Sunday, September 26, 2010

अलास्का - भाग १

सलोनीराणी

मागच्या महिन्यात तु भारतातुन परत आलीस. तुझी पहिली भारतभेट! तुम्ही तिघे तिथे आणि मी इथे. मला अतिशय कंटाळा आला. परंतु मला अतिशय आनंददेखील झाला की तुला भारतात जायला मिळाले. मला इथे तश्या काही टवाळक्या कमी नव्हत्या. १५ ऑगस्टचा इंडिया असोसिएशन चा "इंडिया नाईट" चा कार्यक्रम होता. त्याची तयारी करायची होती. यावर्षी इंडिया असोसिएशनचे काम करत असल्यामुळे प्रत्यक्ष नियोजनामध्ये भाग घ्यायचा होता. कार्यक्रम सुंदरच झाला. दरवर्षी सहसा बॉलिवुड गाण्यांचा भडिमार असतो, तो यावर्षी पहिल्यांदाच कमी करून विविध प्रकारांना वाव दिला. सर्वात मुख्य म्हणजे १५ ऑगस्ट चे महत्व कळेल अश्या पद्धतीने कार्यक्रम राबवला.आणि अहो आश्चर्यम! दरवर्षी मध्यंतरानंतर सभागृह रिकामे व्ह्यायला लागते तसे घडले नाही. अगदी शेवटपर्यंत भरपूर गर्दी होती. लोकांना चांगली गुणवत्ता आवडते आणि कळते देखील. "अमेरिकन प्रेसिडेंट" नावाच्या चित्रपटात मायकेल डग्लस म्हणतो - "People don't drink sand because they are thirsty. They drink sand because they don't know the difference."

अगदी खरे आहे हे. जोपर्यंत कोणी येऊन दुसऱ्या पद्धतीने गोष्टी करुन दाखवत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. असो ... परंतु कार्यक्रम अप्रतिम झाला असे अनेक लोक येऊन म्हणाले. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात असताना ९१ साली आम्ही १५ ऑगस्टचा कार्यक्रम केला होता. तेव्हा काश्मिरी पंडितांची व्यथा लोकांपुढे मांडली होती. तेव्हाचे फर्ग्युसनचे मुख्याध्यापक कार्यक्रम पाहुन म्हणाले "मी इथे ३०-४० वर्षे आहे. परंतु असा कार्यक्रम या महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहतो आहे." पुन्हा तेच! हो की नाही? जर आपल्याला काही वेगळे वाटत असेल दिसत असेल रुचत असेल तर ते लोकांना करुन दाखवायला पाहिजे. भाषणे देऊन काही होणार नाही.

असो .. परंतु या कार्यक्रमामध्ये मंडळाच्या एका कार्यकर्त्याने केलेली ही युट्युब क्लिप! फिनिक्स १५ ऑगस्ट २०१० कार्यक्रमामधली एक चित्रफित



तर या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमामुळे मी थोडाफार व्यस्त होतो. परंतु कधीतरी मनावर घेतले की तुम्ही सर्व भारतात जाउन येत आहात तर तुम्ही परत आल्यावर आपण कुठेतरी जाऊ. तसे आता अमेरिकेत प्रमुख गोष्टी पाहुन झाल्या आहेत. यलो स्टोन नॅशनल पार्क, माऊण्ट रशमोर, फ्लोरिडा आणि अलास्का मुख्यत: राहिले आहेत (होते!). सहजच पाहिले तर अलास्का जमण्यासारखे होते. म्हणुन अलास्काची तिकिटे काढली. तर सिद्धोबा भारतातुन म्हणतो आईला "आई तु आणि सलोनी आणि बाबा अलास्का ला जा. मी इथेच राहतो आणि मग तुम्ही मला अलास्कावरुन पिक-अप करा!" एकंदरीतच साहेबांना भारतात सुख भरपुर आहे हे सांगणे न लगे. अर्थातच ते शक्य नव्हते.

तुम्ही २७ ऑगस्टला परत आलात. तुमचा जेट लॅग संपतोय न संपतोय तोच ४ सप्टेंबरला आपण अलास्कासाठी परत विमानतळावर हजर! तुझी आई मला म्हणते - "सलोनी मोठी झाल्यावर आपल्यावर चांगलीच रागावणार आहे. कोलरॅडो, हवाई आणि आता अलास्का. तिला काहीच आठवणार नाही." मला वाटते आठवणार नाही हे खरे आहे. परंतु You are still breathing the air whereever you go. And I am sure its makings its way into your heart and into your soul. त्यासाठीच भारतात जायचे ... त्यासाठीच इतके फिरायचे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय अनुभुती येत नाही. कळत नाही. मोठे झाल्यावर तुम्ही पुन्हा तिथे आणि अजुनही कुठे कुठे जाणार आहातच परंतु आत्ताच त्याची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला आपलेच ते श्रेष्ठ वाटु लागते. माझी सोमवार पेठ, माझे पुणे, माझे फिनिक्स यापलिकडे ही एक जग आहे. तिथे गेल्याशिवाय कसे कळणार?

अलास्काचे विमान दुपारी निघाले तरीही तिथे पोहोचेपर्यंत ११:३० वाजले रात्रीचे. रात्रीच्या अंधारात विमान ऍंन्करेजच्या जवळ येऊ लागले तशी वैमानिकाने घोषणा केली. खिडकीतुन बाहेर पाहिले तर मिट्ट काळोख. थोड्यावेळाने एक अरुंद प्रकाशाची रेष दिसली. मग दूरवर विखुरलेले दिवे दिसु लागले. कुठल्याही प्रकारे हे अमेरिकन शहर वाटत नव्हते. सहसा कुठल्याही अमेरिकन शहरामध्ये खूपच झगमगाट असतो. अगदीच "तारोंकी बारात". परंतु ऍन्करेज मात्र त्यामानाने अगदी खेडे वाटावे असे!!

अलास्का हा खरा तर रशियाचा प्रांत. १८४८ मध्ये अमेरिकेने तो विकत घेतला. इथला कडक उन्हाळा म्हणजे ७०-७५ फॅरेनहाईट म्हणजे जास्तित जास्त २५-२८ अंश सेल्सिअस असे तपमान! त्यामानाने थंडीमध्ये अगदी ८० फूट (होय फूट!) म्हणजे ९०० एक इंच बर्फ पडतो काही ठिकाणी. त्यामुळे इतका सर्व बर्फ बऱ्याचदा वितळतच नाही. त्याचीच मग ग्लेशिअर्स म्हणजे हिमनद्या तयार होतात. नद्या यासाठी की हे बर्फाचे हजारो फूटाचे थर गुरुत्वाकर्षणाने डोंगर-उतारांवरुन मुंगीच्या गतीने का होईना परंतु पुढे पुढे सरकत राहतात. आणि असे सरकत असताना ते खालची जमीन खरवडुन काढतात आणि अश्या पद्धतीने मोठमोठ्या दऱ्या तयार होतात. असो ... परंतु सांगायचा मुद्दा असा की अलास्का ला ग्लेशिअर्स पाहण्यासाठी बरेच लोक जातात. त्याव्यतिरिक्त पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे अरोरा बोरिअलिस - म्हणजेच नॉर्दर्न लाईट्स - म्हणजेच उत्त्र ध्रुवीय किरणप्रपात !! पृथ्वी म्हणजे एक मोठा चुंबकच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर वैश्विक किरण मोठ्या प्रमाणावर आकर्षीत होतात. रात्रीच्या काळोखात ६० मैल उंचावर या किरणाचे आकाशात जे काही नृत्य चालते ते अगदी अद्भूत असते. अर्थात ते पाहण्यासाठी ध्रुवाच्या जवळ जावे लागते आणि रात्रीच्या काळोखातच हा चमत्कार पहावा लागतो. याव्यतिरिक्त अलास्का मध्ये पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे इथले वन आणि समुद्री जीवन. व्हेल मासे उन्हाळ्यात अलास्कात येतात आणि अलास्काचा कडक हिवाळा सुरु होण्याच्या आत हवाई ला रवाना होतात. तसेच ग्रिझली बेअर (म्हणजे अस्वल) हा एक दुरुनच बघण्यासारखा विषय आहे! कारण हे ग्रिझली बेअर ८-१० फूट उंच आणि प्रसंगी प्राणघातक असू शकते. डेनाली नॅशनल पार्क मध्ये विशेषत: यांची संख्या प्रचंड आहे. डेनाली नॅशनल पार्क हे अलास्काचे अजून एक आकर्षण. अमेरिकेतील (आणि कदाचित) जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान (उद्यान कसले जंगलच)आहे हे. साधारणत: १०,००० चौरस मैल आकार असावा. इथेच उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा पर्वत - माऊंट डेनाली देखील आहे. साहेबाने त्याला आपले नाव लगेच देऊन टाकले - माऊंट मकिनली. परंतु अजूनही त्याला माऊंट डेनाली म्हणुनच ओळखले जाते.

असो ... तर असा हा अलास्का ... रशियाला काही जपणे जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी तो अमेरिकेला विकला. १८४८ ते २० व्या शतकापर्यंत इथे खनिजे आणि लाकुड आणि मुख्य म्हणजे सोने मिळेल म्हणुन अमेरिकेने बरेच प्रयत्न केले. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर अलास्कामध्ये खनीज तेल आणि नैसर्गीक वायु चे प्रचंड मोठे साठे मिळाले तेव्हापासुन हा भाग विकसीत व्ह्यायला सुरुवात झाली. अलास्का थोडासा विचित्र जागी आहे. मुख्य अमेरिकेच्या वर कॅनडा आणि त्याच्या पश्चिमेला थोडासा वर अलास्का! अर्थात मुख्य अमेरिकेपासुन तुटलेला. १९८० पर्यंत ऑपरेटर असिस्टेड फोन होते. त्यानंतर आम जनतेला थेट फोन मिळाले. १९६० पासुन ऍन्करेज झपाट्याने विकसित झाले. मागच्या काही वर्षांमध्ये वॉल-मार्ट मुळे इथे सर्व वस्तु उपलब्ध होऊ लागल्या आहेत आणि त्याही वाजवी दरात. अलास्काच्या वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की रशियामध्ये हा प्रदेश राहिला असता तर अशी प्रगती होणे अवघड होते! वस्तुवाद काही अगदीच टाकाऊ नाही :-)

असो .... आपल्या सहलीचे वर्णन आता पुढच्या लेखात....



Wednesday, September 22, 2010

न्युअर्कहून .... नावात काय आहे?

२२ सप्टेंबर २०१०

 

सलोनीराणी

 

मला आता वाटते की यापुढच्या लेखांची नावे अशीच द्यावीत ... मागचा लेख पीट्सबर्ग हुन लिहिला होता .आता हा न्युअर्कहून .... बऱ्याचदा भारतीय लोक न्युअर्कला नेवार्क म्हणतात. मीसुद्धा म्हणायचो .. बऱ्याचदा ऐकुनही मला कळले नव्हते ... ५-६ वर्षे पन्नास एक वाऱ्या करुन आता कळु लागले आहे. मला वाटते वय वाढते तसे कान आणि एकंदरीतच मेंदु काहीही नविन चटकन आत्मसात करत नाही. कुठे बाहेर फिरायला गेलो आणि काही खायचे असेल तर आम्ही म्हणतो मॅकडोनाल्ड. परंतु सिद्धु म्हणायचा मकडोनल्ड. त्याचा तो उच्चार कळे पर्यंत बरेच दिवस लागले! आपल्या आडनावाचे असेच झाले आहे आता. लोकांना इथे जगताप म्हणायला भयंकर त्रास होतो. अगदी फेफरेच. त्यामुळे त्यांना जॅगटॅप सांगायला लागते. त्याचेदेखील ते जॅकटॅब करतात. कधी कधी कंटाळुन मी म्हणतो ठीक आहे. .... बरोबर ... जॅकटॅब. त्यावर काही माणसे म्हणतात. थॅन्क गॉड आय डिड्न्ट वॉण्ट टु से समथिंग रॉंग ... मी कपाळावर हात मारतो.

 

परंतु आपण मराठी माणसे तरी बरी. ही बरीचशी पंजाबी मंडळी ... रिकी, बॉबी, सॅमी असलीच काहीतरी नावे लावतात. आणि नंतर कळते की त्याचे नाव नरेंद्र आहे. आता रिकी आणि नरेंद्र यात काय साम्य आहे. चीनी लोकांचे मी थोडेतरी समजु शकतो. शांग्ड्र्र्र्र्र्र्र्रंंंंंंंंं असले काहीतरी नाव म्हणणे म्हणजे कच्ची कोळंबी खाऊन ढेकर दिल्यासारखे वाटते. खरेच! त्यामुळे माझ्या त्या मित्राने त्याचे नाव ठेवले सायमन. अजुन एक चीनी मित्र त्याचे नाव होते "हायहुआ?" यामध्ये प्रश्नचिन्ह नावातच आहे. कारण प्रश्नचिन्ह असेल तर मुलगा नाहीतर मुलगी असे काहीतरी तो म्हणाला. त्याने त्याचे नाव एडी ठेवले. मी कुठेतरी ऐकले होते की जगात सर्वात प्रेमळ शब्द कोणते असतील तर आपल्या नावाने कोणी आपल्याला हाक मारत असेल ते! त्यामुळे मी त्याला "हायहुआ?" अशी हाक मारायचो. परंतु त्याला काही ते आवडत नसेल असे मला दिसु लागले. म्हणुन मी एडी झिंदाबाद म्हटले! परंतु चीनी माणसे एकंदरीत खरोखरीच अगदी भारतीयांसारखी. फार काहीही फरक नाही. जवळपास तेच गुणदोष! असो ... जपानी माणसे मात्र आपल्या नावाच्या बाबत अगदी आग्रही. आयजी ला आमच्या वर्गातील एक अमेरिकन पोरगी एजी म्हणायची त्याला काही ते आवडायचे नाही. आता आपली युपी ची तायडी असली असती आणि एजी म्हणाली असती तर त्याचा भलतात अर्थ झाला असता आणि त्या एजीच्या तोमोएने तिच्या झिंज्या उपटल्या असत्या. तशी तोमोए सामुराई घराण्यातील होती. असो ... परंतु आयजी ला माझे कौतुक वाटायचे कारण मी "कोनोसुके मात्सुशिता" "अकिओ मोरिटा" "अकिरा कुरासावा" "अमुक तमुक नाकामुरा" वगैरे अशी नावे त्याच्या समोर लिलया फेकायचो. त्यामुळे आयजी माझ्यावर जाम फिदा होता. आता आपली मराठी भाषाच अशी आहे की जसे लिहितो तसे बोलतो. जपानी भाषा तशी अगदी सरळ आहे .... (असा माझा भ्रम अजुनही आहे!).

 

 

असो ... परंतु आमचे विमान गेट ला लागले आहे. ४:३० ला होते. त्या विमानात बिघाड झाला त्यानंतर दुसरे विमान रद्द झाले. त्यानंतर पुढचे विमान इथे उतरवता आले नाही कारण पावसामुळे विमानतळ बंद केला ... आणि आता सहा तासांनंतर अखेरिस आमच्यासाठी "सवारी" इथे आलेली आहे. फिनिक्सापर्यंत पोचेपर्यंत १-२ वाजणार यात काही संशय नाही.

 

 

पिट्सबर्गहून...

२४ मे २०१०

सलोनीराणी

 

असे दिसतयं की प्रवास करत असलो की मला लेख लिहायला वेळ मिळतो. आत्ता पिट्सबर्ग म्हणुन विमानतळावर आहे. कालचे फिनिक्सला जायचे विमान हवामानामुळे रद्द झाले. आता न्यु यॉर्क कुठे, फिनिक्स कुठे, आणि ते ऍलेक्स नावाचे हरिकेन (वादळ) कुठे. परंतु त्या वादळाने कॉन्टिनेन्टल च्या ह्युस्टन हब वर बराच धुमाकुळ घातला त्यामुळे सर्व अमेरिकाभर त्याचे पडसाद उमटले. त्यातच आमची फ्लाईट कॅन्सल झाली. असो... त्यामुळे न्युयॉर्क मध्ये एक रात्र उगाच घालवुन आमची स्वारी आत्ता प्‍हाटंच्या पारी पिट्सबर्गद्वारे फिनिक्सला चालली आहे.

 

पिट्सबर्गला मी कधीच गेलो नाही आहे. विमानातुन बऱ्याचदा दिसते परंतु शहरात गेलो नाही. परंतु आज कमीत कमी विमानतळावर दोन अडीच तास घालवण्याचा योग आला. तसे विमानतळावरुनच एकंदरीच त्या भागाची आणि लोकांची कल्पना येते. दीड वर्षांपूर्वी ओरेगॉनला गेलो होतो तेव्हा पोर्टलंडच्या विमानतळावर अगदी जाणवले की हे हुकलेल्या लोकांचे राज्य आहे (चांगल्या अर्थाने). पोर्टलंडमध्ये केसांचा भांग वगैरे पडण्याच्या फंदात लोक पडत नाहीत की काय ... आणि सर्व लोक हिप्पी किंवा त्या कॅटेगरीमधले वाटले. ट्री हगर्स! मला ट्री हगर्स आवडतात. ख्रिश्चन धर्मांधांपेक्षा ट्री हगर्स १०० पटीने चांगले! किंबहुना तुलनाच नाही. असो ....

 

पीट्सबर्ग हे इथले अगदी औद्योगिक शहर. पूर्वी प्रमुख शहरांपैकी एक. परंतु आता काळाच्या ओघात बरेचसे उद्योग चीन किंवा इतर विकसनशील भागात स्थलांतरीत झाले, परंतु त्यामानाने सेवा क्षेत्रातील नवे उद्योग इथे निर्माण झाले नाहीत. त्यामुळे हळुहळु पीट्सबर्गचे महत्व कमी होत गेले आहे. एकंदरीतच अमेरिकेतील डेट्रॉईट, पीट्सबर्ग, क्लीव्हलंड अशी दिग्गज शहरे काळाच्या ओघात सिऍटल, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलेस या शहरांच्या बरीच मागे पडली.

 

आपल्याकडे सुद्धा मुम्बईतील गिरण्या मुम्बईबाहेर गेल्या म्हणुन मराठी माणसे हळहळली... तशीच या अमेरिकेच्या मिडवेस्ट्मध्ये एक तीव्र नाराजी आणि हरवल्याची भावना आहे. तसे कालाय तस्मै नम: हे सर्वांना कळते. "परिवर्तन ही संसार का नियम है" हे देखील सर्वांना कळते. बदल खूप कमी लोकांना हवा असतो हे खरे असले तरी जर पुरेसा वेळ दिला तर बरीच माणसे बदलायला अनुकुल असतात. तसेच जर भवितव्य उज्ज्वल दिसत असेल तरीही लोक बदलायला लवकर तयार होतात. अमेरिकन मिडवेस्ट्चे तसे नाही आहे. एक तर झपाट्याने म्हणजे अगदी एका पिढीत हा भाग अगदी सधनतेकडुन निर्धनतेकडे गेला आहे. आणि त्यामानाने दुसऱ्या नोकऱ्या निर्माण न झाल्या मुळे भविष्याविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे इथुन एकुण स्थलांतर करणाऱ्याचे प्रमाण जास्त.

 

आज अमेरिकाभर आऊटसोर्सींग विषयी आज प्रचंड असंतोष आहे. परंतु आऊटसोर्सींग हे १९७० पासूनच मोठ्या प्रमाणावर चालु झाले. ७० च्य दशकात जेव्हापासुन निक्सन ने अमेरिका आणि चीनमध्ये जवळीक साधली तेव्हापासुन मोठया प्रमाणावर चीन ने अमेरिकेतील उद्योग आणि त्यान्च्या नोकऱ्या आकर्षीत केल्या. त्यामुळे चीनची १०-१५-२०% वार्षिक वाढ झाली मागची ३ दशके! परंतु अमेरिकेतील कामगार मात्र पूर्ण भरडुन निघाले. परंतु कामगार वर्गाचा असंतोष व्यक्त करणार कोण? पत्रकार, वकिल, डॉक्टर्स, व्यवस्थापन, कलाकार इत्यादि मंडळी सुरक्षीत होती! त्यामुळे कामगारांच्या व्यथेला आवाज मिळाला नाही. परंतु जसजसे सेवा क्षेत्रातील नोकऱ्या अमेरिकेबाहेर आणि प्रामुख्याने भारतात जाऊ लागल्या तसतसे या व्हाईट कॉलर लोकांना त्याची झळ बसु लागली आणि अमेरिकेमध्ये आज त्यामुळे आऊटसोर्सिंगबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

 

अर्थात याचा अर्थ आऊटसोर्सिंग वाईट आहे असे मुळीच नाही. आऊटसोर्सिंगमुळे आज चीन भारतात बऱ्याच नोकऱ्या तर निर्माण झाल्या आहेतच परंतु त्याहिपेक्षा महत्वाचे म्हणजे जग जवळ आले आहे. तंत्रज्ञानाची आदान प्रदान झाली आहे... राहणीमान उंचावले आहे. अमेरिकन मिडवेस्ट मधल्या कामगार वर्गावर प्रतिकुल परिणाम झाला असला तरिही एकुण अमेरिकेला देखील आऊटसोर्सिंग फायद्याचे ठरले आहे.

 

मुद्दा इतकाच आहे की काही अमेरिकन लोक मात्र यामुळे अगदी पिचुन गेले आहेत. त्यांबद्दल वाईट जरुर वाटते. मी जे काम करतो त्यामध्ये आऊडसोर्सिंग हा एक मोठा भाग आहे. त्या कामामुळे आज भारतात किमान ३-५ हजार नोकऱ्या निर्माण झाल्या केवळ आमच्या कंपनीमध्ये. त्यामुळे बरे वाटते की इथे राहुनही आपण भारताच्या प्रगतीला काही तरी हातभार लावतो. परंतु ते तसे लटके समाधान आहे. भारताबाहेर राहुन जे काही होते ती किरकोळ मदत आहे. हातभार वगैरे नाही. असो ....

 

कोणी म्हणेल इथल्या लोकांबद्दल वाईट का वाटते. तर त्याचे उत्तर असे आहे की अमेरिकेत पैश्याशिवाय काहीच चालत नाही. जगात इतरत्र कुठेही माणसाची अंतर्भूत (इन्हेरन्ट) किंमत इतकी कमी नसेल. आणि सर्व संस्था किंवा घडी अशी बसवली आहे की संचय करताच येऊ नये. त्यामुळे नोकरी गेली की लोकांना कारचे हप्ते भरता येत नाही ... कार जाते .... घर जाते ..... बायको आणि नवराही गमावण्याची पाळी जाते. गरिबीमुळे आरोग्य जाते कारण गरिब लोकांना प्रक्रिया केलेलेच अन्न परवडु शकते. भारतात आपण रोजच साधे परंतु ताजे अन्न खातो. प्रक्रिया केलेले अन्न आपल्याकडे नाहीच आहे त्यामुळे आरोग्याला हानी होत नाही. अमेरिकेत प्रक्रिया केलेले अन्न स्वस्त कारण ते "मॅन्युफॅक्चर्ड" असते! परंतु मग अश्या अन्नातुन तब्येत खराब होते. बरं आणि इथल्या व्यक्तीस्वातंत्र्यामुळे नातेवाईकांवर खूप काही अवलंबुन राहता येत नाही. आणि त्यांच्याकडेदेखील अतिरिक्त पैसा कुठुन असणार कोणाला पोसायला. इथले राहणीमानच इतके उच्च आहे की एका माणसाला पोसायचे म्हटले तर कठीण आहे. या सर्व प्रकारांमुळे अमेरिकेत नोकरी गमावणे हा गंभीर प्रकार झाला आहे. मी स्वत: लोकांना कामावरुन काढत नसलो तरीही या गोष्टी जवळुन पाहिल्यामुळे हळुहळु इथल्या सामान्य माणसावरच्या या संकटाबद्दल सहभावना नक्कीच निर्माण झाली आहे. घर गाडी एखादे पुस्तक ... पेन अश्या निर्जीव वस्तुंमध्ये आपला जीव चटकन अडकतो. मग ही तर माणसांसारखी माणसे! त्यांच्याबद्दल सहानुभूती न वाटुन कसे चालेल?

 

 

असो ... पुरे आता ..

Monday, June 28, 2010

ऑलिव्ह गार्डन

सलोनीराणी

 

काल रविवार होता. त्यामुळे ठरले बाहेर जेवायला जायचे. कुठे जायचे कुठे जायचे करत शेवटी "ऑलिव्ह गार्डन" ला जायचे ठरले. फिनिक्स मध्ये भारतिय रेस्टॉरंट्स आता बऱ्यापैकी आहेत ... १५-२० तरी असतील. परंतु ईस्ट कोस्ट किंवा वेस्ट कोस्टच्या तुलनेत किस झाडकी पत्ती. तरीही आपण बऱ्याचदा भारतियच पसंत करतो ..... आपण म्हणजे तुझी आई. मला चविष्ट असेल तर काहीही चालते. आता दहा वर्षांमध्ये तुझ्या आई मध्ये बदल होऊन तिला इटॅलिअन चालू लागले आहे. कधी कधी मेक्सिकन खाईन अश्या बाता मारते. परंतु आत्तापर्यंत मला तरी आठवत नाही तिने मेक्सिकन खाल्याचे. मेक्सिकन खाणे तसे भारताच्या जवळचे. बऱ्यापैकी मसालेदार, लाल बीन्स( घेवडे), भात आणि चपाती (टॉर्टिया) ... हे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मेक्सिकन लोक मांसाहार कमी करतात. मांसाहार करावा तर युरोपिअन वंशाच्या अर्थात गोऱ्या लोकांनी. सॅन पामिआ मध्ये राह्यला होतो तेव्हा एका जर्मन म्हातारबुवांशी गप्पा मारताना मी चुकुन विचारले की जर्मन क्युझीन (अर्थात पाकशास्त्र) मध्ये काय काय असते? तर म्हातारबुवा गुरगुरले "मीट ऍण्ड पोटेटो ऍण्ड मीट ऍ.......ण्ड पोटेटो!". मला आधी कळलेच नाही .... नंतर कळल्यावर म्हातारबुवांच्या विनोदबुद्धी चे कौतुक वाटले. परंतु नीट विचार केला तर युरोपमध्ये पाकशास्त्र कसले डोंबल्याचे. वर्षातले किती महिने थंडी असते तिथे काय पिकणार? त्यातल्या त्यात फ्रान्स स्पेन आणि इटली हे भाग मात्र त्यामानाने सौम्य हवामानाचे म्हणुन तिथे त्याचे स्वत:चे वेगवेगळे पदार्थ नक्कीच आहेत. तसे पाहिले तर भारतात पदार्थांची जी विविधता आहे त्याला तोड नाही. कारण भारता इतका शेती साठी दुसरा चांगला देश नाही. अगदी चीन सुद्धा नाही. सायमन (शांग्ड्रं) आणि आयजी हे माझे मित्र आणि सहकुटुम्ब आमच्याकडे (आणि आम्ही त्यांच्याकडे) जेवायला जायचो तेव्हा त्यांच्या बायका चीनी जपानी पदार्थ करायच्या. एकदा तोमोए (म्हणजे आयजी ची चयकोबा) ने खास एक जपानी पदार्थ करुन आणला. पदार्थ कसला द्रव होता. भल्यामोठ्या पातेल्यामध्ये ९०% पाणी आणि त्या पाण्यावर पावाच्या लाद्यांसारखे दिसणारे काही तरी तरंगत होते. ते पाहुनच आम्ही घोषीत केले की आम्ही मांसाहार करत नाही! परंतु तोमोएने तिच्या तोडक्या मोडक्या विंग्रजी मध्ये सांगीतले की ते कुठल्या कुठले रूट्स अर्थात कंद आहेत. सोनाली ने काहीतरी बोलुन स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यामुळे तोमोए आणि चुंझं दोघींनी मला पुन्हा पुन्हा आग्रह करुन ते सूप खायला घातले. तसे वाईट नव्हते. परंतु आपली भारतिय - त्यातुनही पुणेरी जीभ फारच चवचाल आहे. भारत सोडुन जगात सगळीकडे लोक जेवण तसे सौम्य खातात. आपल्यालाच फार चमचमीत लागते. असो ... परंतु चीनी आणि जपानी लोक असे पाणीदार जेवण करत असल्यामुळे तसे काटकुळे असतात.

 

कोस्टा रिका मधल्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात रोज एकच खाणे भात, काळे घेवडे आणि परतलेली केळी!! जगात डीप फ्राईड केळी कोण खात असेल तर कोस्टारिकन लोक. आम्हीही चार महिने रोज खाल्ली! चांगली लागतात. बाधत नाहीत डीप फ्राय केल्यावर! फक्त हार्ट ऍटॅक येऊ शकतो!

 

असो ... तर आम्ही ऑलिव्ह गार्डन मध्ये पोचलो. पोचायला दुपारचे २ वाजले त्यामुळे गर्दी कमी होती. तुझ्या आईला प्रयोग आवडत नाहीत. त्यामुळे नेहेमीचा मेन्यु मागवला. मिनस्ट्रोनी सूप (सगळ्या भाज्या पास्ता आणि पाणी), ब्रुशेटा (टोस्ट आणि टोमॅटो), आणि पिझ्झा. तुला थोडे सूप दिले. परंतु आजकाल तुला काहीही खाताना हातात त्या वस्तुचा आकार आणि टेक्श्चर पाहुन मगच खायची सवय लागली आहे त्यामुळे जमेना. हे हातात घेऊन कसले परिक्षण चालते देव जाणे. परंतु मला त्या लोणावळ्याच्या झूमधल्या चिंपाझीच्या गोष्टीची आठवण करुन देते .... तो चिंपाझी कुणीही काहीही दिले की पहिल्यांदा मागे लाऊन बघायचा म्हणे. कुणीतरी विचारले तर तिथल्या रक्षकाने सांगीतले की एकदा त्याने चुकुन कोयीसकट आंबा खाल्ला तेव्हा फार त्रास झाला तेव्हापासुन तो असे करतो!! असो ... परंतु अगदी जेवण संपल्यानंतर मिंट चॉकोलेट बडिशेपसारखे इथे देतात ते सुद्धा हातात घेऊन सगळे निरखुन पाहिलेस तु आणि सगळे बरबटुन घेतले. मध्यंतरी सिद्धोबाने चिकन चा तुकडा चा फडशा पाडला होता. सिद्धोबाला आम्ही चिकन आणि मासे खाऊ देतो. परंतु कुत्ता बिल्ली हे आपण खायचे नसते हे त्याला पक्के ठाऊन आहे त्यामुळे तो आग्रह करत नाही. त्यातल्या त्यात टर्की (म्हणजे कोंबडी आणि बदकाच्या मधला एक प्राणी) चे सॅण्डविच कधी कधी खायला परवानगी देतो.

 

दोन दिवसांपूर्वी सबवे मध्ये तो आणि त्याच्या दोन मित्रांना घेऊन गेलो तेव्हा सर्वांना घासपूस (अर्थात शाकाहारी) सॅण्डवीचेस घेतली. तेव्हा सोनालीने एका मित्राला (वय वर्षे आठ) विचारले की तुझी आई तुला टर्की खाऊ देते का? त्यावर तो म्हणाला, "इफ माय मॉम डिडन्ट मॅरी माय डॅड देन आय वुड हॅव बीन इटिंग ऑल काइन्ड्स ऑफ मीट!!". आम्ही उडालोच. मुलाचे भवितव्य उज्ज्वल आहे!! लाजिक स्ट्रांग आहे.

 

असो ... तर ऑलिव्ह गार्डनमध्ये जेवण झाल्यावर देवळात आणि नंतर किरकोळ खरेदीला जायचा विचार होता. परंतु एकदा एवढे जेवण जेवल्यानंतर अस्मादिकांना झोप आली आणि आपण आता घरी जावे असे मी सुचवले. त्यावर इतर वेळा तुझी आई खूप चिडली असती परंतु बोलता बोलता तिचे स्वत:च्या पायांकडे लक्ष गेले आणि तिच्या लक्षात आले की ती चुकुन स्वैपाकघरातल्या स्लीपर्स घालुन बाहेर पडली आहे. टी शर्ट, स्कर्ट आणि निळ्या रबराच्या स्लीपर्स हा अवतार घेऊन कुठे जाण्याची तिची तयारी नव्हती. त्यामुळे आम्ही घराकडे मोहरा वळवला. आणि दुपारी मस्त ताणुन दिली.

 

 

Tuesday, June 8, 2010

रावणाची सुसु आणि मुनलाईट सोनाटा !

सलोनी

 

लेखाचे नावच गोंधळुन टाकणारे आहे ना? आहेच मुळी. रावणाची सुसु आणि मूनलाईट सोनाटा या दोन गोष्टींमध्ये काय संबंध आहे?

 

तर त्याचे आहे असे की सिद्धुला रात्री झोपताना सहसा गोष्ट ऐकायला आवडते. तश्या बऱ्याच गोष्टी सांगतो मी त्याला परंतु सिद्धुला विशेष करुन वात्रट गोष्टी जास्त आवडतात. तर आज मी त्याला रावणाची आणि गणपतीची गोष्ट सांगीतली. रावण तपश्चर्या करुन शंकराला प्रसन्न करतो आणि एक ज्योतिर्लिंग घेऊन लंकेला जाऊ लागतो. रावणासारख्या दैत्याकडे ज्योतिर्लिंग असेल तर तो त्यातुन मिळणाऱ्या शक्तीचा दुरूपयोग करेल या भीतीने सर्व देव गणपतीला आवाहन करतात की काहीही करुन ते ज्योतिर्लिंग परत मिळवायचे. शंकराने ते लिंग देताना अट घातली असते की ते जिथे पहिल्यांदा जमीनीवर टेकेल तिथुन ते परत उचलता येणार नाही. गणपती लहान मुलाचे रूप घेउन रावणाला "सुसु" येइल अशी जादु करतो. आणि मग रावण त्या लहान मुलाला लिंग सांभाळायला देऊन सुसु करुन येईपर्यंत गणपती ते लिंग खाली ठेऊन पसार होतो. अशी गोष्ट ...

 

सिद्धु ही गोष्ट ऐकुन अगदी गडबडा लोळुन हसला. इतके की त्याचे पोट दुखले. सिद्धुला का कुणास ठाऊक सुसु असलेल्या गोष्टी खूप आवडतात. मी त्याला तश्या बऱ्याच गोष्टी सांगीतल्या आहेत. शिवाजी महाराज, भगत सिंग, देवगिरी चा रामराजा .... अलेक्झॅण्डर इत्यादि .... परंतु सिद्धुला सर्वात जास्त काय आवडत असेल तर सुसु च्या गोष्टी. हनुमान सुपरमॅन बॅटमॅन आणि स्पायडरमॅन कॅंम्पिंगला जातात ती तर त्याची अत्यंत आवडती गोष्ट. सर्वात महत्वाचे म्हणजे हनुमॅन हा इतर कोणत्याही मॅन पेक्षा जास्त पावरबाज आहे हे एव्हाना त्याला पूर्णपणे कळले आणि पटले आहे. हे तुला देखील कळणे अत्यावश्यक आहे. योग्य वेळ येईल तेव्हा तुलादेखील सांगेन. असो ... तर तिथे कॅम्पिंग च्या जंगलामध्ये भुते असतात. ती रात्री सगळे झोपले असताना कशी पांघरुणाच्या आत प्रवेश करतात याचे प्रात्यक्षिकासकट वर्णन मी सिद्धुला बऱ्याचदा दिले आहे. परंतु हनुमानाजवळ जातील एवढी भुतांमध्ये ताकत नाही. त्यामुळे कॅम्पिंग साईटजवळ भुते दबा धरुन बसतात. हनुमानाला रात्री सुसु लागते तेव्हा तो बाहेर येतो आणि चुकुन भुते बसली असतात त्या खड्यात सुसु करतो असे म्हणताच सिद्धु जे खो खो हसु लागतो की काही विचारु नकोस ....

 

सिद्धुच काय .. मला पण हसायला येते तर!

 

असो .. पण माझा प्रयत्न असतो की सिद्धुला येनकेन प्रकारेण भारताच्या संस्कृतीशी निगडीत गोष्टी सांगाव्यात. उद्या त्याला परके वाटु नये जर भारतात गेले तर. सम्पूर्ण नाही परंतु अर्ध्या नसात तरी भारतीय रक्त वहावे एवढीच काय ती इच्छा! परंतु ती इच्छा तरच पूर्ण होईल जर मी गोष्ट सांगता सांगता झोपी नाही गेलो तर. बऱ्याचदा सिद्धु मला उठवत असतो ... "बाबा पुढे काय झाले"... परंतु मला निम्यावेळातरी गोष्ट सांगता सांगताच झोप येते. असो...

 

असो ... पण मग मूनलाईट सोनाटा ही काय भानगड आहे? तर ती आमच्या राणीसाहेबांना झोपी घालवण्याची "ट्रीक" आहे. बाईसाहेब अगदी गोऱ्या मडमेच्या वर मूनलाईट सोनाटा ऐकत ऐकत झोपतात ... सुदैवाने तिथे मी तुला हातात धरुन येरझाऱ्या घालत असल्याने मी स्वत: तुझ्या आधी नाही झोपत.

 

मूनलाईट सोनाटा माझी अत्यंत आवडती सिंफनी आहे.. त्याच्याबद्दल पुढच्या लेखात....

 

 

Tuesday, June 1, 2010

अमेरिकन हेअरकट च्या निमित्ताने ...

सलोनीराणी

 

काल इथे मेमोरिअल डे म्हणजे सैनिक-स्मृतिदिन होता. त्यामुळे सुटी होती. त्यामुळे शिल्लक राहिलेली कामे करायची होती. पैकी एक काम म्हणजे केस कापणे. मिशिगनला असतात विद्यार्थी(दशेत) असताना पैसे नसताना तुझी आईच घरी मशीन आणुन चकट्फु केस कापत असे. आताशा बाहेर जाऊन कापतो. असो ... तर केस कापायला गेलो. दुकानात एक १७-१८ वर्षांची मुलगी होती. इकडे केस कापण्याच्या दुकानात बऱ्याचदा स्त्रीयाच असतात. याचे कारण असे की पैसे इथे खूप कमी असतात - तासाला ६-७ डॉलर्स. एकंदरीतच अमेरिकेतही स्त्रीयांना पुरुषांपेक्षा वीसेक टक्के कमी पगार मिळतो. सो मच फॉर डिव्हेलप्ड वर्ल्ड! असो ... परंतु त्यावरुन आठवले ... पुणे विद्यापीठात एमसीए करत असताना आमच्या वर्गात टीपी (थेलकट प्रदीप ऊर्फ टेन्शन पर्सॉनिफाईड ) नावाची एक "व्यक्ती कमी आणि वल्ली जास्त" होती. हा मुळचा मल्याळी परंतु दिल्लीला स्थायिक झाल्यामुळे अगदी दिल्लीचा झाला होता. सध्या न्युयॉर्क मध्ये कुठल्यातरी बॅन्केत काम करतो. तो पूर्वी एकदा भारतात-दिल्लीला गेला तेव्हा तिथे केस कापायला गेला होता. तिथला न्हावी काम करता करता याला म्हणतो "साहिब उधर बाल काटनेके दस डॉलर्स देने पडते है?" - अर्थात मला पण थोडे जास्त पैसे मिळतील का? त्यावर हा टीपी म्हणतो - "अबे उधर लडकी बाल काटती है. वोभी निक्कर (हाफ पॅण्ट) पेहेनके! इधर तू बाल काटता है!" माझे वडिल २००३ साली इथे आले तेव्हा पुतळ्यासारखे स्तब्ध बसले होते केस कापताना ... तेव्हा आम्ही त्यांची चांगलीच टर उडवली होती. असो ...

 

अशीच दुसरी एक गोष्ट आठवली म्हणुन सांगतो. १९९७ साली ऑक्टोबरमध्ये मी ऑस्ट्रेलियामधुन भारतात परत येत होतो. ऍडलेडमध्ये आमचा एक प्रोजेक्ट पूर्ण करुन स्वारी भारतात येण्यासाठी विमानतळावर निघाली. तर टॅक्सीवाली म्हणजे एक ऑस्ट्रेलिअन बसंती भेटली. त्यावेळी मी जेमतेम २४ वर्षांचा होतो. जग काहीच पाहिले नव्हते आणि भारतातील आपल्या संस्कृती, चालीरीती आणि इतर गोष्टींचा पगडा असलेले मन होते. आपल्या उच्च नीचतेच्या कल्पना आणि त्यात पुन्हा स्त्री टॅक्सी चालवते म्हणल्यावर माझ्या मनात चलबिचल झालेली. परंतु मी सहजतेचा आव आणत तिच्याशी वीस मिनिटांच्या अंतरामध्ये संभाषण साधले. ती पूर्वी माध्यमिक शाळेत मध्ये शिक्षिका होती. परंतु तिथे पैसे पुरेसे मिळेनात (जगभर शिक्षकांची परवडच आहे म्हणायची) म्हणुन टॅक्सी चालवु लागली. त्यावर मी तिला सांगीतले की माझी पण आई शिक्षिका आहे. बऱ्याच गप्पा मारल्या गाडी चालवता चालवता तिच्याशी. अखेरिस विमानतळावर पोचलो. उतरता उतरता मी तिला म्हणालो ... "इन इंडिया यु विल नेव्हर सी विमेन ड्रायव्हिंग अ टॅक्सी". त्यावर तिने दिलेले उत्तर माझ्या कायमचे स्मरणात राहिल. ती म्हणाली "यु विल सी इन्डिअन विमेन नॉट डूईंग मेनी थिन्ग्ज!" आहे की नाही खरे? मी विचारात पडलो.

 

असो ... तर त्या केस कापायच्या दुकानात गेलो तेव्हा हे सगळे विचार आले मनात. त्या मुलीने चांगले केस कापले. गाणी गुणगुणत आणि अगदी आनंदात. शेवटी मी तिला म्हणालो "यु डिड अ गुड जॉब" त्यावर ती मला म्हणते "थॅन्क्यु" "यु शुड टेक प्राईड इन व्हॉट यु डु!" मला कौतुक वाटले.

 

अमेरिकेतील तरुण मुले मुली अशी दुकानांमधुन कामे करुन पोट भरतात आणि स्वत:चे शिक्षण करतात. खूप कमी मुलामुलींना पालक कॉलेजमध्ये पाठवु शकतात कारण खर्च साधारणत: ३०-४० हजार डॉलर्स वर्षाला असतो. त्यामुळे मुले मुली १६ वर्षांची झाली की वेगळी होतात आणि आपले आयुष्या आपण घडवतात. भारतीय समाज अपवाद! इथे मात्र मुलांना पालकांचा पूर्ण आधार असतो. अगदी वैद्यकीय शिक्षणदेखील पालकांच्या बचतीतुन करणारी मुले भारतीय समाजात दिसतात.

