Tuesday, March 31, 2009

समस्या आणि उत्तरे

सलोनी, आत्ता मी न्युअर्क (न्युयॉर्क जवळ) विमानतळावर विमानाची वाट बघतोय. अजून ४० एक मिनिटे आहेत. तेवढ्यात तुझ्याशी काही संवाद साधु!
काही कामानिमित्त इकडे मॉरिसटॉउनला येणे झाले. तसे आता मागच्या ५ वर्षात ५० वेळा तरी आलो असेन. आमच्या कंपनीचे मुख्यालय मॉरिसटाउनमध्ये आहे. त्यामुळे वरचेवर यावे लागते.
अमेरिका देश तसा प्रचंड अवाढव्य आहे. भारताच्या तिप्पट मोठा आणि १/३ लोकसंख्या! त्यामुळे दोन शहरांमध्ये अंतर बरेच असते. फिनिक्स ते न्युअर्क २३०० मैल म्हणजे ३७०० कि.मी. अंतर आहे. त्यामुळे विमानप्रवासाशिवाय पर्याय नाही. असा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या देशाला एकत्र आणणे आणि एकत्र ठेवणे या लोकांनी कसे काय केले असेल? आता तरी दळणवळणाची साधने आहेत. परंतु आत्ता आत्ता पर्यन्त म्हणजे आयझेनहॉवरने १९५० च्या दशकात इथले दृतगती मार्ग अर्थात फ्रीवेज बांधण्यापूर्वी साधे रस्तेच होते.
मला वाटते प्रश्न अडचणींचा नाही. इच्छाशक्तीचा आहे.
रशिया सुद्धा अमेरिकेसारखाच मोठा आहे आणि रशियाकडे नैसर्गिक साधने जास्त आहेत परंतु तिथे इतका विमानप्रवास सर्रास दिसत नाही. अमेरिकेत फिनिक्सहुन न्युअर्कला विमानाने जाणे स्वस्तपण आहे आणि जलद तर आहेच आहे. आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे हे सहजशक्य आहे. इथले लोक हताश झाले नाहीत की केवढा मोठा देश... कसा सांभाळु! त्यांनी मोटारी आणि विमानांचा शोध लावला. आणि मग ते तन्त्रज्ञान सर्व लोकांच्या आवाक्यात येईल इतके स्वस्त केले.
प्रत्येक गोष्टीकडे त्यांनी आव्हान म्हणुन पाहिले आणि स्वीकारले. १९३० च्या दशकात जेव्हा इथे महामंदी (डिप्रेशन) होती तेव्हा इथल्या राज्यकर्त्यांनी दोन खूप मोठे प्रश्न सोडवले - दोन्ही पाण्याशी निगडीत. कॅलिफोर्निया हा दुष्काळी भाग होता तिकडे पाण्याचे दुर्भिक्ष होते. परंतु कोलराडो नदीला उन्हाळ्यात पूर येत असे. आणि जीवित आणि वित्तहानी होत असे. उन्हाळ्यात पूर यासाठी की कोलराडो राज्यातील बर्फ़ उन्हाळ्यात वितळत असे आणि तो कोलराडो नदीच्या रुपात कॅलिफोर्निया आणि अरिझोना राज्यातुन पूराच्या रुपात वाहुन हात असे. त्याउलट मिसिसिपी ही नदी पावसाळ्यात मध्य अमेरिकेत विशेषत: लुइझियाना आणि मिसिसिपी राज्यात हाहाकार माजवत असे. या दोन्ही नद्या हजारो किमी लांब आहेत. १९३० च्या दशकात अमेरिकेने हे आव्हान स्वीकारले आणि दोन्ही प्रश्न सोडवले. कोलरडो नदीला त्यांनी हुव्हर (आणि नंतर ग्लेन कॅनिअन) धरण बांधुन असे अडवले की त्या धरणांत २० वर्षे पाउस नाही पडला तरी पुरेल इतका पाणीसाठा आहे. ही दोन्ही धरणे अद्वितिय आहेत. आश्चर्य आहेत. त्याबद्दल कदाचीत वेगळा लेख लिहावा लागेल. असो .. त्याउलट मिसिसिपी नदीवर त्यानी बांध घातले ज्यामुळे सखोल प्रदेशातुन जाताना या नदीचे पाणी पसरणे बंद झाले. तेव्हापासुन या बांधांनी गेली ७५ वर्षे काम केले - कट्रिना वादळ होइपर्यंत.
हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने जागतिक बॅंकेचा सल्ला घेतला नाही. स्वत:ची बुद्धी वापरली. भारताने १९६० च्या दशकात नद्याजोड प्रकल्प राबवायचे ठरवले. परंतु आपल्याकडच्या भ्रष्ट आणि कचखाउ राज्यकर्त्यांनी जागतिक बॅंकेचा अहितकारी सल्ला स्वीकारला. ती योजना पुढे बारगळली.
आपण आपले प्रश्न काय आहेत हे ओळखले पाहिजे आणि त्यावरची उत्तरे आपणच शोधली पाहिजेत. आणि असे करताना आपल्या लोकांचे कल्याण कसे होइल याचा विचार केला पाहिजे. कल्याण हा काही फार मोठा शब्द नाही. कल्याण म्हणजे काय तर सर्व लोकांना जीवित वित्त यांची सुरक्षा/शाश्वती आणि आपले आयुष्य घडवण्यासाठी समान संधी असणे.
असो .. आज इतके भाषण पुरे. परंतु अमेरिकेच्या धाडसी आणि कल्पक वृत्तितुन खुप काही शिकण्यासारखे आहे यात शंकाच नाही.

Saturday, March 28, 2009

हरवलेला भूतकाळ

प्रिय सलोनी
२ दिवसांपूर्वी दादांची एक ईमेल आली. विषय होता, त्यांना पडलेले एक स्वप्न. ते स्वप्न त्यांना इतके स्पष्ट आठवत होते की त्यांना लिहिल्यावाचून राहवले नाही. स्वप्नाचा तपशील जाऊ देत ... परंतु विषय "निघुन गेलेले आप्त जणु आपल्या सानिध्यात आहेत" असा होता.
मी विचार करु लागलो. खरोखरच आपले मन किती वेडे असते. गतस्मृतिंनी ते किती हळवे होते. बरेचदा भुतकाळात डोकवून आपण कुठेतरी म्हणत असतो ..."गेले ते दिन गेले"। जुने मित्र, जुन्या आठवणी, शाळा, कॉलेज, इतकेच काय तर प्रवास, यश, अपयश, मानापमान आणि काय नाही? दु:खाचे प्रसंग मन आपोआपच बाजुला सारते. उरतात सुखद आठवणी. आपण त्याच आठवुन भविष्यकाळात इतिहास जगण्याची स्वप्ने रंगवु लागतो.

मला आठवते आहे... मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतुन पदवी मिळवल्यानंतर, १ १/२ वर्षांनी मी एका कॉन्फरन्सनिमित्त शिकागोला गेलो होतो. लान्सिंग हे शिकागोपासुन ३ तासांच्या अंतरावर! मी शिकागोला जायच्या आधिच ठरवले की २ दिवस आधी शिकागोला जाउन लान्सिंगला ड्राईव्ह करुन जायचे. गेलोही. २ दिवस एका पाकिस्तानी मित्राकडे राहिलो. हॅसलेटच्या देवळात गेलो. मायर नावचे एकमेव सुपर मार्केट जाऊन पुन्हा न्याहाळले. सर्वात महत्वाचे म्हणजे स्पार्टन व्हिलेज जिथे आम्ही राह्यचो आणि विद्यापीठातही चक्कर मारली. आनंद वाटला. परंतु तरीही लान्सिंग भेटीचा तो अनुभव अतिशय त्रासदायक होता. सतत काही तरी हरवल्याची भावना बळावत गेली, आपण इथे परके झालो आहोत ही भावना त्रासुन राहिली. ते ठिकाण जिथे आम्ही पहिल्यांदा यु एस मध्ये आलो, जिथुन मी एमबीए केले, जिथे सिद्धुचा जन्म झाला आणि जिथे तुझ्या आईचे आणि माझे नाते खर्या अर्थाने फुलले ते लान्सिंग गाव काही सापडले नाही.
मी ती भेट कधीच विसरणार नाही कारण तिथे मी काहीतरी नवीन शिकलो. मी जणुकाही ठरवलेच की यापुढे कुठेही भविष्यात इतिहास जगायचा प्रयत्न करायचा नाही. प्रत्येकवेळी नवीन स्वप्नांचा पाठपुरावा करायचा. तरच आयुष्य सुखावह होईल आणि प्रवाही राहील.
आजही भारतात दरवर्षी जातो तर कुठे तरी तेच जुने दिवस जगण्याचा प्रयत्न करतो. चूक आहे कळते परंतु तरीही करतो आणि दु:खीकष्टी होतो. मला वाटते मी भारतात जेव्हा कायमचा जाईन तेव्हा मात्र काळजी घेईन. नवी स्वप्ने घेउन नवे आयुष्य जगण्यासाठी जाईन.

गुढिपाडव्याच्या निमित्ताने ....

