Monday, July 27, 2009

सहभावना (एम्पथी)

सलोनी

 

आज मी ज्या विषयावर लिहिणार आहे तो विषय आतापर्यंत लिहिलेल्या विषयांच्या तुलनेत समजायला तुला जास्त काळ लागेल. परंतु जर मोठे होऊन कुठल्याही क्षेत्रात तुला नेतृत्व करायचे असेल तर आवश्यक अश्या काही गोष्टी आहेत इथे. मी त्यात पारंगत आहे असे काही नाही. परंतु आपण कुठे कमी पडतो हे कळणे सुद्धा महत्वाचे असते.

 

अमेरिकेत मागील काही आठवडे इथल्या सर्वाच्च न्यायालयाच्या एका रिकाम्या जागेसाठी योग्य व्यक्तीचा शोध चालु आहे. भारतामध्ये राष्ट्रपति न्यायाधिशांची थेट नियुक्ति करतात. अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यक्ष कोणातरी सुयोग्य व्यक्तिचे नाव सुचवतात आणि इथली संसद (सेनेट) त्या व्यक्तिची शहानिशा करुन त्या निर्णयाला मंजुरी देतात. ही प्रक्रिया अतिशय अटीतटीची असते कारण देशाच्या समाजकारणावर दूरगामी होतील असे निर्णय हे न्यायाधीश देणार असतात. एकदा केलेली नियुक्ती आजन्म असते. अक्षरश: आजन्म. त्या न्यायाधीशांना कोणीही निवृत्त करू शकत नाही (अगदी राष्ट्राध्यक्ष सुद्धा). यामागची भूमिका अशी की न्यायाधीशांना कोणाचीही भीती न बाळगता न्यायदानाचे काम नि:पक्षपातीपणे करता यावे.

 

तर सध्या रिकाम्या असलेल्या जागेसाठी ओबामांनी एका लॅटिन अमेरिकन स्त्रीचे नाव सुचवले आहे. तिचे नाव जज सोनिया सोटोमायर. जज सोटोमायरकडे एका चांगल्या न्यायाधीशाकडे असावेत असे सर्व गुण आहेत आणि त्यांची नियुक्ती अगदी निश्चीत आहे. परंतु दोन गोष्टींबाबत मोठा वादंग झाला. खरे तर वादंग पेक्षा वादविवाद किंवा उहापोह झाला असे म्हणु आपण. कारण अमेरिकेत वाद असेल तरिही सभ्यतेची पातळी क्वचीतच सोडली जाते. वाटेल तसे आरोप प्रत्यारोप सहसा केले जात नाहीत. असो... तर ते दोन मुद्दे म्हणजे १) न्यायाधीशांमधील वंशाधारीत न्यायप्रदानक्षमता आणि २) न्यायदानामध्ये सहभावनेचे (एम्पथी) स्थान.

 

जज सोटोमायर यांनी पूर्वी कधीतरी न्यायाधीशांच्या एका संमेलनात असे म्हटले होते की "एखाद्या "विद्वान" श्वेतवर्णीय पुरुषापेक्षा एखादी "विद्वान" लॅटीन अमेरिकन स्त्री जज अधिक चांगले न्यायदान करु शकेल." अमेरिकेत समानतेचे तत्व हे दुहेरी आहे. कोणत्याही कृष्णवर्णीय अथवा अल्पसंख्याक व्यक्तीवर अन्याय होऊ नये याची काळजी जशी घेतली जाते त्याचवेळी बहुसंख्याक अथवा सबळ घटकांवर ही अन्याय होऊ नये अशी समाजाची रचना आणि धारणा बव्हंशी आहे. त्यामुळे सोटोमायर यांचे वरिल वक्तव्य वरकरणी पाहिले तर निषेध करण्यासारखेच आहे. त्यातुन असेच वाटेल की जज सोटोमायर वंश आणि लिंगानुसार भेदभाव मानणार्या आहेत. परंतु जज सोटोमायर यांनी त्यावर क्षमा मागीतली आणि आपला समानतेवर विश्वास आहे हे स्पष्ट केले. त्यांचे मूळ वक्तव्य हे पूर्वीच्या एका प्रसिद्ध न्यायाधीशाच्या वक्त्यव्याला दुजोरा देताना आणि त्या संमेलनाला आलेल्या लॅटिन अमेरिकन स्त्रीयांना स्फुर्ती देण्यासाठी केले होते. त्यामागच्या संदर्भाचा विपर्यास केला जातो आहे हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे स्पष्टीकरण सर्वसाधारणपणे सर्व संसदेला मान्य झाले.

 

परंतु त्या संदर्भावरुन पुढची चर्चा जास्त रंगली. संदर्भ होता - त्या मूळ वक्तव्याचा जिथे नुकत्याच निवृत्त झालेल्या सॅन्ड्रा डे ओकॉनर या एका न्यायाधीशांनी असे म्हटले होते की "न्याय देताना न्यायाधीशांचे आयुष्यविषयक अनुभव जितके जास्त तितके न्यायदान "विद्वत्तापूर्ण" सहभावनापूर्ण आणि म्हणुन अधिक चांगले होईल."

