These are some of our conversations inspired by our new daughter SALONI ! ***** Copyright Baal-Saloni *****
Monday, July 25, 2011
पुन्हा हवाई - भाग ३ (कवाईचे हिन्दु मंदिर)
Friday, July 22, 2011
सेव्हन अप, सिएरा मिस्ट आणि १५००० डॉलर्स
सलोनीराणी, तुझी आई सध्या हवाई बद्दल लेख लिहिते आहे. परंतु मध्यंतरी हा अजुन एक लेख .. अर्थात विमानातुनच!
परवा एक गंमतीशीर बातमी वाचण्यात आली. कॅनडामध्ये एका माणसाने एका विमान कंपनीवर खटला भरला की त्याने त्यांना सेव्हन अप प्यायला मागीतले आणि त्यांनी सिएरा मिस्ट दिले. न्यायालयाने या माणसाच्या बाजुने निकाल दिला आणि त्याला तब्बल पंधराएक हजार डॉलर्स नुकसान भरपाई दिली आणि वर ७५ सेन्ट्स - सेव्हन अपची किंमत म्हणुन!
बातमी वाचुनच मला कळले की हे दिसते तेव्हढे सरळ प्रकरण नाही. बातमी रंजित - अतिरंजित आणि रक्तरंजित करण्यामध्ये सर्वच वर्तमानपत्रे आघाडीवर असतात. भारत काय किंवा अमेरिका काय! परंतु एमबीए करताना न्याय हा एक विषय आम्हाला होता. त्या विषयाचा अभ्यास करताना शिकलो की वर्तमान पत्रात काय लिहिले या वरुन कोणी दोषी किंवा निर्दोषी आहे असे म्हणणे अगदी चुकीचे आहे.
त्या वर्गाच्या पहिल्याच तासाला अॅन लिव्ही या आमच्या शिक्षिकेने असा एक चांगला धडा दिला की तो कधी विसरणार नाही. तिने वर्गातल्यापडद्यावर वेगवेगळे मथळे असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्या दाखवल्या. मथळे थोडेसे वेगवेगळे परंतु साधारण सारखेच होते. "बाईने आपल्या मांडीवर कॉफी सांडली आणि मॅक्डोनल्डवर खटला भरुन करोडो डॉलर्स उकळले". बातमी वाचुन ९०% माणसे म्हणतील अमेरिकेत कोण कोणावर कशाहीबद्दल खटला भरतात आणि न्यायालयांनी पण अक्कल गहाण टाकली आहे. काही निकाल लावतात. आमच्या शिक्षिकेने आम्हाला विचारले की किती लोकांना ही बातमी वाचुन असे वाटते आहे की त्या बाईला भरपाई मिळायला हवी? काही लोकांनी हात वर केले. तिने पुन्हा विचारले, "किती लोकांना वाटते की न्यायालयाची अक्कल चरायला गेली आहे!" - उरलेल्या लोकांनी हात वर केले. त्यावर ती म्हणाली "दोन्ही उत्तरे योग्य नाहीत. अशी वर्तमान पत्रातील बातमी वाचुन काहीच सांगता येणे कठीण आहे. त्यासाठीच न्यायालयाच्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने पुराव्याने दोष सिद्द केला गेला पाहिजे. तेव्हा खरी घडलेली गोष्ट अशी होती.
एक ७०-७५ वर्षाची वृद्ध स्त्री मॅक्डोनल्डच्या ड्राईव्हथ्रु मध्ये आली. तिने कॉफी मागीतली. मॅक्डोनल्डच्या कर्मचाऱ्याने कॉफी दिल्यावर तिने तो कप दोन पायांच्या मध्ये ठेवला आणि पैसे काढु लागली. वृद्ध असल्यामुळे शरीराला कंप होता आणि तो कप तिच्या दोन पायांच्या मध्ये लवंडला. कॉफीचे तपमान १६५ अंश फॅरेनहाईट होते. त्यामुळे त्या स्त्रीच्या कमरेपासुन मांडीपर्यंत थर्ड डिग्री बर्न्स झाले. थंडी असल्यामुळे आणि वृद्ध असल्यामुळे त्या स्त्रीने थर्मल्स घातले होते. त्या थर्मल्समध्ये ती सगळी कॉफी शोषली गेली आणि त्यामुळे कोणाला काही कळेपर्यंत आणि ते थर्मल्स काढेपर्यंत चांगलाच उशीर झाला. तोपर्यंत त्या उष्णतेने तिला अजुनच भाजत राहिले आणि पुढे ती वृद्धा उरलेल्या आयुष्यासाठी अपंग झाली.
मग यात मॅक्डोनल्डचा दोष कसा काय? तर मॅक्डोनल्डला कॉफी एका विशिष्ट तपमानाला विकण्याची अनुमती होती. परंतु सरकारी नियम धुडकावुन लाऊन मॅक्डोनल्ड कॉफी १५-२० अंश जास्त गरम विकत असे. असे करण्याचे कारण म्हणजे कॉफी जास्त काळ गरम राहते आणि ग्राहक तिचा जास्त काळ आस्वाद घेऊ शकतात. आणि अर्थातच म्हणुन लोक मॅक्डोनल्ड कॉफी विकत घेतील. न्यायालयाने नियम धुडकावल्याबद्दल आणि त्या वृद्धेला झालेल्या वेगनांबद्दल मॅक्डोनल्डला दोषी ठरवले. आणि त्या वृद्धेला शारीरीक आणि मानसीक आणि आर्थिक नुकसानभरपाईखातर मॅक्डोनल्डला मोठा दंड ठोठावला. इतकेच नाही तर शिक्षात्मक (प्युनिटिव्ह) दंड त्याच्या कित्येक पट ठोठावला.
हे सगळे ऐकुन आम्ही सर्व थक्कच झाले. माझे तर डोळेच उघडले. त्यामुळे मी आता कुठलीही बातमी वाचुन कधीच कोणाला दोषी किंवा निर्दोषी ठरवत नाही.
असो ... तर मग या कॅनडाच्या माणसाचे काय झाले? तर त्याचे असे झाले की तो माणुस होता फ्रेंच. कॅनडा हा देश इंग्रज आणि फ्रेंच लोकांचा देश आहे. दोन्ही भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव आहे आणि मराठी कानडी लोकांपेक्षा जास्त कुरबुर चालते तिथे. केबेक नावाच्या प्रांतात फ्रेंच लोक जास्त आहेत. त्यांनी निवडणुक घेतली की कॅनडापासुन वेगळे व्ह्यायचे की नाही. अगदी अर्ध्या टक्क्याने की काय परंतु केबेक कॅनडापासुन वेगळे होता होता वाचले. परंतु तरीही फ्रेंच लोकांमध्ये अतिशय असंतोष आहे. तर या माणसाचे म्हणणे असे की त्याने फ्रेंच भाषेतुन त्या विमान सुंदरीला सेव्हन अप मागीतले. तिने कळलेन कळल्यासारखे करुन त्याला सिएरा मिस्ट दिले. इतकेच नाही तर संपुर्ण विमानप्रवासातच त्या विमान कंपनीशी फ्रेंच भाषेत त्याला व्यवहार करणे अगदी अवघड झाले होते. कोणत्याही सूचना, पाट्या फ्रेंच भाषेत नव्हत्या. त्याव्यतिरिक्त त्याला टोरोंटो आणि अन्य शहरामध्ये देखील सगळीकडे वाईट अनुभव आले. इंग्लिश बोलल्याशिवाय त्याला कुठेही कामे करता आली नाहीत आणि वर उपेक्षेची वागणुक मिळाली. कॅनडामध्ये बरेच फ्रेंच लोक असल्यामुळे त्यांना फ्रेंच भाषेतुन सेवा उपलब्ध करुन द्यायला हव्यात असे त्याचे म्हणणे न्यायालला पटले. आणि त्याची मानसीक, सांस्कृतिक आणि भाषिक हानी केल्याबद्दल न्यायालयाने विमान कंपनीला १०-१५००० डॉलर्सचा दंड ठोठावला.
अर्थात त्यावर इंग्रज मंडळींनी अतिशय मार्मिक टीका केली हे सांगणे न लगे. साहेबामध्ये काही फार मोठे गुण आहेत. साहेबाची जात अतिशय संयमी आणि मार्मिक आहे. तोल ढळणे हे इंग्लिश माणसाचे लक्षण नाही. त्याउलट मराठी माणुस काही झाले की एकदम रस्त्यावर. त्यामुळे पाट्या मराठीत असाव्यात अशी साधी मागणी देखील मान्य होत नाही. आणि आपला आवेश हा आवेश कमी आणि अभिनिवेशच जास्त असतो. खरोखरीच माणुस आग्रही असेल कशाच्याबाबत तर तो आग्रह साध्या साध्या गोष्टींतुन दिसतो. अमेरिकेत मारे गणेशोत्सव आणि गौरी आणि काय काय साजरे करायचे आणि सकाळमध्ये त्याचे भारंभार लेख लिहायचे. आणि सगळ्यांचे मथळे अगदी ठरावीक - "पॅरिसमध्ये दिवाळी साजरी" "पीट्सबर्गमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष" - "सिडनीमध्ये .... ". आणि ९०% लोकांच्या पोरांना धड मराठी बोलता येत नाही. असो .. टीका करण्याची गरज नाही. परंतु सगळ्या समाजालाच एक जो पीळ असायला हवा तो कमी पड्तो आणि मग आपण रडत बसतो की आमच्या संस्कृतीवर आणि भाषेवर आक्रमण होते आहे. आम्हीच आमच्या भाषेचा आग्रह धरला नाही तर काय दुसऱ्यांनी धरायचा!
असो त्यावरुन आठवले. सिद्धोबा आजकाल मराठी अक्षरे गिरवतो आहे. मराठी बोलता चांगले असल्यामुळे स्वारी लिहायला पटकन शिकेल असे वाटते आहे. ... पुरे आता इथेच थांबतो.