सलोनीराणी, मागच्या शुक्रवारी मी ऑफिस मध्ये बसलो होतो. घरातलीच एक खोलीचे ऑफिस म्हणुन वापरतो. तर सिद्धु आणि तुझ्या आईने मला जोरजोरात बोलावले. एरवी मी बऱ्यापैकी बहिरा असतो. परंतु आकांत एवढा मोठा की काही विचारता सोय नाही. ऑफिसकडुन किचेन कडे जायला लागलो तर सिद्धु आणि तुझी आई गराजच्या दरवाजापाशी उभे राहुन मला सांगत होते की "विंचु" आहे. मी सगळीकडे पाहु लागलो. मला काही दिसेना. "अरे इकडे" आई. "बाबा इथे इथे .." सिद्धु. म्हणुन मी ते उभे होते तिकडे जायला लागलो. तर एकदम हलकल्लोळ केल्यासारखे दोघेही काहीतरी सांगु लागले. शेवटी त्यांचा आवाज टीपेला पोहोचला त्यावेळी मला कळले की मी उभा होतो तिथे माझ्या पासुन अर्ध्या फुटावर भिंतीवर विंचु होता. मग काय .. तुझ्या आईचीच एक चांगली चप्पल आणली आणि --- पच्याक!
आताशा इथे विंचवांची सवय झाली आहे. व्ह्यायला नको ... पण काय करणार?
पहिले ६ महिने या घरात चांगले गेले. घरात रहायाला आलो ते ९ महिन्यांपूर्वी. घर चांगलेच आहे. चौघांसाठी पुरेसे असे. सगळ्या गोष्टी जवळ असलेले - सिद्धुची शाळा, दुकाने आणि ओळखीचे लोक इत्यादि. अंगण एकदम चांगले. परंतु मे महिना आला आणि अचानक एके दिवशी कचऱ्याचा डबा (डबा कसला ड्रम!) बाहेर नेऊन ठेवत असताना तुझ्या आईला विंचु दिसला. त्यावेळी त्या विंचवाला गाठुन मारेपर्यंत तिचा आणि माझा देखील थरकाप उडालेला! नंतर पुढच्या दरवाज्यात ... त्यानंतर मागच्या दरवाज्यात. परत एकदा घरात दारात. हॉलमध्ये भिंतीवर ... पुन्हा बाहेर कचऱ्याच्या डब्यापाशी .... बापरे बाप .. अशी अनेक पिल्ले आढळुन आली. अर्थात त्या सगळ्यांना आकाशातल्या बापाकडे पाठवले हे सांगणे न लगे.
परंतु इतके विंचु सापडल्यामुळे आम्ही हैराण झालो. किंबहुना दुसरा विंचु घरात भिंतीवर दिसला त्याचवेळी आपण हादरलो. कारण जे न देखे रवी ... अश्या सर्व जागा तुला बरोबर दिसतात. आणि विंचवांना पण त्याच जागा दिसतात. त्यामुळे कधीतरी तुमची गाठ पडायला नको!
सिद्धु ५ वर्षांचा असताना आपण दुसरीकडे रहात होतो - इथुन एक मैलावर. तिथे त्याला विंचु चावला होता. तो किंचाळला म्हणुन आम्ही पळत लिव्हिंग रुम मध्ये आलो तर कुठे काही दिसेना. आम्हाला कळेना काय चावले. सिद्धुला विचारले तर त्याने नांगीसारखा बोटाचा आकार करुन दाखवला. मग काय आम्ही सगळी खोली पालथी घातली. तरी दिसेना. बाहेर गेला की काय? शेवटी मी कोच पालथा केला. तर स्वारी सोफ्याच्या खालच्या भागाला बिलगुन अशी बसली होती की काही केलेच नाही. त्याचा समाचार घेतल्यानंतर ९११ ला फोन केला आणि सांगीतले की मुलाला विंचु चावला आहे तर काय करायचे. तर त्यांनी विचारले "विंचवाचा रंग काय होता - पिवळसर की काळा?". म्हटले - "पिवळसर". "मग काळजीचे कारण नाही" - ९११. पिवळसर विंचु अॅरिझोनामध्ये चिक्कार. त्यांना बार्क विंचु म्हणतात. ते प्राणघातक नसतात. परंतु दंश केला तर दाह होतो. त्यामुळे फक्त साबणाने धुतले आणि बर्फाने चोळले तर थोडे बरे वाटते. सिद्धु तसा मुळचाच सोशिक असल्यामुळे तसा नाही रडला खुप.
असो तर त्या अनुभवामुळे आईने मला एका पेस्ट कंट्रोल वाल्याकडे पिटाळले. त्याने शंभर पद्धतीची औषधे आणि ती फवारण्याची यंत्रे दाखवली. मी सगळे एकदम ऑल क्लिअर आहे असे त्याला सांगीतले पण मला हे अमेरिकेतील डिआयवाय इथे करायला आवडले नसते. डिआयवाय म्हणजे "डू-इट-युवरसेल्फ". म्हणजे स्वावलंबन! मी त्याच्या दुकानातुन पळ काढायला लागलो तर तो म्हणाला, "मागच्या आठवड्यात एक बाई तिच्या भावाच्या घरी गेली. तिचे लहान मुल त्या घराच्या पुढ्यात खेळत असताना त्याला विंचु चावला. तर त्याला हेलिकॉप्टरने इथल्या हॉस्पिटलमध्ये आणले. १५ दिवस ते बाळ जायबंदी झाले होते. आता हळुहळु बरे होते आहे. परंतु आई वडिलांवर आता दीड लाख डॉलर्सचे कर्ज झाले आहे!". "तुमच्या बायकोला अजिबात सांगु नका" - हे सांगायला विसरला नाही.
परंतु विंचु-कन्ट्रोल ही माझी खासियत नसल्यामुळे त्याच्या विक्रीकौशल्याचा उपयोग झाला नाही आणि अखेर इको-फर्स्ट नावाच्या कंपनीला आपण वर्षभराचे पैसे देऊन आपल्या घरात आणि आवारात विंचुविरोधक औषधे मारुन घेतली.
अर्थात त्याच्या आधी एका दुकानातुन बरीचसे स्प्रेज, औषधे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॅकलाईट म्हणजे अतिनील किरणांचा (युव्ही रेज) टॉर्च आणला. अंधारात विंचवांवर ब्लॅकलाईट चा प्रकाश पडला तर अगदी किरणोत्सर्ग करत असल्यासारखे विंचु चमकु लागतात. "विंचु असेल तर दिसणार नाही असे होणारच नाही" इति लोज मधला विक्रेता! अर्थात त्याचा पडताळा घेण्यासाठी आम्हाला फार काळ जावा लागलाच नाही. दोन-चार दिवसातच अगदी हॉलमधल्या भिंतीवर विंचु दिसला. त्याला मारता मारता तो खाली पडला आणि सोफ्याच्या खाली जाऊन लपला. सिद्धोबाच्या अनुभवानंतर आम्ही सुपर स्मार्ट झालो असल्यामुळे विंचोबांना सोफ्याखाली हेरले आणि ठेचले. ब्लॅकलाईट झिंदाबाद.
एकंदरीतच अॅरिझोनामध्ये विंचु भरपुर आहेत. आणि उन्हाळ्यात ते थंड जागेच्या शोधात घरात येण्याचा प्रयत्न करतात. दरवाजे खिडक्या कुठेही थोडी जरी फट असेल तरीही त्यांना पुरते. १/१६ इंच फटीतुनदेखील ते आपले शरीर सपाट करुन आत प्रवेश करु शकतात. दुसरे म्हणजे कुठल्याही सांदीसपाटीत असे काही दुमडुन बसतात की वाटावे की पाला पाचोळा पडला आहे. तिसरे म्हणजे अगदी दिसले तरी कळत नाही की जिवंत आहे असे वाटतच नाही. माझ्या घरातल्या ऑफिसमध्ये बरेच विंचु सापडले. माझ्यापासुन दोन फुटावर मी तास दोन तास फोनवर बोलतोय आणि हे महाशय खाली जमीनीवर झोपा काढताहेत. शेवटी कधी तरी माझे लक्ष गेले.
असो.. परंतु असे तिसऱ्यांदा घडल्यावर आता मात्र इको-फर्स्ट च्या लोकांना घराच्या आतुन बाहेरुन रसायने आणि औषधे यांचा अगदी सडा टाकला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो खरे .... परंतु ही निश्चंती काही तासच टिकली. आज सकाळीच छतावर एक इंचाचे विंचवाचे पिल्लु सापडले! तीच जागा राहिली होती म्हणा! तिथेदेखील आता विंचु सापडल्यामुळे आता झोप लागणे कठीण आहे!
1 comment:
मी ही दोनदा विंचवाचा अनुभव घेतला. सुदैवाने चावलाबिवला नाही. पण इतकी घाबरले की अपार्टमेंट वाल्यांना कामाला लावूनच थांबले. :) आणि मोठाले कोळीही फारच सापडत राहतात. त्यांचीही फार भीती वाटत राहते.
Post a Comment