Monday, April 6, 2009

ऍण्ड्र्यु कार्नेगी

प्रिय सलोनी
आत्ताच सिद्धुबरोबर इथल्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन आलो. सिद्धुला कसला तरी प्रोजेक्ट करायचा आहे शाळेत "लेपर्ड" अर्थात "चित्ता" या विषयावर. त्यामुळे वाचनालयातुन काही पुस्तके आणली त्याच्यासाठी. तशी सिद्धुची स्वारी लहानपणापासुनच पुस्तके म्हटली की खुश होते. अगदी सहा महिन्याचा असल्यापासुन त्याच्यासाठी एक गायीचे चित्र असलेले पुस्तक आणले होते तेव्हापासुन साहेबांना पुस्तके आवडतात असे कळले. अलिकडे व्हिडिओ गेम्सचे वेड लागले आहे ते वेगळे.
असो ... परंतु आज लिहावेसे असे वाटले की ... इथल्या वाचनालयात जातो त्या प्रत्येकवेळी माझ्या हृदयात एक वेदना उमटते. यासाठी की, भारतियांनी किंबहुना सर्वच जगाने हेवा करावा असे काय या अमेरिकेचे भाग्य की इथे प्रत्येक गावात किमान एक सार्वजनिक वाचनालय असते. आणि वाचनालय पण असे की अगदी सर्व सोयींनी सुसज्ज! सदस्यत्व नि:शुल्क असते. अगदी हवी तितकी पुस्तके घ्या. नवी, जुने सर्व पुस्तके सहसा उपलब्ध असतात. शैक्षणिक ध्वनी आणि चित्रफीतीदेखील उपलब्ध असतात. तसेच मागील ७-८ वर्षांत सर्व वाचनालयात नि:शुल्क इंटरनेटसुद्धा उपलब्ध झाले आहे.
या सर्वाचे श्रेय जर कुणाला द्यायचे झाले तर एकच नाव डोळ्यापुढे येते - ते म्हणजे ऍण्ड्र्यु कार्नेगी. कार्नेगी हा अमेरिकेतला एकेकाळचा सर्वात श्रीमंत माणुस होता. अमेरिकेच्या एकुण संपत्तीपैकी १% संपत्ती त्याच्या एकट्याकडे एकवटली होती एके काळी. कार्नेगी हा स्कॉटीश होता. तो लहान असताना अमेरिकेला आला आणि त्याने स्टील व्यवसायातात अमाप नाव आणि पैसा कमावले. परंतु नाव आणि पैसा कमावणारे जगात अनेकजण होऊन गेले आहेत. कार्नेगीचे वैशिष्ट्य असे की त्याने त्याची सर्व (हो सर्व!) संपत्ती त्याच्या हयातीतच समाजाच्या उद्धारासाठी वापरली. १८३५ मध्ये जन्म झालेला हा माणुस १९०१ साली निवृत्त झाला आणि त्याच्या मुत्युपर्यंत पुढील १८ वर्षे त्याने अनेक समाजोपयोगी कामे केली. सार्वजनिक वाचनालये हे त्यापैकी एक अतिशय प्रमुख काम होते. कार्नेगीने एकुन ३००० सार्वजनीक वाचनालये बांधली. त्यामागचा हेतु असा होता की सामान्य माणसाने शिकावे, वाचावे आणि विचारप्रवुत्त व्हावे. कोणाच्याही प्रगतीमागे चांगले विचार असतात ही त्याची धारणा होती. आणि शिक्षण आणि वाचनामुळे विचारांना चालना मिळते यासाठी ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवावे हा त्याचा आग्रह होता. याव्यतिरिक्त कार्नेगीने बर्याच शिक्षणसंस्था, कलासंस्था यांनादेखील मदत केली ... परंतु माझ्या मते त्याने बांधलेल्या सार्वजनीक वाचनालयांमुळे अमेरिकेतील सामान्यांपर्यंत ज्ञान पोचले आणि अमेरिकेची खरी शक्ती त्यातच आहे.
झाले बहु होतिलही बहु परंतु या सम हा! खरोखरच. रजनीशांची एक गोष्ट आहे की एक सम्राट मरण पावला .. आणि त्याने आयुष्यात बरेच पुण्य केले असल्यामुळे त्याला स्वर्गात प्रवेश मिळाला. सम्राटाला माहीत होते की स्वर्गात एक पर्वत आहे तिथे सर्व महान व्यक्तींना आपली नावे लिहिता येतात. त्यामुले त्याने चित्रगुप्ताला विचारले की मी सुद्धा या पर्वतावर नाव लिहु का? चित्रगुप्त म्हणाला - अर्थातच. जरुर लिहा. परंतु सम्राट जेव्हा त्या पर्वतापाशी पोचला तेव्हा त्या पर्वतावर नावे लिहायला जागाच शिल्लक राहिली नव्हती. तेव्हा तो परत चित्रगुप्ताकडे गेला हिरमुसला होऊन. तेव्हा चित्रगुप्त त्याला म्हणाला ... अरे वेड्या तुझ्यासारखे अगणित सम्राट होऊन गेले आहेत तुझ्याआधी. त्यांच्या नावांनेच तो पर्वत पूर्ण भरुन गेला आहे. काय करणार?
आपल्याकडे असे काही विद्यमान सम्राट आहेत जे स्वर्गात जायच्या आधीच इथे पृथ्वीतलावरच नाव लिहायला बघताहेत. परंतु त्यांना मुम्बईच्या समस्या दिसत नाहीत. जिथे रस्त्यावर गाडी चालवण्याची मारामार त्या देशात बायकोला बोईंग घेउन देतात आणि ३०% लोक जिथे दोन वेळचे जेवण जेउ शकत नाहीत तिथे २ अब्ज डॉलर्सचा महाल बांधतात. महाल कसला --- २ अब्ज डॉलर्सचे "आगे दुकान पिछे मकान आहे ते". वैशम्य वाटते. सध्या निवडणुकांचा काळ आहे आणि या सर्व समाजसेवकांच्या मालमत्तेचे शपथपत्रातले वर्णन ऐकुन घृणाच येते आहे कारण त्यामागचे त्यांचे कर्तृत्व आपण सर्वचजण जाणतो. म्हणुनच मला टाटांबद्दल अतीव आदर वाटतो. नॅनो हा केवळ एक व्यवसाय नाही आहे. त्यातुन टाटा वाहतुक सुरक्षीततेचा प्रश्न सोडवत आहेत. भारतीय कार उद्योगाच्या विश्वस्तरावर जाण्याचा पाया रचत आहेत.
असो ... परंतु कार्नेगीबद्दल सांगायचे झाले तर .. कार्नेगी सारखी माणसे जन्माला आली म्हणुनच या पृथ्वीला वसुंधरा म्हणतात. कार्नेगी, बिल गेट्स, वॉरेन बफेट, रॉक-अ-फेलर असे दानशूर उद्योगपती लाभले हे अमेरिकेचेही भाग्य. भारतात अगदीच दुष्काळ नाही परंतु देण्याची वृत्ती त्यामानाने कमी दिसते. आपणच ती वाढवायला हवी.
अश्या या कार्नेगीला माझे शतश: प्रणाम!

1 comment:

Anonymous said...

कृपया http://marathi-e-sabha.blogspot.com/ या ब्लॉगवरील नवीनतम पोस्ट वाचा. आपला सहभाग प्रार्थनीय आहे.