प्रिय सलोनी
मागील एक महिना इथे हवा इतकी सुंदर आहे की काय सांगु! भारतात असताना हवा नेहेमीच चांगली असायची त्यामुळे किंमत नव्हती. मिशिगनला आल्यानंतर पुण्याच्या हवेची किंमत कळली. मिशिगनला वर्षातुन जेमतेम ४ महिने साधे कपडे घालता यायचे. बाकीचे महिने सगळीकडुन गुंडाळुन घेतल्याशिवाय बाहेर पडताच यायचे नाही. सप्टेम्बरच्या सुमारास झाडांच्या पानांचा रंग बदलायचा ... ऑक्टोबरमध्ये सगळी पाने गळुन जायची. आणि मग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या बर्फाचे हृदय एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापर्यंततरी द्रवत नसे! आणि मग मे मध्ये गवताची पाने दिसु लागली की काय आनंद! तो आनंद जेमतेम सप्टेंबरपर्यंत टिकायचा ... की परत थंडीची चाहुल. आणि थंडी पण अशी की नुसते पुणेकर गारठलेच नाही तर पुणेकर अगदी गोठले अशी. माझ्या ओळखीतला एक सोलापुरचा मित्र आमच्या पुण्यातल्या लोकांवर फार चिडायचा. त्याच्या मते पुण्याचे लोक स्वत:ला फार अवास्तव महत्व देतात. जरा पाउस पडला तर "पुणेकर भिजले", थंडी पडली तर "पुणेकर गारठले", आणि उन्हाळा आला तर "पुणेकर होरपळले". (अजयदादांना हे सांगीतले त्याच्या दुसर्याच दिवशी प्रभात रोडवर एका बंगल्यात खुन झाला ... तर ते मला म्हणाले - "पुणेकर घाबरले"!!) ... असो ... पण पुणेकर अश्या टीकेला घाबरत नाहीत.
सांगायचा मुद्दा काय तर मी पुण्यात वाढलेलो त्यामुळे चांगल्या हवामानाला चांगलाच सोकावलो होतो. मिशिगनचे माझ्यावर उपकार झाले की तिथे मी चांगल्या हवेबद्दल कृतज्ञ राह्यला शिकलो.
तीच गोष्ट फिनिक्सची. इथे जुन ते सप्टेंबरपर्यंत असा कडक उन्हाळा असतो की बस! ऍरिझोना हे वाळवंटच आहे. त्या ४ महिन्यात इथे दुपारी कारमधुन खाली उतरुन घरात शिरेपर्यंत भाजुन जायला होते. अगदी रात्रीसुद्धा चांगले गरम वाटते. त्यामुळे आम्ही फिनिक्स मध्ये ऑक्टोबरची आतुरतेने वाट पहात असतो. नंतर डिसेंबर ते फेब्रुअरी परत कडाक्याची थंडी इथे.
सांगायचे काय तर पुण्याच्या हवेला तोड नाही. परंतु त्या हवेचे महात्म्य इथे बसुन कळते.
तर सध्या तरी फिनिक्स मध्ये हवा छान आहे. आता वाळवंटात झाडे आहेत यावरच कोणाचा विश्वास बसणे कठिण आहे ... मग त्यांना वसंतात पालवी फुटु शकते म्हटले तर लोक वेड्यात काढतील. परंतु खरेच ... सकाळी सकाळी ऑफिसला जाताना पिवळ्या रंगांनी नटलेली वाळवंटी झाडे छानच दिसतात. फक्त त्या परागकणांनी ऍलर्जीमात्र भरपूर होतात. परंतु या हवेमुळे मला आज एकदम ग्रॅण्ड कॅनियनची आठवण आली. कित्येक दिवसात गेलो नाही आहोत. केवळ तुझ्यामुळेच चिंगे! जशी तुझी बातमी कळली तसे आमचे भटकणे बंद झाले आहे. जुलै-ऑगस्ट मध्ये नायाग्रा आणि माउंट सेंट हेलेन्सला गेलो तेच. त्यानंतर फिनिक्स एके फिनिक्सच चालु आहे. बघु ... तु आल्यानंतर आपण सप्टेंबरमध्ये यलोस्टोन पार्कला जाउ.
तसे या गोष्टीचे मला कधीकधी वाईट वाटते... की एव्हाना आम्ही अमेरिकेत इतके फिरलो आहोत की आम्ही त्यामानाने भारतच कमी पाहिला आहे. प्रत्येकवेळी विचार करतो... की या भेटीत गोव्याला जाउ. परंतु एकदा पुण्याला पाय टेकले की आम्ही पुणेकर सुखावले! गोवा राहिला बाजुला!!
2 comments:
मस्त जमलाय लेख.. आवडला.ओघवती भाषा आणि विचार छानच जमले आहेत.
महेन्द्रजी धन्यवाद. तुमच्या वेबसाइट्ला मागच्या आठवडाभरात जाण्याचा प्रयत्न करतोय ... पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. कळत नाही काय. आणि २-३ वेगवेगळ्या कंप्युटर्सवरुन प्रयत्न केला... त्यामुळे कळत नाहिये.
Post a Comment