Monday, February 15, 2010

बिहारकन्येचे बंड!

सलोनीराणी

काल वाचलेली एक अशीच बातमी ... त्याबद्दल थोडे काही.

गोष्ट आहे बिहारच्या एका मुलीची. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या मुलीचे लग्न ठरले ओळखीतील एका मुलाशी. ३-४ वर्षांची ओळख आणि पुढे लग्न म्हणजे सर्व तसे सुरळीत पार पाडायला हवे होते. परंतु घडले वेगळेच. लग्नाच्या धुंदीत नवरोबांनी मद्यप्राशन करुन मित्रांबरोबर असा काही नाच केला की या नववधुचे धाबे दणाणले. मला कल्पनाही करवत नाही नक्की कसा काय डॅन्स केला की त्या मुलीने त्या नवरदेवाबरोबर जायला नकार दिला. वारंवार विनवण्या करुनही ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. खरे खोटे कुणाला ठाऊक. परंतु बिहार मध्ये असे घडु शकते यावर माझा विश्वासच बसत नाही आहे.

इतिहासात पाहिले तर बिहार भारताची सुवर्णभूमी होता. सर्व मोठमोठी साम्राज्ये - नंद, गुप्त, अशोक, मौर्य - बिहारमध्येच उदयास आली. अर्थात त्याचे मुख्य कारण म्हणजे सुपीक जमीन आणि लोखंड धातुची उपलब्धता. परंतु आज पाहिले तर बिहारपेक्षा मागास राज्य शोधावे लागेल. जमिनदारी अस्तित्वात असलेले एकमेव राज्य असा लौकीक असलेले राज्य. अर्थातच बिहार मध्ये स्त्रीयांची अवस्था काही फार चांगली नाही. मी १० वीत असताना कुठेतरी वाचले होते की भारतात १/३ स्त्रीया त्यांच्या आयुष्यात एकदातरी घरातील किंवा ओळखीच्या लोकांच्या अतिप्रसंगाला बळी पडतात. आपण अलिकडे वर्तमानपत्रे वाचतो आणि म्हणतो काय घडते आहे. मला वाटते विशेष वेगळे काही घडत नाही आहे आज .. फक्त वर्तमानपत्रे बातम्या मोकळेपणाने देत आहेत. अन्यथा आपण कुठल्यातरी "आम्ही त्यातले नाहीच" या खोट्या भ्रमात वावरत होतो. असो .. परंतु त्या पार्श्वभूमीवर मला बिहारच्या या मुलीचा हा नकार खूप धाडसाचा आणि स्तुत्य वाटला.

एकंदरीतच लोकसंख्येने ५०% असलेल्या समाजघटकाला म्हणजे स्त्रीयांना स्वत:च्या अस्तित्वाची पुरेशी जाणीव नाही. अगदी अजूनही. आणि भारतातच नाही तर अमेरिकेतही. अमेरिकेत ५०-६० च्या दशकांमध्ये स्त्रीया नोकऱ्या करू लागल्या आणि बंधने झुगारुन स्वत:च्या अस्तित्वासाठी लढु लागल्या. गंमत म्हणजे धर्म, वय आणि वंश यावर आधारित भेदभाव करता येऊ नये म्हणुन ६० च्या दशकात अमेरिकेत जे विधेयक आणले त्यामध्ये लिंगाचा समावेश नव्हता. थोडक्यात काय तर तुम्ही स्त्री आहात म्हणुन कोणी तुम्हाला नोकरी नाकारली तर त्याविरुद्ध कोर्टात दाद मागता येत नव्हती. तसेच वय, धर्म आणि वंशाबद्दल सुद्धा तीच परिस्थिती होती. परंतु त्या विधेयका मध्ये स्त्रीयांचा समावेश कसा झाला हे खूप मजेशीर आहे. अमेरिकेतील दक्षीणेतील राज्यातील काही असहिष्णु आणि परंपरावादी मंडळींचा या विधेयकाला विरोध होता. त्यांना हे विधेयक हाणुन पाडायचे होते. त्यांना असे वाटले की लिंगाचा देखील समावेश केला तर उत्तर भागातील काही मंडळी त्यांच्या बाजुला वळतील आणि स्त्रींयांचा समावेश कशाला म्हणुन विरोधात मतदान करतील.

प्रत्यक्षात झाले उलटेच. उलट दक्षीणेतील काही मंडळी स्त्रीयांच्या समावेशामुळे त्या विधेयकाशी संमती दर्शवायला तयार झाली आणि ते विधेयक पुढे कायद्यात रुपांतरीत झाले. आणि त्यानंतर आज स्त्रीया बऱ्यापैकी स्वतंत्र आहेत. अत्याचारांपासुन मुक्त आहेत आणि अत्याचार झाले तर तोंड न लपवता परत स्वत:चे आयुष्य हिमतीने घडवतात.