सलोनीबाई
काल गुढीपाडवा होता. आपले नवे वर्ष इथे सुरु होते. रावणावर विजय मिळवुन प्रभु श्री रामचंद्र आज अयोध्येला परतले. त्या विजयाचे प्रतिक म्हणुन गुढी उभारतात. याच दिवशी शालिवाहनाने शकांचा पराभव केला. पुराणांत म्हटले आहे की याच दिवशी सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवांनी.
आपल्या संस्कृतित बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वरुपात दिसतात. जणुकाही एखादी मोत्याची किंवा फुलांची माळ असावी आणि प्रत्येकाने एक एक फुल गुम्फत जावे .... तसे!
आम्ही (मी सोनाली आणि सिद्धु) इथे जवळच एक बालाजीचे मंदिर आहे तिथे गेलो होतो. बरेच लोक आले होते. २०० तरी असावेत. दर्शन घेतले, प्रसाद घेतला .... बरे वाटले. तिर्थ घेतले आणि डोक्याला हात लावुन डोळ्यावरुन फिरवला की काय वाटते ते शब्दात सांगणे कठिण आहे. अगदी घरी आल्यासारखे वाटते.
हे मंदिर खरेतर एका घरात वसले आहे. बव्हंशी कानडी लोकांनी स्थापन केले आहे असे दिसते. भाषा कळली नाही तरी भाव कळतो ... भावना कळतात. त्यामुळे अडचण येत नाही.
इथे अमेरिकेत चर्चचे असे नसते. जर तुम्ही ख्रिश्चन असाल आणि चर्च मध्ये जात असाल तर तुम्ही एका विशिष्ट चर्चमध्येच जाता. कॅथॉलिकांचे चर्च वेगळे, मेथोडिस्टांचे वेगळे, लॅटर डे सेंट्सचे वेगळे. इतकेच नाही तर काळ्यांचे वेगळे आणि गोर्यांचे वेगळे.
भारतात आपण असा विचारच कधी करत नाही. आपल्याला जिथे आवडेल तिथे जाउन दर्शन घेतो. अगदी चर्चमध्ये जायला पण काही हरकत नसते आपली. दलितांना मंदिरप्रवेश नव्हता ही मधल्या काही शतकांमधील विकृती होती. अजूनही कुठे कुठे तुरळक होत असेल परंतु तो अपवाद म्हणावा लागेल.
मला माहित नाही सगळ्याच ख्रिश्चन लोकांचे असे असते का.. परंतु इकडे तरी चर्च म्हणजे जणु काही संघटनाच असते एखाद्या राजकिय पक्षासारखी. कदाचित त्यामुळे जर तुम्ही एका चर्चचे सभासद असाल तर तुम्ही दुसऱ्या चर्चचे तत्व मान्य करणे अशक्य असावे. हिंदु (वेदिक) धर्माचा पायाच हा आहे की "तत त्वम असि। अहम ब्रह्मास्मि। एकम सत, विप्रा बहुधा वदन्ति।" एकच तत्व आहे सगळीकडे ... आणि आपण त्याचेच अंश आहोत. ज्याप्रमाणे नदी सागराला जाउन मिळते तसे आपणही कधितरी त्या तत्वात विलिन होणार. वेगवेगळे धर्म आणि देवता ही केवळ रूपे आहेत. आपण स्वत:च ब्रह्म आहोत. उपनिषदात की कुठे तरी ती गोष्ट सांगीतली आहे दोन पक्षांची. ज्ञान प्राप्त झाल्यावर कळते की खालचा पक्षी ही वरच्या पक्षाचीच प्रतिमा आहे. दोन्हीत फरक केवळ ज्ञानाचा. एक जण अज्ञानात आहे. आणि म्हणुन आपल्या धर्माचे लक्ष्य मोक्ष आहे ... ज्ञानप्राप्ति आहे. आनंद मिळवणे नाही. कारण आनंदातही अज्ञानच आहे.
असो ...
तर खरोखरच छान वाटले. तिथे प्रसाद म्हणुन दक्षिणात्य पद्दतीचा मसाले भात, ताक-पोहे, नैवेद्याचा शिरा असे दिले. ते घेउन घरी आलो.

Wednesday, March 25, 2009

स्मृतिभ्रंश (अल्झायमर्स)

सलोनी
आज ऑफिसला जाताना रेडिओ ऐकत होतो. अमेरिकेत बरेच लोक कार चालवता चालवता रेडिओ ऐकतात. मला स्वत:ला इथला पब्लिक रेडिओ आवडतो. कारण पब्लिक रेडिओ व्यावसायिकरीत्या न चालवता समाजप्रबोधनासाठी चालवला जातो. त्यामुळे त्यावरच्या बातम्या आणि कार्यक्रम उद्बोधक असतात. असो ...
आज पब्लिक रेडिओवर अल्झायमर्स (स्मृतिभ्रंश) या रोगाबद्दल चर्चा चालली होती. त्यात असे कळले की अमेरिकेत ६५ वर्षांवरच्या १०% आणि ८५ वर्षांच्यावरच्या तब्बल ५०% लोकांना स्मृतिभ्रंश होतो. तसे अमेरिकेत स्मृतिभंशाबद्दल बर्याचदा ऐकायला येते. परंतु ही माहिती केवळ माहिती यासाठी नाही राहिली की .... सिद्धुची एक शिक्षिका मिस ब्लॅक म्हणुन आहे तिच्या बोलण्यातुन कळले की तिच्या आईला गेली कित्येक वर्षे स्मृतिभ्रंश आहे. एकदा एका लग्नसमारंभात व्हायोलिन वाजवता वाजवता ती एकदम थांबली. तिला पुढचे काही आठवेना. अश्या पद्धतीने मिस ब्लॅकच्या आईच्या स्मृतिभ्रंशाची अशुभ चाहुल लागली. यावर उपाय अजुनतरी नाही. स्मृतिभ्रंशाची वाढ थोडीफार रोखता येते परंतु इतकेच काय ते. मिस ब्लॅकची आई आज स्वत:च्याच नवर्याला कधीकधी म्हणत असते ... की त्याचे घर छान आहे किंवा त्याचा कुत्रा चांगला आहे. आपल्याच माणसांना आपली ओळख राहु नये यासारखे दु:ख नाही.
अमेरिकेत या रोगाचे प्रमाण विशेषत: जास्त आहे. मी काही तज्ञ नाही ... परंतु असे वाटते की इथे सुबत्ता आणि वरवरची शांति जरुर आहे परंतु त्यासाठी करावा लागणारा संघर्ष खुपच तीव्र आहे. इथे एक म्हण प्रसिद्ध आहे - देअर इज नो फ्री लंच! अर्थात - कोणालाही इथे फुकट काहीही मिळणार नाही. तसे बव्हंशी हे तत्वज्ञान मला स्वत:ला पटते. परंतु त्याचा इतका अतिरेक आहे की नोकरीची शाश्वती नाही, नात्यांची शाश्वती नाही, प्रत्येक गोष्टीचे मूल्य ठरवता ठरवता बर्याच गोष्टींचे महत्व विसरुन जायला होते. स्पर्धा हा भांडवलवादाचा अतिशय महत्वाचा घटक ... परंतु अतिस्पर्धेमुळे व्यक्तिचे महत्व कमी होऊन वस्तुंचे महत्व इतके वाढले आहे की काही माणसांना स्वत:चाच विसर नाही पडला तरच नवल! जीवन ही अनुभव धारा आहे. अनुभवांची शृंखला आहे. परंतु स्पर्धेत जर आपण हरल्याचीच भावना सतत घर करून राह्यला लागली तर त्या अनुभवांमध्ये कोणाला रस राहणार?
आधुनिक युगात आणि भांडवलवादाच्या रेट्यात स्पर्धेला पर्याय नाही. परंतु किती स्पर्धा आवश्यक आहे? किती वस्तु पुरेश्या आहेत? आणि आपण खरोखरच काय शोधतो आहोत? या सर्व गोष्टींचा विचारही व्हायला हवा. आज पाश्चात्यांच्या भौतिक प्रगतिमुळे सर्व जगच त्यांचे अंधानुकरण करते आहे. काही वेळा हे अनुकरण अस्तित्वाची लढाई म्हणुन करावे लागते. त्यांच्याकडे बर्याच चांगल्या गोष्टी आहेत यात वादच नाही. परंतु भारताकडेही अमुल्य ठेवा आहे. विचारधन आहे. तगमगलेल्या पाश्चात्य मनाला शांत करण्याची ताकद आहे. परंतु भारताच्या ताकदीचे प्रकटीकरण भारताच्या भौतिक प्रगतीशिवाय होणार नाही. मला वाटते पाश्चात्यांचा वस्तुवाद आणि पौर्वात्यांचे सहजीवन यांचे मिलन कधी तरी होईल. समस्त मानव जात बाह्य प्रगतीबरोबर आंतरीक शांति प्राप्त करेल . स्मृतिभ्रंशाचे प्रमाणही तेव्हाच कमी होईल.

Sunday, March 22, 2009

सिलिऍक डिसिझ

सलोनी
आज राजीव आणि नम्रता घरी आले होते. मिहिर त्यांचा मुलगा अर्थात बरोबर होताच. सिद्धुला कोणीही घरी येणार म्हटले की विशेष उधाण येते. आणि त्याला खेळायला मिळाले की तर विचारुच नकोस. अमेरिकेत तसे एकटेपण आहे. त्यामुळे मुलेपण खूप कंटाळतात. त्यामुळे ती शाळेत, घरी, कुठल्याही क्लास मध्ये इतर मुले कधी भेटतील याची वाटच पहात असतात. केवळ या एका कारणामुळे तर सिद्धु ला भारतात यायला विशेष आवडते.
असो ... तर मिहिर आता बराच चांगला दिसतो. थोडे वजनही वाढले आहे. परंतु ६ महिन्यांपूर्वी तो अगदीच खुजा होता. चेहेरा अतिशय काळवंडलेला, त्रासिक, चिडखोर आणि अतिशय कृश. वजनाच्या बाबतीत म्हणशील तर त्याचे वजन अमेरिकेतील ९५% मुलांच्यापेक्षा कमी होते. तर असा मिहिर ६ महिन्यांपूर्वी पोट दुखते म्हणुन तक्रार करू लागला. राजीव/नम्रताला कळेना काय करावे. अखेरिस हो ना हो ना करता करता त्याला डॉक्टरांकडे नेले. आणि हे कळले की मिहिरला कदाचीत "सिलिऍक" रोग आहे. डॉक्टरांनी लिपिड पॅनेलची चाचणी केली. त्यामध्ये "सिलिऍक" बर्यापैकी सिद्ध झाला. आम्हाला जे काहि याबाबत कळले आहे ते असे आहे की, "सिलिऍक" म्हणजे ग्लुटेन नावाच्या अन्नघटकाला पचवता न येण्याची अगदी टोकाची अवस्था. ग्लुटेन हा अन्नघटक सहसा गव्हामध्ये असतो. बर्याचदा पाश्चात्य देशांमध्ये हा घटक कोणत्याही हवाबंद अन्नामध्ये टिकवण्यासाठी अथवा घट्टपणा येण्यासाठी मिसळतात. ग्लुटेन पचवता न येणे हे तसे बर्याच जणांना होते. त्याची ऍलर्जीही काही जणांना होते परंतु "सिलिऍक" हा रोग तसा कमी लोकांना होतो. "सिलिऍक"मध्ये ग्लुटेन पचण्याऐवजी पोटात विषारी प्रक्रिया करून आतड्याचे आतील आवरण (व्हिलाय) विरघळुन टाकते. व्हिलाय यांचा आपल्याल पचनक्रियेमध्ये उपयोग होत असतो. व्हिलायच नसतील तर ग्लुटेनच काय तर कोणताच अन्नघटक पचवता येणे कठिण आहे.
मिहिरच्या आतड्याला किती ईजा झाली आहे हे तपासण्यासाठी मग आतड्याची बायोप्सी झाली. त्याला भूल देउन त्याच्या तोंडातुन एक दुर्बिण आत घालुन डॉक्टरांनी त्याच्या आतड्याचे निरिक्षण केले. त्यामध्ये त्यांना असे दिसुन आले की त्याचे व्हिलाय जवळपास सर्वच नष्ट झाले होते किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर होते. मिहिरच्या शरिरामध्ये ग्लुटेन पचवण्याची ९९% अक्षमता सिद्ध झाली.
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की "सिलिऍक" वर औषध अजूनतरी नाही. सुदैवाची गोष्ट अशी की हा रोग रोजच्या आहारात बदल करून आटोक्यात आणता येतो. ज्या ज्या पदार्थांमध्ये ग्लुटेन आहे ते ते पदार्थ (उदा. गहु रवा मैदा इ. ) पूर्णपणे वर्ज्य. त्यामुळे भर मुख्यत: भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, चिकन, भाज्या, दुध, आणि फळे इत्यादिंवर. हे सर्व करताना कुठेही ग्लुटेनचा थोडासुद्धा अंश आपल्या जेवणात येउ देता कामा नये (अर्थात क्रॉस कंटॅमिनेशन होऊ देउ नये). याबाबत हलगर्जीपणा केला तर त्यातुन पुढे कॅन्सर होऊ शकतो.
मिहिरच्या बाबत अजून एक चांगली गोष्ट अशी कि त्याची परिस्थिती इतकी तीव्र असूनही तो सुधारु शकेल कारण तो अजून फक्त ५ वर्षांचाच आहे. मागील ६ महिन्यात ग्लुटेनमुक्त आहारामुळे त्याचे वजन आता ४ पौंडांनी वाढले आहे. याचे सर्व श्रेय त्याच्या आईला म्हणजे नम्रताला आहे.
आपल्याकडे या आजारावर फारशी माहिती उपलब्ध नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आशियाई लोकांमध्ये हा आजार क्वचितच आढळतो. त्याव्यतिरिक्त अज्ञान हेही एक महत्वाचे कारण आहे. कित्येकदा एखादे मुल खुजेच आहे असे पालक स्वत:ला पटवतात. त्याबाबत "सिलिऍक"ची शक्यता पडताळण्याची गरज आहे. आम्ही स्वत: इतक्यातल्या इतक्यात ३ भारतीय मुलांना हा रोग झाल्याचे पाहिले आहे. त्यामुळे शंका येते की खरेच हा आजार इतका दुर्मिळ आहे का?
मिहिरच्या आजी आजोबांनी बंगळुरसारख्या प्रमुख शहरामध्ये चौकशी केली तिथेही तज्ञ डॉक्टरांना याविषयी विशेष माहिती नव्हती. भारतात याविषयी जागरुकता निर्माण होण्याची गरज आहे.
मिहिर मात्र आता हळुहळु सुधारत आहे.

दिसामाजी काहीतरी (नवीन) लिहित जावे!

प्रिय सलोनी
सिद्धुने मागील सहा महिने ऍबॅकसची शिकवणी लावली आहे. चीनी पद्धतीने गणित शिकवतात या शिकवणीत. तर स्वारीने काल कुठली तरी लेव्हल पूर्ण केली म्हणे. त्यामुळे साहेबांना काल पीएसपी ची एक नवीन गेम काढायची परवानगी मिळाली आईकडुन.
तसा सिद्धोबा हुशार आहेच. परंतु त्याहिपेक्षा तो कल्पक अधिक आहे. त्याच्या डोक्यात सतत काहितरी कलाकृति करण्याचे वेड असते. आणि मला वाटते ... हे फक्त सिद्धुच्याच बाबतीत नाही तर बर्याच अमेरिकन मुलांबाबत खरे आहे. इथली शिक्षणपद्धतीच इतकी कल्पकतेला प्रोत्साहन देणारी आहे.
सिद्धुच्या शाळेत कधी गेलं तर खरोखरच थक्क होतं मुलांनी केलेले काम पाहुन. अगदी साध्या साध्या वस्तुंपासुन इतक्या सुन्दर प्रतिकात्मक गोष्टी तयार करायला शिकवतात मुलांना. कागद, पिना, फुगे, रंग, कार्ड बोर्ड्स इत्यादी साध्या साहित्यापासुन; मदर्स डे असेल तर त्यादिवशी कागदी फुलांचा गुच्छ, सायन्स क्लास झाला तर ह्युमन स्केलीटन (सापळा) किंवा हृदय, अगदी ओबामा आणि मायकेल फेल्प्सची चित्रे सुद्धा! इतकी लहान मुले इतके सुंदर काम करु शकतात यावर विश्वास बसणे अन्यथा शक्य नव्हते.
मला वाटते की अमेरिकेच्या यशाचे हे एक मोठे गुपीत आहे. इथे अभिव्यक्तीला वाव आहे, कल्पकतेला वाव आहे. आणि कल्पकता म्हणजे काय प्रत्येकाने अगदी एडिसन सारखा दिवाच शोधायला पाहिजे असेही काही नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कल्पकतेचा उपयोग होतो. माझे सर्वात आवडते उदाहरण म्हणजे ... ऍपल कटर. सफरचंद कापायचे एक यंत्र... एक सेकंदात अगदी ६ फोडी तयार. किती साधी आणि किती उपयोगी गोष्ट आहे! दुसरे म्हणजे कचरा उचलण्याचे यंत्र. एक काठीला पुढे चिमटा बसवलेला आणि हातात त्या चिमट्याला हलवता येईल असा एक खटका. परंतु कचरा उचलणे किती सोपे झाले?
कुठलाही माणुस अमेरिकेत आला की इथली प्रगती पाहुन थक्क होतो. प्रचंड रस्ते, इमारती, सुबत्ता, गाड्या, विमाने, तंत्रज्ञान .... परंतु या सर्वांचा पाया कल्पकता, नाविन्याचा ध्यास यामध्ये आहे. बिल गेट्स एवढे मोठे कॉम्प्युटरचे विश्व निर्माण करतो त्याच समाजात कोणीतरी थोडा अधिक चांगला साबण, टुथपेस्ट आणि अगदी झाडुसुद्धा बनवतो... जो तो ज्याच्या त्याच्या क्षेत्रात नविन काय करता येइल याचा विचार करतो. मला वाटते समृद्धिची उंची समृद्धिच्या रुंदीवर अवलंबुन आहे. फक्त अवकाशयानांचाच शोध लवणे अशक्य आहे. कोणीतरी टाचणी पण शोधावी लागते. समाजातील कल्पकतेची उंची समाजातील कल्पकतेच्या रुंदीवरुनच ठरते.
२ वर्षांपूर्वी मी प्रयत्न केला काही पुण्यातल्या शिक्षण संस्थांना उद्युक्त करायला की मुलांच्या कल्पकतेला वाव मिळेल असे उपक्रम घडवा. त्याच्यासाठी लागणारे पैसे उभे करायला मी मदत करेन. परंतु पैसे देणे सोपे आहे. त्यासाठी काम करणारी माणसे मिळणे अवघड आहे. पाहु या काय होते ते .... कदाचीत आपण भारतात परत जाऊ तेव्हा काही करू!

Saturday, March 21, 2009

कॉप्स (अर्थात - अमेरिकन पोलिस)

२ दिवसांपूर्वीची गोष्ट... मी नेहेमीप्रमाणे सिद्धु ला शाळेत सोडवायला म्हणुन घराबाहेर पडलो। घराबाहेरच्या वळणावरच लाल निळे दिवे चमकताना आणि एक गाडी थांबलेली दिसली. मनात म्हटले सकाळी सकाळी कोण बिचारं पोलिसाच्या तावडीत सापडलंय? बघतो तर एक बाईची गाडी बंद पडली होती. आणि एक पोलिस तिथे येऊन तिला मदत करत होता.

हे दृश्य इकडे तसे नेहेमीचेच। अमेरिकन पोलिस हा इथल्या समाजाचा रक्षक आणि सहाय्यक आहे. पोलिस तुम्हाला केवळ कायद्याचा भंग केला म्हणुन ताबडतोब पोलिसी खाक्या नाही दाखवत. गरज पडली तर तोही दाखवतातच ... परंतु सर्वसामान्यत: पोलिस हे सुद्धा पाहतात की या व्यक्तीला काय अडचण आहे का? आणि तुम्हाला मदत करतात. माझ्या एका मित्राच्या कार मध्ये एकदा गॅस (इथले पेट्रोल थोडे वेगळे असते... त्याला गॅस म्हणतात) संपला. तर पोलिस एक मिनिटात हजर की स्वारी रस्त्यात का उभी राहिली! तो म्हणाला की मी गॅस आणुन देतो. अखेरिस हो नाही करता करता माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार त्याने शेवटी माझ्या मित्राच्या गाडीला ढकलत ढकलत गॅस स्टेशन पर्यंत नेले. आहे की नाही गम्मत. पोलिसांच्या या मदतशील वृत्तीतुन विनोदही घडतात. एकदा तर ९० वर्षांच्या वृद्ध स्त्रीने पोलिसांना फोन केला की तिला बीयर प्यायची आहे पण तिला झाकण उघडत नाही आहे. आपल्याला विनोद वाटेल ... परंतु हे खरोखरच घडले! पोलिसांनी त्या स्त्रीची विनंती मान्य केली... तिच्या घरी जाउन तिच्या बीयर चे झाकण उघडुन दिले!

मला स्वत:ला २ चांगले अनुभव आहेत। सिद्धु चा जन्म झाला त्या दिवशी मी भारतात बातमी कळवण्यासाठी म्हणुन घरी चाललो होतो. विचारांच्या नादात होतो त्यामुळे कळले नाही कधी गाडीने वेगमर्यादा ओलांडली आणि पोलिसाची गाडी येउन मागे उभी राहिली. पोलिसाने मला विचारले की मला माहिती आहे का की इथे जास्तीत जास्त किती वेग असायला हवा. मी म्हणालो ... चूक झाली. परंतु आत्ताच माझ्या मुलाचा जन्म झाला त्यामुळे विचारांच्या नादात होतो म्हणुन चूक झाली. त्याने मला सोडुन दिले. इथे माझी चूक होतीच. कायद्यानुसार त्याने मला दण्ड थोठावायला १००% जागा होती. परंतु त्याने परिस्थिती पाहिली आणि सोडुन दिले.

आपल्याकडे भारतात असे दिसत नाही। मला अनेक प्रसंग आठवतात। पुणे रेल्वे स्थानकावर लाच दिली नाही आणि दंड भरण्याचा आग्रह धरला म्हणुन टी.सी. ने पोलिसांकडे नेले आणि त्यांनी त्याचीच बाजु घेतली ते... पासपोर्ट साठी जे पोलिसी प्रमाणपत्र लागते ते मिळवताना पोलिसाने वापरलेले शब्द की "तुझ्यावर मेहेरबानी करतोय." अजूनही कानात घुमतात.... स्वारगेट्जवळ एका पहाटे माझ्या स्कूटरला अपघात झाला तेव्हा पोलिसाने लाच मिळवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड, अगतिकता आणि माझ्या ठामपणानंतर त्याने व्यक्त केलेला पोकळ राग.... एक ना अनेक.

आपल्याकडे भारतात पोलिस हा सहाय्यक अगदी क्वचीत, रक्षक कधी कधी आणि सहसा भक्षकच असतो। आणि हे तर मी आपल्या पुण्यातले अनुभव सांगीतले. दिल्ली बिहार युपी इकडची परिस्थिती तर कल्पनाच करवत नाही. आणि यात सर्वात भर म्हणजे हिंदी पिक्चरमधले संवाद! "हजार रुपयोंमे पेट नही चलता ... ईमान कैसे चलेगा।" - इति अमिताभ बच्चन (अग्निपथ). बरोबर आहे का ... वाचकहो? चुकभुल देणे घेणे. पेट कैसे नही चलता है? नाही चालत तर दुसरा काम धंदा करा. पोलिस म्हणजे काय "खातं" आहे?

खरे तर पोलिसांचाच फक्त हा दोष नाही। आपल्याकडे राज्यकर्ते नादान होते आणि आहेत. त्यांचा आदर्श पोलिस घेत आहेत. पूर्वी तैनाती फौजा आणि तनखा घेउन राज्ये केली... आणि आता भत्ते घेउन राज्य चालवतात. दोन्ही ठिकाणी संपत्ती चे निर्माण कमी आणि लुटच जास्ती.

हे राज्य आपले आहे... ही माणसे आपली आहेत... ही भावनाच दिसुन येत नाही. जे जनतेची लुट करतात त्यांना राज्य करण्याचा अधिकार कसला? इंग्रज हे परकिय होते... त्यांनी जे काही कायदे केले ते इथल्या समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी होते. इथल्या समाजाचे भले करण्यासाठी नाही. स्वातंत्रानंतरही आज आपण इंग्रजाचीच राज्यपद्धती आणि दहशतवादाचे तंत्र आणि "फोडा आणि राज्य करा"चीच नीति वापरतो. फक्त फरक इतकाच आहे... की इंग्रजानी हे परकियांवर केले. आपण हे स्वकियांवर करतो आहोत.
दोन खुप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ... त्यांचा उल्लेख करतो .... परंतु त्याबद्दल आत्ता नाही लिहित। १. जनता अशी पिळवणूक का सहन करते? २. पाश्चात्य देशांचा इतिहास पाहिला तर ते तर आपल्या राज्यकर्त्यांपेक्षा अधिक क्रुर आणि धूर्त होते... तरिहि त्यांच्याकडे समृद्धि आणि आपल्याकडे दारिद्र्य का? मला वाटते पुढे कधितरि बोलेन....

परंतु आत्ता इतकेच सांगतो ॥ की सलोनी ... आपण जिथे
राहतो ... ज्यांचे आपल्यावर ऋण आहे कमीत कमी त्यांच्या हिताचा तरी विचार करणे हे आपले कर्तव्य आहे। तुझा जन्म जरिही अमेरिकेत झाला तरिहि तुझ्या जीन्स मध्ये शतकानुशतके चा भारतीय वारसा आहे. तो कधीहि विसरु नकोस.

बाबा

Wednesday, March 18, 2009

आईशी संवाद - भाग २ (4D अल्ट्रासाऊन्ड)

प्रिय सलोनी

काल तुला बघण्यासाठी माझी दुसर्यांदा 4D अल्ट्रासाऊण्ड झाली। यावेळी मी अल्ट्रासाऊण्डला जाताना जय्यत तयारीनिशी म्हणजे व्यवस्थीत जेवुन, थण्ड ज्युस/सोडा पिऊन आणि चॉकलेट खाऊन गेले होते। जणुकाही तुला मी मांडीवर घेतले आहे अशी तु पोटात बसलेली दिसलीस आज. पहिल्या दोन मिनीटात वाटले की बहुतेक दुसर्यांदा निराश होऊन आम्हाला तुला न बघताच परत जावे लागणार. पण तितक्यात तुझी भरपुर हालचाल सुरु झाली. माझ्या उजव्या बाजुला अगदी कडेला तुझे डोके आहे. म्हणुन मला डाव्या कुशीवर झोपवण्यात आले. मी, तुझा दादा आणि तुझे बाबा तुला एका मोठ्या पडद्यावर बघत होतो. तु एकदा तोंडात एका हाताची सगळी बोटे घातली होतीस. तुझे दोन्ही पाय अगदी तुझ्या गालावर टेकले होते. अल्ट्रासाऊण्ड करणारी बाई आम्हाला म्हणाली की तुला आत हलायला जागा नाही, त्यामुळे चेहेरा दाबला जात आहे. हे ऐकल्यावर लक्षात आले की थोड्या आठ्वड्यांआधीच म्हणजे २६ ते २८ आठवड्यांदरम्यानचा काळ हा 4D अल्ट्रासाऊण्ड्साठी योग्य आहे. असो .... तुला पाहून मला अगदी सिद्धुचा जन्म झाल्यानंतरचा चेहेरा आठवला.

तु तोंडातुन हात काढावास म्हणुन त्या अल्ट्रासाऊण्ड करणार्या बाईने जरा माझे पोट हलवले तेव्हा तुला काही सेकन्द रडताना पाहिले. नंतर मध्येच एकदा तु डोळे उघडलेस आणि बन्द केलेस. तुझे हे सगळे चेहेर्यावरचे भाव बघताना खुपच मजा वाटली. कालचा दिवस कसा मस्त गेला!

नंतर घरी आल्यापासुन रात्रिपर्यंत फक्त 4D अल्ट्रासाऊण्ड्चाच विषय डोक्यात घुटमळत होता. इतके दिवस मला कुतुहल वाटायचे की दर आठवड्याला मी जे प्रेग्नन्सी लेटर वाचते त्यातले इतके बारकावे या माणसांनी कसे अभ्यासले असतील? परन्तु आता लक्षात येते आहे की 4D अल्ट्रासाऊण्ड्चे तन्त्र हे तब्बल १४ वर्षे जुने आहे. या तन्त्रामध्ये बाळाचा जो विशिष्ट भाग बघायचा असेल तो आधी नेहेमीचे म्हणजे 2D अल्ट्रासाऊण्ड वापरुन बघतात. नंतर त्या विशिष्ट भागावर फ़ोकस करून मग 4D अल्ट्रासाऊण्ड चा कॅमेरा चालु करतात. या 4D कॅमेर्यामधुन येणारे चित्र जुन्या काळातल्या फोटोंसारखे पिवळसर असते .... परन्तु बाळ बर्यापैकी स्पष्ट दिसते. अश्यारितीने बाळाच्या वाढीदरम्यान घडणार्या बारिकसारिक गोष्टींचा अभ्यास केला जातो.

4D अल्ट्रासाऊण्ड बघुन अजुन एक विचार माझ्या मनात आला. तो म्हणजे बाळ पोटात असताना देखील त्याला हसणे, रडणे, भिती या सर्व भावना असतात. त्यामुळे गर्भसंस्कारही खुपच महत्वाचे आहेत. गरोदर स्त्रीने फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करणे, चांगल्या गोष्टी वाचणे, चांगल्या गोष्टी ऐकणे, सतत प्रसन्न राहणे, हे किती महत्वाचे आहे हे आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करता येते. पूर्वी आपल्याकडे या सर्व आधुनिक गोष्टी नसतानासुद्धा आपल्या पूर्वजांनी हे कसे काय ओळखले असेल असा प्रश्न पडतो!!

