Saturday, April 4, 2009

दादाची शाळा

प्रिय सलोनी,
आज आपण जरा दादाच्या शाळेबद्दल गप्पा मारु. तुझी शाळेत जाण्याची वेळ येइल तेव्हा कदाचीत आपण कायमचे भारतात गेलो असू म्हणुन!
मागच्या शुक्रवारी मी दादाला शाळेत आणायला गेले तेव्हा त्याच्या टीचरने सांगीतले की, "He did a great job on his project! In fact everybody did a great job. Just in case if you are interested, you can see all projects on the wall outside his classroom." उत्सुकतेपोटी मी प्रोजेक्ट्स बघायला गेले तर काय .. पहिलीतल्या मुलांनी इतके सुंदर प्रोजेक्ट्स केले आहेत यावर विश्वासच बसला नाही. विषय होता - ’प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्रटीपण’. प्रत्येक मुलाने एक प्रसिद्ध व्यक्ती निवडायची. त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल पुस्तके शोधुन काढायची (इथे पालकांची मदत घेणे अपेक्षीत). अमेरिकेत सार्वजनिक ग्रंथालयात सर्व प्रकारची पुस्तके सहज उपलब्ध असतात त्यामुळे काही प्रश्नच नाही. नंतर मुलांनी ही पुस्तके वाचुन ही व्यक्ती कोण आहे, ती कशाबद्दल प्रसिद्ध आहे, ती दुसर्यांसाठी कशी प्रेरणादायी ठरली इत्यादि गोष्टींचा अभ्यास करायचा आणि त्यांचा जीवनपट हा छायाचित्रांच्या स्वरुपात एका मोठ्या कार्डबोर्डवर चिकटवायचा. शेवटी हे सगळे वर्गासमोर सादर करायचे. बापरे! पण सहा वर्षांच्या मुलांनी ही जबाबदारी उत्तमरीत्या पेलली होती. दादाने रोझा पार्क्सबद्दल अभ्यास करुन ती अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांच्या चळवळीसाठी कशी प्रेरणादायी ठरली याबद्दल माहीती जमवली होती. काही मुलांनी लिंकन, थिओडोर रूझवेल्ट, हेलेन केलर, वॉल्ट डिजनी यांच्यापासुन ते बराक ओबामा पर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींची निवड केली होती. हे सगळे बघताना या मुलांचे खुपच कौतुक वाटत होते.
घरी परत येताना नकळतच मी या शाळेची भारतातील शाळेशी तुलना करू लागले. आमच्या वेळी तरी शाळा अश्या नव्हत्या. पण आता माहित नाही. कदाचीत भारतातही आता अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत बदलली असेल!
दादाला जेव्हा मला पहिल्यांदा शाळेत घालायचे होते तेव्हा तो दोन वर्षांचा होता. त्यावेळी बर्याच पाहणीनंतर माझ्या लक्षात आले की मुले पाच वर्षांची होई पर्यंत त्यांच्यासाठी मॉंटेसरी ही शिक्षणपद्धती जास्त योग्य असते. त्यामुळे आम्ही त्याला मॉंटेसरीमध्येच घातले.
मॉंटेसरीमध्ये प्रत्येक वयोगटाल साजतील असे खेळ, उपक्रम आणि कोडी असतात. मुलांना भाषा, गणित, सामाजिक, दृकश्राव्य अश्या वेगवेगळ्या गटांतुन एकेक खेळ निवडायला सांगीतला जातो. हे सर्व करताना कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. फक्त पर्याय समोर ठेवले जातात. मुलांना मिळणारे हे स्वातंत्रच त्यांना प्रेरणादायी ठरते. या गोष्टींशिवाय मुलांना स्वावलंबन, दुसर्यांना मदत करणे अश्या इतर अनेक गोष्टीही शिकवल्या जातात. या शिक्षणपद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे लहान मुलांचा कल ओळखणे सोपे जाते. तसेच मुलांच्या दृष्टीने विचार केला तर मुले बर्याच गोष्टी हसतखेळत सहज आत्मसात करतात. आपल्यालाही त्यांच्यातील हा बदल सहज जाणवु लागतो. असो ....
मला असे वाटते की मुले एकदा ५ वर्षांची झाली म्हणजे साचेबद्द / पारंपारिक पद्धतीला हरकत नाही कारण आता मुलांना थोडी जाण येउ लागली असते की जगात सर्वच गोष्टी आपल्या आवडीवर अवलंबुन नसतात. काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात कधी कधी. सुरुवातीला हा बदल स्वीकारणे मुलांना थोडे अवघड जाते. पण कालांतराने मुले या नविन अभ्यासपद्धतीतही तितकीच रुळतात. याचे सर्व श्रेय अर्थातच शाळा, शिक्षक आणि अभ्यासक्रम यांना जाते. प्रत्येक वर्गातील शालेय साहित्यही मुलांना आकर्षित करणारे असते. प्रत्येक गोष्टीत मुलांना स्वत:चे विचार मांडण्याची संधी दिली जाते. नविन किंवा वेगळ्या गोष्टींसाठी प्रेरित केले जाते. त्यामुळे मुलांना शाळा म्हणजे एक जादुची नगरीच वाटते. यातुनच पुढे कल्पकता जन्म घेते. म्हणुनच कदाचीत अमेरिका जगात महासत्ता म्हणुन स्थान टिकवुन आहे.
मला आठवते आहे की, २ वर्षांपूर्वी माझ्या एम. एस. च्या नव-उद्योजकतेच्या (enterpreneurship) वर्गामध्ये आम्हाला एका प्रकल्पासाठी एक नविन उत्पादन शोधुन काढायचे होते. मी बर्याच गोष्टींबद्दल विचार करुन त्या गोष्टी बाजारात नाही याची खात्री करायला इंटरनेटवर जायचे. तर आश्चर्य म्हणजे त्या त्या गोष्टी आधीच बाजारात आहेत हे लक्षात यायचे. याचे कारण म्हणजे प्रत्येक शोध काही फार मोठा असण्याची गरज नाही. तसेच एखादा शोध लावण्यासाठी तुम्ही स्वत:ही फार मोठे कुणी असण्याची गरज नाही. लहानपणापासुनच जर कल्पकतेला प्रोत्साहन मिळाले तर तुमचे जीवन सुखकर करतील असे शोध लागले नाही तरच नवल!
मला असे वाटते की आपणही परिक्षार्थी तयार करणे थांबवुन अश्याच धरतीवर आपल्याकडील गरजांचे निराकरण होइल अशी शिक्षणपद्धती राबवली पाहिजे. अमेरिकेतील माणसे भारतीय लोकांच्या बुद्धीमत्तेला दाद देदात. म्हणजेच आपल्याकडे आवश्यक ती बुद्धीमत्ता आहे. परंतु कल्पकतेला वाव मात्र अजिबात नाही.
अलिकडेच थॉट लिडर्स हे पुस्तक वाचताना मला हे कळले की डॉ. रघुनाथ माशेलकर आणि बायाकॉनच्या अध्यक्ष्या किरण मजूमदार यांनीही हीच खंत व्यक्त केली आहे. अमेरिकेने जेव्हा आपल्याला महासंगणक नाकारला तेव्हा आपण आपला महासंगणक तयार केला. जर्मनी, इंग्लंड, रशिया हे देशसुद्धा आवश्यक ती यंत्रसामग्री, मनुष्य आणि पैश्याचे बळ असतानाही करु शकले नाहीत ते भारताने करुन दाखवले. म्हणजेच आपण भारताला कमी लेखण्याऐवजी आवश्यकता आहे ती जुनाट निरुपयोगी शिक्षणपद्धती टाकुन कल्पकता आणि उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती राबवण्याची!!

आई

3 comments:

Anonymous said...

आजचा तुमचा फारच सुंदर जमला आहे.

Anonymous said...

आजचा तुमचा लेख फारच सुंदर जमला आहे. जुने दिवस आठवले मुली लहान असतांनाचे.

पराग जगताप said...

dhanyawad!!!!

aamhi doghehi tumcha blog roj vachato. tumche likhan khoop aawadate pan comments lihaychya aalsamule kalwayche rahun jate.