दुसऱ्या दिवशी आपण सगळे जरा निवांतच उठलो. ब्रेकफास्ट झाल्यावर तू आणि दादा पोहायला गेलात. तोपर्यंत मी स्वैपाक करुन ठेवला. हो.... स्वैपाकच! कारण आपण १ बेडरुम आणि किचन असा स्वीट घेतला होता. कुठेही फिरायला जातानादेखील पोटाची काळजी घ्यावीच लागते. नाहीतर कितीही आव आणला तरीही निसर्ग बघुन मन भरेल पण पोट नाही. कवाईत अतिशय महागाई आहे. त्यातुन आपण जिथे राहिलो ते प्रिन्सव्हिल अगदि सुंदर, ना-पाली किनाऱ्याजवळचा सधन लोकवस्तीचा भाग होता. त्यामुळे महागाई भयंकर. दीड डॉलर्सला एक बटाटा, ६.५ डॉलर्स ला दुध. ४ डॉलर्सला एक ब्रेड इत्यादि इत्यादि ..... असो....
मी फिनिक्सवरुनच भाजी साठी लागणाऱ्या गोष्टी - नान आणि खिचडीचे सामान आणले होते. त्यामुळे आपल्याला एव्हढा त्रास झाला नाही. जेवण करुन थोडी विश्रांती घेऊन काय पाह्यचे याचे संयोजन केले. तसा आधी रिसर्च केला होताच परंतु मग वाटले की सरळ स्थानिक माणसांनाच विचारले तर? हॉटेलच्या कॉन्सिअर्ज मधुन माहिती घेऊन बाहेर पडेपर्यंत दिवस संपत आल्यामुळे जवळच "हाना-ले बे"वर सुर्यास्त बघायचे ठरले. दहा मिनिटात तिथे पोहोचलो. सुर्यास्ताची वेळ झाली होतीच. नुकतीच पावसाची एक सर येउन गेली होती. लगबगीने पिअर(पाण्याच्या आत १०० एक मीटर पर्यत बांधलेला लाकडी पूल आणि त्याच्या शेवटी असलेला चौथरा) कडे जायला लागलो. तर एक गोरी बाई म्हणाली, "मागे पाहिलेस का? दुहेरी इन्द्रधनुष्य दिसतंय!" आम्ही पहिल्यांदाच असे इन्द्रधनुष्य बघत असल्यामुळे मी त्याबद्दल तिला कुतुहलाने विचारले. त्यावर ती म्हणाली की इथे बऱ्याचदा असे पूर्ण क्षितिजाला व्यापुन टाकणारे दुहेरी इंद्रधनुष्य दिसते. कधी कधी तर तिहेरीही दिसते! अश्याच गप्पा मारत असताना आम्ही फिनिक्स वरुन आलो आहोत हे कळल्यावर ती आम्हाला सांगु लागली,"मीही तिथुनच आले आहे." मग कळले की ही बाई अभियांत्रिकीची पदवी घेऊन इंटेल मध्ये काम करत होती. तरुणपणीच कवाईला २० व्यावर्षी फिरायला म्हणुन आली आणि कवाईच्या प्रेमातच पडली आणि इथेच स्थाईक झाली. आता एका शाळेमध्ये (हाय स्कुल) विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवते. गप्पा मारता मारता तिने विचारले आम्ही मुळचे कुठुन आलो. भारतीय म्हणल्यावर ती म्हणाली की मी कल्पना करु शकते की पालक म्हणुन तुम्हाला काय आव्हानांना सामोरे जावे लागत असेल. माझे आईवडिलदेखील तुमच्यासारखेच मला घेऊन अमेरिकेला आले. त्यांना त्यांच्या सिसिलिअन संस्कृतीचा अतिशय अभिमान होता. त्यामुळे मी जसजसी मोठी होत गेले आणि अमेरिकन मुला मुलींसारखी वागु लागले तेव्हा माझे वडिल चिडुन मला म्हणत, "ओह.... यु अमेरिकन...." त्यांना वाटे की मी सिसिलिअन पद्धतीनेच वागावे. तिचे हे बोलणे ऐकुन आम्ही म्हणालो, "सिसिलि म्हणजे इटली ना?". त्यावर आपला सात्वीक संताप आवरत ती म्हणाली "नाही. सिसिली मागची फक्त १००-१५० वर्षे इटलीचा भाग आहे. परंतु खरेतर सिसिली वेगळा आहे." आम्ही कपाळावर हात मारला आणि मनात हसु फुटले. शेवटी माणसे इथुन तिथुन सारखीच!
अश्याच थोड्याफार गप्पा होई पर्यंत आता चांगलाच अंधार झाला होता. त्यामुळे आपण होटेल वर परतलो.
आत्तापर्यंत माऊई चेच सौंदर्य सरस वाटत होते. परंतु आज फिरल्यावर लक्षात आले की कवाई देखील तितकेच सुंदर आहे. तशी दोन्हीची तुलना करणे योग्य नाही कारण माऊई हे बऱ्यापैकी सपाट, सरळ रस्ते असलेले, उसाच्या शेतीने बहरलेले बेट आहे. तर कवाई म्हणजे मोठमोठे पर्वत, नागमोडी रस्त्यांचे, नारळाच्या बनांनी नटलेले बेट आहे. दोन्हींचे सौंदर्य तितकेच मोहक आहे.
तिसऱ्या दिवशी आपण पॅसिफिकमधील ग्रॅण्ड कॅनिअन म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या वायमेया कॅनिअन ला गेलो. आपण रहात असलेल्या ठिकाणापासुन ही कॅनिअन अतिशय जवळ आहे. परंतु उत्तरेला रस्ता थांबतो कारण ना-पाली किनाऱ्यावर २-४ ह्जार फुट उंचीचे डोंगर थेट अगदी समुद्रालाच भिडतात. कॅनिअन त्या डोंगरांच्या एका बाजुला आणि प्रिन्सव्हिल दुसऱ्या बाजुला असल्यामुळे संपुर्ण बेटाला वळसा घालुन जावे लागते. रस्ता अतिशय वळणावळणाचा असल्यामुळे कॅनिअन ला पोहोचेपर्यंत तुम्ही दोघे अगदी कंटाळुन गेला होता. कॅनिअनला पोहोचल्यावर तुम्ही दोघे कोंबड्यांच्या मागे पळण्यातच गुंग होता. अरे हो ... कवाईला रूस्टर कंट्री असे देखील म्हणतात. कारण जागोजागी कोंबडे सगळ्या कुटुंबासह फिरताना दिसतात. कधीतरी कुठल्यातरी वादळानंतर इथे कोंबड्या आल्या म्हणे आणि त्यानंतर त्यांची संख्या वाढतच गेली म्हणे!
कॅनिअन १६ किलोमीटर लांब आणि 3600 फुट खोल आहे. कॅनिअन सुंदरच आहे परंतु आपण ग्रॅण्ड कॅनिअन ३०-४० वेळा तरी पाहिल्यामुळे आपण काही वायमेया बघुन प्रभावित झालो नाही. ग्रॅण्ड कॅनिअन ४० मैल रुंद, १ मैल खोल आणि ३०० मैल लांब आहे!
वायमेया कॅनिअन मधे बरेचसे हायकिंग ट्रेल्स आहेत. कदाचित ते करता आले असते तर जास्त मजा आली असती. परंतु तुला घेऊन ते शक्य नव्हते म्हणुन मग फक्त १/२ - ३/४ मैल ना-पाली किनाऱ्याच्या कडेकडेने डोंगरपठारावरचा एक ट्रेल केला. परत कारकडे येता येता वाटेत माउण्ट वाई-आले-आले पर्वतावर फोटो काढला. ही जागा जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणुन प्रसिद्ध आहे. पॅसिफिक समुद्रातुन पाण्याची वाफ आणि त्याचे ढग होऊन या डोंगरांच्या फनेलसारख्या आकारामुळे इथे येउन बरोबर थंड होतात आणि रोज दुपारी पाऊस पडतो. स्थानिक पर्यटन विभाग जरीही जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणुन या जागेचा प्रचार करत असले तरीही गिनिज बुक मध्ये नोंद झालेली पहिली दोन ठिकाणे भारतात मेघालयात आहेत. माऊण्ट वाई-आले-आले हा कवाईतील दुसऱ्या क्रमांकावरील उंच पर्वत असुन १९१२ पासुन इथे ६८३ इंच इतका सरासरी पाऊस झाला आहे. चेरापुंजी आणि इथल्या पावसातला फरक म्हणजे इथला पाऊस रोज पडतो परंतु चेरापुंजीचा पाऊस ऋतुकाळानुसारच पडतो.
कॅनिअन बघुन परत होटेल वर पोहोचेपर्यंत रात्र झाली. दुसऱ्या दिवशी काय बघायचे याचे नियोजन करुन उरलेला वेळ आपण होटेल वरच घालवला.
No comments:
Post a Comment