Tuesday, March 17, 2009

धर्मस्य गति सूक्ष्मः

प्रिय सलोनी,
आज मी ज्या विषयावर लिहिणार आहे तो विषय थोडासा बोजड आहे. तुला या गोष्टी कळायला त्यामानाने थोडा जास्त वेळ लागेल. परंतु विषय अतिशय महत्वाचा आहे म्हणुन आवर्जून लिहितो आहे. जसजशी तु मोठी होशील तसतसे तुला अधिक कळु लागेल. बर्याचदा असेच असते, नाही? आपल्याला एखादी गोष्ट कळली आहे असे वाटते. परंतु पुन्हा पुन्हा नव्याने अर्थ कळत राहतो वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ... काहिसे तसेच.
असो .. तर मागील काही दिवसांमध्ये इकडे अमेरिकेत ए.आय.जी. नावाच्या कंपनीच्या बोनस वरून खूप मोठे वादळ उठले आहे. इतके मोठे की अमेरिकेच्या अध्यक्षांना सुद्धा त्या वादळात उतरावे लागले. आणि त्यांच्या पाठोपाठ सर्वच राजकारणी लोक या वादात पडले आहेत. एका कंपनीच्या बोनस वरुन एवढ वाद का व्हावा ? वादाचे मुख्य कारण असे की ए.आय.जी. पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सध्या केवळ यु.एस. सरकारच्या आधरामुळे ती तग धरुन आहे. यु.एस. सरकारने या कंपनीला असे साह्य करण्याचे कारण म्हणजे ही कंपनी अमेरिकेच्या आणि पर्यायाने जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्वाची आहे. जर या कंपनीचे काम बंद पडले तर आधीच डबघाईला आलेली अमेरिकेची आणि जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणेच कोलमडुन पडेल. ए.आय.जी. सारख्या कंपन्या म्हणजे काही जादूची वीटच आहे अर्थव्यवस्थेच्या इमारतीतील. जर ही वीट काढली तर सम्पूर्ण इमारत कोसळण्याचा धोका! तर आता वाद याचा चालला आहे की यु.एस. सरकार जर या तोट्यात चालणार्या कंपनीला पोसत असेल तर व्यवस्थापनाला आणि कामगारांना बोनस देण्यात काय अर्थ आहे? कंपनीच्या आजच्या अवस्थेला हेच तर लोक बव्हंशी जबाबदार आहेत! या मुद्द्यावरून अमेरिकेत जनक्षोभ उसळला आहे. भारतात जनक्षोभ पुतळ्यांच्या विटम्बनेवरून, कोणाच्या कसल्या तरी लिखाणावरुन अथवा तुतार्या नगारे वाजवले किंवा नाही वाजवले म्हणुन होतो. सरकार पैसे वाया घालवते आहे म्हणुन जनक्षोभ उसळल्याचे कधी ऐकिवात नाही!!
असो ... जनक्षोभ ग्राह्य जरुर आहे. परंतु इथला व्यापारी आणि उच्चशिक्षीत (विशेषत: आर्थिक उद्योगांशी निगडित असलेला) तसेच उजव्या विचारसरणीच्या मंडळींना अशा बोनसला विरोध करणे धोक्याचे वाटते आहे. धोका कशाचा? तर अमेरिकेच्या मूल्यांना. "सॅन्क्टीटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट" अर्थात "कराराचे पालन" हा पाश्चात्य आणि भांडवलवादी विचारसरणीचा पायाच आहे. त्याशिवाय व्यापार होऊ शकत नाही. व्यापाराशिवाय सम्पत्ती निर्माण होणार नाही.
न्यायव्यवस्था करारांची अंमलबजावणी चांगली होईल यासाठी अतिशय दक्ष असतात. कोणत्याहि दोन किंवा अधिक व्यक्ती अथवा संस्थांमध्ये करार (लिखित अथवा तोंडी) झाल्यास त्याचे पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे. आपल्या पौर्वात्य मनाला एकदम त्याचे महत्व कळत नाही कारण कुठेतरि "मूल्ये" हा आपल्या जीवनाचा पाया असतो. आणि व्यापार हा आपल्या जीवनाचा एक भाग असतो. पाश्चात्यांचा इतिहास इतका रक्तरन्जीत असल्यामुळे त्यांच्याकडे नियमांना अधिक महत्व मूल्यांपेक्षा. जिथे स्थैर्य नाही तिथे मूल्ये सहसा असू शकत नाहीत. आज पाश्चात्य देशांत असलेली सुबत्ता ही स्थैर्यामुळे शक्य झाली आहे. आणि स्थैर्य हे नियमांचे पालन केल्यामुळे आले आहे.
पाश्चात्य मन आयुष्याकडे संघर्ष म्हणुन बघते. त्यामुळे इथे बर्याच नात्यांमध्ये अविश्वास असतो. 'Trust but verify' हे वाक्य इकडे प्रसिद्ध आहे. त्यामुळे अर्थातच कराराला महत्व.
तर अश्या या समाजात जर ए.आय.जी. ने कामगार आणि व्यवस्थापनाशी काही करार केला होता बोनस देण्याबद्दल तर त्याचे पालन झालेच पाहिजे असे बर्याच मातब्बरांना वाटते. करार न्याय्य होता की नाही ही चर्चा करण्याची वेळ निघुन गेली असे यांचे मत.
बरोबर काय आणि चूक काय याचा निवाडा सोपा नाही. खुद्द ओबामांचे मत करार मोडण्या/वाकवण्याच्या दिशेने आहे कारण त्यांना मतदारांचा क्षोभ परवडणारा नाही. परंतु लोकक्षोभ हा प्रत्येकवेळी न्याय्य असतोच असेही नाही.
एकंदरीत विषय सोपा नाही. मला विचारशील तर माझ्याकडे निश्चीत उत्तर नाही. धर्मस्य गति सूक्ष्म: - तसे आहे हे. (भीष्म बहुधा अमेरिकन असावा!).
असो ... आपल्याकडे सगळी उत्तरे असती तर आयुष्य इतके मजेशीर वाटले नसते. हो की नाही?

Sunday, March 15, 2009

4D अल्ट्रासाऊण्ड

सल्लु,
काल आम्ही तुझी 4D अल्ट्रासाऊण्ड करायला गेलो होतो. 4D अल्ट्रासाऊण्ड ही वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक गोष्ट नाही। इकडे अमेरिकेत तंत्रज्ञान प्रगत आहे. 4D अल्ट्रासाऊण्ड द्वारे बाळाचा जन्म होण्याच्या आधिच बाळाचा चेहेरा पाहता येतो. चित्र अर्थातच नेहेमीच्या फोटो इतके स्पष्ट नसते. परंतु बाळाचा एकंदरीत तोंडवळा नक्कीच कळतो. तर आम्ही इथेच घरापासुन २ मैलावर (अमेरिकेत हे एक विचीत्र आहे. मैल, गॅलन, फुट, पाउण्ड ... सर्वकाही जगाच्या उलट! त्याबद्दल पुन्हा कधितरी!) एका ठिकाणी गेलो. अर्थात ही वैद्यकिय गरज नसल्यामुळे ही अल्ट्रासाऊण्ड आरोग्य विम्याकडुन मंजुर नसल्यामुळे आम्हीच १२९ डॉलर्स मोजले (सध्या आर्थिक मंदीमुळे १२९ - नाहीतर ३०० आहे म्हणे. मला माझ्या बहिणीची आठवण आली. ती तुळशीबागेतुन काही तरी गरज नसलेल्या वस्तु खरेदी करायची आणि वडिलांना म्हणायची सेल मध्ये ५० रुपयामध्ये मिळाले आहे, नाहीतर १०० किंमत आहे!)असो.. परंतु ते दुकान एकंदरीत जोरात चालले होते. भरपुर गर्दी होती. १२९ डॉलर्स मध्ये २० मिनिटे अल्ट्रासाऊण्ड आणि ४ रंगीत फोटो अनि एक सीडी. असे पॅकेज आहे.
परंतु सलोनीबाई तुमचा मूड काही ठिक नव्हता. तुझे डोकेच सापडेना. (डोकं फिरलया .. बयेचं डोकं फिरलया! - मुग्धाचं गाणं मनात येउ लागलं.). अल्ट्रासाऊण्ड च्या बाईने मग सोनालीचे पोट धरुन हलवले. आम्ही दोघेही दचकलोच! पण जेणो काम तेणो ठाय असा विचार करून गप्प बसलो. बर पडद्यावर काय दिसते आहे तेही काही कळत नव्हते. ती म्हणाली पाय आहे आपण म्हणायचे पाय आहेत. ती डोके म्हणाली की आपण म्हणायचे डोके. असो ... परंतु एकदा तिला काही तरी निश्चीत सापडले असे दिसले ... आणि तिने मग एक जादुचे (जी ई कंपनीचे) बटण दाबले आणि सिद्धुचा जन्म झाला त्यावेळी तो जसा दिसत होता तसाच चेहेरा काही क्षण दिसला.
परंतु अगं राणी तु अशी रुसुन बसलीस की त्या एक-दोन क्षणांपलिकडे विशेष काही दिसले नाही.
त्यामुळे आम्ही आता मंगळवारी पुन्हा जाणार आहोत. त्यावेळी भरपुर गार आणि साखरयुक्त असे पेय घेउन यायला सांगीतले आहे. बघु त्यावेळी तरी तुझी मर्जी होते काय आमच्यावर.

Saturday, March 14, 2009

आईशी संवाद.

प्रिय सलोनी,
तुझ्या आईला आता दिवसेनदिवस अवघड होत चालले आहे. परन्तु आज तिला देखिल काही तरी लिहावे अशी उर्मी आली आहे. त्यामुले तिच्याशी बोल!
बाबा

प्रिय सलोनी,
आज तुझ्या बाबाला टायपीस्ट करून मी तुझ्याशी तुझ्या दादाबद्दल गप्पा मारणार आहे. यावेळी जेव्हा तुझ्या आगमनाची चाहुल लागली तेव्हा २ वर्षांपुर्वी झालेल्या मिसकॅरेज मुळे आम्ही ही गोड बातमी कुणाशीही शेअर न करण्याचे ठरवले. तुझ्या दादाला कळले की सर्वांना कळणारच. म्हणुन त्यालाही सांगीतले नाही. माझी होम प्रेग्नन्सी टेस्ट पॉझीटीव्ह आल्यावर लगेचच मला अतिशय उलट्या चालु झाल्या आणि अशक्तपणा जाणवु लागला. त्यातच एके दिवशी मी सिद्धुला पोहण्याच्या सरावाला घेउन गेले आणि तिथुन परतताना मला चक्कर आली. इथे असे काही घडले तर लगेच पॅरामेडिक्स बोलवले जातात. ते आले. त्यांनी मला तब्येती बद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर लगेचच मी त्यांचा वेळ वाचवण्यासाठी प्रेग्नंसी बद्दल सांगीतले. सिद्धु बरोबर असल्यामुळे त्याने ते ऐकले ( तसा चतुर गडि आहे - इति बाबा). आणि अश्या रितीने त्याला ही बातमी कळाली.
बातमी कळाल्याबरोबर तो खुप खुष झाला. आणि त्याचे सर्व नियोजन चालु झाले. तो अचानक खुप समंजस मुलासारखा वागु लागला. शाळेत जाताना पटापट आवरुन तयार होऊ लागला. शाळेतुन आल्यावरही स्वत:ची कामे स्वत: करु लागला.
पहिल्या अल्ट्रासाऊण्ड ला जेव्हा मी आणि तुझे बाबा गेलो, तेव्हा तेथील तज्ञ आम्हाला म्हणाली की बाळाचे लिंग नंतरच्या म्हणजे १६ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊण्ड मध्ये कळेल. परन्तु तुम्हाला जर दुसरे मुल असेल तर त्याला विचारा की तुला भाऊ होणार की बहीण? तिचा असा अनुभव आहे की बहुतेक वेळा लहान मुलांचा अन्दाज खरा ठरतो. हे ऐकुन आम्ही ही तुझ्या दादाला विचारले की तुला बेबी सिस्टर आहे की बेबी ब्रदर? तेव्हा दादा म्हणाला - बेबी सिस्टर. त्याचे हे उत्तर ऐकुन आम्हाला अतिशय आश्चर्य वाटले. कारण तो अथर्वच्या म्हणजे माझ्या भाच्याच्या जन्मानंतर नेहेमी म्हणायचा की मलापण एक बेबी ब्रदर हवा. "बेबी ब्रदर्स आर फन." असो.
नंतर तो स्वत:हुन नावांची शोधाशोध करु लागला. त्यासाठि त्याने त्याच्या शाळेचा कॅटलॉग वापरला. काही नावे शॉर्टलिस्ट केल्यावर "सलोनी" हे नाव त्यानेच निश्चीत केले. माझ्याकडुन या नावाचा अर्थ शोधुन घेतला. आम्ही जेव्हा त्याला हेच नाव का असे विचारले तेव्हा त्याने आम्हाला सांगीतले की त्याला ’स’ या अक्षराने सुरु होणारे नाव हवे होते (बाबा गेला मायनॉरिटीत!). दुसरे म्हणजे - सोनाली हे माझे नाव इंग्रजी मध्ये ऊलटेसुलटे केले तर सलोनी हे नाव तयार होते - इति सिद्धु! आणि अर्थातच तिसरे म्हणजे सलोनी म्हणजे सुंदर. थोडक्यात काय तर सिद्धु ने सर्व विचार केला आहे. आता तुम्ही काहीही त्रास घेण्याची गरज नाही. ६ वर्षांचा हा तुझा दादा, पण किती विचार करतो? सध्याची पिढीच हुशार आहे. प्रत्येक गोष्टीत तर्कशास्त्र! अरे हो! हे नाव निवडताना अमेरिकन लोकांना उच्चार करता येइल का याचाही त्याने विचार केला. मला नाही वाटत की बरेच मोठे होई पर्यंत आमच्या पिढीला एवढी अक्कल होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या यादीमध्ये एकही मुलाचे नाव नव्हते. तो अगदी ठाम होता की मुलगीच आहे.
अखेर आम्ही १६ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊण्ड्ला गेलो तेव्हा लिंगनिदान झाले आणि मुलगी असल्याची खात्री झाली. मग काय, दादाची तुझ्या खरेदी ची लगबग चालु झाली. प्रत्येक गोष्ट ही त्याच्या पसंतीने खरेदी करायची. नाही तर स्वारी रुसलीच.
दादाला तुझ्या प्रत्येक गोष्टीत रस असतो. तो माझ्या बरोबर बेबी सेंटर या संकेतस्थळावर जाऊन दर आठवड्याला तुझी काय वाढ होते आहे ते बघत असतो. तुझ्या बद्दल अनेक प्रश्न विचारतो. तुझ्या लाथेने खुष होतो. तुझ्यासाठी पियानोवर गाणे वाजवतो. तुझ्यावर निबंध लिहितो. तुझ्यासाठी पुस्तके वाचतो. असा हा तुझा दादा, जर तु पोटात असताना तुझ्यासाठी इतका गोष्टी करतो तर तु बाहेर आल्यावर तो काय काय करेल याची कल्पनाच करणे अशक्य आहे.
मी फक्त एवढेच म्हणु शकते की तुझ्या दादाने आणि बाबाने मिळुन तुला लाडाने बिघडवले नाही तरच नवल!

योग

सलोनी, मागील २ महिने मी इकडे य़ोग शिकायला सुरुवात केली. झाले असे की मुंबईहुन एक गृहस्थ इकडे फिनिक्स मध्ये आले होते. अशोक काणे. अशोकजी मुम्बईच्या योगविद्यानिकेतनमध्ये कार्यरत आहेत. निवृत्त झाल्यावर त्यांनी यो.वि.नि.मध्ये नियमीतपणे योगाचा अभ्यास आणि सराव सुरु केला आणि आता ते स्वत: योगाचा प्रसार आणि प्रचार करतात.
असो .. तर मी स्वत: मागील ७-८ वर्षे पाठीच्या दुखण्याने अतिशय त्रस्त आहे. त्यामुळे मी ठरवले की काहीही करुन ही संधी चुकवायची नाही. अशोकजींनी एकुण ८ वर्ग घेतले. मला स्वत:ला त्यामधुन खूप काही शिकायला मिळाले. त्यापैकि थोडेसे इथे काही.
१. योगाचे सर्वात महत्वाचे सुत्र म्हणजे - य़ोग: कर्मसु कौशलम. योग म्हणजे कामातील कौशल्य. असे कर्मसु कौशलम कशातुन येते .... तर त्याबद्दल पातंजलि म्हणतात - दीर्घकाल निरंतर. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दीर्घकाळ केल्यामुळे कौशल्य प्राप्त होते. योग म्हणजे व्यायाम नव्हे. व्यायामात ताकद वाढते. योगामुळे दम वाढतो ... एकाग्रता वाढते।
२. योगाचे दुसरे सुत्र म्हणजे डिफरेन्शीअल रिलॅक्सेशन. याचा अर्थ असा की आवश्यक तितकेच आणि आवश्यक तिथेच श्रम करणे. कोणत्याही आसनामध्ये आसनस्थ होण्यासाठी आवश्यक तेवढेच स्नायु वापरावेत. बाकीचे शरीर अगदी शिथील असणे आवश्यक आहे. ते तसे नसेल तर व्यायाम घडेल परंतु योग नाही घडणार।
३. योगाचे तिसरे महत्वाचे सुत्र म्हणजे एकाग्रता. एकाग्रता कशी प्राप्त करायची? त्यासाठी श्वासावर लक्ष केन्द्रित करायचे. शरिर हे शिथिल परन्तु मन एकाग्र! अवघड आहे. परन्तु अतिशय उपायकारक आहे. श्वास आत घेताना थन्ड असतो आणि बाहेर पडताना तो गरम हॊऊन बाहेर पडतो. हे जाणवले पाहीजे।
४. योगचे चौथे महत्वाचे सुत्र म्हणजे प्राणाचा अपव्यय टाळणे आणि मेन्दुला कमीत कमी प्राणवायु मध्ये काम करायची सवय करायला लावणे. म्हणजेच प्राणायाम. प्रत्येक श्वासागणिक आपण आपला प्राणच जणु त्याग करित असतो. त्यामुळे त्याची धारणा केली पाहिजे .. जतन केले पाहिजे. श्वास नेहेमी पोटातुन घ्यायचा. दीर्घ असेल तितके चांगले. आणि उछ्वास जास्त दीर्घ असायला हवा।
५. सर्वात शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे, क्रिया. वेगवेगळ्या योगक्रिया या वेगवेगळ्या ग्रंथींना व्यायाम घडवुन आणतात आणि शरिराचे कार्य नियमीत करतात.
आणि मग याव्यतिरिक्त वेगवेगळी विशिष्ट आसने, मुद्रा, बंध आणि क्रिया आहेत. परन्तु तो तान्त्रिक भाग आहे. मला वाटते की ही पाच सुत्रे जर आपण आचरणात आणली तर आपण योगाचे अधिक चांगले आचरण करू शकू.
अर्थात हा सर्व मला समजलेला योग आहे. मी काही तज्न्य नाही. परंतु मी योग अधिकाधिक शिकणार आणि शिकवणार हे नक्कि.
मागील काही वर्षांमध्ये असे चित्र झाले होते कि अमेरिकेत भारतापेक्षा योगाचा प्रसार खूपच जास्त होत चालला होता. परन्तु मागील काही वर्षांमध्ये भारतातही चांगली योगजागृति झाली आहे.
आपले हे पुरातन शास्त्र आपणा सर्वांना शारिरिक आणि मानसिक आरोग्य प्रदान करो! आज इतकेच पुरे.

Thursday, March 12, 2009

स्लमडॉग मिलिओनेअर

सलोनिबाई ..... इकडे अमेरिकेत येउन मी जितके हिन्दी आणि मराठी चित्रपट पाहिले आहेत ते मी भारतात सुद्धा कधी पाहिले नव्हते। भारतात मी इन मीन ४-५ हिन्दी चित्रपट टॉकीज ला जाऊन पाहिले असावेत। मराठी तर एक सुद्धा नसेल ... कदाचित बाल शिवाजी (आनंद आगाशे)च फक्त अपवाद। परन्तु इकडे अमेरिकेत येउन हिन्दी मराठी चित्रपट आवडू लागले। मराठी गाणी विशेषतः ! आणि सध्याच्या सा रे ग म प little champs ने तर वेड लावले। आता मात्र भारतात गेलो की सहसा टॉकीज ला जाऊन मराठी चित्रपट पाहतो। जत्रा धमाल होता। वळु तर थोर होता। वळु श्रीकांत (यादव) बरोबर पाहिला। त्यामुले अगदी चित्रपट कसा बनवला इत्यादि गोष्टींची सुंदर माहिती कळलि।

असो .... इकडे अमेरिकेत मराठी हिन्दी चित्रपट पहायचे म्हणजे ... चकटफु इन्टरनेट वर घर बसल्या पहायला मिळतात। तर १ महिन्यांपूर्वी स्लमडॉग मिलिओनेर पहिला। चित्रपट अफलातून आहे। पाश्चिमात्य लोकांची कुठलीही कृति अफलातूनच वाटते कारण त्यामागे कष्ट ओतलेले जाणवतात। दृश्ये, संवाद, नेपथ्य सगळीकडे बारीक बारीक गोष्टींचा विचार केलेला दिसतो। थातुर मातुर काम करणे हां आपला भारतीयांचा गुणधर्म। चाणक्य सारखी मालिका एखाद दुसरीच। दादा १० वर्षांपूर्वी एकदा मला म्हणाले होते ..की भारतीय लोकांकडे पाश्चिमात्य लोकांसारखी शिस्त आणि कष्टाळुपणा दिसेल असे एकच क्षेत्र आहे ते म्हणजे शास्त्रीय संगीत आणि नृत्य। मला वाटते ते बव्हंशी खरे आहे। नाही तर महात्मा गांधींवर चित्रपट काढण्यासाठी रिचर्ड अॅटनबरो कशाला पाहिजे? आपण का काढू शकत नाही? सावरकर शिवाजी महाराज यांच्या चरित्राला न्याय करेल असा चित्रपट अजून निघायचाय। आपण वाट बघू।

परन्तु तोपर्यंत कमीत कमी केवळ तांत्रिक दुष्ट्या चांगला आहे आणि एकंदरीत उत्तम दिग्दर्शन पटकथा आहे म्हणुन आपल्या गरिबीचा बाजार, सामाजिक प्रश्नांचे भांडवल, हिंदूंची अवहेलना, मुंबई पोलिसांवर अकारण टीका आणि मुस्लिमांची न होणारी गळचेपी दाखवणार्या चित्रपटाला ऑस्कर कसा काय मिळतो याचा थोड़ा विचार करायला हवा। किंबहुना ऑस्कर मिळण्याचे हेच निकष आहेत की काय असे वाटते।

फोड़ा आणि झोडा हे तंत्र वापरणार्या इन्ग्रजान्चीच औलाद हे असे ऑस्कर बहाल करू शकते। प्रतेक वेळी भारताला नावे ठेवानार्याच लोकांना पुरस्कार का मिळतात। अरुंधती रॉय, तो हैदराबादचा कुणी शहाणा (अरविंद अदिगा) यांच्या पेक्षा आपल्याकडे लेखक चांगले झाले नाहित का? की सत्यजित राय, राज कपूर, गुरुदत्त याचे चित्रपट इतके चांगले नव्हते?

भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात उत्पादन अगदी कमी होते, ९९% कृषिप्रधान देश होता, आयुर्मान ५०-५५ वर्षे होते, गरीबी ७०% च्या पुढे होती। आज भारत आपले उपग्रह सोडतो अवकाशात, शेती अर्थव्यवस्थेच्या ३०% च्या आसपास आहे, आयुर्मान वाढत आहे आणि गरीबी २५% आहे। दर वर्षी एक ऑस्ट्रेलिया जन्माला घालणार्या देशाने हे साध्य करायचे म्हणजे काही कमी नाही। बरे त्यातुनही चीन आणि पाकिस्तान सारखे शेजारी आहेत। आणि त्यांना प्रोत्साहन देणारे पश्सिमात्य राष्ट्र (अमेरिकेसकट) आहेत। आज कश्मीर प्रश्न नसता तर भारत अजून १०० पावले पुढे असला असता। पंजाबचा दहशतवाद नसता तर अजून २०० पावले पुढे असला असता। आज देखिल नक्शल वाद्याना हत्यारे कुठून मिळतात? आणि का?

वस्तुस्थिति ही आहे की आपण भाबडे आहोत। या भाबडेपणानेच आपला घाट केला आहे शतकानुशतके। शिवरायांचे हेच तर महत्व! सावरकरांच्या भाषेत "ही युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी" अशी शिवरायांची कूटनीति होती। २१ वे शतक भारत आणि चीनचे असणार आहे यात शंका नाही। आणि म्हणुनच आपल्या प्रगतित खीळ घालायला अनेक जण उत्सुक आहेत। कधी पाकिस्तान ला साह्य, कधी अतिरेक्यान्ना उत्तेजन, कधी नक्शलवाद्यान्ची भलामण तर कधी आर्थिक गळचेपी, आणि अगदी काही नाही तर भारत विरोधी गोष्टीना प्रोत्साहन। भारतद्वेशाची आणि भारताला रोखण्याची ही अशी नानाविधा साधना आहे।

स्लमडॉग - चित्रपट चांगलाच आहे... परन्तु आपल्या गृहछिद्रान्चे परकियान्नी प्रदर्शन मांडावे आणि आम्ही टाळ्या वाजवाव्यात हे मानसिक गुलामगिरी किंवा दिवाळखोरिचे लक्षण आहे।

सलोनी ... भारतीय संस्कृति वसुधैवकुटुम्बकमता सांगते तशीच निळ्या कोल्ह्याची गोष्टही सांगते। दोन्ही ही गोष्टी खर्या आहेत। परन्तु भाबडेपणा उपयोगाचा नाही। त्याने स्वार्थ ही बुडेल आणि परमार्थ ही साधणार नाही। परवशतेचे धुपाटणे मिळेल।

Wednesday, March 11, 2009

टॉमची आई

प्रिय सलोनी .... टॉम म्हणजे माझा boss ! तसे भलतेच जालिम प्रकरण आहे। ६०-६५ वर्षांचा, अतीशय धूर्त, धोरणि, बुद्धिमान आणि कंपनीच्या राजकारणात मुरलेला माणुस आहे तो। मुळचा जर्मन परन्तु मागच्या ३-४ पिढ़्यांपासून अमेरिकेत स्थाईक झालेल्यान्पैकी एक आहे। जर्मन लोक तसे बोलायला अतीशय मोजके, काहीसे ताठ परन्तु अतीशय शिस्तबद्ध असतात। अमेरिकेत येउन हां समाज पूर्णतः अमेरिकन झाला आहे। जर्मनी या आपल्या मुळच्या देशाबद्दल प्रेम असते परन्तु अमेरिका हाच आता स्वीकारालेला देश झाला आहे यांचा। तसे जर्मनच नाही तर सर्वच देशांच्या लोकांबद्दल असे म्हणता येइल। असो... तर हां टॉम ५ वर्षांपासून माझा boss आहे। सुरुवातीला रुक्ष असलेला टॉम मागील १-२ वर्षात भलताच बदलला आहे। सलोनिच्या भावी आगमनाची बातमी त्याला ताबडतोब कानावर घातली होती। तेव्हापासूनच तो कळत नकळत मला जपत जपतच काही काम सांगतो। इथे family म्हणजे कौटुम्बिक बाबींमध्ये कम्पनिमधिल वरिष्ट खूपच सहकार्य करणारे असतात। त्यामुळे त्यानेही मला अगदी वाटेल तेव्हा वाटेल तिथून काम करण्याची मुभा दिली आहे। इथे नोकर चाकर नसतात ... नातेवाईक किंवा आप्तेष्टांचा आधार कमी असतो आणि सहसा नवरा बायको दोघेही नोकरी करतात अशीच परिस्थिति सर्वांची असते। त्यामुळे काही कौटुम्बिक अड़चण आली तर सहसा कामाच्या वेळात सुद्धा घराची काम आटोपली तर चालते। सहसा तुम्हाला दिलेले काम तुम्ही पूर्ण करावे अशी अपेक्षा असते। लवकर पूर्ण केले तर उरलेल्या वेळात आपण काहीही करू शकतो।