 

वाद या विषयावर होता की न्यायाधीशांनी न्यायदान करताना सहवेदना अथवा सहभावना ठेवावी का? ऍरिस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञाने कायद्याची (किंवा नियमांची) व्याख्या अशी केली आहे की - लॉ इज रिझन विदाऊट पॅशन (अर्थात, कायदा म्हणजे अभिनीवेशशून्य कारणमीमांसा आहे.). इथे भावनेपेक्षा तर्क महत्वाचा. लोकशाहीमध्ये न्यायदान हे नियमानुसार व्हावे अशी अपेक्षा. अन्यथा सोयिस्कररीत्या व्याख्या बदलल्या तर अन्याय सहन न झाल्याने अनगोंदी माजेल. त्यामुळे न्यायाधीशांनी नियमानुसार त्यांचे काम करावे आणि भावनिकपणा टाळावा अशी अपेक्षा. परंतु आयुष्यातील सर्वच प्रसंग नियमबद्ध करता येत नाहीत. महाभारतात त्यालाच "धर्मस्य गति सूक्ष्म:" म्हटले आहे. त्यामुळे अनेकदा न्यायाधीशांना कायद्याचा अर्थ लावावा लागतो. आणि इथे जर न्यायाधीशांनी समाजातील दु:ख आणि वेदना पाहिल्याच नसतील तर अन्याय होऊ शकतो. न्याय आंधळा असावा याचा अर्थ सर्व जण कायद्यापुढे समान असावेत. परंतु न्याय बहिरा अथवा संवेदनाहीन असावा का असा प्रश्न आहे.

 

ऍरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार अभिनिवेशशून्य असला तरीही सहभावनाहीन असावा का? बहुधा नाही. सांगणे कठीण आहे. सर्वच प्रश्नांना निश्चीत उत्तरे नसतात. आणि अनेकदा उत्तरांपेक्षा प्रश्न विचारला जाणे हेच खूप महत्वाचे असते. जिवंतपणाचे लक्षण आहे.

 

एकंदरीतच अमेरिकेच्या प्रगतीमागचे सर्वात मूळ कारण हे इथली न्यायव्यवस्था हेच आहे. अमेरिकाच नव्हे तर जगातील सर्वच यशस्वी आणि संपन्न राज्ये / राष्ट्रे आणि साम्राज्ये ही तुलनेनी कमी अन्यायकारक होती. जो राजा जितका अन्यायकारक तितका त्याचा लवकर अस्त हा इतिहासातिल नियम आहे. रामराज्य या संकल्पनेमागील अर्थ नेमका काय आहे? त्याउलट रावणराज्य कसे असेल असे विचारले तर सहसा आपण सर्वच हेच म्हणु की जिथे जीवाशीवाची शाश्वती नाही ते रावणराज्य! मोगलाई "मोगलाई" असूनही इतर इस्लामी बादशहांपैकी जास्त टिकली कारण तुलनेने मोगल राज्यकर्ते अधिक सहिष्णु होते !! यात "तुलनेने" हे समजुन घेणे महत्वाचे. शिवाजी राजांना जनतेने आपले का मानले ... त्यांच्या मृत्युनंतरही हे राज्य टिकावे अशी धडपड इथल्या माणसांनीच नाही तर कड्या कपारींनीही का केली? तर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि आपल्या धर्मानुसार श्री म्हणजे दुसरे तिसरे कोणिही नसुन आपणच आहोत. हे सर्वांचे राज्य आहे. इथे न्याय आहे म्हणुन ते चालवायचे आणि वाढवायचे. आज महाराष्ट्र पुढे का आणि अनेक नोबेल पदक विजेत्यांची जन्मभूमी बंगाल मागे का? कारण कम्युनिझमच्या नावाखाली अराजकताच आहे. कामगारांची सर्व समाजावर लोखंडी पकड आहे. मुक्त विचार मुक्त आचार यांना बंदी आहे.

 

अमेरिका म्हणजे काही धुतल्या तांदळासारखी नक्कीच नाही. परंतु इतर देशांपेक्षा बरी आहे. तीच गोष्ट महाराष्ट्राची. न्याय, समता (गुणांना वाव), आचार विचार आणि कृतिचे स्वातंत्र आणि मानवी मुल्यांचे अधिष्टान ही समाजाच्या प्रगतीची चाके आहेत. मानवी मन, त्याच्या क्षमता आणि आकांक्षा ही त्याची इंजिन्स आहेत. आणि कल्पकता हे इंधन आहे. पाश्चात्यांची प्रगती साध्य करणे हे तसे सोपे आहे ... कारण अनेक भारतिय अमेरिकेत येऊन मोठमोठे पराक्रम करतातच. परंतु भारत देशच जर अमेरिकेसारखा अथवा अधिक समृद्ध आणि बलशाली करायचा असेल तर न्याय, समान संधी, स्वातंत्र्य खर्या अर्थाने प्रस्थापित केले पाहिजेत. समृद्धि आणि भौतिक प्रगती केवळ एक परिपाक आहे.

 

"सहभावना हवी की नको?" !!! खरेच ... भारतामध्ये ही असे प्रश्न विचारणारे खासदार जन्माला येवोत.

No comments: