These are some of our conversations inspired by our new daughter SALONI ! ***** Copyright Baal-Saloni *****
Tuesday, April 14, 2009
बुध्दीस्तु मा गान्मम
प्रिय सलोनी
आज ऑफिसला येताना गाडीत नेहेमीप्रमाणे एन.पी.आर. म्हणजे नॅशनल पब्लिक रेडिओ लावला. त्यामध्ये राहुल गांधी आणि वरुण गांधी या गांधी घराण्याच्या वारसांबद्दल माहिती सांगत होते. अमेरिकेत किंवा पाश्चात्य जगातच एकंदरीत कुठलाही मुद्दा मांडण्याची शैली वाखाणण्यासारखी असते. दोन्ही बाजु आवर्जुन मांडल्या जातात. सभ्यतेची पातळी सहसा सोडली जात नाही. तसेच स्वैर आरोप केले जात नाहीत. प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठ स्वरुपात पुढे ठेवली जाते.
या सर्वांचा ऐकणार्यावर अपेक्षीत तो परिणाम नाही झाला तरच नवल. बोलणार्याची माती खपते पण न बोलणार्याचे सोनेदेखील खपत नाही म्हणतात ना ... तसेच. फरक इतकाच की बोलण्याचेही एक विशिष्ट तंत्र आहे. दुकानात दुकानदार जसे वस्तुंना चांगल्या आवरणात घालुन जास्त किमतीला विकतात तसे कुठल्याही बातमीला आपल्याला हवे तसे सादर करणे कसे असते हे इथे पहावे. प्रचार प्रसार आणि अपप्रचार यांचे पण एक तंत्र पाश्चात्य देशात विकसित झालेले दिसते. माझ्या अनेक आदरणिय शिक्षकांपैकी एक - श्री. किशाभाऊ पटवर्धन म्हणत असत - "अमृत फुटक्या मडक्यात दिले तर कोणिही पिणार नाही." त्याऊलट सोन्याच्या भांड्यात विष दिले तरीही लोक पितील.....
राहुल आणि वरुण गांधींची ती बातमी ऐकुन कोणालाही राहुल गांधी एक संयमीत आणि प्रागतिक व्यक्तिमत्व वाटेल. इंग्रजीतुन संभाषण करणारा, जनतेच्या प्रश्नांची मांडणी करणारा, आवाजात कळकळ ... असा नेता ... त्याउलट वरुण गांधीचे १० सेकंदाचे भाषण चिथावणीखोर आणि अगदी असंस्कृत वाटावे यापद्धतीने मांडले गेले. आणि मग अर्थातच वरुण हा भा.ज.प. या हिन्दु राष्ट्रवादी पक्षाचा प्रतिनिधी आहे हे सांगायला देखील विसरत नाहीत.
खरे काय याची शहानिशा करणे अवघड आहे. इथे अमेरिकेत बसुन तर अधिकच अवघड. तसेच मुद्दा कोण अधिक चांगला नेता आहे असाही नाही. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व मान्यता मिळण्याआधी दोघांनीही जनतेसाठी थोडे काम करणे गरजेचे आहे. मुद्दा प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेचा आहे. ज्या पद्धतीने बुश-चेनी सरकारने इराक युद्ध आरंभले आणि धादांत खोटा अपप्रचार केला, इतकेच नाही तर इतक्या प्रगत देशात आणि प्रगत समाजात ज्या सहजतेने वृत्तपत्रांनी सरकारचीच री ओढली ते पाहुन माझा आता एकुणच प्रसार माध्यमांवरचा विश्वास आणि आदर फारच कमी झाला आहे. केवळ चलाखी वापरुन सादरीकरणाच्या जोरावर सत्याचे असत्य आणि असत्याचे सत्य केले जाऊ शकते हे सिद्ध झाले.
भारतीय समाज आणि शासन - आजचे काय किंवा इतिहासातीलही, आपल्याकडे पुराणे आणि कर्मकांडातील काही गोष्टी सोडल्या तर बुद्धीभेद कमी दिसतो. किंबहुना बुद्धिभेद करणे हा बर्यापैकी पाश्चात्य शोध आहे म्हणायला हरकत नाही. भारताचे ब्रीदवाक्य "सत्यमेव जयते" आहे ही गोष्ट आपल्या राष्ट्रीय चारित्र्याबद्दल खुप काही सांगुन जाते. त्याऊलट कुठल्याही पाश्चात्य देशाचे ब्रीदवाक्य सत्याचे महत्व सांगत नाही. कारण असत्याचा वापर हा यांच्या व्यवहाराचा एक भाग आहे. म्हणुनच चोरांना गौरवणारे चित्रपट तुफान चालतात. स्पॅनिश लोकांनी दक्षिण अमेरिकेतील केलेला वंशच्छेद, आणि युरोपियनांनी केलेला रेड इंडियन्सचा वंशच्छेद यावर मुलामा दिला जातो.
भले भले लोक या अपप्रचाराला बळी पडतात. पुण्यात एकदा एका ज्येष्ठ व्यक्तीचे भाषण मी ऐकत होतो. त्यानी पाश्चात्य न्यायव्यवस्थेतील एका तत्वाचा उल्लेख केला - "न्याय केवळ करुन भागत नाही तर तो केला गेला आहे हे दिसायला हवे.". तत्व तसे ऐकायला छानच वाटते. परंतु याचे विकृत स्वरुप असे होऊ शकते की "न्याय होवो न होवो ... तो केला गेला आहे असे सर्वाना वाटले तरीही पुरे." आणि याची प्रचिती आपण जागतिक स्तरावर पाश्चात्य राष्ट्रांच्या दुटप्पी वागण्यातुन पहात असतोच. विषय आर्थिक असो, सुरक्षिततेचा असो, पर्यावरणाचा असो ... प्रत्येक वेळी जागतिक संस्थांच्या घटनातत्वांचा अवलंब प्रगत राष्ट्रांसाठी सोयिस्कररीत्या केला जातो. न्यायाचा आभास निर्माण करीत सोयिस्कर नसलेल्या सत्ताधिशांना आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आणले जाते आणि इतर हस्तकांना अभय दिले जाते. असो ... परंतु जाता जाता नमुद करावेसे वाटते की ऍन्ग्लो-सॅक्सन न्यायव्यवस्थेच्या वर नमूद केलेल्या मूलतत्वाचा जनक लॉर्ड ह्युअर्ट हा इंग्लिश इतिहासातील एक अतिशय कुप्रसिद्ध न्यायाधिश होता. त्याचा मूळ हेतु काहीही असो ... परंतु ह्युअर्टादपि सुभाषितम ग्राह्यम म्हणायच्या आधी त्या तत्वाची थोडी छाननी व्ह्यायला हरकत नाही.
असो .. प्रश्न पडतो की भारताबद्दल पूर्वी जे काही लिहिले गेले आहे आणि आजही जो काही प्रचार केला जातो त्यात तथ्य किती? अमेरिकेत मी बर्याचदा पाहतो की - योग ही अतिप्राचीन विद्या आहे असाच उल्लेख नेहेमी असतो. भारताचा उल्लेख गाळला जातो. बेंगॉल टायगर चा नेहेमी सुमात्रन टायगर असा उल्लेख असतो. भारताच्या उत्तम आणि उदात्त चित्रीकरणाचे तसे वावडे आहे आणि त्याऊलट स्लमडॉग अगदी चवीने पाहिला जातो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपला इंग्रजांनी किती बुद्धीभेद केला आहे! स्लमडॉगचे यश हे आपण भारताचे "यश" (!!) म्हणुन गौरवतो. त्याउलट खुद्द अमेरिकेत इंग्लंडशी निगडीत सर्व गोष्टींचा तिरस्कार केला जातो कारण एके काळी इंग्लंडने अमेरिकेचाही वसाहत म्हणुन वापर केला होता.
चिनी लोक मात्र भारतीयांसारखे भुलणारे नाहीत. त्यांना त्यांचा इतिहास माहित आहे आणि ते विसरत नाहीत. आपण त्यांच्याकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे. भारतात दोन सुपुत्र मात्र असे होऊन गेले की जे इंग्रजांना पुरते ओळखुन होते आणि त्यांना ते पुरुन उरले. पहिले म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज. आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. छत्रपतिंच्या काळात इंग्रजांचे बस्तान इतके बसले नव्हते आणि छत्रपतिंमुळे बसुही शकले नाही. महात्माजींच्या काळात इंग्रज भारताच्या उरावर बसले होते. अश्यावेळी "सत्य" आणि "अहिंसा" या दोन पूर्वापार तत्वांकडे गांधीजींनी भारतीयांना वळवले. अहिंसेबद्दल मी विचार करतो आहे काय रहस्य असावे या तत्वाचा अवलंब करण्यामागे. परंतु "सत्य" हे तत्व इंग्रजांच्या असत्य आणि अपप्रचाराला शह देण्यासाठी होते यात मला काही संशय नाही.
गांधीजींच्या एकाच गोष्टीचा उल्लेख करुन आजचा लेख संपवतो. कुण्या एका पाश्चात्य वृत्तपत्रकाराने गांधीजींना विचारले - "व्हॉट डू यू थिंक अबाऊट वेस्टर्न सिव्हिलायझेशन?". गांधीजी म्हणाले - "दॅट वुड बी अ गुड आयडिया". कोणत्याही भारतीय नेत्याने याहुन अधिक मार्मिक भाष्य केलेले माझ्या पाहण्यात आलेले नाही. पाश्चात्यांचा इतिहास रक्तरंजीत आणि कावेबाजपणाचा आहे. त्यांच्याकडुन शिकण्यासारखे भरपूर काही आहे ... परंतु त्याबदल्यात आपली बुद्धी गमावण्याची गरज नाही. मुद्राराक्षस नाटकात चाणक्य अतिशय हुशारिने राक्षसाचे सर्व सहाय्यक फोडुन आपल्या बाजुला वळवतो. त्यावेळी हतबल झालेला राक्षस म्हणतो भले सर्व जण मला सोडुन जावोत परंतु कमळाची मुळे जशी कमलपत्राला पाण्यावर स्थिर ठेवतात तशी माझी बुद्धीच एक मला या गदारोळात स्थिर ठेवु शकते ... तस्मात ..बुध्दीस्तु मा गान्मम ! गांधीजींजवळ अशी स्वत:ची बुद्धी होती की ती इंग्रजांच्या अपप्रचाराचा भेद करु शकत होती. त्यांच्यापासुन आपण काही शिकावे. बुद्धिभेद करणारी अनेक साधने जगात आहेत. त्यांच्या गर्दीत सत्याची कास धरण्याचे सामर्थ्य आणि सत्याचा ठाव घेण्याची पात्रता सलोनी तुला लाभो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Sunder :) jhaalay lekh.
Post a Comment