असो ... तर आज टॉम अगदी रंगात आला होता। याची आई अजूनही ठणठणीत आहे। आईचा विषय काढला की हां रुक्ष माणूस अगदी जिवंत होतो। इतके दिवस मला माहीत होते की टॉम ची आई ८०-८५ वर्षांची आहे। परन्तु आजच्या ग़प्पान्मध्ये कळले की टॉमची आई "थोर" आहे। ८०-८५ वर्षांची ही आजी अजूनही कार्यरत आहे। त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघाची मागील १५ वर्षे अध्यक्ष आहे। स्वतःच्या ६ नातवंडान्ना प्रत्येक आठवड्यात स्वतःच्या हस्ताक्षराचे १ पानी पत्र लिहून पोस्ट करते। अमेरिकेत भारतीयांची सहसा अशी कल्पना असते की अमेरिकन कुटुंब व्यवस्था अगदी ढासळलेली आहे। काही प्रमाणात ते खरेही आहे। परन्तु कुटुम्बवत्सल एकमेकांसाठी जीव देणारी, अगदी अनोळखि व्यक्तिन्साठी निरपेक्ष मदत करणारी ही खूपच उदाहरणे आहेत। असो ॥ परन्तु टॉम ची आई अगदी नेटाने सर्व कुटुम्बाला धरून आहे। ३०-४० वर्षांची तिची नातवंडे आवर्जून तिला भेटायला जातात। आजीची पत्र मित्रांना वाचून दाखवतात। Grandama's movie reviews नावाची वेबसाइट चालू करण्यासाठी धडपड करतात कारण आजीने सिनेमा पाहिल्या पाहिल्या पहिल्यांदा नातवंडान्ना सांगितले असते। ८०-८५ व्या वर्षी ही आजी एकटी रहते। बोलिंग करते। कंप्यूटर शिकते। फ्रांस मधल्या पतवन्डान्ना इमेल्स लिहिते।

मी मनोमन थक्क झालो। तशी साधी साधी माणसे भेटतात आयुष्यात ... परन्तु कधी कधी त्यांना खूप खोली असते। जवळ गेल्याशिवाय जाणवत नाही। तसेच आपल्या मनामध्ये खूप गैरसमज असतात। मन मोकळे नाही ठेवले तर नविन कल्पना आत येणारच नाहित आणि गैरसमज दूरच होणार नाहित।

कुठेतरी मी भारतातील ज्येष्ट नागारिकांशिही तुलना करू लागलो। आपल्याकडे नव्या पिढिबरोबर चालणारे लोक कमी दिसतात। नाही असे नाही। परन्तु नक्कीच कमी। "परिवर्तन ही संसार का नियम है" असे सान्गनार्या भागावाद्गीतेला मानणारे आपण लोक ... परन्तु आपल्याकडे बदल तसा बराच हळु येतो... असो ... त्याबद्दल पुन्हा कधीतरी....

होळी

प्रिय सलोनी, आज होळी आहे। इकडे आल्यापासून आम्ही भारताबद्दल सर्वात जास्त काय miss करत असू तर भारतातील सण सणावर! अश्या सणाच्या दिवशी हटकून आपल्याकडची आठवण येते। जीव हळहळतो
होळिचा दिवस परंपरेने महाराष्ट्रात जूने जाउदे सरणालागुनी (!!) या पध्दतीने साजरा केला जातो .... जे जे जूने आणि अनिष्ट ते ते या दिवशी जाळायचे ..... बव्हंशी प्रतिकात्मिकारित्या परन्तु कधी कधी शब्दशः सुद्धा हरकत नाही!! पूर्वी होळी आणि रंगपंचमी हे वेगावेगले साजरे केले जात होते। मागील २० वर्षात मात्र जसजसे उत्तरेतील लोक महाराष्ट्रात येऊ लागले आहेत ... तसतसे महाराष्ट्रात आजकाल होळी ला रंगांची उधळण देखिल वाढली आहे। त्यामुले आता होळी आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी रंग खेळला जातो। एकंदरीतच मला वाटते की होळी आणि दिवाळी हे सण भारतीय संस्कृतीचे सर्वात जास्त चांगले प्रतिनिधी आहेत। प्रकाश किंवा रंग कोणाला नको आहेत आयुष्यात? आणि ते जर वगळले तर आयुष्याला काय अर्थ आहे। गम्मत अशी आहे की या साध्या साध्या गोष्टी आपण इतक्या गृहीत धरतो की त्यांच्यापासून दूर गेलो की किम्मत कळू लागते। पाश्चात्य जीवन आणि संस्कृति चा गाभा हां खूप वेगळा आहे। जीवनाकडे ते संघर्ष आणि शोकान्तिकेच्या दृष्टिकोनातुनाच बघते। पाश्चात्य विचारवंत किंवा कलाकार यांचे लेखन संगीत काव्य नाटक सगळीकडे मानवाच्या अनुदात्त वर्तणुकीवर दृष्टी जास्त आहे। तो विचार चुकीचा नाही कारण तो विचार परिस्थितिजन्य आहे। पाश्चात्य लोकांचा पूर्ण इतिहास च मुली रक्तरंजित आहे। स्थल काल आणि पात्रे बदलतात। परन्तु अतीशय हिंसक वृत्तीचे प्रदर्शन अजूनही येथे आहे। आणि म्हणूनच इथे शस्त्रांचे (guns) महत्व आहे। असो ... परन्तु भारतीय संस्कृति आणि विचारसरणी तशी आशावादी प्रसन्न आणि माणसाच्या उत्तम गुणांना गौरवणारी आहे। पाश्चात्यांच्या तुलनेत कधी कधी भाबडी वाटेल..... परन्तु मला तरीही श्रेष्ठ वाटते।
प्रकाश आणि रंग जीवनात कोणाला नको आहेत? त्यांच्यामुळेच जीवन आहे आणि जीवनात आनंद आहे।
Happy Holi !!

Sunday, March 8, 2009

सोनालीची ग्लूकोज चाचणी २ आणि प्लेटलेट्स

मागच्या ग्लूकोज चाचणी नंतर असे दिसले की साखर चांगली विरघळली जात नाही आहे। म्हणुन परत तीच चाचणी केली। यावेळी मात्र १ तासाऐवजी ३ तासांची होती। प्रत्येक तासामध्ये एक कप सीरप प्यायला देऊन १ तासाने रक्त तपासायला घेतले। असे ३ वेळा केले। आणि या ३ नमून्यांची तपासणी वेगवेगळी केली। यावेळी साखर विघटन ठीक आले ... परन्तु रक्तामध्ये प्लेटलेट्स कमी आल्या। प्लेटलेट्स म्हणजे रक्तामध्ये असलेल्या काही विशिष्ट पेशी ज्या रक्त गोठायला मदत करतात। जन्म देताना - विशेषतः सी-सेक्शन करताना रक्तस्राव होतो। यावेळी शरीर नैसर्गिक रित्या रक्त गोठवते आणि प्लेटलेट्स एकमेकांमध्ये गुंतून रक्तप्रवाह अडवतात। प्लेटलेट्स कमीच असतील तर रक्त गोठायला त्रास पडतो। आणि अतिरक्तस्रावाने बाळंतीण स्त्रीचा मृत्यु होऊ शकतो।

परन्तु आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये या सर्व गोष्टींवर उपाय आहेत। त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही। आम्हाला ताबडतोब एका दुसऱ्या डॉक्टर कड़े जाण्यास सांगितले। ती डॉक्टर फक्त याच विषयामध्ये तज्ञ आहे। तिथे काही चाचण्या केल्या. त्यांनी सांगितले की प्लेटलेट्स कमी आहेत परन्तु आता काही करण्याची गरज नाही कारण १०० च्या आसपास आहेत। १५०-४०० हे निरोगिपणाचे लक्षण ... आणि ३५ हे अगदी गंभीर लक्षण। प्रसूतीच्या वेळी ती डॉक्टर ओपेराशन रूम मध्ये असणार आहे। त्याव्यतिरिक्त काहीही करण्याची गरज नाही।

मी विचार करू लागलो की भारतात खेडोपाड्यात अजूनही या सर्व गोष्टींचा किती विचार केला जात असेल। कधी कधी तर शहरातही अजूनही अज्ञान दिसते। केवल वैद्यकीय सुविधांचाही हां प्रश्न नाही। मुद्दा आपल्या समाजाच्या मोकळेपणाचाही आहे। आपल्या समाजात गर्भारपणा इत्यादि विषयांवर मोकळेपणाने बोलणे दिसत नाही। नैसर्गिक लज्जा हे मी समजू शकतो। परन्तु काही काही आरोग्यविषयक गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात त्यांच्याबद्दल प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे। गैरसमज दूर झाले पाहिजेत।

तसेच आपल्याकडे डोक्टरदेखिल आवश्यक ती माहिती रोग्यांना देत नाहित। यांना काय कळणार ही भावना योग्य नाही। अज्ञानात सुख नाही तर दुःखच आहे इथे। त्यामुले या विषयावर सामान्यांना कळेल अशी पुस्तके लिहावीत डोक्टरांनी। मी आणि सोनाली बर्याचदा इथे पुस्तकांच्या दुकानात जाऊन या विषयावरची पुस्तके वाचतो। त्यामध्ये बाळाची वाढ आणि स्त्री मध्ये होणारे प्रत्येक आठवड्यातिल बदल यावर अगदी सुंदर आणि अचूक माहिती दिली असते। मन थक्क होते की या पाश्चात्य लोकांनी एवढा अभ्यास कधी केला असेल!! आणि आता तर ही सर्व माहिती महाजालावर (internet) सुद्धा उपलब्ध आहे।
असो तर ... एकंदरीत उत्तम चालले आहे। इथे वैद्यकीय सोयीसुविधा चांगल्या (नव्हे जगात सर्वोत्तम) आहेत। त्यामुले काळजिचे कारण नाही। अजून ५ आठवडे झाले की सलोनिची वाढ पूर्ण होईल। त्यानंतर पुढचे ४ आठवडे फक्त वजन वाढत राहते ... ३६ ते ४० च्या आठवड्यात बाळाचा कधीही जन्म झाला तरी बाळाच्या आरोग्याला तसा धोका तितका नसतो। परन्तु आईच्या पोटापेक्षा अधिक माया अजून कुठेही मिळू शकत नाही बाळाला हेही तितकेच खरे।