Sunday, June 12, 2011

आमचेही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग

दोन आठवड्यांपूर्वी ओडिसीचे ऑइल बदलले. दुकानाचे नाव मायडास! तर या मच्छराने गाडीला अगदी घरघर लागली आहे असे निदान केले. सगळे टायर्स बदला, व्हील अलाइनमेंट करा. टायमिंग बेल्ट बदला. पावरस्टिअरिंग आणि पावरट्रेन फ्लश करा आणि नवीन ऑइल टाका. हे म्हणजे घंटी सोडुन सायकलचे सगळे पार्ट्स वाजताहेत असे निदान होते. सगळे केले असते तर दोन हजार एक डॉलर्स चा खर्च. यापैकी वस्तु ५०० डॉलर्स आणि मजुरी १५०० असली असती. त्यामुळे एक घरगुती मेकॅनीक गाठला. डेव्हिड बाक्केन त्याचे नाव. म्हटले किती घेणार? तर एकंदरीत वाजवी दर सांगीतल्यामुळे मी हो म्हटले.

त्यानुसार आज सकाळी त्याच्या घरी गेलो. अमेरिकेत अर्थातच सगळ्यांकडे कार असल्यामुळे सगळ्यांकडे गराज (गॅरेज) असते. हे अमेरिकेत उच्चार थोडे वेगळे असतात. भारतात ब्रिटिश इंग्लिश वापरतात. त्याचे देखील आता भारतीयकरण झाले आहे. अमेरिकेचे असेच आहे. त्यांनी साहेबाला शहारा येईल असे बऱ्याच शब्दांचे केले आहे. आणि केवळ उच्चारच नाही तर आख्खे शब्दच नवीन शोधुन काढतात. उदाहरणार्थ ... मॉर्निंग च्या ऐवजी डे ब्रेक, फुटपाथ च्या ऐवजी साईडवॉक, सिग्नलच्या ऐवजी लाइट्स. इतकेच नाही तर इंग्रजांच्या अगदी उलटे करायचा कटाक्ष दिसतो. गाडी उजवीकडे चालवणे, व्होल्टेज ११०, प्लग पिन्स विचित्र काढणे, सैन्याच्या रॅन्क इंग्रजांपेक्षा उलट्या करणे, सैनिकी सल्युट देखिल उलटा. दरवाजे बाहेर उघडणारे. या सर्व गोष्टींमध्ये व्यावहारीक सोय आहे. परंतु ५०% इंग्रजद्वेष नक्कीच आहे. असो ....

तर अमेरिकेत सगळ्यांकडेच गराज असते आणि ते सुसज्ज असते. सहसा घरात बाहेर लागणारी सर्व आयुधे तिथे असतात. स्क्रु ड्रायव्हर पासुन रेंच आणि पावर ड्रिल पर्यंत आणि खुरप्यापासुन लॉन मोअर (गवत कापायचे मशिन) ... सगळे काही असते. अमेरिकन पुरुषमंडळी दर काही वर्षांनी घरात ल्या घरात काही तरी उन्हाळी कामे काढत असतात. नवीन रुम तयार करणे, रंग देणे, कुंपण करणे, फ्लोअरिंग करणे. बऱ्याचदा हे डिआयवाय म्हणजे डू इट योरसेल्फ असे असते कारण इकडे मजुरी खूप जास्त.

डेव्हिडच्या गराजमध्ये असेच ... पाय ठेवायला जागा नाही. परंतु एक कार मावेल एवढी जागा मात्र अर्थात रिकामी ठेवलेली. दुरुस्तीसाठी आलेल्या सर्व गाड्या रस्त्यावर लावलेल्या. गराजमध्ये का कुणास ठाऊक वॉशर सुद्धा होता. बहुधा गराजशी संबंधीत कपडे आणि वस्तु तिथे धुऊन काढल असेल.

त्याच्या घराबाहेरुनच त्याला फोन केला तर गराजचे दार उघडले. गाडीचा टायमिंग बेल्ट बदलणे आणि पावरट्रेन आणि स्टिअरिंग फ्युईड बदलणे असे ठरले होते. त्यानुसार तो तयार होता. किल्ली देऊन परत घरी जायचे कसे अश्या विचारात मी होतो. शेवटी डेव्हिडलाच विनंती केली की मला घरी सोड. तो लगेच तयार झाला. परंतु एका गिऱ्हाईकाची गाडी दुरुस्त झाली नव्हती तेव्हा त्या बाईची वाट पाहु आणि ती आली की तिला गाडी देऊ असे म्हणाला.

दुरुस्त होत नाही म्हणजे काय? - मी
ए सी बिघडला आहे. चालुच होत नाही.  आणि सर्किट बायपास केले तर चालु होतो परंतु १५ मिनिटात बंद होतो! - डेव्हिड.
अगदी वैतागलो आहे. सगळे करुन झाले. माझे डोकेच चालेनासे झाले आहे! - पुन्हा डेव्हिड.
 बायपास केल्यावर ए सी चालु होते हे तुला कसे कळते. - मी
आवाज येतो ना पंख्याचा. आणि त्याच्या आधी क्लिक सुद्धा होते. - डेव्हिड

बहुधा सगळ्या गाड्यांमध्ये दोन पंखे असतात. पहिला पंखा रेडिएटर ला थंड करतो आणि दुसरा पंखा ए सी च्या हीट एक्चेंजला. त्यामुळे तो पंखा चालु असेल तर ए सी चालु असायला हवा (सहसा). परंतु त्यापेक्षादेखील गाडी चालु केली तर ए सी चा एक क्लिक आवाज ऐकु येतो. सांगीतल्याशिवाय कळणार नाही. परंतु मेकॅनिक लोकांना माहित असते. मला सांगीतल्यावर ऐकु आला.

माझे सामान्य ज्ञान नक्कीच वाढले परंतु त्याला प्रश्न काही सुटला नव्हता!

तो आतुन एक पुस्तक घेऊन आला. कुठलेसे पान उघडले. त्यावर सगळे एलेक्ट्रीक च्या रेखाकृती होत्या. मला बीएस्सी फिजिक्स चे दिवस आठवले. तो मला सांगु लागला. ...

रीले चा संदेश जातो आणि सेकंडरी फॅन चालु होतो. हीट एक्सेंज आणि टेंपरेचर कंट्रोल आणि इतर संवेदक (सेन्सर्स) आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते. बाबामहाराजांना तब्बल १८ वर्षांनंतर असले चित्र पाहुन स्फुरण चढले. मी त्याला प्रश्न विचारु लागलो.

या रेषेचा अर्थ काय? कोण कोणाला सिग्नल पाठवतो आहे? पीएमसी काय आहे? रिलेचे काम काय? एक ना दोन.... बीएस्सी (संस्कृत) च्या पहिल्या आणि शेवटच्या वर्षात असताना बापट गुरुजींना मी इतक्या शंका विचारायचो की त्याने माझे नाव शंकासुर ठेवले होते. असो ... परंतु अनेक प्रश्न विचारल्यानंतर माझी खात्री झाली की ए सी चांगला आहे आणि सेन्सर्स देखील त्यांचे काम करत आहेत. त्यामुळे तरीसुद्धा ए सी बंद होत असेल तर जे कोणी ए सी ला बंद व्हायचा संदेश पाठवते आहे तिथेच दोष आहे. आणि ते कोणी म्हणजे पीएमसी आहे. पीएमसी अर्थात पॉवरट्रेन कंट्रोल मॉड्युल (अर्थात एंजिन कंट्रोल मॉड्युल) हे जणु काही सर्व  गाडीच्या एलेक्ट्रीकल सिस्टिमचा मेंदुच म्हणायचा.

त्याच्या आत कसे शिरायचे? तुझे एरर फाईंडिंग मशिन त्याला लावता येते का? - मी.

हे मशिन मेकॅनिक गाडीला लावतात आणि गाडी आपले निदान त्या मशिनला सांगते. आजकालच्या सर्व गाड्यांमध्ये अशी सोय असते ... अगदी भारतातल्या सुद्धा गाड्यांमध्ये अशी गोष्ट असणारच.

नाही.. काहीही एरर कोड येत नाही आहे... - डेव्हिड
 तो कोड पीएमसी कडुनच येणार? - मी
बरोबर - डेव्हिड
 पीएमसी उघडुन बघता येते? - मी
नाही - डेव्हिड
 ओके ... मग पीएमसी च बिघडला आहे. - मी
कसे - डेव्हिड
कारण एसी कम्प्रेसर चांगला आहे. दुसरा पंखा चांगला आहे. सेन्सर्स त्यांचे काम करत आहेत. सर्किट ब्रेक केल्यावर एसी चालु होतो आणि पंधरा मिनिटानंतर कोणीतरी तो बंद करायला सांगतो याचा अर्थ केवळ संदेश चुकीचा आहे. संदेश कुठुन येतो आहे तर पीएमसी. पीएमसी च्या आत आपल्याला जाण्याची सोय नाही. आणि अजुन एक गोष्ट म्हणजे गाडीला एरर फाईंडर लावला तर त्याला पीएमसी सगळे आलबेल आहे असे सांगतो आहे. - मी
 अच्छा! - डेव्हिड
मीसुद्धा त्याच निष्कर्षाप्रत आलो आहे. - डेव्हिड
 गुड! - मी


त्याला पटले होते. पुढे त्याने त्या गाडीच्या मालकीणीला तेच सांगीतले.

त्यानंतर मला घरी सोडवायला येताना मला सांगु लागला की तो इंटेल मध्ये डिझाईन इंजिनिअर होता. मी दचकलोच ... अगदी त्यांच्या दोन धुळ खात पडलेल्या पाट्या/ट्रॉफिज देखील दाखवल्या! आज डेव्हिड एका दुकानात काम करतो. इंटेलमध्ये १२-१५ तास काम करुन करुन अगदी तरुणपणात हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ती नोकरी सोडली किंवा सोडावी लागली. मी विचारले नाही. परंतु अमेरिकेत हे नवीन नाही. लोक एक करीअर सोडुन देऊन पुन्हा आयुष्याची नवीन जुळणी करतात.

बोलता बोलता घरी पोहोचलो. मी डेव्हिड ला म्हणालो, "गरज असेल तरच टायमिंग बेल्ट बदल". "अर्थात" -डेव्हिड. दुपारी डेव्हिडचा फोन आला, "तुला बेल्ट ची गरज नाही. २०० डॉलर्स वाचले तुझे." "धन्यवाद" - मी.

कदाचीत डेव्हिड प्रामाणिक असेल .... कदाचित मी त्याला मदत केली म्हणुन असेल ... परंतु त्याने मला योग्य तो सल्ला दिला.

आणि मी गेली १० वर्षे व्यवस्थापन करुन करुन माझा मेंदु शिणलेला ... थोडा कुणाचा काही प्रश्न सोडवला तर अगदीच आनंदुन गेलो. तांत्रीक गोष्टींमध्ये इन्स्टंट समाधान असते. सॉल्व्ह प्रॉब्लेम्स बी हॅपी!

No comments: