Monday, June 28, 2010

ऑलिव्ह गार्डन

सलोनीराणी

 

काल रविवार होता. त्यामुळे ठरले बाहेर जेवायला जायचे. कुठे जायचे कुठे जायचे करत शेवटी "ऑलिव्ह गार्डन" ला जायचे ठरले. फिनिक्स मध्ये भारतिय रेस्टॉरंट्स आता बऱ्यापैकी आहेत ... १५-२० तरी असतील. परंतु ईस्ट कोस्ट किंवा वेस्ट कोस्टच्या तुलनेत किस झाडकी पत्ती. तरीही आपण बऱ्याचदा भारतियच पसंत करतो ..... आपण म्हणजे तुझी आई. मला चविष्ट असेल तर काहीही चालते. आता दहा वर्षांमध्ये तुझ्या आई मध्ये बदल होऊन तिला इटॅलिअन चालू लागले आहे. कधी कधी मेक्सिकन खाईन अश्या बाता मारते. परंतु आत्तापर्यंत मला तरी आठवत नाही तिने मेक्सिकन खाल्याचे. मेक्सिकन खाणे तसे भारताच्या जवळचे. बऱ्यापैकी मसालेदार, लाल बीन्स( घेवडे), भात आणि चपाती (टॉर्टिया) ... हे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मेक्सिकन लोक मांसाहार कमी करतात. मांसाहार करावा तर युरोपिअन वंशाच्या अर्थात गोऱ्या लोकांनी. सॅन पामिआ मध्ये राह्यला होतो तेव्हा एका जर्मन म्हातारबुवांशी गप्पा मारताना मी चुकुन विचारले की जर्मन क्युझीन (अर्थात पाकशास्त्र) मध्ये काय काय असते? तर म्हातारबुवा गुरगुरले "मीट ऍण्ड पोटेटो ऍण्ड मीट ऍ.......ण्ड पोटेटो!". मला आधी कळलेच नाही .... नंतर कळल्यावर म्हातारबुवांच्या विनोदबुद्धी चे कौतुक वाटले. परंतु नीट विचार केला तर युरोपमध्ये पाकशास्त्र कसले डोंबल्याचे. वर्षातले किती महिने थंडी असते तिथे काय पिकणार? त्यातल्या त्यात फ्रान्स स्पेन आणि इटली हे भाग मात्र त्यामानाने सौम्य हवामानाचे म्हणुन तिथे त्याचे स्वत:चे वेगवेगळे पदार्थ नक्कीच आहेत. तसे पाहिले तर भारतात पदार्थांची जी विविधता आहे त्याला तोड नाही. कारण भारता इतका शेती साठी दुसरा चांगला देश नाही. अगदी चीन सुद्धा नाही. सायमन (शांग्ड्रं) आणि आयजी हे माझे मित्र आणि सहकुटुम्ब आमच्याकडे (आणि आम्ही त्यांच्याकडे) जेवायला जायचो तेव्हा त्यांच्या बायका चीनी जपानी पदार्थ करायच्या. एकदा तोमोए (म्हणजे आयजी ची चयकोबा) ने खास एक जपानी पदार्थ करुन आणला. पदार्थ कसला द्रव होता. भल्यामोठ्या पातेल्यामध्ये ९०% पाणी आणि त्या पाण्यावर पावाच्या लाद्यांसारखे दिसणारे काही तरी तरंगत होते. ते पाहुनच आम्ही घोषीत केले की आम्ही मांसाहार करत नाही! परंतु तोमोएने तिच्या तोडक्या मोडक्या विंग्रजी मध्ये सांगीतले की ते कुठल्या कुठले रूट्स अर्थात कंद आहेत. सोनाली ने काहीतरी बोलुन स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यामुळे तोमोए आणि चुंझं दोघींनी मला पुन्हा पुन्हा आग्रह करुन ते सूप खायला घातले. तसे वाईट नव्हते. परंतु आपली भारतिय - त्यातुनही पुणेरी जीभ फारच चवचाल आहे. भारत सोडुन जगात सगळीकडे लोक जेवण तसे सौम्य खातात. आपल्यालाच फार चमचमीत लागते. असो ... परंतु चीनी आणि जपानी लोक असे पाणीदार जेवण करत असल्यामुळे तसे काटकुळे असतात.

 

कोस्टा रिका मधल्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात रोज एकच खाणे भात, काळे घेवडे आणि परतलेली केळी!! जगात डीप फ्राईड केळी कोण खात असेल तर कोस्टारिकन लोक. आम्हीही चार महिने रोज खाल्ली! चांगली लागतात. बाधत नाहीत डीप फ्राय केल्यावर! फक्त हार्ट ऍटॅक येऊ शकतो!

 

असो ... तर आम्ही ऑलिव्ह गार्डन मध्ये पोचलो. पोचायला दुपारचे २ वाजले त्यामुळे गर्दी कमी होती. तुझ्या आईला प्रयोग आवडत नाहीत. त्यामुळे नेहेमीचा मेन्यु मागवला. मिनस्ट्रोनी सूप (सगळ्या भाज्या पास्ता आणि पाणी), ब्रुशेटा (टोस्ट आणि टोमॅटो), आणि पिझ्झा. तुला थोडे सूप दिले. परंतु आजकाल तुला काहीही खाताना हातात त्या वस्तुचा आकार आणि टेक्श्चर पाहुन मगच खायची सवय लागली आहे त्यामुळे जमेना. हे हातात घेऊन कसले परिक्षण चालते देव जाणे. परंतु मला त्या लोणावळ्याच्या झूमधल्या चिंपाझीच्या गोष्टीची आठवण करुन देते .... तो चिंपाझी कुणीही काहीही दिले की पहिल्यांदा मागे लाऊन बघायचा म्हणे. कुणीतरी विचारले तर तिथल्या रक्षकाने सांगीतले की एकदा त्याने चुकुन कोयीसकट आंबा खाल्ला तेव्हा फार त्रास झाला तेव्हापासुन तो असे करतो!! असो ... परंतु अगदी जेवण संपल्यानंतर मिंट चॉकोलेट बडिशेपसारखे इथे देतात ते सुद्धा हातात घेऊन सगळे निरखुन पाहिलेस तु आणि सगळे बरबटुन घेतले. मध्यंतरी सिद्धोबाने चिकन चा तुकडा चा फडशा पाडला होता. सिद्धोबाला आम्ही चिकन आणि मासे खाऊ देतो. परंतु कुत्ता बिल्ली हे आपण खायचे नसते हे त्याला पक्के ठाऊन आहे त्यामुळे तो आग्रह करत नाही. त्यातल्या त्यात टर्की (म्हणजे कोंबडी आणि बदकाच्या मधला एक प्राणी) चे सॅण्डविच कधी कधी खायला परवानगी देतो.

 

दोन दिवसांपूर्वी सबवे मध्ये तो आणि त्याच्या दोन मित्रांना घेऊन गेलो तेव्हा सर्वांना घासपूस (अर्थात शाकाहारी) सॅण्डवीचेस घेतली. तेव्हा सोनालीने एका मित्राला (वय वर्षे आठ) विचारले की तुझी आई तुला टर्की खाऊ देते का? त्यावर तो म्हणाला, "इफ माय मॉम डिडन्ट मॅरी माय डॅड देन आय वुड हॅव बीन इटिंग ऑल काइन्ड्स ऑफ मीट!!". आम्ही उडालोच. मुलाचे भवितव्य उज्ज्वल आहे!! लाजिक स्ट्रांग आहे.

 

असो ... तर ऑलिव्ह गार्डनमध्ये जेवण झाल्यावर देवळात आणि नंतर किरकोळ खरेदीला जायचा विचार होता. परंतु एकदा एवढे जेवण जेवल्यानंतर अस्मादिकांना झोप आली आणि आपण आता घरी जावे असे मी सुचवले. त्यावर इतर वेळा तुझी आई खूप चिडली असती परंतु बोलता बोलता तिचे स्वत:च्या पायांकडे लक्ष गेले आणि तिच्या लक्षात आले की ती चुकुन स्वैपाकघरातल्या स्लीपर्स घालुन बाहेर पडली आहे. टी शर्ट, स्कर्ट आणि निळ्या रबराच्या स्लीपर्स हा अवतार घेऊन कुठे जाण्याची तिची तयारी नव्हती. त्यामुळे आम्ही घराकडे मोहरा वळवला. आणि दुपारी मस्त ताणुन दिली.

 

 

No comments: