल आणि अलास्काला जाण्याचा विचार करत असाल तर क्रुझ ने जाणे जास्त चांगले! आम्ही विमानाने गेलो. त्यातही मजा आहे. वादच नाही.

अपर्णा said...

अलास्काला जाण्याचा विचार आहे बरोबर ओळखलंत फ़क्त आधी हवाईला क्रुझ केली होती म्हणून विचार करतोय विमानाने गेलं तर तिथली वनसंपदा जास्त चांगल्याप्रकारे पाहता येईल का? आणि मुख्य घरात बाळ आहे त्यामुळे दोन मुलं घेऊन जाताना कसं झालं एकंदरित हे मला खरं तर वाचायचं होतं त्यासाठी पाहात होते...:)

अपर्णा said...

आहे बरोबर ओळखलंत फ़क्त आधी हवाईला क्रुझ केली होती म्हणून विचार करतोय विमानाने गेलं तर तिथली वनसंपदा जास्त चांगल्याप्रकारे पाहता येईल का? आणि मुख्य घरात बाळ आहे त्यामुळे दोन मुलं घेऊन जाताना कसं झालं एकंदरित हे मला खरं तर वाचायचं होतं त्यासाठी पाहात होते...

बाल-सलोनी said...

अरे वा! क्रुझ केली असेल तर मग आता पहाण्यासारखे राहिले असे म्हणजे अरोरा बोरिअलिस (जे डेनालीच्या पुढे दिसते). आणि खुद्द डेनाली पार्क. बाळ बरोबर असेल तर बरीच रिस्ट्रीक्शन्स येतात. त्यामुळे आम्ही जमेल तेवढे करतो (डेनाली नाहीच जमले). Because we stayed in Anchorage for 5 days. With a baby its just too difficult to change hotels every few days. p.s. In 2009 when Saloni was 5 months old, we went to colorado and changed hotels 3 times in 5 days. That was terrible. So we learnt a lesson and now we try to stay in one place and only enjoy what we can in that area with short drives (max 2-3 hours one way).

बाल-सलोनी said...

aparna sorry ... I think I didn't answer it quite well.

For Alaska cruise is the BEST option. For Hawaii flying in is the best option. Whether or not you have small kids.

In alaska there is so much wild life in the sea as well as glaciers that cruise is the best way to look at those things.

Hope this helps better!

अपर्णा said...

you did answer me now. I would differ for Hawaii as if you wanna taste of diff islands and you are travelling coast to coast I would say do a cruise for a week and take a day more at Big Island..Lets leave Hawaii off from this post and conc on Alaska, yup you do have valid points about Alaskan wild life...

Thanks again..

Aparna

अपर्णा said...

I would still suggest you complete your Alaska Post....it would be fun to know how Saloni did there and look forward to how my kids would whenever we visit...:)

बाल-सलोनी said...

जरूर लिहिन! धन्यवाद. असा धक्का मिळाल्याशिवाय माझी गाडी हलली नसती.

हवाईला आम्ही दोन्ही वेळा विमानानेच गेलो त्यामुळे क्रुझ कसे असते ते माहित नाही. परंतु आता एका मित्राची आई क्रुझने गेली आहे तिच्या अनुभवावरुन वाटले की विमान बरे! असो.. परन्तु अलास्का चा लेख पूर्ण करायलाच हवा.