Sunday, April 12, 2009

आस्वाद

प्रिय सलोनी
परवा संध्याकाळी सिद्धुबरोबर फुटबॉल खेळत होतो. इथे घराशेजारीच एक मैदान आहे। ३-४ एकर असावे. मैदान तसे खोलात आहे. ३ बाजुने रस्ते थोडेसे उंचावर आणि एकाबाजुला आमचे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उंचावर. मध्ये अगदी सपाट असे मैदान. त्यामध्ये छोटी छोटी झाडे विखुरलेली.

लाथा मारण्याचा खेळ म्हणजे माझा हात(नव्हे पाय)खंडा! पुण्यात स।प.महाविद्यालयाच्या मैदानावर परशुरामियन्स म्हणुन फुटबॉल क्लब होता. तिथे जात असे॥ तेव्हापासुन फुटबॉलची चांगलीच आवड लागली. पुण्यात ऋतु कोणताही असो ... संध्याकाळी मैदानावर उतरण्यात चांगलीच मजा आहे. अगदी त्याचीच आठवण येईल अशी हवा पसरलेली होती इथे. उंच आकाशात दूरवर स्काय हार्बर विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळेपर्यंत घिरट्या घालणारी विमाने ... संध्याकाळच्या तिरक्या सूर्यकिरणांमध्ये सोनेरी-चंदेरी धुरांचे लोट सोडवीत फिरत होती. अगदी आय. आय. टी. पवईच्या टेकडीवरुन दिसणार्या अगदी याच दृश्याची आठवण करुन देउन नकळत घायाळ करुन जात होती। मुंबई शहर खरे तर मूळ सौंदर्यात पुण्यापेक्षा सरस आहे ... परंतु त्यासाठी थोडे उंचावरुन न्याहाळावे लागते. आय.आय.टी.च्या ६ महिन्यांच्या आमच्या ९५ सालच्या थोड्याश्या वास्तव्यात शिक्षणाव्यतिरिक्त अजुन काय केले असेल तर मुंबईवर प्रेम करू लागलो. हो! आणि आमिर खाँसाहेबांचा कायमस्वरुपी ऋणी झालो तेही तिथेच. इंटर्नशीप वगैरे तर गोष्टी होतच राहतात. मजा नेहेमी यातच असते की आपण अजुन काय काय केले मुख्य गोष्टीव्यतिरिक्त!!

असो ॥ सिद्धु खरोखरच इतका छान फुटबॉल खेळतो कि काय सांगु? लहान मुलांचे असेच असते। त्यांना थोडी एखाद्या विषयात चालना देण्याचा अवकाश .. की त्यांची गाडी त्या मार्गावरुन छान मार्गक्रमण करू लागते. पवईच्या वास्तव्यातच वासंतीताईंशी झालेल्या एका पत्ररुपी संवादात त्यांनी उल्लेख केलेला की शाखेवर मुलांना शिकवण्यात काय मजा येते. मजा येते हे तर खरेच ... परंतु मी त्यांना त्यावेळी चुकुन एक चांगली गोष्ट लिहुन गेलो ... की मुले लहान आहेत म्हणुन अगदी त्यांच्याशी लहानच गोष्टी बोलल्या पाहिजेत असे नाही. तुम्हाला वाटेल त्या विषयावर संवाद साधा. काय सांगावे त्यांच्यामध्ये कोणी ज्ञानेश्वर समोर बसलेला असू शकतो! मला वाटते खरे आहे ते. कुणाच्या मनात कसले बीज कधी आणि कुठे रोवले जाईल सांगणे कठीण आहे. शिक्षक म्हणुन आपण सहजतेने जमेल तितके चांगले विचार-आचार जरूर पोचवावेत. मी स्वत: लहान असताना पंडित नेहेरुंचे एक वाक्य पाचवीत असताना एका मासिकात वाचलेले - द वर्क ऑफ अ नेशन गोज ऑन. शेठ हिरालाल सराफ प्रशालेत माझी बहिण होती. त्यांच्या मासिक अंकात एका नववीतल्या मुलाने लिहिलेल्या लेखात ते वाक्य होते. का कुणास ठाऊक, ते वाक्य मला अजूनही चांगले लक्षात आहे. तो लिहिणारा मुलगाही विसरला असेल ... परंतु चांगल्या विचारांची तीच ताकद आहे ... ते चिरंतन आहेत.

असो ... तर मैदानावरील त्या वातावरणाने मला या सर्वांची आठवण करुन दिली. वाऱ्याच्या मंद लहरी, सिद्धार्थच्या चेहेर्यावरचा उत्साह आणि आनंद, गवताच्या पात्यांचे डोलणे, शेजारच्या फ्रीवेवरुन जाणार्या गाड्यांचे आवाज, मधुनच उमटणारी एखाद्या पक्षाची शीळ ....... काय उद्देश असेल? काय उद्देश असायला हवा? काही उद्देश असायलाच हवा का? माहित नाही। खरोखरच माहित नाही। परंतु इतके तर नक्कीच की माझे मन प्रसन्न होते ... शांत होते। इट वॉज अल्मोस्ट लाइक आय कुड हिअर द नेचर व्हिस्पर. निसर्गाचे स्पंदन जाणवत होते आणि माझेही मन त्याबरोबर स्पंदत होते. इफ देअर इस एनिथिंग कॉल्ड ब्लिस देन धिस इज हाउ इट मस्ट बी लाइक.

मला आठवले की माझे वडिल आम्हाला एकदा लहानपणी म्हणाले होते की तुम्हाला मोठेपणी काय व्हायचे आहे। ताईने सांगीतले तिला डॉक्टर व्ह्यायचे आहे। तिला शाबासकी मिळाली। पुढे ती डॉक्टर झालीही. दादा म्हणाला मला इंजीनियर व्हायचे आहे. पुढे तो खरोखरच झालाही. त्यालाही अप्पांनी शाबासकी दिलेली. मी मात्र म्हणालो होतो मला असे काही विशेष व्ह्यायचे वगैरे नाही. एक साधी नोकरी एक साधे घर पुरे होईल. अप्पा रागावले. म्हणाले या पोराचे डोकेच विचित्र! मला वाटते मला अप्पांचा प्रश्न कळला नव्हता आणि त्यांना माझे उत्तर! अप्पांचा प्रश्न होता की पुढे मोठे होऊन तुम्हाला काय करायचे आहे. आणि मी उत्तर दिले होते की मोठे झाल्यावर मला काय हवे आहे! "काय करायचे आहे" या प्रश्नाचे उत्तर आभाळापेक्षा मोठे असू शकते ... परंतु "काय हवे आहे" याचे उत्तर टॉलस्टॉय म्हणतो त्याप्रमाणे खूपच छोटे असते. आपल्याला ते कधी जाणवते तर कधी त्याचा विसर पडतो इतकेच काय ते.

परवाच दिवस अश्या दिवसांपैकी होता की त्यादिवशी मला माझ्याच लहानपणीच्या उत्तराची अनुभुती आली। तशी ती तुलाही वेळोवेळी येवो तुझ्या आयुष्यात इतुकेच मागणे परमेश्वरापाशी।

तुझा
बाबा

No comments: