Friday, August 19, 2011

संभवामि युगे युगे

सध्या भारतामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठे आंदोलन चालले आहे. अण्णा हजारे या कुठलेही सरकारी पद किंवा पैश्यांचे बळ मागे नसलेल्या सामान्य माणसाच्या मागे आज या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे.

तब्बल २० एक वर्षांपूर्वी आमचे एक युवक शिबिर झाले होते राळेगणसिद्धीला - म्हणजे अण्णांच्या गावी. त्या काळी अण्णांचे नाव त्या गावाचा कायापालट करण्याबद्दल प्रसिद्ध होते. अगदी परदेशातुन आणि इस्राईलमधुन जलतज्ञ येऊन पाहुन जात की नगर जिल्ह्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये हे एकच गाव इतके संपन्न आणि हिरवेगार कसे. अर्थातच त्यामागे अण्णांचे कष्ट होते. सैन्यातुन निवृत्ती घेतल्यानंतर अण्णांनी आपल्या गावी परतुन गांधीजींच्या ग्रामविकासाच्या कल्पनेची कास धरली. दारुबंदी केली. पाण्याचे नियोजन केले, सहकाराच्या माध्यमातुन शाळा, वीज अश्या सोयी आणल्या गावात. राळेगण सिद्धी हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आदर्श गाव म्हणुन प्रसिद्ध झाले.

आमच्या शिबिराचा समारोप करताना अण्णांनी भ्रष्ट्राचार हाच विषय निवडला. आम्ही ५० एक तरुण असु तिथे. अण्णा म्हणाले, "भ्रष्टाचार संपवु म्हणुन संपणार नाही. त्यासाठी आक्रमकता पाहिजे. भाषणांनी साध्य होणार नाही. तुम्हा तरुणांना मी एक उपाय सांगतो. शंभर तरुण गोळा करा. मी तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्रातील १०० सर्वात जास्त भ्रष्ट जिल्हाधिकारी आणि त्यांची पिल्लावळ यांची यादी देतो. तुम्ही अमुक एक दिवस निवडा. प्रत्येक तरुणाने एक अधिकारी निवडायचा आणि त्या दिवशी त्याची भेट ठरवायची बरोबर दहा वाजता. आणि बरोबर दहाच्या ठोक्याला भेट झाली की काहीही न बोलता त्याला एक ठेऊन द्यायची (भडकावुन द्यायची / श्रीमुखात द्यायची / कानाखाली जाळ काढायचा इत्यादि!)."

अणा पुढे म्हणाले - "कल्पना करा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रांमध्ये बातमी येईल की कसे कुणास ठाऊन परंतु काल शंभर तरुणांनी शंभर कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवले."

मला त्यावेळी २० एक वर्षांचा असताना ती कल्पना जेवढी आवडली, आज जवळपास ४० च्या आसपास तेवढीच आवडते. आणि अमेरिकेत इथे येऊन तर माझे ठाम मत झाले आहे की राजकिय गोष्टी भीक मागुन मिळत नसतात तर त्यासाठी लढावे लागते, संघर्ष करावा लागतो. याचना करुन फार तर भीक मिळेल. परंतु हक्क आणि सन्मान मिळणार नाही.

पुढे अण्णांनी राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला आणि दोन मंत्र्यांना बडतर्फ करायला लावले. परंतु मला वाटते अण्णांनी महाराष्ट्रात माहितीचा अधिकार यावा याचा जो यशस्वी लढा दिला ते आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. आणि महाराष्ट्राने संपूर्ण भारतामध्ये माहितीच्या अधिकाराची मुहुर्तमेढ रोवली.

आज अण्णांचा लढा हा भारताच्या पातळीवर पोहोचला आहे. लोकपाल विधेयक मांडण्यात यावे या मागणीचा सरकारने अंशत: स्वीकार करुन दोन महिन्यांपूर्वी असे विधेयक आणण्याचे नाटक केले. परंतु अण्णांचे समाधान झाले नाही. प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमावा आणि त्याने सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणे सहा महिन्यात निकालात काढावीत अशी मुख्य मागणी आहे. मी त्याचा काहीच अभ्यास केला नाही. परंतु सरकारपेक्षा अण्णांवर माझा शतपटीने जास्त विश्वास आहे.

आळशी, विघ्नसंतोषी, नकारात्मक लोक तसेच भ्रष्टाचारी किंवा हितसंबंधी मंडळी नाके मुरडत आहेत. या विधेयकाने काय होणार असे विचारत आहेत. परंतु पर्यायी उपाय सुचवत नाहीत.

तत्वज्ञान मांडायला खूप सोपे आहे. परंतु कृती अवघड असते. अण्णांच्या उपायात तृटी असणारच आहेत. लोकायुक्तावर अंकुश कोण ठेवणार. आहे त्याच गोष्टी नीट चालवता का नाही येत. न्यायव्यवस्था का नाही सुधारता येत. शंभर सुविचार आहेत. अगदी मलादेखील हे पटते की समांतर रचना निष्फळच ठरेल. जोपर्यंत सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी जाब विचारण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत कुठलीच व्यवस्था नीट काम करत नाही. अगदी लोकायुक्त देखील नाही. लोकायुक्त हा थेट जनतेने निवडुन दिला पाहिजे. तरच ते पद चांगले काम करेल. मग न्यायाधिशांना निवडुन दिले तर? सर्व प्रश्नांचे मुळ ते नाही का? सडलेली न्यायव्यवस्था हे भ्रष्टाचाराचे मुळ कारण आहे. जर न्यायाधीश जनता निवडुन देत असेल तर भ्रष्टाचाराला शासन लवकर होईल आणि भ्रष्टाचार कमी होईल.

परंतु पुन्हा तेच... वाद चर्चा आणि तत्वज्ञान यांचा अतिरेक करुन संधी वाया घालवण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडुन घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध एक पाऊल पुढे उचलणे जास्त महत्वाचे आहे.

अण्णांच्या या लढ्यातुन नुसते भ्रष्टाचाराचे नव्हे तर समाजाच्या औदासिन्याचे निर्मुलन होवो. विष्णुचा दहावा अवतार येऊन आमची सुटका करेल अशी आशा बाळगणारी वृत्ती जाऊन स्वत: धडक देऊन काहीतरी करु अशी उर्मी आणि आत्मविश्वास समाजात येवो. आणि हे मराठ्यांनी नाही करायचे तर कोणी करायचे? ज्ञानेश्वर एकनाथ तुकारामांपासुन ते अगदी छत्रपती शिवाजी, संभाजीराजे, थोरले बाजीराव, माधवराव ते शाहु फुले आंबेडकर टिळक गोखले आगरकर आणि यशवंतराव अशी आपली परंपरा. वस्तुस्थिती ही आहे की केवळ महाराष्ट्रामध्येच हे स्फुल्लिंग आहे आणि ते शिवाजी महाराजांनी पेटवले आहे. तोच आपला वारसा आहे आणि आपणच तो पुढे न्यायचा आहे. अण्णा हे केवळ त्याच परंपरेतील एक धागा आहेत आणि हा लढा त्या परंपरेतील एक रत्न आहे.

16 comments:

Anonymous said...

विनंतीस मान देवून आवर्जून लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याही मनात कुठे तरी भारताबद्दलचे प्रेम आहे हे पाहून छान वाटले.

आंदोलनाची सुरुवात तर छान झाली आहे. उत्तरोत्तर या आंदोलनाला सर्वच स्तरांवरुन पाठिंबा मिळो. तुमच्या ब्लॉग मधूनही वेळोवेळी त्या विषयाची चर्चा होवो.

बाल-सलोनी said...

अहो असे काय म्हणताय? भारताबद्दल नाही तर काय पापीस्तान बद्दल प्रेम असणार काय?
लेख लिहायला सांगीतल्याबद्दल धन्यवाद! भारताबद्दल मी बऱ्याचदा लिहितो. परंतु अमेरिकास्थित भारतियांना काही लिहायचे तर भीती वाटते म्हणुन खूप काही लिहित नाही.

Anonymous said...

> वस्तुस्थिती ही आहे की केवळ महाराष्ट्रामध्येच हे स्फुल्लिंग आहे
>---

Such rhetoric does injustice to other provinces in India. I am surprised by how many of my idols are from my home state. It does suggest that Maharashtra has a lot to be proud of, but it also suggests that I could be prejudiced and lacking in knowledge about other regions.