भारतातील परिस्थिती पाहिली तर आपल्या संस्कृतित आपण स्त्रीयांना समान स्थान देतो. किंबहुना कांकणभर जास्तच मान देतो. परंतु व्यवहारात पाहिले तर स्त्रिया अजूनही तितक्या स्वतंत्र वाटत नाहीत. माझ्या मते आर्थिक स्वातंत्र्याशिवाय इतर काही स्वातंत्रविषयक चर्चेला काही अर्थ नाही. आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शिक्षण होय. आज बिहार मधली मुलगी जे काही करु शकली ते केवळ ती तिच्या शिक्षणामुळे. आज ती कदाचीत नोकरी करत असले किंवा डॉक्टर असल्यामुळे ती आर्थिक दृष्या परावलंबी नक्कीच नसणार आहे. अन्यथा हे धाडस करणे कठिण होते.

अर्थात असाही वाद घालता येईल की आर्थिक स्वातंत्र म्हणजेच स्वातंत्र्य का? तर नक्कीच नाही. परंतु आर्थिक स्वातंत्र्याशिवाय जे काही तुझ्याजवळ असेल ते स्वातंत्र नक्कीच नसेल यात संशय नाही. पुन्हा मग ... स्वातंत्र्य म्हणजेच सर्व काही का? मी म्हणेन ... तु स्वत:च विचार कर. मला वाटते त्याचे उत्तर ठामपणे हो असेल. परंतु तु स्वत: शोधले तर जास्त बरे!

ता. क. - काही गोष्टींचा खुलासा करावासा वाटतो. आर्थिक स्वातंत्र्य केवळ नोकरीतुनच येते असे नाही तर सामाजिक/न्यायिक आधारातुनही येते. इथे ऍरिझोनामध्ये नवरा बायको यांची संपत्ती समान असते. जरीही नवरा एकटाच कमवत असेल तरीही बायकोचाही संपत्तीवर समान हक्क समजला जातो. जर्मनीमध्ये माझ्या एका सहकर्मचाऱ्याशी परवा बोलत होतो तेव्हा त्याने सांगीतले की त्यांना जुळी मुले होणार आहेत एप्रिलमध्ये. आणि आता त्याच्या बायकोला ३ वर्षे पर्यंत बिनपगारी सुटी मिळेल. अर्थात ३ वर्षांनंतर ती पुन्हा त्याच कंपनीमध्ये रुजु होऊ शकते. मुलांच्या संगोपनामुळे तिला तिच्या करिअरचा पूर्ण त्याग करायची गरज नाही.


दुसरी एक गंमतीशीर पण करुण गोष्ट आठवली. काही दिवसांपूर्वी मी मेडलिन अल्ब्राईट बद्दल लिहिले होते. तिचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा तिचे वय अंदाजे ४५ असावे. घटस्फोटानंतरचे एकाकी आयुष्य तिच्यासारख्या बुद्धिमान आणि कर्तबगार स्त्रीलासुद्धा सोपे नव्हते. अगदी साध्या साध्या गोष्टी .. दुकानात वस्तु आणायला गेली तर काय घ्यावे सुचायचेच नाही कारण पूर्वी वस्तु आणायची ती नवऱ्याला काय आवडेल ते. त्यामुळे स्वत:ची आवड माहितच नाही. इतके प्रेम करता येणे हे भाग्यवानच करु जाणे. पुढे जाऊन मेडलिन अगदी अमेरिकेची सेक्रेटरी ऑफ स्टेट झाली. तात्पर्य काय तर प्रेम भक्ती एकरुपता असु शकते आणि तरिही माणुस स्वतंत्र असू शकतो ... स्वत:चा आणि स्वत्वाचा विकास करू शकतो.


6 comments:

Naniwadekar said...

> भारतातील परिस्थिती पाहिली तर आपल्या संस्कृतित आपण स्त्रीयांना समान स्थान देतो. किंबहुना कांकणभर जास्तच मान देतो.
>---

काय बोलताहात? मुलाचा जन्म होतो. वडील पंचवीन्चे, एक आत्या ३५, आणि एक शेंबडा चड्डीतला का १५. आत्याला या छोट्या काकाएवढा मुलगा असतो. पण 'ए आत्या' आणि 'अहो काका'. हा का पुढे दुसर्‍या घरातल्या मोठ्या बाईशी लग्न करतो, ती मात्र 'ए काकू'.