 

कधी कधी वयाने जास्त मंडळी तरुण पिढीच्या नावाने खडे फोडतात. परंतु मला अमेरिकेतल्या किंवा भारतातल्या देखील तरुण पिढीबद्दल आशाच वाटते. कमीत कमी नैराश्य कधीच नाही वाटले. प्रत्येक पिढीचे प्रश्न वेगळे असतात, परिस्थीती वेगळी असते. त्यामुळे कोणी कोणावर काहीही मतप्रदर्शन करण्याची गरज नाही. अमेरिकेतील तरुण पिढीच्या भवितव्याबद्दल काहीसे प्रश्नचिन्ह आहे. शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत आणि अमेरिकेची ताकत घसरणीला लागलेली ... त्यामुळे तरुण पिढी चिंताग्रस्त आहे. त्याऊलट इथली बेबी-बूमर्स पिढी (अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेली पहिली पिढी) अगदी सुखात आहे. आपल्याकडे उलटे चित्र आहे. आमच्या आईवडिलांच्या पिढीने बऱ्याच खस्ता खाल्या. परंतु आमच्या पिढीला नक्कीच बरे दिवस आले. आणि आता तुमच्या पिढ्यांनादेखील भारताचा भविष्यकाळ अधिकाधिक प्रगतीचाच दिसतो आहे .... असो ... तो खूप मोठा विषय होईल... आज इथे थांबतो.

Monday, April 12, 2010

टायटन मिसाईल म्युझिअम


सईबाई

फिनिक्सच्या दक्षिणेला १००-१२५ मैलावर टुसॉन नावाचे गाववजा शहर आहे. आकाराने मोठे परंतु तसे छोटे असे गावच. तिथे मागच्या वीकएण्डास्नी गेलो होतो. टुसॉनमध्ये फिनिक्सपेक्षा जास्त गोष्टी आहेत पाह्यला ... कॅचनर कॅव्हर्न्स, माऊंट लेमन, सबिनो कॅनिअन, सुहारो नॅशनल पार्क, ओल्ड टुसॉन स्टुडिओज (रिमेम्बर क्लिंट ईस्टवूड मूव्हिज!). आत्तापर्यंत टुसॉनला १० वेळा तरी गेलो असेन. यावेळी मात्र वेगळ्या गोष्टी पाहिल्या.

१. पीमा एअर ऍण्ड स्पेस म्युझिअम.
२. टायटन मिसाईल म्युझिअम.

पीमा म्युझिअम मध्ये पहिल्या महायुद्धापासुन ते १९८० च्या आसपास पर्यंतची निवृत्त विमाने ठेवली आहेत. यामध्ये जगातील सर्वात लहान विमान, केनेडी-जॉहन्सन यांचे ऐअर फ़ोर्स वन, बी-सेरिज बॉम्बर्स, इतकेच नाही तर एस आर ७१ ब्लॅकबर्ड्स हे अतिउंचावरुन टेहेळणी करणारे विमान देखील पाहिले.

एकंदरीत साहेबाने किती आधीपासुन सुरुवात करुन किती गोष्टी केल्या आहेत याची कल्पना येते. पहिल्या दुसऱ्या महायुद्धापासुनच या लोकांनी शेकडो विमाने, जहाजे बनवली आणि वापरली आहेत. किंबहुना, दुसऱ्या महायुद्दाच्या काळातच अमेरिकेतील उद्योगधंद्यांना चालना मिळाली कारण सर्वच युद्धसामग्री ही खाजगी कंपन्या तयार करणार. शासन कंपन्या चालवत नाही .... कुठल्याच. आपल्याकडे दारुगोळा बनवणे, आणि सैन्यसामग्री बनवणे हे सरकारने हातात घेतल्यामुळे
    १. ते अप्रगत राहिले आहे.
    २. ते खर्चाच्या तुलनेने महाग आहे.
    ३. सर्वात महत्वाचे तंत्रज्ञानाचे दुसऱ्या क्षेत्रात उपयोजन होऊ शकले नाही.

अर्थात इस्रो भाभा इत्यादि अपवाद आहेत. परंतु ही वस्तुस्थिती आहे की आपली अन्यत्र प्रगती पासंगालाही पुरणारी नाही. एकंदरीतच शासनाचा ढिसाळपणा आणि उदासीनता देखील कारणीभूत आहे. परंतु मला वाटते खाजगीकरण आणि स्पर्धा या गोष्टींशिवाय प्रगती होत नाही. चाणक्यानेदेखील म्हटले आहे ... शासनाने फक्त मात्स्य न्यायापासुन समाजाचे संरक्षण करावे आणि उद्योगांना चालना द्यावी. शासनाने प्रत्यक्ष उद्योगधंदे करु नयेत.

असो ... परंतु पूर्वीपासुनच अमेरिकेची तंत्रज्ञान आणि उत्पादनाची झेप लक्षात येते. हेही लक्षात येते की ही सर्व प्रगती टप्याटप्याने झाली आहे. विमानाचे इंजिन असो, वा पंख्यांचा आकार, अथवा इलेक्ट्रॉनिक्स अथवा वेग ... इत्यादि.


आज आपण ज्या गोष्टी गृहित धरतो त्या गोष्टी पूर्वी अस्तित्वात नव्हत्या हे चटकन लक्षात येत नाही. साधे उदाहरण द्यायचे तर विमानातील हवामान. विमाने जस जशी वर जातात तसतसा हवेचा दाब कमी होतो आणि तापमानही. आजकालच्या विमानांमध्ये तापमान आणि हवेचा दाब दोन्ही गोष्टी योग्य पातळीवर ठेवल्या असतात. परंतु ४०-५० वर्षांपूर्वी या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे ती दुसऱ्या महायुद्धातील विमाने मोठमोठे बॉम्ब्ज घेऊन जाणारी परंतु पूर्णपणे उघडी. हवा इकडुन तिकडे येते आहे अशी.... ३०-४० हजार फुटांवरुन उडणारी. एकेकाळी पॅरॅशुट्स देखील नव्हत्या. अद्ययावत दिशा दाखवणारी साधने नव्हती. पंख्याची विमाने ते जेट्स, दुहेरी पंख तसेच एकेरी, जमीनीवरची, पाण्यातली, टेहळणी करणारी - बॉम्बर्स - मालवाहतुक करणारी - लढाऊ - प्रवासी. सर्वच प्रकारांमध्ये अगदी जुन्या तंत्रज्ञानापासुन ते नवीन तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास अद्भुत होता.

मला वाटते खाजगी करणाचा तोदेखील एक फायदा आहे. ज्ञानाचे वितरण आणि प्रसरण होते. नविन नविन अधिक उपयोगाच्या गोष्टी अस्तित्वात येतात.

असो ...

या विमान संग्रहायलयापेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे आम्ही एक न्युक्लिअर सायलो पाहिला! न्युक्लिअर सायलो म्हणजे अशी जागा की जिथे अण्वस्त्रे तैनात केली असतात. अश्या जागा अण्वस्त्रांच्या हल्ल्यापासुन देखील सुरक्षीत असाव्या लागतात. दुसऱ्या महायुद्दानंतर रशिया आणि अमेरिकेत जगावर वर्चस्वासाठी अघोषित शीतयुद्ध घडले. यामध्ये अण्वस्त्रांची मोठी स्पर्धा निर्माण झाली. संपूर्ण पृथ्वीचा कोण अधिक विनाश करु शकतो अशी विकृत स्पर्धा लागली. आपल्या पौर्वात्य मनाला संपूर्ण विनाशाची संकल्पना कळत नाही. आशियाई देशांच्या इतिहासात अशी उदाहरणे मला तरी माहित नाहीत. याउलट पाश्चात्यांचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. त्यांचे क्रौर्य अतुलनीय आहे. त्यांची लबाडी अविश्वसनीय आहे. अपवाद जरुर असतील .... परंतु इतिहासात डोकावले तर कोणाचाही असाच ग्रह व्हावा अशी एकामागोमाग एक उदाहरणे आहेत. पाश्चात्यांची आजची प्रगती, स्वातंत्र्य, आणि नियमबद्धता यांच्या मागे हिंसाचाराच्या अतिरेकातुन स्थैर्याला पारखे झाल्यामुळे आलेले शहाणपण कारणीभूत आहे. मी १९९९ साली कोस्टा रिकामध्ये असताना एक डॅनिश अमेरिकन माणुस माझ्याबरोबर काम करत असे. त्याच काळात अमेरिकेत कोलंबिअन हत्याकांड घडले. कोलंबिअन शाळेत कोलरॅडो राज्यात दोन शाळकरी मुलांनी त्यांच्या शाळेत अंदाधुंद गोळीबार करुन १२ मुलांना मारले. ही घटना सुन्न करणारी होती. त्यामुळे मी माझ्या सहकर्मचाऱ्याला विचारले की अमेरिकेत बंदुका अश्या सहजासहजी उपलब्ध का करुन देता? बंदी का घालत नाही? त्यावर तो म्हणाला, " जे घडले ते नक्कीच वाईट आहे. परंतु अमेरिकेत - वाईल्ड वाईल्ड वेस्ट - संस्कृती आहे. कुठलाही माणुस इतर कुणापेक्षा आपल्या बंदुकीवर जास्त विश्वास ठेवतो." !!!! विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथली नियमबद्धता, कायदेशीरपणा सर्व ठीक आहे. परंतु कायदे इतके कडक आहेत कारण लोकांचा परस्परांवर विश्वास नाही. चांगुलपणा ही कविकल्पना आहे. अपवाद असतील .... परंतु तुरळक.

असो... तर सांगण्याचा मुद्दा असा की, हिंसाचाराची ही पातळी आपल्यासारख्या पौर्वात्य लोकांना कळत नाही. परंतु संपूर्ण विनाशाचे सूत्र सर्वच युरोपिअन टोळ्यांनी पहिल्यापासूनच राबवले आहे.

त्यामुळे साहजिकच अण्वस्त्रे हातात पडल्यावर पहिल्यांदा त्यांनी त्यादिशेने पावले उचलली.

अमेरिकेत अशी ३६ ठिकाणे होती. ऍरिझोना मध्ये ८, कॅन्सास आणि अरकान्सामध्ये प्रत्येकी ८. प्रत्येक ठिकाणी एक अण्वस्त्र होते. त्याचे नाव टायटन. ही ठिकाणे अर्थातच गुप्त होती. जमीनीखाली २०० फुट खड्डा खणुन त्यामध्ये संपूर्ण इमारती बांधल्या होत्या. या इमारतींचे मजले स्प्रिंगने टांगल्यासारखे होते जेणेकरुन शत्रुच्या पहिल्या अण्वस्त्र हल्यानंतरही दुसरा हल्ला करुन शत्रुचा पूर्ण विनाश करता येईल. आकशातुन पाहिले तर कळणारही नाही इथे काय आहे. इथे सर्वच गोष्टींमध्ये दुप्पट तिप्पट रिडन्डन्सी अर्थात पर्यायी क्षमता उपलब्ध होती. अश्या सायलोज मध्ये २-४ पेक्षा जास्त लोक काम करत नसत. या लोकांना बाहेर काय चालले आहे हे कळत नसे आणि कळण्याची गरज ही नसे. त्यांचे एकच काम होते. आदेशाची वाट पाहणे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आदेश येईल तेव्हा पुस्तकात लिहिल्यानुसार बटणे दाबणे हे त्याचे काम. आपण सोडलेले अण्वस्त्र कोणत्या शहरावर जाणार आहे हे देखील त्यांना माहीत नसे. अर्थात ही सर्व मंडळी असा प्रसंग येऊ नये अशी प्रार्थना करत असत आणि सुदैवाने एकही अण्वस्त्र वापरल्यावाचुनच शीतयुद्ध संपले.

१०-१५ वर्षांपूर्वी अमेरिकेने टायटन अण्वस्त्रे आणि हे सर्व सायलोज निकामी केली. परंतु हे ऐकल्याचा माझा आनंद क्षणभरच टिकला. त्यांनी हे निकामी केले कारण या गोष्टी खूप महाग आणि कालबाह्य झाल्या होत्या. सध्या अमेरिकेत अशी ५०० च्या वर क्षेपणास्त्रे आहेत. ती जास्त अचूक आहेत. जास्त विनाशकारी आहेत. आणि त्यांच्यावर नियंत्रण देखील दुरुन ठेवले जाते. मिसाईलची कळ दाबणाऱ्या माणसांनादेखील माहीत नसते की मिसाईल कुठे आहे.

ते सर्व ऐकुन पाहुन मी सुन्न झालो. माणसाचे मन जितके विशाल, उदार, सुंदर, उत्तुंग तितकेच ओंगळ, अतर्क्य आणि दरिद्री आहे. आपल्यातल्या चांगल्या प्रवृत्तींना कश्यामुळे चालना मिळेल आणि वाईटाचे कशाचे दमन होईल? सांगता येत नाही. कदाचित पूर्ण दमन शक्य नाही. परंतु सांकेतिक कर्मकांडाने का होईना परंतु भारतिय संस्कृतिने काही प्रमाणात नक्कीच अनिष्ट प्रवृत्तिंवर विजय नक्कीच मिळवला. आपला इतिहास इतका विकृत नक्कीच नाही. मला वाटते ... भारत जसजसा आर्थिक प्रगती करेल तस तसे भारतिय विचार - सहिष्णुता, अहिंसा, सत्याग्रह आणि सर्व सुखी व्हावेत ही भावना - नक्कीच जगाला मार्गदर्शक ठरतील. माझ्या एका शिक्षकांच्या भाषेत ..."फुटक्या भांड्यातुन मिळाले तर कोणी अमृतदेखील पिणार नाहीत" - तसे विचार चांगले असले तरीही भारत प्रगत झाल्याशिवाय जग त्यांना स्वीकारणार नाही.

Sunday, March 28, 2010

जपान

सलोनी

 

आत्ता मी विमानात जपानबद्दल एक लघुपट पाहिला. ऍन्थनी बोर्डेन नावाचा एक बल्लवाचार्य (अर्थात शेफ) आहे. त्याची "नो रेझर्व्हेशन्स" नावाची एक मालिका आहे. आत्ता जो भाग पाहिला तो जपान बद्दल होता. काही खरोखरीच चांगल्या गोष्टी ऐकल्या त्याबद्दल काही .....

