प्रिय सलोनी
तुझी मामी येताना तुझ्यासाठी खूप काही कपडे, दुपटी, दागिने घेउन आली आहे. आम्ही इथे आधी बरीच खरेदी करुन ठेवली आहे. त्यात आता भारतातुन आलेल्या या वस्तुंची भर पडली. त्यामुळे आता काही काही वस्तु जास्त झाल्या आहेत. म्हणुन काही वस्तु परत करायला हव्यात. आई इकडे आली होती तेव्हा तिला हसु यायचे .... की इकडे खरेदी करायला म्हणुन; नाही तर खरेदी केलेल्या वस्तु परत करायला म्हणुन मॉलला जायचे! खरोखरच. फारच वस्तुवादी जीवनसरणी आहे इथे. पण काय करणार ? जीवाला गोड लागते त्यामुळे सर्वच जण या प्रवाहात पोहतात ...आणि तसेही हेही माहीत नाही की किती वस्तु म्हणजे खूप वस्तु आहेत. असो..... परंतु आजचा विषय वेगळाच आहे.
तर आज मी "बर्लिंग्टन कोट फॅक्टरी" नावच्या एका दुकानात स्लीप पोझिशनर परत करायला गेलो होतो. स्लीप पोझिशनर म्हणजे बाळाला सरळ झोपता यावे यासाठीची उशी आणि बाजुचे अन्थरुण. खरेतर आम्ही हे स्लीप पोझिशनर बरोबर ३० दिवसांपूर्वी विकत घेतले होते. उघडले नव्हते त्यामुळे वेष्टण तसेच होते. परंतु इथे व्यावसायिक स्पर्धा इतकी तीव्र असते की ग्राहकाने वस्तु परत केली तर बहुधा दुकाने परत घेतात. कालही तसेच घडले. दुकानदार अजिबात तक्रार करत नाहीत.
आपल्याकडे भारतात दुकानात पाटी लावलेली दिसते - "ग्राहको देवो भव।". परंतु दुकानदारांची त्या पद्धतीने वागणुक क्वचीतच दिसते. पु.लं.च्या भाषेत सांगायचे झाले तर पुण्याच्या दुकानदारांच्या दृष्टीने दुकानात सर्वात जास्त दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट म्हणजे ग्राहक!
प्रश्न पडतो.... असे का?
मला असे वाटते की अमेरिकेतील अर्थव्यवस्था विपुलतेवर आधारित आहे तर आपली अभावावर। थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेत वस्तुंची रेलचेल जास्त आहे. माणशी जास्त वस्तु वापरायला मिळतात. तेच भारतात कमी वस्तु आपण वापरतो. उदाहरणच द्यायचे झाले तर अगदी खाद्यपदार्थांपासुन ते कपडे खेळणी इलेक्ट्रॉनिक्स सर्वांचेच देता येइल. ही रेलचेल अशी अमेरिकेत जास्त का आणि भारतात कमी का हा तसा मोठा विषय होइल परंतु मला थोडक्यात असे वाटते की पाश्चात्यांनी त्यांची सर्व शक्ती आपले आजचे जीवन सुखकर कसे होइल यात ओतली आहे. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने अधिक उत्पादन कसे करता येइल, अधिक उत्पादकता कशी वाढेल याचा सतत विचार. ग्राहकाची उत्पादकता आणि क्रयशक्ती (अर्थात विकत घेण्याची क्षमता) या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. त्यामुळे ग्राह्क अधिक वस्तु घेउ शकतो. अमेरिकेतील बरीचशी श्रीमंती इथल्या लोकांच्या बुद्धीमत्तेतुन आणि कष्टांतुन आली आहे. काही जण याला आक्षेप घेतील ॥ आणि तेलासाठी (पेट्रोल) केलेले इराकयुद्ध याचा दाखला देतील. मला वाटते तेही सत्य आहे की अमेरिकेच्या या वस्तुंच्या हव्यासापोटी अमेरिकेने जगभर कच्च्या मालावर पकड करुन ठेवली आहे ... कारण तुमच्याकडे नुसते तंत्रज्ञान असुन भागत नाही. हातात कोंबडं नसेल तर उपयोग काय तुमच्या अत्याधुनिक ग्रिलचा! तसेच काही.
असो ... परंतु इथे वस्तुंची रेलचेल अशी असल्यामुळे दुकानदारांचे सगळे लक्ष खप वाढवण्यावर असते। वस्तु पडुन राहतील अशी त्यांना भीती वाटते. त्याउलट विकसनशील किंवा अविकसीत देशांमध्ये वस्तुंचा अभाव असल्यामुळे खपाची कधीच काळजी करण्याचे कारण नसते। वस्तु आज नाही तर उद्या खपणार याची दुकानदारांना खात्री असते. दुकानदारांची ग्राहकांप्रती सौजन्यशीलता (किंवा त्याचा अभाव) हे केवळ या फरकातुन आलेले लक्षण आहे।
भारतात जसजसे आपण आपली (म्हणजे सामान्य माणसाची) उत्पादकता वाढवु तसतशी त्याची खरेदी करण्याची क्षमताही वाढत जाईल आणि दुकानात मग सर्वात जास्त लक्ष देण्याजोगी वस्तु अशी त्याची ओळख होऊ लागेल!
2 comments:
आपली बहुल म्हण्जे जवळ जवळ ६५% जनता सामान्य आणि शेतिवर आहे.
.
आपण म्हटल्या प्रमाणे "आपण आपली (म्हणजे सामान्य माणसाची) उत्पादकता वाढवू तसतशी त्याची खरेदी करण्याची क्षमताही वाढत जाईल" . .. फक्त उत्पादकतेचा विचार करायचा झालाच तर या बळिराजाची उत्पादकता भरपुर असुनही त्याची कुठलिही वस्त्य खरेदी करन्याची क्षमता नाही आहे. (जीवनावश्यक वस्तू सोडुन, स्लीप पोझिशनर तर सोडाच, तसले काही खरेदी करायचे असते हेच त्यांना माहित नसते. ) ... म्हणुनच "उत्पादकता" हा एकमेव निकष न लावणे त्या उत्पादित मालाचे "उत्पादन खर्चावर आधारित मुल्यांकन" बाजारात व्हायला हवे हे महत्त्वाचे आहे. .
सचीन, धन्यवाद. मला वाटते चाकणचा शेतकरी थेट पुण्याच्या दुकानदाराला विकु शकला तर त्याला भाव चांगला मिळेल. मधल्या दलालांची संख्या कमी व्हायला हवी आणि त्यात पारदर्शकता आणि स्पर्धा यायला हवी.
परंतु याचबरोबर शेतीवर अवलंबुन राहणार्यांची संख्या कमी व्ह्यायला हवी. कुठल्याही प्रगत देशात १% पेक्षा अधिक लोक शेती करत नाहीत. भारतात अजूनही इतके लोक शेतीवर अवलंबुन आहेत कारण त्यांना दुसरा अधिक आकर्षक पर्याय नाही आहे. औद्योगीकरणाची गती वाढायला हवी.
Post a Comment