> माझ्या मते आर्थिक स्वातंत्र्याशिवाय इतर काही स्वातंत्रविषयक चर्चेला काही अर्थ नाही.
>---

स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यावर जी आज़ अमेरिका-युरोपात महिलांची 'प्रगती' आहे ती काही स्पृहणीय वाटत नाही. लाखो रुपये कमवलेल्या स्त्रिया एकज़ात आपला किमान एक खांदा उघडा टाकून ऑस्कर कार्यक्रमाला स्वत:च्या देहाचं स्वखुशीनी प्रदर्शन घडवतात. भारताचीही तिकडेच वाटचाल सुरु आहे. स्वैराचार, घटस्फोट, आणि शिक्षणाचा परिणाम काय तर डुकरानीही पाहू नये असले पडद्‌यावरचे कार्यक्रम पहात बसणे.

इंटरनेटवरच्या मराठी जगताला सगळ्यात काय प्रिय असेल तर थरथरणार्‍या हातांची आजी. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या अभावात जर अशा गोड स्वभावाच्या बाया तयार होत असतील, तर लगेच महिला शिक्षण विरोधी चळवळ सुरु करायला हवी. त्याचीही गरज़ नाही. स्त्रीशिक्षण तालिबानकडे outsource करा. ते बरोबर मोकाट सुटलेल्या भारताला नैतिकतेचे धडे देतील.

बाल-सलोनी said...

ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

भारतातील परिस्थिती पाहिली तर आपल्या संस्कृतित आपण स्त्रीयांना समान स्थान देतो. किंबहुना कांकणभर जास्तच मान देतो.

मला असे म्हणायचे आहे की आपण प्रत्यक्ष समान स्थान देत नाही.

स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यावर जी आज़ अमेरिका-युरोपात महिलांची 'प्रगती' आहे ती काही स्पृहणीय वाटत नाही. लाखो रुपये कमवलेल्या स्त्रिया एकज़ात आपला किमान एक खांदा उघडा टाकून ऑस्कर कार्यक्रमाला स्वत:च्या देहाचं स्वखुशीनी प्रदर्शन घडवतात. भारताचीही तिकडेच वाटचाल सुरु आहे. स्वैराचार, घटस्फोट, आणि शिक्षणाचा परिणाम काय तर डुकरानीही पाहू नये असले पडद्‌यावरचे कार्यक्रम पहात बसणे.

स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नाही. त्याबद्दल दुमत नाही. परंतु अंगप्रदर्शन आणि चारित्र्याचा विशेष संबंध आहे असे मला वाटत नाही. इंडोनेशियामध्ये बायका १९६० पर्यंत चोळी घालत नसत. पूर्ण नग्नपणे तळ्यामध्ये अंघोळ करत. पुढे युरोपिअन लोकांचे पर्यटन (या कारणामुळे) वाढले तेव्हा इंडोनेशियामध्ये त्यावर बंदी घातली. दुसरे असे अमेरिकेत मी १० वर्षे राहतो आहे. इथल्या बायका चारित्र्यहीन आहेत असे मला वाटत नाही.

इंटरनेटवरच्या मराठी जगताला सगळ्यात काय प्रिय असेल तर थरथरणार्‍या हातांची आजी.

शिक्षण आणि स्वातंत्र्यामुळे गोड स्वभावाच्या आजी तयार होणार नाहीत असे तुम्हाला का वाटते? मला कळले नाही.

Naniwadekar said...

> इंडोनेशियामध्ये बायका १९६० पर्यंत चोळी घालत नसत.
>---

हे उदाहरण समोर ठेऊन मराठी बाया आज़ असं वागू लागल्या तर तुम्ही काय म्हणाल? हे उदाहरण इथे चालत नाही, असा माझा समज़ आहे. माझा शेरा इंडोनेशियन बायांना उद्‌देशून नव्हता. 'अमुक एके काळी होत असे' म्हणून बालविवाह, सती यांचं समर्थन करता येत नाही. पण इथेही माझी संकुचित भूमिका आहेच. खेड्यात १५ वर्षाच्या मुली लग्न होऊन व्यवस्थित राहतात. तेव्हा 'बालविवाह नको' ही माझी भूमिकाही चूक असू शकते.


> शिक्षण आणि स्वातंत्र्यामुळे गोड स्वभावाच्या आजी तयार होणार नाहीत असे तुम्हाला का वाटते?
>---

शिक्षणाचा फायदा होतो, हे तसं म्हटलं तर कोणी नाकारणार नाही. पण शिक्षण, लोकशाही वगैरे गोष्टी आज़ (बरेच लोक) मानतात तितक्या आवश्यक नाहीत. बायका स्वतंत्र नाहीत याबद्‌दल इतर लोक गळे काढतात. ज्या स्वतंत्र नसतात, त्या (पैकी बर्‍याच) मजेत असतात. ज्या स्वतंत्र असतात त्यातल्या अनेक 'या स्वतंत्र नसत्या तर छान झालं असतं', असं (मला) वाटायला लावतात. हा मुद्‌दा मांडण्यासाठी एक टोकाची भूमिका घेऊन उदाहरण दिलं.