 

जपान हे एक अद्भुत रसायन आहे. मिशिगन स्टेट मध्ये एमबीए करत असताना माझी आयजी तकागी शी ओळख झाली. आयजी माझ्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठा माझा जपानी मित्र. मिशिगन स्टेट मध्ये आमची ओळख झाली. ओसाका गॅस कंपनीमध्ये तो कामाला होता. त्या कंपनीने त्याला शिक्षणासाठी मिशिगन ला पाठवले होते. शिक्षणाचा खर्च कंपनी करत होती. अधिक ८०% पगार देखील त्याला देत होती. त्याची बायको तोमोए (ही सामुराई घराण्यातील होती) आणि मुलगी युका. तुझी आई जेव्हा लान्सिंगला आली तेव्हा आपल्याकडे कार नव्हती. त्यामुळे आयजी माझ्याबरोबर तिला घ्यायला बरोबर आला. आयजी ची गाडी (निसान) इतकी छोटी होती की सगळे सामान ठेवल्यानंतर तुझ्या आईला युकाच्या कारसीट मध्ये बसावे लागले. सोनबाला युकाचे नाव कळल्यावर ती म्हणते "येउ का"! आणि खी खी करुन हसु लागली. असो ... परंतु त्या प्रसंगानंतर आयजी शी चांगली ओळख झाली.

 

तोपर्यंत जपानी लोक फक्त टीव्ही मध्येच पाहिलेले! आयजीचे इंग्लीश अगदी जुजबी होते. त्यावर तो अमेरिकेत आला हे म्हणजे खूप धाडस करण्यासारखे होते. त्यामुळे तो बऱ्याचदा माझ्यावर अवलंबुन असायचा. किंबहुना पुढची दोन वर्षे आम्ही बहुतेक प्रोजेक्ट्स एकत्र केले. माझ्या भाषाविषयक वर्चस्वाच्या मोबदल्यात मला आयजी ने अमा.....प मदत केली. कुठलाही प्रोजेक्ट असो ... आमच्या टीमची पहिली भेट व्ह्यायच्या आधी आयजी ६०-७०% काम करत असे. कितीही क्षुल्लक गोष्ट असु देत आयजी त्यावर चारपाच तास काम करत असे .... एकदा रात्री दोन तासांच्या कामासाठी म्हणुन आयजी मी आणि अजुन एक चीनी मित्र एका वर्गात बसलो होतो. विषय होता..."लास व्हेगास च्या एका कसिनो चे दिवे किती वेळा बदलले तर पैश्याची सर्वात जास्त बचत होईल!" कसिनो मध्ये लक्षावधी आणि करोडो दिवे असतात. प्रत्येक दिव्याला एक आयुष्य असते. परंतु एक दिवा विझला की बदलत बसले तर दिव्यांपेक्षा बदलण्याचा खर्च जास्त. त्यामुळे सगळे दिवे एकदम बदलतात. तर याचे गणित मांडताना सरासरी दिव्याचे आयुर्मान काढायचे होते. थोडेफार संख्याशास्त्र वापरायचे होते इत्यादि इत्यादि. आयजी आणि दुसरा चीनी मित्र (शांग्ड्रं - अर्थात सायमन) रात्रीचे २ वाजले तरीही गणित मांडत बसलेले. माझ्या पद्दतीने काढलेले उत्तर ९०-९५% अचूक होते. परंतु त्यांना अजूनही अचुक उत्तर हवे होते. शेवटी मी चिडुन घरी आलो. दुसऱ्या दिवशी आयजी ने मला पत्र लिहुन माझी माफी मागितली की माझा वेळ घेतला!! नेकी और पुछ पुछ असावी तर अशी. वास्तविकत: कष्ट त्याचे जास्त परंतु तरीही माफी त्याने मागितली. असो ..

 

परंतु आयजीचा हा कष्टाळुपणा पाहुन मी गोंधळायचो. कष्टाळु असायला हरकत नाही...किम्बहुना आग्रह असावा; परंतु त्याबदल्यात मिळणारा मोबदला हा पुरेसा असायला हवा अशी माझी धारणा. किंबहुना कुठल्याही व्यावसायिकाची देखील अशीच धारणा असते. सगळे प्रोजेक्ट्स करता करता आयजी थकुन जायचा. झोप मिळत नाही अशी तक्रार करायचा (फक्त माझ्या जवळ ..... कारण आम्ही तितके चांगले मित्र झालो होतो.). हळुहळु मला कळु लागले. जपानी समाजामध्ये केवळ यश मिळवणे पुरेसे नाही. तर यश कष्ट करुन मिळवलेले असायला हवे. यशापेक्षा ध्यास महत्वाचा. किंबहुना अपयश देखील चालेल .... परंतु तुमचा प्रयत्न कसा आहे हे महत्वाचे.

 

कुठलातरी जपानी खेळ आहे धनुष्य बाणावर आधारीत. यामध्ये धनुष्य अगदी ६-८ फूट उंच असते. बाण घ्यायचा प्रत्यंचा ओढायची आणि लक्ष्यभेद करायचा हा क्रम. परंतु इतकाच नाही. तर बाण प्रत्यंचे मधुन गेल्यानंतर देखील धनुर्धारीचा हात कसा खाली येतो हे महत्वाचे. बाण सुटलेला आहे. लक्ष्याचा भेद घेईल किंवा नाही ही घेणार.. परंतु तरिही हे अतिशय महत्वाचे की धनुर्धारीची नजर कुठे आहे. पाय कसे आहेत. प्रत्यंचा कशी सुटली आणि कानामागुन हात कसा मागे जाउन शरिरापाशी आला.

 

अगदी वेगळे तत्वज्ञान आहे हे. शरीर मन आणि आत्म्याच्या एकात्मिक विकासाचे आणि त्यामधुन अत्युत्कृष्टता साधण्याचा प्रयत्न करण्याचे. पाश्चिमात्य आणि विशेषत: अमेरिकेच्या विचारसरणीशी अगदी विरोधी अशी विचारसरणी. "रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट" ला नाकारणारी.

 

ऍन्थनी बोर्डेन च्या आज पाहिलेल्या लघुपटात हेच जाणवले. पूर्ण जपानी संस्कृतीच उत्कृष्टतेचा ध्यास घेणारी आहे. ते स्पष्ट करताना त्याने केंडाल (लाकडी तलवारीची युद्धकला), सुशी करण्याची पाककला, इकेबाना (जपानी पुष्परचना) आणि सामुराई तलवार तयार करण्याचे शास्त्र अशी चार उदाहरणे दाखवली. प्रत्येक ठिकाणी एका मोठ्या व्यक्तीकडुन त्याने या गोष्टींचे मर्म समजावुन घेण्याचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला हे जाणवले ..... की उत्कृष्टतेचा ध्यास अगदी लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिल्याशिवाय केला जाऊ शकत नाही. केंडालमध्ये प्रतिस्पर्ध्याची मानसिकता त्याच्या काठीच्या टोकाची स्पंदने जाणुन घेतली तर कळते. परंतु त्यासाठी दीर्घ आणि सूक्ष्म अभ्यास हवा. इकेबानामध्ये केवळ पुष्परचना महत्वाची नाही तर अवकाश देखील महत्वाचे .... सामुराई तलवार एकच पाते पुन्हा पुन्हा घडी घालुन पुन्हा पुन्हा भट्टीतुन काढावे लागते. आणि तेही अगदी हळुवारपणे.

 

जाता जाता या सर्व दिग्गजांना बोर्डेन एक प्रश्न विचारत होता. "तुमच्या क्षेत्रात अत्युत्कृष्टता कशी असते. त्याची व्याख्या काय". त्या त्या क्षेत्रात २०-३०-४० वर्षे सरस काम करणाऱ्या त्या सर्व माणसांचे उत्तर मात्र एकच होते. "आम्ही तेच समजावुन घेण्याचा प्रयत्न करत आहोत."

 

आयजी मला त्यावेळी बावळट वाटायचा. त्याला विमानतळावर सोडायला गेलो शेवटचे तेव्हा जाता जाता मला म्हणाला ... "तू खूप कार्यक्षम आहेस. (कमी वेळात जास्त काम करणारा आहेस.) मी तुझ्याकडुन हे शिकायला हवे.".

 

मागे वळुन बघता, मला वाटते खरेतर मीच त्याच्याकडुन काहीतरी शिकलो. आयजी जपानला जाताना थोडासा खट्टु होता. अमेरिकन संस्कृतीमधील मोकळेपणा/स्वातंत्र्य त्याला मोहवुन गेले होते. पुन्हा एकदा अपेक्षांचे ओझे वागवाव्या लागणाऱ्या समाजात त्याला जायचे नव्हते. परंतु पर्याय नव्हता.

 

नंतर अधुन मधुन त्याचे फोन्स एमेल्स येत राहिले. अजूनही अधुन मधुन संपर्क होतो. सिद्धुचा जन्म झाला त्यावेळी आयजी ने सिद्धुला खास जपानी देवळातुन नवजात बालकांना द्यायच्या पहिल्या "चॉपस्टिक्स" दिल्या होत्या. जपानला गेल्यावर आयजी आणि तोमोएला एक मुलगा झाला. त्याचे नाव "शोई" ठेवले आहे.

 

मला म्हणशील तर मिशिगन स्टेट मध्ये शिक्षणाव्यतिरिक्त सर्वात अधिक मौल्यवान काय मिळवले असेल तर हे असे अनुभव आणि असे मित्र!

 

 

 

 

मामाची फिनिक्सवारी

सलोनीराणी

 

बऱ्याच दिवसांनंतर लिहायला घेतले आहे. दिसामाजी सोडा .. महिन्यामाजी सुद्धा काहीतरी लिहित जावे असे म्हणायला सुद्धा जागा ठेवली नाही असे लोकांनी म्हणु नये म्हणुन आज लिहायला घेतले. तसे पण काहीतरी लिहिण्यात मला स्वारस्य नसते म्हणुन लिहिण्यात कुचराई झाली असे म्हणायला मात्र नक्कीच जागा आहे.असो .... दुसरे काही सांगण्याआधी मागच्या काही दिवसांचा आढावा...

 

८ मार्च ला तुला पाह्यला म्हणुन मामा, मामी, आजोबा आजी आणि अथर्व खास इकडे आले. आजी आजोबा येणारच होते. वाटेत मामाकडे लंडनला १० दिवस गेले आणि मग इकडे येणार होते. मामा "गड्या आपुला गाव बरा" म्हणत भारतात चालला होता. तेव्हा तिकडे जायच्या आधी एकदा फिनिक्सासनी येऊन जावे आणि तुला पहावे असे त्याला खूप वाटु लागले. त्याच्या आयबीएम (इंडिया) च्या लोकांनी हा कायमचा परत चालला म्हणुन त्याला बराच त्रास दिला परंतु स्वारी त्यांना पुरुन उरली आणि शेवटी या सगळ्या बारदानाचं फिनिक्सभूमीवर अवतरण झालं. ओडिसीमध्ये खरे तर ८ जण जास्तीतजास्त बसु शकतात .... परंतु सिद्धोबाला अगदी भारतीय पद्धतीने डबल शीट बसवुन आम्ही नुसते घरीच नाही तर सेडोना, ग्रॅण्ड कॅनियन इत्यादी ठिकाणी देखील फिरलो. बाकी ठिकाणी नियमांचा आग्रह घरणाऱ्या तुझ्या आईला इथे मात्र पोलिसाने पकडले तर दंड भरायची तयारी होती! असा हा माहेरचा महिमा ... काय सांगु तुला. असो ...

 

अखेरिस मामा मामी अथर्व १७ तारखेला भारतात परत गेले. नऊ दिवसात देखील प्रचंड धमाल आली. एका घरात नऊ माणसे म्हणजे घर अगदी भरुन गेले होते. परंतु खरोखरीच मजा आली. एक दोनदा आमच्या शेजाऱ्याने एका गाडीत इतके लोक कसे म्हणुन भुवया उडवलेल्या दिसल्या. परंतु मी देखील भुवया उडवुन त्याला हाय म्हटले आणि गाडी गॅरेज मध्ये घातली. या अमेरिकन लोकांना फार प्रायव्हसी चे वेड. माझ्या बॉसला जेव्हा कळते की भारतातुन लोक १-२ महिन्यांसाठी येणार आहेत तेव्हा तो खुदुखुदु हसु लागतो ... आणि म्हणतो ... "आय डोण्ट थिंक दॅट इज सच अ गुड आयडिया". इथे व्यक्तीवादाचा इतका अतिरेक झाला आहे की अमेरिकेत लोकांना एकमेकांच्या सहवासातील आनंद कळेनासा झाला आहे की काय असे वाटते. आणि या बाबतीत अमेरिकन लोक अगदी खास आहेत. इतर पाश्चात्य लोक असे नाही आहेत. अगदी युरोप, लॅटिन अमेरिकेत सुद्धा लोक बऱ्यापैकी समाजप्रिय आहेत. अमेरिकेतील व्यक्तीवाद आणि प्रायव्हसीच्या कल्पना मला तरी अनैसर्गीक वाटतात. मला वाटते जसजसा बाह्य जगाशी अमेरिकेचा जास्त संबंध येईल तसतसे हे लोक सुधारतील. असो ..

 

सेडोना ग्रॅण्ड कॅनियन व्यतिरिक्त अपाचे ट्रेल, टुसॉन ला देखील गेलो. अजून जास्त दिवस असले असते तर मामा साहेबांना कॅलिफोर्निया दाखवण्याची इच्छा होती. असो .. परंतु नुसते घरात राहण्यातही मजा असते. आता फक्त आजी आजोबा आणि आपण चौघे उरलो आहोत. ते अजून सव्वा महिना असतील. बहुधा ब्राईस आणि झायॉन कॅनिअन ला जाऊ पुढच्या आठवड्यात....

 

    

Monday, February 15, 2010

बिहारकन्येचे बंड!

सलोनीराणी

काल वाचलेली एक अशीच बातमी ... त्याबद्दल थोडे काही.

गोष्ट आहे बिहारच्या एका मुलीची. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या मुलीचे लग्न ठरले ओळखीतील एका मुलाशी. ३-४ वर्षांची ओळख आणि पुढे लग्न म्हणजे सर्व तसे सुरळीत पार पाडायला हवे होते. परंतु घडले वेगळेच. लग्नाच्या धुंदीत नवरोबांनी मद्यप्राशन करुन मित्रांबरोबर असा काही नाच केला की या नववधुचे धाबे दणाणले. मला कल्पनाही करवत नाही नक्की कसा काय डॅन्स केला की त्या मुलीने त्या नवरदेवाबरोबर जायला नकार दिला. वारंवार विनवण्या करुनही ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. खरे खोटे कुणाला ठाऊक. परंतु बिहार मध्ये असे घडु शकते यावर माझा विश्वासच बसत नाही आहे.

इतिहासात पाहिले तर बिहार भारताची सुवर्णभूमी होता. सर्व मोठमोठी साम्राज्ये - नंद, गुप्त, अशोक, मौर्य - बिहारमध्येच उदयास आली. अर्थात त्याचे मुख्य कारण म्हणजे सुपीक जमीन आणि लोखंड धातुची उपलब्धता. परंतु आज पाहिले तर बिहारपेक्षा मागास राज्य शोधावे लागेल. जमिनदारी अस्तित्वात असलेले एकमेव राज्य असा लौकीक असलेले राज्य. अर्थातच बिहार मध्ये स्त्रीयांची अवस्था काही फार चांगली नाही. मी १० वीत असताना कुठेतरी वाचले होते की भारतात १/३ स्त्रीया त्यांच्या आयुष्यात एकदातरी घरातील किंवा ओळखीच्या लोकांच्या अतिप्रसंगाला बळी पडतात. आपण अलिकडे वर्तमानपत्रे वाचतो आणि म्हणतो काय घडते आहे. मला वाटते विशेष वेगळे काही घडत नाही आहे आज .. फक्त वर्तमानपत्रे बातम्या मोकळेपणाने देत आहेत. अन्यथा आपण कुठल्यातरी "आम्ही त्यातले नाहीच" या खोट्या भ्रमात वावरत होतो. असो .. परंतु त्या पार्श्वभूमीवर मला बिहारच्या या मुलीचा हा नकार खूप धाडसाचा आणि स्तुत्य वाटला.

एकंदरीतच लोकसंख्येने ५०% असलेल्या समाजघटकाला म्हणजे स्त्रीयांना स्वत:च्या अस्तित्वाची पुरेशी जाणीव नाही. अगदी अजूनही. आणि भारतातच नाही तर अमेरिकेतही. अमेरिकेत ५०-६० च्या दशकांमध्ये स्त्रीया नोकऱ्या करू लागल्या आणि बंधने झुगारुन स्वत:च्या अस्तित्वासाठी लढु लागल्या. गंमत म्हणजे धर्म, वय आणि वंश यावर आधारित भेदभाव करता येऊ नये म्हणुन ६० च्या दशकात अमेरिकेत जे विधेयक आणले त्यामध्ये लिंगाचा समावेश नव्हता. थोडक्यात काय तर तुम्ही स्त्री आहात म्हणुन कोणी तुम्हाला नोकरी नाकारली तर त्याविरुद्ध कोर्टात दाद मागता येत नव्हती. तसेच वय, धर्म आणि वंशाबद्दल सुद्धा तीच परिस्थिती होती. परंतु त्या विधेयका मध्ये स्त्रीयांचा समावेश कसा झाला हे खूप मजेशीर आहे. अमेरिकेतील दक्षीणेतील राज्यातील काही असहिष्णु आणि परंपरावादी मंडळींचा या विधेयकाला विरोध होता. त्यांना हे विधेयक हाणुन पाडायचे होते. त्यांना असे वाटले की लिंगाचा देखील समावेश केला तर उत्तर भागातील काही मंडळी त्यांच्या बाजुला वळतील आणि स्त्रींयांचा समावेश कशाला म्हणुन विरोधात मतदान करतील.

प्रत्यक्षात झाले उलटेच. उलट दक्षीणेतील काही मंडळी स्त्रीयांच्या समावेशामुळे त्या विधेयकाशी संमती दर्शवायला तयार झाली आणि ते विधेयक पुढे कायद्यात रुपांतरीत झाले. आणि त्यानंतर आज स्त्रीया बऱ्यापैकी स्वतंत्र आहेत. अत्याचारांपासुन मुक्त आहेत आणि अत्याचार झाले तर तोंड न लपवता परत स्वत:चे आयुष्य हिमतीने घडवतात.

भारतातील परिस्थिती पाहिली तर आपल्या संस्कृतित आपण स्त्रीयांना समान स्थान देतो. किंबहुना कांकणभर जास्तच मान देतो. परंतु व्यवहारात पाहिले तर स्त्रिया अजूनही तितक्या स्वतंत्र वाटत नाहीत. माझ्या मते आर्थिक स्वातंत्र्याशिवाय इतर काही स्वातंत्रविषयक चर्चेला काही अर्थ नाही. आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शिक्षण होय. आज बिहार मधली मुलगी जे काही करु शकली ते केवळ ती तिच्या शिक्षणामुळे. आज ती कदाचीत नोकरी करत असले किंवा डॉक्टर असल्यामुळे ती आर्थिक दृष्या परावलंबी नक्कीच नसणार आहे. अन्यथा हे धाडस करणे कठिण होते.

अर्थात असाही वाद घालता येईल की आर्थिक स्वातंत्र म्हणजेच स्वातंत्र्य का? तर नक्कीच नाही. परंतु आर्थिक स्वातंत्र्याशिवाय जे काही तुझ्याजवळ असेल ते स्वातंत्र नक्कीच नसेल यात संशय नाही. पुन्हा मग ... स्वातंत्र्य म्हणजेच सर्व काही का? मी म्हणेन ... तु स्वत:च विचार कर. मला वाटते त्याचे उत्तर ठामपणे हो असेल. परंतु तु स्वत: शोधले तर जास्त बरे!

ता. क. - काही गोष्टींचा खुलासा करावासा वाटतो. आर्थिक स्वातंत्र्य केवळ नोकरीतुनच येते असे नाही तर सामाजिक/न्यायिक आधारातुनही येते. इथे ऍरिझोनामध्ये नवरा बायको यांची संपत्ती समान असते. जरीही नवरा एकटाच कमवत असेल तरीही बायकोचाही संपत्तीवर समान हक्क समजला जातो. जर्मनीमध्ये माझ्या एका सहकर्मचाऱ्याशी परवा बोलत होतो तेव्हा त्याने सांगीतले की त्यांना जुळी मुले होणार आहेत एप्रिलमध्ये. आणि आता त्याच्या बायकोला ३ वर्षे पर्यंत बिनपगारी सुटी मिळेल. अर्थात ३ वर्षांनंतर ती पुन्हा त्याच कंपनीमध्ये रुजु होऊ शकते. मुलांच्या संगोपनामुळे तिला तिच्या करिअरचा पूर्ण त्याग करायची गरज नाही.


दुसरी एक गंमतीशीर पण करुण गोष्ट आठवली. काही दिवसांपूर्वी मी मेडलिन अल्ब्राईट बद्दल लिहिले होते. तिचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा तिचे वय अंदाजे ४५ असावे. घटस्फोटानंतरचे एकाकी आयुष्य तिच्यासारख्या बुद्धिमान आणि कर्तबगार स्त्रीलासुद्धा सोपे नव्हते. अगदी साध्या साध्या गोष्टी .. दुकानात वस्तु आणायला गेली तर काय घ्यावे सुचायचेच नाही कारण पूर्वी वस्तु आणायची ती नवऱ्याला काय आवडेल ते. त्यामुळे स्वत:ची आवड माहितच नाही. इतके प्रेम करता येणे हे भाग्यवानच करु जाणे. पुढे जाऊन मेडलिन अगदी अमेरिकेची सेक्रेटरी ऑफ स्टेट झाली. तात्पर्य काय तर प्रेम भक्ती एकरुपता असु शकते आणि तरिही माणुस स्वतंत्र असू शकतो ... स्वत:चा आणि स्वत्वाचा विकास करू शकतो.


कार्ल राबेडेरची कहाणी

सलोनीराणी

 

मिनयानव्हिल ही माझी अतिशय आवडती अशी एक आर्थिक विषयावर अतिशय प्रबोधक माहिती देणारी वेबसाईट आहे. आज तिथे एक वेगळीच बातमी वाचली. त्याबद्दल थोडे...

 

गोष्ट अगदी म्हणजे अगदी नवीन आहे. कार्ल राबेडेर हा एक ४७ वर्षांचा बर्यापैकी सधन माणुस. ऑस्ट्रीया या देशाचा रहिवाशी. मागच्या काही महिन्यात तो हवाई ला गेला आणि हवाईने त्याच्यावर काय जादू केली कोण जाणे ..परंतु त्याने आणि त्याच्या बायकोने ठरवले की आपली सर्व संपत्ती दान करायची. सर्व म्हणजे स र व ... एकही पैसा शिल्लक ठेवायचा नाही. हा काही खूप अतिश्रीमंत नाही ... परंतु ३.७ मिलिअन पौंड चा धनी आहे. म्हणजे अंदाजे २७ कोटी रुपये. ३५०० चौरस फुटाचा अल्प्स पर्वतराजीमधील बंगला - त्यात जकुझी सोना अगदी टुमदार तळे देखील, काही हेक्टर्सची जमीन आणि सहा ग्लायडर्स तसेच इतर मौल्यवान वस्तु अशी पाश्चात्य देशांच्या मानाने उच्चमध्यमवर्गीय किंवा थोडेफार श्रीमंत वर्गातील हा माणुस. इतक्या पैश्यामध्ये निवृत्त होऊ शकतो.

 

परंतु हवाईने याच्या डोक्यामध्ये भलतेच वारे भरले.

 

झाले असे की तिथे त्याने पैसा अगदी मुबलक खर्च केला. परंतु त्याच्याच शब्दात सांगायचे तर त्याला असे वाटले की संपूर्ण सुटीमध्ये त्याला एकही खराखुरा माणुस अवतीभवती आढळला नाही. होटलमध्ये किंवा जिथेकुठे पैसे खर्चून राहिले तिथे सेवा पूरवणाऱ्यांच्या चेहेऱ्यावर कृत्रीम सौजन्य आणि सेवा घेणाऱ्यांच्या वागणुकीत मी मारे कोण अशी कृत्रीमता आढळली. अर्थात त्यात फार काही चूक आहे असे मी स्वत: म्हणणार नाही. कारण जगरहाटीच तशी आहे.

 

परंतु मुख्य मुद्दा असा की कार्लला त्यानिमित्ताने हे प्रकर्षाने जाणवले की तो त्याच्या जीवनचक्राचा गुलाम झाला होता. आणि जगणेच विसरला होता. पैश्याच्या मागे धावता धावता खऱ्या आत्मिक आनंदाला पारखा झाला होता. हे ओळखणे महत्वाचे ! कधी कुठे असे आपण चक्रात अडकले जातो कळत नाही. परंतु मला खरोखरीच असे वाटते की तु याचा जरुर विचार करावा आणि त्यानुसार आयुष्यातील निर्णय घ्यावेत.

 

कार्ल ने त्याची सर्व संपत्ती विकत आणली आहे. ग्लायडर्स विकली गेली आहेत. घर विकतो आहे ... ८७ पौंडाची २२००० तिकिटे विकुन त्यातुन एक लॉटरी पद्धतीचे तिकिट काढणार आहे आणि त्या माणसाला घर मिळेल. आणि मग आलेल्या त्या पैश्यातुन आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील गरिबांसाठी लहान स्वरुपातील कर्जे पुरवणारी धर्मादाय संस्था कार्ल चालवणार आहे.

 

पाश्च्यात्य जगातील कार्ल हे पहिले किंवा शेवटचे उदाहरण नव्हे. बिल गेट्स (२८ अब्ज), जॉर्ज सोरोस (७-८ अब्ज), वॉरेन बफेट (५-७ अब्ज) इतकेच नाही तर रॉकंफेलर, कार्नेगी अशी खूप मोठी परंपरा आहे दानशूर लोकांची.

 

आपण अमेरिकेचा भोगवादी म्हणुन हिणवुन उल्लेख करतो. तो काही प्रमाणात खरा आहे. परंतु हे भोगवादी लोक कमालीचे कर्मयोगी देखील आहेत. इतक्या सर्व सुखसोयी आहेत परंतु यांना भोग घ्यायला वेळच नाही आहे. सर्व सुखामागे धावता धावता सुख दूर पळुन जाते. नातेवाईक दुरावतात. खरी नाती खरे प्रेम पारखे होते. त्यामुळे ही मंडळी सर्व समाजाला देणगी देऊन टाकतात. उगाच कुठल्या करंट्या नातेवाईकांना अथवा मुलाबाळांना कशाला द्यायची असा विचार करुन. अर्थात सर्वच असे नसतात. केवळ समाजाचे भले व्हावे म्हणुन मदत करणारेही अनेक असतात. मला वाटते आपण त्यातली चांगली बाजु पहावी - की अशी दानशूरता इथे आहे. अशी कर्मशक्ती इथे आहे. आणि अशी विवेकी विचारशक्तीही इथे आहे. प्रमाण कमी जास्त असेल. लोक वाद घालतील. परंतु आपण चांगल्याला आयुष्यात पहावे आणि त्याचा ध्यास धरावा.

 

Sunday, January 17, 2010

हैती .. आणि इतर काही ...

 

सलोनी

 

हा काही फार चांगला आठवडा नव्हता. १२ जानेवारी विवेकानंद जयंती म्हणून मला नेहेमीच लक्षात असतो. परंतु यावर्षी हैतीमधील भूकंपामुळे पण लक्षात राहणार. कामावरुन घरी आलो तर हैतीमधील भूकंपाची बातमी ऐकली - एनबीसी न्यूजवर. तश्या जगात शंभर गोष्टी घडत असतात म्हणून ऐकल्या न ऐकल्यासारखे झाले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे गांभीर्य जाणवले. एक तर भूकंप ७ रिश्टर म्हणजे अगदीच तीव्र (किल्लारी ला झालेला ६.७ होता बहुधा).

 

पोर्ट ऑफ प्रिन्स या राजधानीच्या जवळपासच भूकंपाचा केंद्रबिंदु असल्यामुळे खूपच जीवितहानी झाली आहे. ३० लाख लोकसंख्या आहे हैतीची. पैकी ५०००० तरी मृत झाले असावेत. अमेरिकेच्या इतक्या जवळ असल्यामुळे साहजिकच अमेरिकेत तुफान सहानभूती आहे. परंतु निसर्गाचे बळच इतके मोठे की अमेरिकेच्या साह्यानंतरही खूप माणसांचे जीव वाचवणे शक्य नाही आहे.

 

माझा एक पूर्व(मराठित एक्स!)-सहकर्मचारी जाक्स जान (फ्रेंच नाव आहे) हा मूळचा हैतीचा आहे. त्याला इमेल टाकली. पण बहुधा तो तिकडेच गेला असावा. अजूनतरी उत्तर नाही.

 

आजच्या गोल्डन ग्लोबमध्ये हैती ला सह-अनुकंपा म्हणुन बऱ्याच तारे-तारकांनी रिबन्स लावल्या होत्या. बरे वाटले ते पाहुन.

 

गोल्डन ग्लोब्जचा विषय निघाला तर ... जेम्स कॅमेरॉनला अखेरिस गोल्डन ग्लोब मिळाले तर! सर्वोत्तम चित्रपट आणि दिग्दर्शन दोन्हीचे. त्याबद्दल भाषण करताना त्याने म्हटले ... "जगातील सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे समजावुन घेण्यासाठी १५० किंवा १५० मिलिअन वर्षे पुढे जाण्याची गरज नाही.(in reference to the original movie that takes place 150 or so years from now). आपण ते आपल्याभोवती पाहु शकतो आणि अनुभवु शकतो." विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

 

बाकी आज व्हायकिंग्जनी काऊबॉयज वर दणदणीत विजय मिळवला. ३४-३ !! पुढच्या रविवारी सेंट्स आणि व्हायकिंग्जच्या मॅचची प्रचंड उत्सुकता आहे. ब्रेट फार्व्ह मला सचिनसारखा वाटतो. अस्सल खेळाडु कलावंत आणि एकंदरीतच प्रतिभावंत ... सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ... ते त्यांची जी काही गोष्ट आहे ती इतकी सहज करतात की बस्स. एकाग्रता जरुर आहे. परंतु तणाव नाही. असो ...

 

Thursday, January 7, 2010

अवतार अर्थात ऍव्हंटार

सलोनीराणी

दोन आठवड्यांपूर्वी एक चित्रपट पाहिला. अवतार अर्थात ऍव्हंटार ... या अमेरिकन लोकांना सरळ शब्दोच्चार जमतच नाहीत. ऍ कुठेतरी आलाच पाहिजे. शरद तळवलकर असे साधे नाव वाचायले सांगीतले तर फेफरेच येईल यांना!!

असो .. अवतार हा मराठी/संस्कृत शब्द आहे. जेव्हा जेव्हा जगावर संकट येते तेव्हा परमेश्वर कुठलेतरी रूप धारण करुन पृथ्वीवर जन्म घेतो आणि मनुष्यजातीला संकटातुन वाचवतो अशी कल्पना. या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा हाच आहे. जेक सली हा पाय गमावलेला सैनिक नवे पाय लाऊन घेण्यासाठी लागणारे पैसे कमावण्यासाठी एका शास्त्रीय प्रयोगामध्ये भाग घेतो. त्याला एका नवीन ग्रहावर (पॅण्डोरा) जाऊन तिथल्या एका उद्योगासाठी एक कामगिरी पार पाडायची असते. कामगिरी अशी की स्थानिक लोकांकडे अनऑब्टेनिअम नावाचे एक मूल्यवान द्रव्य किंवा धातु असतो तो स्थानिक लोकांमध्ये मिसळुन जाऊन त्यांच्याकडुन हिरावुन घ्यायचा. स्थानिक लोक अतिशय उंच काटक आणि निळ्या रंगाचे असतात. तेव्हा त्यांच्यासारखी दिसणारे शरीरे शास्त्रज्ञ तयार करतात. विशिष्ट तंत्रज्ञान वापरुन जेक सुली त्या दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो - तस्मात्‌ चित्रपटाचे नाव अवतार! परंतु अवतार घेऊन जर त्या स्थानिक लोकांना लुटणार असेल तर मग तो अवतार कसला? त्यामुळे जेक सली हा अखेरिस स्थानिक लोकांच्या बाजुने लढतो आणि त्यांना लुबाडण्याचे प्रयत्न हाणुन पाडतो.

चित्रपट सुंदरच आहे. त्रि-मिती दृष्ये आणि संगणाकाची कमाल आहे. तसेच टर्मिनेटर, एलिअन्स, अबिस आणि टायटॅनिक सारखे अतिप्रसिद्धच नव्हे तर नवीन दिशा देणारे चित्रपट काढणाऱ्या जेम्स कॅमेरॉन चा हा चित्रपट... त्यामुळे चांगलाच असणार. परंतु तेवढेच असते तर या लेखाचे प्रयोजन नव्हते. ९-१-१ च्या घटनेनंतर अमेरिकन चित्रपट हे केवळ करमणुकप्रधान राहिले नाही आहेत. त्यांमध्ये बऱ्याचदा सूप्त अथवा उघड संदेश दडलेले असतात. ते समजुन घेण्यासाठी हा प्रपंच.

९-१-१ नंतर जनमत खवळलेले होते. शस्त्रे तयार करणाऱ्या कंपन्यांना युद्धाची चांगली संधी होती. इस्रायल समर्थकांना चांगली संधी होती की अरब राष्ट्रांचा काटा काढावा (नाहीतर टोक तरी मोडावे!). ऑईल कंपन्यांना संधी होती की अस्थिरतेचा फायदा घेऊन तेलाच्या किमती भरमसाठ वाढवुन नफा कमवावा. रिपब्लिकन पक्षाला चांगली संधी होती की युद्धे करुन आपले बस्तान चांगले बसवावे. आणि सर्व अमेरिकन उद्योगांना चांगली संधी होती की युद्धासाठी आणि नंतर सामग्री पुरवुन पैसे कमवावेत. जे उद्योग हे काहीच करत नव्हते ते रिपब्लिकन पक्षामार्फत "अमेरिका खतरेमे" जा एकीकडे जयघोष करत उद्योगांना पोषक (आणि सामान्यांना जाचक) असे नियम शिथील करत होते. या सर्वाचा परिपाक म्हणुन अखेरिस अफगाणिस्तान आणि नंतर इराक वर अमेरिकेने हल्ले केले आणि ती युद्धे अजूनही चालू आहेत. त्यामागचे सूप्त उद्देश वर नमूद केल्याप्रमाणे अजूनही कायम आहेत.

बऱ्याचदा असे म्हटले जाते की अमेरिकेने तेलासाठी इराक युद्ध केले. आणि ते खरे असले तरीही अर्धसत्यच आहे. खरी गोष्ट ही आहे वर म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टींचा तो एक परिपाक होता. जग हे खूप गुंतागुंतीचे आहे. तिथे एक खलनायक आणि एक नायक आणि एक नायिका नाही आहे. अनेक पात्रे आणि त्यांचे अनेक उद्देश असतात. त्यामुळे जगात जे काही भलेबुरे घडते ते या सगळ्याचा परिपाक असतो. या सर्व पात्रांपैकी इस्रायल समर्थक जे आहेत ते अर्थातच बव्हंशी ज्यु लोक असतात. ज्यु लोक अतिशय बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि धनवान आहेत. भारतात ज्ञान, साहित्य, कला, उद्योग, राजकारण या विषयांवर काही विशिष्ट समाजांची/जातींची जास्त पकड दिसते. परंतु एकच समाज चौफेर कामगिरी करताना सहसा दिसत नाही. अपवाद वेगळे. परंतु ज्यु समाज मात्र चौफेर प्रतिभावंत आणि यशवंत आहे. शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योगपति, राजकारणी, विद्वान, तत्वज्ञ ... काय नाही आहेत ज्यु समाजात प्रश्न पडतो. हॉलीवुड मध्ये सुद्धा बरेच ज्यु कलावंत आणि त्याहुनही अधिक निर्माते आहेत.

९-१-१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जे लोक मृत्यू पावले त्यात बव्हंशी ज्युच होते कारण वॉल स्ट्रीट वर देखील यशस्वी लोकांमध्ये ज्यु अग्रगण्य आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणुन इराक युद्धाचे ढोल जेव्हा वाजवले जाऊ लागले तेव्हा पारंपारिक डेमॉक्रॅट असणाऱ्या ज्यु समाजाने युद्धाबाबत रिपब्लिकनांना पाठिंबा दिला. या सर्वाचे प्रतिबिंब इथल्या प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रचारामध्ये तर उमटलेच पण अगदी चित्रपटसृष्टीदेखील त्यातुन सुटली नाही. पुढे वॉर ऑफ द वर्ल्ड सारखे अनेक चित्रपट निघाले जे परकियांविषयी द्वेष अथवा मत्सर निर्माण करतील. चित्रपट पाहणाऱ्याला वाटते की आपण एक काल्पनिक कथा पाहतो आहे. परंतु खरे तर कुठेतरी आपले ब्रेन-वॉशिंग (बुद्धिभेद) होत असते. अर्थात एका माणसाला जो बुद्धिभेद वाटेल दुसऱ्याला ती जागृति वाटू शकते. त्याला इलाज नाही. दुसऱ्या महायुद्धात गोबेल्सने अशी बरीच जागृति केली होती. परंतु महायुद्ध संपल्यानंतर लोकांना कळले की आपण फसवले गेलो आहोत. असो ... परंतु या भांडणात न अडकता फक्त हे स्वीकारावे की केवळ करमणुकीच्या पलिकडे जाऊन देखील काही उद्देश (राजकीय / सामाजिक / आर्थिक) काही माणसे चित्रपट बनवतात.

जेम्स कॅमेरॉन हा त्यातलाच एक.

परंतु एक नाही तर एकमेकाद्वितीयच. कारण असे की कॅमेरॉनने एकंदरीतच जगात सध्या जे अमेरिकेचे साम्राज्य पसरले आहे त्यावर अगदी उघड भाष्य केले आहे. मूल्यवान धातु आणि तो लुबाडण्यासाठी तयार असलेल्या कंपन्या आणि त्यासाठी युद्ध पुकारण्याची त्यांची तयारी.... जगभरात आणि अगदी अमेरिकेतही बऱ्याच लोकांना हे कळते आणि ते त्याला विरोध करतात देखील. परंतु मागच्या ८-१० वर्षात हा विरोध क्षीण वाटला आहे. इराक युद्धाच्या वेळी इतके उघड उघड खोटे आरोप करुन देखील कोणीही प्रमुख कलावंत, शास्त्रज्ञ अथवा पत्रकार यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला नाही. असतील तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. म्हणुन जेम्स कॅमेरॉनचे महत्व.

अवतार चित्रपटामध्ये दाखवलेली अनॉब्टेनिअम धातुची हाव ही केवळ एक प्रतिक आहे. वस्तुस्थिती ही आहे की अमेरिकेतील राहणीमान हे जगाच्या मानाने खूप कमालीचे वर आहे. ५% लोकसंख्या असलेला देश जगातील २५% उत्पादन वापरतो आहे. या सर्वासाठी जो कच्चा माल लागतो त्यावर नियंत्रण ठेवल्याशिवाय तो कच्चा माल योग्य किंमतीला मिळणार नाही. तेलावर असलेले नियंत्रण अगदी दिसते. परंतु अगदी दक्षिण अमेरिकेतील पाण्याची सरोवरे आणि जंगलांबरोबर आफ्रिकेतील आणि ऑस्ट्रेलिआतील खाणींपर्यंत हे नियंत्रण सर्वदूर पसरले असते. उगाच ५०-१०० विमानवाहु नौका आणि हजारो क्षेपणास्त्रे आणि विमाने तैनात केलेली नसतात. आर्थिक देवाणघेवाणीमागे राजकीय आणि शस्त्रांचे बळ आहे. उगाच का हवाई गुआम आणि भारताच्या दक्षिणेला दिएगोगार्सिआ, तसेच जपान, दक्षिण कोरिआ आणि आखात आणि युरोपमध्ये सैन्य तैनात केले? सुरक्षेचे कारण तितके खरे नाही आहे. अमेरिकेच्या सामर्थ्याला टक्कर द्यावी इतकी ताकत कोणातही नाही. आणि जरी असली तरीही जे थोडेफार बळकट आहेत त्यांना युद्ध हा पर्याय नाही हे कळते. त्यामुळे अर्थातच ही ताकत अमेरिकेच्या उद्योगजगताला भल्याबुऱ्या मार्गाने जगभरातुन कच्च्या मालावर पकड घेता यावी यासाठीच आहे.


आपण इतिहास विसरुन चालणार नाही. शेवटी ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी होती हे विसरुन चालणार नाही. आणि ती कंपनी इंग्लंडच्या राजाची हस्तक होती. आणि त्यांनी भारताच्या संपत्तेची प्रचंड लूट केली. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे दुष्काळ इंग्रजांच्या काळातच घडले. दुसऱ्या देशांना लुबाडुन स्वत: श्रीमंतीत राहणारे हे आधुनिक वाल्या कोळीच. आत्तासुद्धा तेच घडते आहे. फक्त फरक इतकाच आहे की आता जग एकमेकात इतके गुंतले आहे की राजसत्तेचा उद्योगविश्वावर तितका ताबा राहिला नाही आहे. पाश्चिमात्य देशांतील काही सुजाण नागरिकांना आणि संस्थांना हे कळत असते परंतु बव्हंशी नागरीक आपल्या रोजच्या जीवनात इतके दंग असतात की त्यांना या गोष्टींचा गंधही नसतो. जागतिकीकरणामध्ये नकळत कुठेतरी चांगल्या गोष्टी घडुन जातात कारण माणुस जातच मुळी समाजप्रिय आहे. जागतिकीकरणामुळे समाजाची व्याख्या आपले गाव, राज्य आणि देशाच्याही पलिकडे जात चालली आहे. आता हेच पाहा की एकप्रकारे अमेरिकी परराष्ट्र धोरण आणि उद्योगांवर इतकी उघड टीका करणार चित्रपट गेले दोन आठवडे इथे चित्रपटगृहामध्ये कमालीचा लोकप्रिय झाला आहे. १ अब्ज डॉलर्सच्या वर पैसे कमवले आहेत. एकंदरीत काय तर हे प्रश्न आपल्याला कळले पाहिजे परंतु त्यामध्ये कुठेही द्वेष करुन चालणार नाही कारण कोणाचा द्वेष करणार? दुर्बळांचा फायदा घेणारे लोक तुम्हाला कुंपणाच्या दोन्ही बाजुला सापडतील. तसेच मदत करणारे आणि बघेही दोन्ही बाजुला सापडतील. प्रश्न इतकाच आहे की आपली भूमिका काय आहे?