- dn

बाल-सलोनी said...

श्री. धनंजय, तुम्ही म्हणता ती शंका अतिशय प्रामाणिक आहे. परंतु इतिहास वाचला तर कळते की मागच्या ३०० वर्षांत तरी मराठ्यांमुळे (प्रांतवाचक अर्थ घ्यावा) भारत मुसलमान होता होता वाचला. मराठ्यांमुळे भारतियांची स्वातंत्र्याची ऊर्मी शिल्लक राहिली आणि स्वातंत्रलढा महाराष्ट्राच्या नेतृत्वाखाली लढला गेला. सुरुवात पहा - नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, त्यानंतर फडके-सावरकर-टिळक (जहाल पासुन) ते गोखले रानडे आगरकर आणि अगदी आंबेडकर सुद्धा. सावरकर जहालवाद्यांचे तर गोखले गांधीजींचे गुरु. आंबेडकर घटनाकार. महाराष्ट्राच्या या स्फुल्लिंगाची आणि नेतृत्त्वाची धास्ती केवळ ब्रिटिशांनीच नाही तर स्वकियांनी देखील धास्ती घेतली. ब्रिटिशांनी हिंदुस्तान मुघल नव्हे तर मराठयांकडुन घेतला. उत्तरेत शिंदे होळकर, मध्ये आणि पूर्वेला नागपुरकर भोसले, तर पश्चिमेला खुद्द पेशवे आणि गायकवाड. पैकी बव्हंशी लोकांनी इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा दिला म्हणुन त्यांची नामोनिशाणी मिटली. शनिवारवाडा, रायगड, होळकर, भोसले यांचे राजवाडे दिसत नाहीत. परंतु राजस्थानात अमरविलास लक्ष्मीविलास कसे शिल्लक राहतात. दिल्ली चे राजवाडे कसे का होईना का शिल्लक राहिले. कारण त्या लोकांनी नमते घेतले. त्यांची स्वातंत्र्याची ऊर्मी नाहीशी झाली होती आणि आहे. तुम्ही दिल्लीचे लोक पहा. शतकानुशतके मुघलांना मुजरे करुन त्यांच्यावर असलेला मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. बंगाली लोकांवर इंग्रजांचा प्रभाव होता आणि आहे - जनमनगण अधिनायक आणि भारत भाग्यविधाता. दक्षिणेत मागच्या ३०० वर्षात काय घडले? टिपु सुल्तान सोडला तर तिथे स्वातंत्र्याची आस तेवढी तीव्र नव्हती. राहता राहिले गुजरात कर्नाटक. दोन्ही राज्ये महाराष्ट्राला जवळची आणि मान्य करो न करो - महाराष्ट्र हा सांस्कृतिक आणि राजकीय केंद्रबिंदु असणारी.

पाश्च्यात्य लोकांमध्ये (गोऱ्यांमध्ये) "व्हाईट मॅन्स बर्डन" म्हणुन कल्पना आहे. ती आणि "अमेरिकन एक्सेप्शनलिझम" या दोन संकल्पना भारताच्या सीमांमध्ये मराठी ंमाणसांना अगदी लागु पडतात. आपण त्याबद्दल कोणाला काय वाटेल असे समजून आपले कर्तव्य विसरण्याची गरज नाही. भारतात एतद्देशीयांचे राज्य व्हावे (अर्थात स्वातंत्र्य) ही मूळची छत्रपतींची कल्पना. आजही ती अर्थवट स्वरुपातच उतरली आहे. अजूनही परकियांचा प्रभाव (मुघल राज्यकर्ते ब्रिटिश किंवा सध्याचे अमेरिकापुराण असो) अगदी जाणवतो. आणि मला तरी असे क्वचीतच दिसले आहे की इतर प्रांतातील लोकांना स्वतंत्र विचार, भारतीय विचार आणि समस्त भारतियांचा विचार करण्याची आस आहे. ते फक्त मराठी लोकांमध्येच प्रकर्षाने जाणवते.

महाराष्ट्राला या सर्व लढ्याचे योग्य मोजमाप पदरात पडले नाही याची दोन कारणे आहेत. १) इतर राज्यांमध्ये दिसणारी महाराष्ट्राबद्दलची असूया २) ब्राह्मण मराठा तेढ. यामुळे आपण मागे पडतो. आणि आपण मागे पडतो म्हणुन बाकीच्या लोकांच्या दिल्लीमध्ये मर्कटलीला चालतात. असो ... तुमच्या अभिप्रायावरुन एवढे लिहिले खरे. चुका दाखवल्यात तर बरेच वाटेल.

mahendra said...

लेख छान लिहिला आहे. पण बरेचदा असे वाटते की हा जो मास हिस्टेरीयाचा प्रकार सुरु झाला आहे, त्याला आवर घातला जाणे आवश्यक आहे. अण्णांचं लोकपाल विधेयक आलं, की सगळं काही आलवेल होईल अशी जनमानसामधे भावना निर्माण होत चालली आहे. बरेचदा तर अण्णा वाघावर बसले आहेत की काय असे वाटते. एकदा वाघावर बसल्यावर त्याला आटोक्यात ठेवणॆ हे अतीशय आवश्यक असते... नाहीतर...

बाल-सलोनी said...

महेंद्रजी, मास हिस्टेरिया आहे हे खरे आहे. हिस्टेरिया असू नये हे पटते. परंतु असंतोषातुन हिस्टेरिया आला आहे का? सरकारच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट्पणाची कमाल झाली आहे. मला वाटते अण्णा फक्त प्रश्नाला वाचा फोडताहेत. त्यांच्याकडे उत्तरे नसतीलही. उत्तरे खरेतर समाजातुन आली पाहिजेत. लोकशाही मध्ये सामान्य माणुस आपले राजकीय कर्तव्य करणार असेल तर भ्रष्टाचार नक्की नष्टप्राय होईल. नाहीतर कितीही लोकपाल नेमले तरीही ते स्वत: भ्रष्ट होतील. त्यांच्यावर अंकुश कोण ठेवणार?

Naniwadekar said...

> बंगाली लोकांवर इंग्रजांचा प्रभाव होता आणि आहे
>
तुमचा सगळा लेख एकाच गोष्टीला पुरावा देणार्‍या गोष्टी पुढे ठेऊन लिहिला आहे. इंग्रजी भाषा 'वाघिणीचे दूध' आहे, ही गोष्ट मराठी लोकांनाही कळली होती. टिळक वगैरे मंडळी इतर प्रान्तियांशी सल्लामसलत इंग्रजीत करत. गांधीजींनी हिन्दीचा आग्रह धरला. परशुरामतात्या गोडबोले त्यांच्या काळचे मोठे कवी - त्यांनी 'धन्य राणी विक्तुरिया' कविता लिहिली. ही चमचेगिरी टागोरांनीच केली असा भाग नाही. 'नामदार गोखले इंग्रज़ांचे पोपट आहेत' अशी पोपट उडतानाची व्यंगचित्रं टिळकप्रेमी काढत.

तुम्ही उल्लेख केलेले यशवन्तराव 'नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत' म्हणून कीर्ती पावले. ते तुम्हाला आठवले पण हेडगेवार-देवरस आठवले नाहीत. गांधीजींना आणि हेडगेवारांना सर्व भारतभर पाठिम्बा मिळाला तो देशभक्ती सर्वत्र असल्यामुळेच. आणि शिवाजीच्या काळातही स्वत: शिवाजीचे अनेक सासरे मुसलमानांकडून लढत राहिले. १८५७ चा लढा महाराष्ट्रात झालाच नाही, तरी तात्या टोपे - झाशीची राणी ही नावं घेतली ज़ातात. त्यांच्या बाज़ूचे हिन्दी भाषिक काय देशभक्तीत कमी होते? दोन नांवांमुळे तो महाराष्ट्राचा लढा होतो? पंजाब तर नेहमीच शौर्यात पुढे आहे. लंकेत तमिळ लोकांनी जी कमाल केली ती स्वत:च्या भारतात हिन्दु करू शकत नाहीत. त्यात तुमचे स्फुल्लिंगवाले मराठी लोकही आलेत. उमा भारती, नरेन्द्र मोदी या लोकांबाबत मला फार आदर आहे. हे काही मराठी लोक नाहीत. ते असो.

> बरोबर दहाच्या ठोक्याला भेट झाली की काहीही न बोलता त्याला एक ठेऊन द्यायची
>-----
हे अण्णा हज़ारे यांना भाषणबाजी करायला ठीक आहे. (त्यांच्याविषयी आदर आहेच.) पण हा प्रयोग शिवसेनेनी खूप केला आहे. (बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही आदर आहेच. अगदी प्रामाणिकपणे.) ही ठोकशाही प्रत्यक्षात घडते तेव्हा विकृत स्वरुपात दिसते. तेव्हा ठोकशाही चांगली असतेही आणि चांगली नसतेही.

हरिलाल गांधी बापाला डिवचायला सहा महिने 'अब्दुल्लाह' बनला, तसा प्रत्यक्ष शिवाजीचा मुलगा संभाजी (आणि नेताजी पालकरही) औरंगज़ेबाच्या कम्पूत गेलेच. तेव्हा महाराष्ट्रात उज्ज्वल इतिहास आहे, आणि फितुरीही आहे. मी तुमच्या लेखाशी पूर्ण असहमत आहे, अशातला भाग नाही. पण एकूण इतर प्रान्तियांना शिव्या देऊन दूर ढकलण्यात अर्थ नाही.

बाल-सलोनी said...

धनंजय, देशभक्ती सगळीकडे आहे. मी इतकेच म्हणालो की "मराठी मातीमध्ये देशभक्ती बरोबरच एक स्वातंत्र्याची ऊर्मी आहे." आणि याचे कारण मुघलांना (मुख्य) आव्हान फक्त इथुनच दिले गेले. असे म्हणणे म्हणजे इतरप्रांतियांना शिव्या देणे समजु नये.

गांधीजी केवळ महानच नाही तर शिवाजी महाराजांच्या बरोबरीचे दुसरे राष्ट्रपुरुष होते असे माझे मत आहे. (महाराजांचा एकेरी उल्लेख कृपया करु नये).

बाकी मी न बोललेल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही बोलता आहात. शौर्य इतर ठिकाणी नाही असे मी कधी म्हटले? लढा महाराष्ट्रात झाला नाही याने काय फरक पडतो? हेडगेवार देवरस यांबद्दल आदर आहे. देवरसांनी संघाचे काम नक्कीच जास्त व्यापक केले (१७-१८ वर्षांचा असताना पुण्यात मोतिबागेत त्यांच्या अगदी पुढ्यात बसुन एकदा भाषण ऐकले आहे.). फितुरी / सवतासुभा नव्हते असेही मी म्हणालो नाही आणि होते म्हणुन महाराष्ट्रावर काही बालंट आहे असेही मानायचे कारण नाही. इंग्रजांचे लांगुलचालन बऱ्याचजणांनी केले. दिल्लीचे लांगुलचालन बऱ्याचजणांनी केले. परंतु प्रत्यक्ष काम काय केले की फक्त लाळघोटेपणाच केला?

तुम्ही असहमत आहात असे मला वाटत नाही. परंतु मला वाटते तुम्ही स्वत: एक लेख लिहा या विषयावर की "महाराष्ट्राचे आणि इतर प्रांतांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान". त्यातुन या बऱ्याचश्या गोंधळवादी गोष्टी दूर होऊन तुम्हाला नेमके काय म्हणायचे ते चांगले समजेल.

जाता जाता फक्त एक स्पष्ट करावेसे वाटते - हजारेंची आक्रमकता म्हणजे गुंडगिरी आणि हप्तागिरी नाही. कुठल्याही सैनिकी पेश्यातील प्रामाणिक माणसाची अशीच प्रतिक्रिया येणार. त्याबद्दल फार काही तात्विक चर्चा करण्याची गरज नाही.

पुन्हा नमूद करतो, देशभक्ती सगळीकडे आहे. मी इतकेच म्हणालो की "मराठी मातीमध्ये देशभक्ती बरोबरच एक स्वातंत्र्याची ऊर्मी आहे." असे म्हणणे म्हणजे इतरप्रांतियांना शिव्या देणे समजु नये.

Anonymous said...

'इतर प्रान्तांत स्वतन्त्र विचार क्वचित होतो', 'दिल्लीकडले लोक मुघलांना मुज़्रे करण्याच्या संवयीचे आहेत' ही भाषा वापरल्यावर हे 'इतरप्रांतियांना शिव्या देणे समजु नये' हे मला पटत नाही. दिल्लीचे लोक मुज़रेबाजीवाले आहेत, हे मला वाटत नाही. आणि 'मराठी लोक मोठे ताठ आहेत' असंही वाटत नाही. ढोबळ निष्कर्ष (generalization) काढलेले मला अवश्य चालतात, पण मूळ लेखातेले काही पटलेले नाहीत.

आज़च्या आक्रस्ताळी वातावरणात नियतकालिकांतून शिवाजीचा एकेरी उल्लेख होणार नाही. पण ज्ञानदेव, तुकाराम, शिवाजी, लता यांचा एकेरी उल्लेख करण्याची मराठी परम्परा आहे. उलट उत्तरेकडे बरेचदा गीता-जी, अयोध्या-जी असे निर्जीवांचेही आदरपूर्वक उल्लेख होतात. 'अन्तू बरवा' मधे 'गांधी कोकणात आला नाही' असाच उल्लेख आहे. वामन पण्डिताचा तर मी आदरार्थी उल्लेख कुठेच वाचलेला नाही. आणि 'नानासाहेब पेशव्याला' (शेज़वलकर), 'मोरोपन्ताला काव्यस्फ़ूर्ती' (विनोबा) असे एकेरी उल्लेख साहित्यात वैपुल्यानी आढळतात.

इतर प्रांतांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान - याविषयी मी फार काही माहिती बाळगत नाही. पण ते योगदान महाराष्ट्राबाहेरूनही खूप आहे, हे नक्की.

इतर मुद्दे पुढे वेळ मिळाल्यास.

- डी एन

बाल-सलोनी said...

श्री नानिवडेकर, मला वाटते तुम्ही विपर्यास करता आहात माझ्या मूळ लेखाचा आणि त्यानंतरच्या चर्चेचा. मला वाटते "लेट्स अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री".

आजचे वातावरण आक्रस्ताळी असेलही परंतु शिवाजी महाराजांबद्दल आकस आणि विरोध बराच जुना आहे. एकेरी उल्लेख करुन आपण आपली लायकी दाखवुन देतो. तेव्हा पुन्हा विनंती की उगाच भलत्या गोष्टीचे बौद्धिक समर्थन करु नये.

Anonymous said...

शिवाजी, तुकाराम यांचे एकेरी उल्लेख करणारे लोक त्यांच्याविषयी आकस बाळगणारे नव्हते. विनोबांना काय मोरोपन्तांविषयी आकस होता? ती पद्‌धत तुम्हाला 'भलतीच' वा नालायकपणाचं लक्षण वाटली तर तो तुमचा अधिकार आहे. पण आकस-विरोध या गोष्टींना तिथे स्थान नाही.

माझ्याकडून गांधी-सावरकर-कुसुमाग्रज-दीनानाथ यांचा उल्लेख एकेरी होत नाही. ज्ञानेश्वर-एकनाथ-शिवाजी-लता-वामन पण्डित यांचा उल्लेख एकेरी होतो. त्यामागे काहीही खोल कारण नाही. ती एक मराठी परम्परा आहे.

बाल-सलोनी said...

ही विकृती आहे. परंपरा नाही.

Anonymous said...

> ही विकृती आहे.
>
You are entitled to your opinion.

> परंपरा नाही.
>
Even a cursory glance at Marathi literature will tell you that it is a Marathi tradition whether you like it or not. Check this: http://www.aathavanitli-gani.com/GenPages/Song.asp?Id=70074809139 (Savarkar does not say 'dyaa mantra', he says 'de mantra'.)

बाल-सलोनी said...

धनंजय नानीवडेकर, तु तुझी परंपरा तुझ्या घरी तुझ्या बापावर वापर. आणि या ब्लॉगवरुन तोंड काळे कर.

Anonymous said...

> धनंजय नानीवडेकर, तु तुझी परंपरा तुझ्या घरी तुझ्या बापावर वापर. आणि या ब्लॉगवरुन तोंड काळे कर.
>----

LOL.

Naniwadekar said...

> धनंजय नानीवडेकर, तु तुझी परंपरा तुझ्या घरी तुझ्या बापावर वापर. आणि या ब्लॉगवरुन तोंड काळे कर.
>-------

LOL