Monday, January 4, 2010

हवाहवाई - भाग ३ स्नॉर्केलिंगची जीवघेणी मजा


ते हिरवे पाणकासव अखेरिस दिसले .... पंधरा एक मिनिटे आम्ही त्याचा पाठलाग करत होतो. ख्रिस मला बराच वेळ झाला ते कासव दाखवत होता. परंतु काही केल्या मला ते दिसत नव्हते. स्नॉर्केलिंग पहिल्यांदाच करत असल्यामुळे अजूनही पाण्यात तोंड घालुन तोंडाने त्या नळीतुन श्वास घेणे जमत नव्हते. आणि एकदा जर तोंडावरचा मुखवटा काढला की परत घालणेही थोडे अवघड जात होते. ख्रिस आणि दुसरा एक गोरा जोडीदार मात्र अगदी सराईतपणे त्याचा पाठलाग करत होते...


माऊई स्नॉर्केलिंगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. स्नॉर्केलिंग म्हणजे पाण्यावर तरंगत राहुन पाण्यात तोंड घालुन समुद्रतळ आणि परिसर न्याहाळणे. हे करत असताना डोळ्यांवर आणि नाकावर एक मुखवटा वापरायचा असतो आणि एका नळीचे एक टोक तोंडात आणि दुसरे टोक पाण्याबाहेर ठेवुन तोंडाने श्वास घ्यायचा असतो. असे केल्यामुळे अगदी कमी श्रमात तासन तास न दमता समुद्रतळ मासे कासवे आणि कोरल्स बघता येतात. अर्थात यासाठी माऊईसारखा उथळ, शांत आणि जीववैविध्याने समृद्ध असा समुद्रतळ असला तर उत्तम. माऊईबद्दल बरेच ऐकुन होतो त्यामुळे स्नॉर्केलिंग करायला मी अतिशय उत्सुक होतो. आम्ही मोलोकिनी या एका समुद्रविवरामध्ये स्नॉर्केलिंगचे आरक्षण देखील केले .. परंतु माऊईला जायच्या दिवशीच सिद्धु इतका आजारी पडला की अगदी अर्जंट केअरमध्ये नेऊन ऍण्टीबायॉटिक्स घ्यावे लागले. त्यामुळे अगदी विमान उडण्याआधी २ मिनिटे फोन करून ते आरक्षण रद्द केले. तीन दिवस दुसऱ्या गोष्टी केल्यानंतर मात्र चौथ्या दिवशी मी ठरवले की अगदी मोलोकिनी नाही ... परंतु आमच्या रिसॉर्टच्या शेजारच्या बीचवर स्नॉर्केलिंग करायचेच. सकाळी ८ वाजता जाऊन स्नॉर्केलिंगचे सिद्धु आणि माझ्या मापाचे साहित्य आणले आणि १० च्या सुमारास उलुआ बीच वर गेलो.

पाणी तसे किंचीत थंड होते परंतु सुसह्य होते. मी आणि सिद्धु पाण्यात शिरलो. स्नॉर्केलिंगचा मास्क मी लावला तोंडावर परंतु पाण्यात गेलो की तो मास्क तोंडावरुन सुटायचा आणि नाकातोंडात पाणी जायचे. बराच वेळ तसे केले आणि शेवटी अर्धा एक लिटर खारे पाणी पिल्यानंतर मी मनात म्हटले की या गोष्टीचा नाद सोडुन द्यायला हवा. परत बीचवर आलो आणि ते साहित्य ठेवुन परतणार एवढ्यात आमच्या शेजारी बसलेल्या जोडीतला एक साठी उलटुन गेलेला माणुस (ख्रिस त्याचे नाव - मागुन कळले) मला म्हणाला, "व्हिजिबिलिटी कशी आहे?" - अर्थात समुद्रतळ दिसतोय का व्यवस्थीत.

"व्हिजिबिलिटी चांगली आहे - पण मला काहीच जमत नाहीए." - मी
"अरेच्च्या का?" - ख्रिस
"मला माहित नाही. माझा मास्क सैल होतो आहे आणि मग मी नाकाने पाणी पितोय!" - मी
"असं! बघु बर" - ख्रिस

ख्रिस आणि त्याची बायको दोघेही मला शिकवु लागले. आणि मग मला कळले की तोंडावरचा मुखवटा नाकाने श्वास घेऊन अगदी हवाबंद करायचा नसतो. फक्त लावायचा असतो. आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे नळीचे तोंडाकडचे टोक अगदी तोंडात पूर्ण घालायाचे असते.

"चल .. आपण पाण्यात जाऊन बघु." - ख्रिस थोड्या वेळाने मला म्हणाला.
"ओ के ... चल" - मी उत्साहात म्हणालो.

पाण्यात जाताना पायाला माश्यासारखे पंख पण लावले कारण त्यामुळे पोहायला अजूनच मदत होते आणि कमी श्रम होतात.

मी धीर करुन पाण्यात तोंड खुपसले आणि चमत्कार ! नळी तोंडात पूर्ण घातल्यामुळे अगदी व्यवस्थीत श्वास घेता येऊ लागला. ५-१०-२०-३० सेकंद झाले तरीही नाकातोंडात पाणी न जाता मी तरंगु शकलो! मग माझा घीर अजुनच वाढला. उलुआ बीचवर मध्येच एक खडकांची रांग (रीफ) समुद्रात जाते. अश्या कपारींमध्ये मासे येऊन राहतात. तिथे वनस्पतीही अधिक वाढतात. त्यामुळे आम्ही त्या रीफच्या अनुषंगाने समुद्रात आत आत जाऊ लागलो. समुद्रतळ देखील पाहण्यात प्रचंड मजा आहे. रंगीबेरंगी माश्यांबरोबर पोहोण्यात तर स्वर्गसुखच! त्याचा आनंद घेत घेत आमची स्वारी ख्रिसच्या मागोमाग चालली होती. तो अगदी पट्टीचा पोहोणारा होता. ते कळत होते. मला तो सारखा विचारत होता की सगळे ठिक आहे ना. एकदा मला स्नॉर्केलिंगचे तंत्र जमल्यानंतर मी काळजी न करता पाय मारत मारत पुढे चाललो होतो. एव्हाना आम्हाला एक अजून जोडीदार मिळाला होता. गोरा होता पण अमेरिकन नक्कीच नव्हता. जरुरीपेक्षा जास्त सौजन्य दाखविले की कधीही समजावे ही व्यक्ती अमेरिकन नाही. अमेरिकन त्याबाबतीत अर्थवट पुणेरी आहेत ... सौजन्याची ऐशीतैशी! परंतु पुणेकर मात्र शिष्टाचाराची पण ऐशीतैशी करतात ते भाग वेगळा!! असो ..

तर आम्ही तिघेही पुढे पुढे चाललो होतो. बराच वेळ झाला ख्रिस एक कासवांची जोडी दाखवत होता. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली हिरवी पाणकासवे होती ती. मला सुरुवातीला दिसली नाहीत. परंतु अखेरिस पाण्याच्या तळातुन सुरुवातीला अस्पष्ट आणि नंतर स्पष्ट होत गेलेले ते महाकाय कासव माझ्या डोळ्यासमोर अजुनही आहे. ६ फ़ूट व्यासाचे ते कासव होते. हळु हळु ते माझ्या अगदी जवळ आले... अगदी ४ फुटावर. आम्ही त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. किती अंतर गेलो ते कळले नाही. परंतु ते जसे अनाकलनीयरित्या पाण्याच्या तळातुन वर आले तसेच झपकन ते खाली जाऊ लागले आणि अखेरिस खालच्या अंधारात लुप्त झाले.

खाली अंधार होता याचा अर्थ पाण्याची खोली ५० फुट तरी असावी. आम्ही तिघेही अगदी अचंबीत होत आपापले मुखवटे काढत एकमेकाना विचारु लागलो की कासव पाहिले का! मागे वळुन पाहिले तर समुद्र किनारा बराच लांब होता. खडकांची रांग देखील संपली होती.

"तुम्ही नशीबवान आहात. एवढे मोठे कासव पाहता आले!" - ख्रिस म्हणाला, " चला परत फिरु."


आम्ही सगळे परत वळलो. मुखवटे लावले आणि झपझप जाऊ लागलो. मी त्यांचे पाय पाण्यात पहात पहात जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण लवकरच त्यांचे माझ्या पुढे पोहोणारे पाय दिसेनासे झाले. म्हणुन मी अंदाज घेण्यासाठी पाण्याबाहेर तोंड काढले. बघतो तर समोर अथांग समुद्र. बीच कुठेच दिसत नव्हता. मी समुद्रात आत चाललो होतो. परत मागे वळलो आणि ख्रिसच्या दिशेने जाऊ लागलो. परत थोड्यावेळाने अंदाज घेण्यासाठी तोंड बाहेर काढले तर परत मी समुद्रात आत पोहोत चाललो होतो! एव्हाना त्यांच्या आणि माझ्या मध्ये बरेच अंतर पडले होते. मी तिसऱ्यांदा परत पाण्यात तोंड घातले आणि पाय मारु लागलो... परंतु एव्हाना कुठेतरी मन चुकचुकले होते. आणि एकदम नाकात खारे पाणी गेले. त्यामुळे एकदम मी मुखवटा काढला. परंतु इतका वेळ सराईतपणे स्नॉर्केलिंग करणारा मी ... आता मात्र थोडा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. मी पुन्हा पाण्यात तोंड घालुन जीवाच्या आकांताने पाय मारु लागलो. आणि उजव्या पोटरीत वात आला. तेव्हा मात्र मी मुखवटा आणि नळी पूर्ण बाजुला करुन फक्त पाण्यात स्थिर होण्याचा प्रयत्न केला. असे करताना बऱ्यापैकी श्रम होतात. आणि एका पायाच्या ताकतीवर पोहायचे म्हणजे तर अतीच. किनार किमान २०० मीटर तरी लांब होता. मला आता मात्र प्रसंगाचे गांभीर्य जाणवले. आपण योग्य त्या गोष्टी केल्या नाहीत तर जीव गमावु याची जाणीव झाली. बीच वर १०० एक माणसे असली तरीही २०० मीटर आतमध्ये कोणी धडपडले आहे हे ओळखणे सोपे नाही.

सुदैवाने ख्रिसने पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले. मी जमेल तितके मोठ्याने ओरडुन म्हणालो "हेल्प". एकच शब्द. "हेल्प". दुसऱ्यांदा मात्र ख्रिसला गांभीर्य कळले. तो झपझप हात मारत माझ्या दिशेने आला. मला मोठे आश्चर्य वाटले की तो १५ सेकंदात माझ्याजवळ पोहोचला.
"काय झाले?"
"माझ्या उजव्या पायात वात आला आहे"


ख्रिसने माझ्या दंडाला पहिले पकडले. मी त्याला स्पर्शही केला नाही कारण बुडणारा वाचवणाऱ्याला मिठी मारतो आणि दोघेही बुडु शकतात. त्याने मला थोडासा टेकु दिल्यामुळे मला थोडी उसंत मिळाली.

"तुला पाठीवर पडून पोहोता येईल?"
"हो"
"त्याने वात कमी होईल"
"ओ के"

मी पाठीवर पडलो. त्यामुळे विश्रांती देखील मिळाली आणि वात ही कमी झाला. ३०-४० सेकंद थांबल्यानंतर तो म्हणाला "तुला पोहोता येईल?" "हो" -मी. मग आम्ही हळु हळु पोहोत येऊ लागलो. एव्हाना बरेच खारे पाणी पिल्यामुळे परत स्नॉर्केलिंगचा मुखवटा घालुन पोहोणे मला शक्य नव्हते (किंवा धाडस झाले नाही). तरीही जमेल तसे पोहोत पोहोत आमची स्वारी किनाऱ्यावर आली. ख्रिसचा जीव नक्कीच भांड्यात पडला असणार आहे. परंतु तो निश्चल होता. जणु काही घडलेच नाही. त्याला अडचणीत आणल्याबद्दल मला लाज वाटत होती. मी त्याला दोन चार वेळा सॉरी म्हणालो. परंतु त्याने खांदे उडवले. तो म्हणाला "ते सगळे विसर. कासव पाहिले की नाही!! मजा आली ना... बस्स!"

मी कालच्या लेखात लिहिले तेच पुन्हा म्हणतो ... की धैर्य उदारता आणि सहजता ही या पश्चीमेच्या जगात खूप आहे. अगदी शिकण्यासारखे आहे. ख्रिसला मी अरे-तुरे लिहित असलो तरीही हा माणुस काही लहान नाही आहे. किमान ६०-६५ वर्षांचा तरुण आहे हा! व्हॅन्कुव्हर कॅनडा चा रहिवाशी आहे. त्याचे पुन:पुन: आभार मानुन आम्ही परत रिसॉर्ट वर परत आलो.

तसा मी कठीण प्रसंगात सहसा डगमगत नाही. कारण घाबरलो, डगमगलो तर विनाश अगदी नक्कीच आहे. त्यापेक्षा शांत डोक्याने प्रसंगाला सामोरे जावे. परंतु डगमगत नाही अशी फुशारकी मारण्यापेक्षा कठीण प्रसंग येऊन न देणे यातच खरा शहाणपणा आहे. स्नॉर्केलिंगची मजा आली खरी परंतु मला विचाराल तर एकट्याने स्नॉर्केलिंग करु नये आणि अगदी खोल पाण्यात आधाराशिवाय तर मुळीच करु नये. असो ... परंतु पुन्हा सुरक्षीतपणे हे मी करेन का ... सलोनीबाई ... ऍब्सोल्युटली येस!

2 comments:

अपर्णा said...

सलोनीचे बाबा, तुमच्या चांगलंच जीवावर बेतलं जणू...पुढच्या वेळेसाठी एक टिप आहे...वेळ मिळाल्यास नक्की पाहा....

http://majhiyamana.blogspot.com/2010/01/blog-post.html

बाल-सलोनी said...

Tumachaa anubhav vaachalaa... chaan aahe. Maui aani Florida donhi kade snorkeling kele tumhi, heva vaatala.

p.s. - Lahaina harbor madhun glass bottom boat tour karane he snorkelingchya javalapaaschaa pan almost 100% surakshit option aahe!