तुमच्या मते पिचत पडलेल्या अनेक स्त्रियांना आज़ अमेरिकन-पुणेरी (मुंबई-पुणेरी हा ज़वळ आलेल्या ज़गात कालबाह्‌य शब्द होतो आहे) पद्‌धतीनी ज़गणाची संधी मिळाल्यास 'थू असल्या जिण्यावर' म्हणतील, कारण त्यांची एक विशिष्ट नैतिकता किंवा आयुष्याबद्‌दलची समज़ आहे. पण आधुनिक अमेरिकन-भारतीय विचारसरणी इतर जीवनपद्‌धती लक्षात न घेता उगीच त्यांच्या नावानी गळे काढते आणि जगाला तारण्याचा आव आणते.

बाल-सलोनी said...

जगला तारण्याची आपली कुवत नाही. जे दिसते जे समजते ते आपल्या मुलाबाळांना पाहता यावे / समजावे इतकीच धडपड आहे. मी ७-८ वर्षे पुण्यात एका सामाजिक संस्थेत काम करत होतो तेव्हा पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टींमधुन हे ९०% विचार पक्के झाले. त्यामुळे असे काही नाही की अमेरिकेत येऊन भारताच्या नावाने गळे काढतो. पुणे मुंबईत जेवढे सामाजिक स्वातंत्र्य आहे तितके उरलेल्या भारतात नक्कीच नाही (काही अपवाद वगळता). तुम्ही भारतातल्या इतर स्त्रीविषयक संस्थांमध्ये जा आणि माहिती घ्या आणि मग मला सांगा मी चुक की बरोबर. अमेरिकेत खूप काही चांगले आहे असे नाही. भारतापेक्षा २ पावले पुढे आहेत इतकेच ते काय.

इंडोनेशियाचे म्हणाल तर मुद्दा परसेप्शनचा आहे. अंगप्रदर्शन हे रिलेटीव्ह आहे. अरब लोकांना १ इंच दिसला तरीही अनैतिक वाटते. मग त्यांचे परिमाण वापरायचे का? अर्थात बुरखा!

दुसरे असे की आपली नैतिकतेची व्याख्या व्यापक करण्याची गरज आहे. कपडे किती घालतो यापेक्षा व्यवहार स्वच्छ आहे का? माणुस प्रामाणिक आहे का? समाजासाठी काही काम करतो का निस्वार्थीपणे या गोष्टी सुद्धा त्यात असाव्यात.

अर्थात अंगप्रदर्शनाचे हे समर्थन नाही. परंतु नैतिकता अरुंद असू नये असे वाटते. पुन्हा आभार!

Naniwadekar said...

> जे दिसते जे समजते ते आपल्या मुलाबाळांना पाहता यावे / समजावे इतकीच धडपड आहे.
>---

ज़रूर. माझा स्त्रीशिक्षणाला विरोध आहे; पण पुण्यातल्या कोणी आपल्या मुलीला आज़ शिकवलंच नाही, तर मी त्याला मूर्ख म्हणीन. या दोन विरोधाभास असणार्‍या गोष्टींचा मेळ घालण्याचा मी परिस्थितीनुरुप प्रयत्न करतो.

> दुसरे असे की आपली नैतिकतेची व्याख्या व्यापक करण्याची गरज आहे.
>---

नैतिकतेची व्याख्या व्यापक करणं हे माकडाच्या हाती कोलीत देणं आहे, असा माझा समज़ झाला आहे. तसाच विचार इस्लामचा असावा, पण मला नक्की माहीत नाही. माझा कयास खरा असल्यास माझा पिंड मुसलमानी म्हणावा लागेल. म्हणून मी 'बुरखा हवा', 'संगीत नको' या गोष्टी समज़ू शकतो. (पण स्वत: थोडंफार गाणं ऐकतो.) माझ्या आदर्श समाज़ाच्या कल्पनेत बुरखा असणार नाही. पण माणसाचा स्वभाव पाहता पुरुषांवर कडक निर्बंध असावेत आणि बायकांवर दुप्पट कडक निर्बंध असावेत, असं मला वाटतं.

बाल-सलोनी said...

@Naniwadekar, thanks. I would be lying if I said I agree with you. I appreciate your candor and thank you for your thoughts.