असो .. विषय गंभीर आणि खोल जरूर आहे. परंतु कधी तरी वाच मोठी झाल्यावर आणि तुला कळेल. कदाचित तुला पुढचे काहीतरी कळेल आणि म्हणशील बाबा काय बावळट होता. मला चालेल ! पण वाच हे नक्की.

Monday, January 4, 2010

हवाहवाई - भाग ३ स्नॉर्केलिंगची जीवघेणी मजा


ते हिरवे पाणकासव अखेरिस दिसले .... पंधरा एक मिनिटे आम्ही त्याचा पाठलाग करत होतो. ख्रिस मला बराच वेळ झाला ते कासव दाखवत होता. परंतु काही केल्या मला ते दिसत नव्हते. स्नॉर्केलिंग पहिल्यांदाच करत असल्यामुळे अजूनही पाण्यात तोंड घालुन तोंडाने त्या नळीतुन श्वास घेणे जमत नव्हते. आणि एकदा जर तोंडावरचा मुखवटा काढला की परत घालणेही थोडे अवघड जात होते. ख्रिस आणि दुसरा एक गोरा जोडीदार मात्र अगदी सराईतपणे त्याचा पाठलाग करत होते...


माऊई स्नॉर्केलिंगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. स्नॉर्केलिंग म्हणजे पाण्यावर तरंगत राहुन पाण्यात तोंड घालुन समुद्रतळ आणि परिसर न्याहाळणे. हे करत असताना डोळ्यांवर आणि नाकावर एक मुखवटा वापरायचा असतो आणि एका नळीचे एक टोक तोंडात आणि दुसरे टोक पाण्याबाहेर ठेवुन तोंडाने श्वास घ्यायचा असतो. असे केल्यामुळे अगदी कमी श्रमात तासन तास न दमता समुद्रतळ मासे कासवे आणि कोरल्स बघता येतात. अर्थात यासाठी माऊईसारखा उथळ, शांत आणि जीववैविध्याने समृद्ध असा समुद्रतळ असला तर उत्तम. माऊईबद्दल बरेच ऐकुन होतो त्यामुळे स्नॉर्केलिंग करायला मी अतिशय उत्सुक होतो. आम्ही मोलोकिनी या एका समुद्रविवरामध्ये स्नॉर्केलिंगचे आरक्षण देखील केले .. परंतु माऊईला जायच्या दिवशीच सिद्धु इतका आजारी पडला की अगदी अर्जंट केअरमध्ये नेऊन ऍण्टीबायॉटिक्स घ्यावे लागले. त्यामुळे अगदी विमान उडण्याआधी २ मिनिटे फोन करून ते आरक्षण रद्द केले. तीन दिवस दुसऱ्या गोष्टी केल्यानंतर मात्र चौथ्या दिवशी मी ठरवले की अगदी मोलोकिनी नाही ... परंतु आमच्या रिसॉर्टच्या शेजारच्या बीचवर स्नॉर्केलिंग करायचेच. सकाळी ८ वाजता जाऊन स्नॉर्केलिंगचे सिद्धु आणि माझ्या मापाचे साहित्य आणले आणि १० च्या सुमारास उलुआ बीच वर गेलो.

पाणी तसे किंचीत थंड होते परंतु सुसह्य होते. मी आणि सिद्धु पाण्यात शिरलो. स्नॉर्केलिंगचा मास्क मी लावला तोंडावर परंतु पाण्यात गेलो की तो मास्क तोंडावरुन सुटायचा आणि नाकातोंडात पाणी जायचे. बराच वेळ तसे केले आणि शेवटी अर्धा एक लिटर खारे पाणी पिल्यानंतर मी मनात म्हटले की या गोष्टीचा नाद सोडुन द्यायला हवा. परत बीचवर आलो आणि ते साहित्य ठेवुन परतणार एवढ्यात आमच्या शेजारी बसलेल्या जोडीतला एक साठी उलटुन गेलेला माणुस (ख्रिस त्याचे नाव - मागुन कळले) मला म्हणाला, "व्हिजिबिलिटी कशी आहे?" - अर्थात समुद्रतळ दिसतोय का व्यवस्थीत.

"व्हिजिबिलिटी चांगली आहे - पण मला काहीच जमत नाहीए." - मी
"अरेच्च्या का?" - ख्रिस
"मला माहित नाही. माझा मास्क सैल होतो आहे आणि मग मी नाकाने पाणी पितोय!" - मी
"असं! बघु बर" - ख्रिस

ख्रिस आणि त्याची बायको दोघेही मला शिकवु लागले. आणि मग मला कळले की तोंडावरचा मुखवटा नाकाने श्वास घेऊन अगदी हवाबंद करायचा नसतो. फक्त लावायचा असतो. आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे नळीचे तोंडाकडचे टोक अगदी तोंडात पूर्ण घालायाचे असते.

"चल .. आपण पाण्यात जाऊन बघु." - ख्रिस थोड्या वेळाने मला म्हणाला.
"ओ के ... चल" - मी उत्साहात म्हणालो.

पाण्यात जाताना पायाला माश्यासारखे पंख पण लावले कारण त्यामुळे पोहायला अजूनच मदत होते आणि कमी श्रम होतात.

मी धीर करुन पाण्यात तोंड खुपसले आणि चमत्कार ! नळी तोंडात पूर्ण घातल्यामुळे अगदी व्यवस्थीत श्वास घेता येऊ लागला. ५-१०-२०-३० सेकंद झाले तरीही नाकातोंडात पाणी न जाता मी तरंगु शकलो! मग माझा घीर अजुनच वाढला. उलुआ बीचवर मध्येच एक खडकांची रांग (रीफ) समुद्रात जाते. अश्या कपारींमध्ये मासे येऊन राहतात. तिथे वनस्पतीही अधिक वाढतात. त्यामुळे आम्ही त्या रीफच्या अनुषंगाने समुद्रात आत आत जाऊ लागलो. समुद्रतळ देखील पाहण्यात प्रचंड मजा आहे. रंगीबेरंगी माश्यांबरोबर पोहोण्यात तर स्वर्गसुखच! त्याचा आनंद घेत घेत आमची स्वारी ख्रिसच्या मागोमाग चालली होती. तो अगदी पट्टीचा पोहोणारा होता. ते कळत होते. मला तो सारखा विचारत होता की सगळे ठिक आहे ना. एकदा मला स्नॉर्केलिंगचे तंत्र जमल्यानंतर मी काळजी न करता पाय मारत मारत पुढे चाललो होतो. एव्हाना आम्हाला एक अजून जोडीदार मिळाला होता. गोरा होता पण अमेरिकन नक्कीच नव्हता. जरुरीपेक्षा जास्त सौजन्य दाखविले की कधीही समजावे ही व्यक्ती अमेरिकन नाही. अमेरिकन त्याबाबतीत अर्थवट पुणेरी आहेत ... सौजन्याची ऐशीतैशी! परंतु पुणेकर मात्र शिष्टाचाराची पण ऐशीतैशी करतात ते भाग वेगळा!! असो ..

तर आम्ही तिघेही पुढे पुढे चाललो होतो. बराच वेळ झाला ख्रिस एक कासवांची जोडी दाखवत होता. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली हिरवी पाणकासवे होती ती. मला सुरुवातीला दिसली नाहीत. परंतु अखेरिस पाण्याच्या तळातुन सुरुवातीला अस्पष्ट आणि नंतर स्पष्ट होत गेलेले ते महाकाय कासव माझ्या डोळ्यासमोर अजुनही आहे. ६ फ़ूट व्यासाचे ते कासव होते. हळु हळु ते माझ्या अगदी जवळ आले... अगदी ४ फुटावर. आम्ही त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. किती अंतर गेलो ते कळले नाही. परंतु ते जसे अनाकलनीयरित्या पाण्याच्या तळातुन वर आले तसेच झपकन ते खाली जाऊ लागले आणि अखेरिस खालच्या अंधारात लुप्त झाले.

खाली अंधार होता याचा अर्थ पाण्याची खोली ५० फुट तरी असावी. आम्ही तिघेही अगदी अचंबीत होत आपापले मुखवटे काढत एकमेकाना विचारु लागलो की कासव पाहिले का! मागे वळुन पाहिले तर समुद्र किनारा बराच लांब होता. खडकांची रांग देखील संपली होती.

"तुम्ही नशीबवान आहात. एवढे मोठे कासव पाहता आले!" - ख्रिस म्हणाला, " चला परत फिरु."


आम्ही सगळे परत वळलो. मुखवटे लावले आणि झपझप जाऊ लागलो. मी त्यांचे पाय पाण्यात पहात पहात जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण लवकरच त्यांचे माझ्या पुढे पोहोणारे पाय दिसेनासे झाले. म्हणुन मी अंदाज घेण्यासाठी पाण्याबाहेर तोंड काढले. बघतो तर समोर अथांग समुद्र. बीच कुठेच दिसत नव्हता. मी समुद्रात आत चाललो होतो. परत मागे वळलो आणि ख्रिसच्या दिशेने जाऊ लागलो. परत थोड्यावेळाने अंदाज घेण्यासाठी तोंड बाहेर काढले तर परत मी समुद्रात आत पोहोत चाललो होतो! एव्हाना त्यांच्या आणि माझ्या मध्ये बरेच अंतर पडले होते. मी तिसऱ्यांदा परत पाण्यात तोंड घातले आणि पाय मारु लागलो... परंतु एव्हाना कुठेतरी मन चुकचुकले होते. आणि एकदम नाकात खारे पाणी गेले. त्यामुळे एकदम मी मुखवटा काढला. परंतु इतका वेळ सराईतपणे स्नॉर्केलिंग करणारा मी ... आता मात्र थोडा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. मी पुन्हा पाण्यात तोंड घालुन जीवाच्या आकांताने पाय मारु लागलो. आणि उजव्या पोटरीत वात आला. तेव्हा मात्र मी मुखवटा आणि नळी पूर्ण बाजुला करुन फक्त पाण्यात स्थिर होण्याचा प्रयत्न केला. असे करताना बऱ्यापैकी श्रम होतात. आणि एका पायाच्या ताकतीवर पोहायचे म्हणजे तर अतीच. किनार किमान २०० मीटर तरी लांब होता. मला आता मात्र प्रसंगाचे गांभीर्य जाणवले. आपण योग्य त्या गोष्टी केल्या नाहीत तर जीव गमावु याची जाणीव झाली. बीच वर १०० एक माणसे असली तरीही २०० मीटर आतमध्ये कोणी धडपडले आहे हे ओळखणे सोपे नाही.

सुदैवाने ख्रिसने पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले. मी जमेल तितके मोठ्याने ओरडुन म्हणालो "हेल्प". एकच शब्द. "हेल्प". दुसऱ्यांदा मात्र ख्रिसला गांभीर्य कळले. तो झपझप हात मारत माझ्या दिशेने आला. मला मोठे आश्चर्य वाटले की तो १५ सेकंदात माझ्याजवळ पोहोचला.
"काय झाले?"
"माझ्या उजव्या पायात वात आला आहे"


ख्रिसने माझ्या दंडाला पहिले पकडले. मी त्याला स्पर्शही केला नाही कारण बुडणारा वाचवणाऱ्याला मिठी मारतो आणि दोघेही बुडु शकतात. त्याने मला थोडासा टेकु दिल्यामुळे मला थोडी उसंत मिळाली.

"तुला पाठीवर पडून पोहोता येईल?"
"हो"
"त्याने वात कमी होईल"
"ओ के"

मी पाठीवर पडलो. त्यामुळे विश्रांती देखील मिळाली आणि वात ही कमी झाला. ३०-४० सेकंद थांबल्यानंतर तो म्हणाला "तुला पोहोता येईल?" "हो" -मी. मग आम्ही हळु हळु पोहोत येऊ लागलो. एव्हाना बरेच खारे पाणी पिल्यामुळे परत स्नॉर्केलिंगचा मुखवटा घालुन पोहोणे मला शक्य नव्हते (किंवा धाडस झाले नाही). तरीही जमेल तसे पोहोत पोहोत आमची स्वारी किनाऱ्यावर आली. ख्रिसचा जीव नक्कीच भांड्यात पडला असणार आहे. परंतु तो निश्चल होता. जणु काही घडलेच नाही. त्याला अडचणीत आणल्याबद्दल मला लाज वाटत होती. मी त्याला दोन चार वेळा सॉरी म्हणालो. परंतु त्याने खांदे उडवले. तो म्हणाला "ते सगळे विसर. कासव पाहिले की नाही!! मजा आली ना... बस्स!"

मी कालच्या लेखात लिहिले तेच पुन्हा म्हणतो ... की धैर्य उदारता आणि सहजता ही या पश्चीमेच्या जगात खूप आहे. अगदी शिकण्यासारखे आहे. ख्रिसला मी अरे-तुरे लिहित असलो तरीही हा माणुस काही लहान नाही आहे. किमान ६०-६५ वर्षांचा तरुण आहे हा! व्हॅन्कुव्हर कॅनडा चा रहिवाशी आहे. त्याचे पुन:पुन: आभार मानुन आम्ही परत रिसॉर्ट वर परत आलो.

तसा मी कठीण प्रसंगात सहसा डगमगत नाही. कारण घाबरलो, डगमगलो तर विनाश अगदी नक्कीच आहे. त्यापेक्षा शांत डोक्याने प्रसंगाला सामोरे जावे. परंतु डगमगत नाही अशी फुशारकी मारण्यापेक्षा कठीण प्रसंग येऊन न देणे यातच खरा शहाणपणा आहे. स्नॉर्केलिंगची मजा आली खरी परंतु मला विचाराल तर एकट्याने स्नॉर्केलिंग करु नये आणि अगदी खोल पाण्यात आधाराशिवाय तर मुळीच करु नये. असो ... परंतु पुन्हा सुरक्षीतपणे हे मी करेन का ... सलोनीबाई ... ऍब्सोल्युटली येस!