सलोनीबाई
परवा तुझी आई म्हणाली म्हणुन एक मराठी चित्रपट पाहिला - "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय". खरेतर मी हा चित्रपट पाह्यला फार उत्सुक नव्हतो कारण १) चित्रपटाचे नाव मला आवडले नाही २) मराठी माणसांची महाराष्ट्रात कशी गळचेपी होते आहे याबद्दल रडगाणे मांडलेले मला विशेष आवडत नाही.
नावाबद्दल सांगायचे तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मला रुचत नाही. आपण कधीतरी "मी ज्ञानेश्वर कुलकर्णी बोलतोय" असा उल्लेख करु का? कधीच नाही. माधवराव पेशव्यांना आपण कधी "तो माधव" म्हणतो का? संत एकनाथ यांना आपण कधी तो एकनाथ म्हणतो का? मग शिवाजी, संभाजी, गोरा कुंभार, चोखोबा यांना एकेरी उल्लेख का करायचा. त्या मांजरेकरांनाच कर जोडुन विचारले पाहिजे. खरे तर जोडे मारुन विचारले पाहिजे असे म्हणायला पाहिजे कारण छ्त्रपतिंशिवाय मांजरेकरांचे महंमदवाडीकर १०-१५ पिढ्यांपूर्वीच झाले असते.
एकंदरीतच मला निवडकपणे एकेरी उल्लेख केलेला आवडत नाही. त्यातुन दुसर्या व्यक्तीप्रती अनादर व्यक्त होतो. याचे मूळ अर्थात आपल्या जातीव्यवस्थेत आहे. आपल्या समाजाने जातींच्या भिंती पाडायचे बरेच काम केले असले तरी कधी कधी अश्या सांकेतिक प्रतिध्वनींमधुन हे कळते की काम अजूनही अपूर्ण आहे.
अमेरिकेत आदरार्थी संबोधनच नाही. इंग्लिश भाषेतीलच ती त्रुटी कमी आणि खुबी जास्त आहे. अमेरिका तर विशेषत: अगदीच बहुजनमुख (एगॅलेटेरिअन) समाजधारणा आहे. आर्थिक विषमता जरुर आहे. परंतु समान संधीचे सुत्र बाळगले जाते त्यामुळे समाजात विषमता परंपरागत चालत येत नाही. सर्वच माणसे एकमेकांना आदराने वागवतात. केवळ शिष्टाचार आहे असे म्हणुन त्याकडे नाके मुरडण्यापेक्षा आपण शिष्टाचार म्हणुन तरी आपल्याकडच्या गरीब, असहाय लोकांना त्याच्या निम्मे जरी सन्मानाने वागवले तरी खूप बरे होईल. भारतात आपण विशिष्ट लोकांना अरे तुरे करुन त्यांच्या सन्मानावर घाला घालुन त्यांचा आत्मविश्वासच खच्ची करतो. एखाद्या दुकानदाराचे १०-१२ वर्षाचे पोरगे ५०-६० वर्षाच्या कामगाराला सहज अरे तुरे करताना दिसते. त्याउलट अनिरुद्ध दादा वडिलांचा २०० कोटींचा व्यवसाय असूनही ड्रायव्हरकाकांच्या पाया पडुन परिक्षेला जातो आणि दुकानातुन घरी येताना वडिलांच्या गाडीतुन न येता कोणाच्या तरी स्कूटर मोटरसायकल वरुन येतो. हीच आपल्या मराठी समाजाची ताकत आहे. उगाच महाराष्ट्र पुढे नाही गेला. सिंधी, मारवाडी लोक मुंबईत आले म्हणुन महाराष्ट्र प्रगत झाला हे केवळ अर्धसत्य . (खरेतर पाव सत्य!) म्हणायला पाहिजे. सिंधी गुजराती मारवाडी पंजाबी सगळीकडे गेले आहेत. दिल्ली, बंगळुर, चेन्नई, कलकत्ता ... सगळीकडे. परंतु महाराष्ट्रात जो कष्टाळु, प्रामाणिक आणि बहुजनप्रिय समाज आहे तो भारतात अन्यत्र खूपच कमी आहे. ज्ञानेश्वर तुकाराम शिवाजी महाराज शाहु महाराज ते गोखले आगरकर कर्वे कर्मवीर भाऊराव पाटिल फुले आंबेडकर नारायण सुर्वे कुसुमाग्रज .... किति किति नावे घ्यावीत. मराठी समाजाचा पाया व्यापक आहे. त्याचे अधिष्ठान सर्व समाजात आहे. केवळ कृष्णाच्या करंगळीवर गोवर्धन उचलला जाऊ शकत नाही. तिथे समस्त गोकुळजन आपापल्या काठ्या घेउन गेले तेव्हा गोवर्धन उचलला गेला.
बर्याचदा मला अमेरिकन आणि मराठी समाजामध्ये बरेच साम्य आढळते. आत्मविश्वास, समानता,न्यायप्रियता, कष्टाळुपणा, तुलनेने कमी भेदभाव या सर्व गोष्टी दोन्हीकडे दिसतात. अमेरिकेत सर्व जगातुन गुणवान लोक येउन त्यांच्या गुणांचे चीज करतात आणि अमेरिकेच्या श्रीमंतीत भर घालतात. भारतीय समाज हा अमेरिकेत सर्वात जास्त सधन आहे. परंतु ती सधनता इथे येउन निर्माण झाली आहे. त्याची कारणे अनेक आहेत. परंतु सांगायचा मुद्दा हा की जरी सरासरी अमेरिकन समाज अमेरिकेतल्या भारतियांपेक्षा गरीब असला तरीही इथल्या प्रगतीचा तोच पाया आणि तोच कळस आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठी समाज हा सरासरीने गुजराती, मारवाडी इत्यादिंपेक्षा गरीब असला तरीही तोच कारण आहे या सर्व प्रगतीचे.
फक्त एकच गोष्ट मराठी समाजात कमी आहे. आपण त्या सिंहासारखे आहोत की जो शेळ्यांच्या कळपात राहुन आपले सिंहपण विसरला आहे. आर्थिकदृष्ट्या अल्पसंतोषी असल्यामुळे इतर सर्व गुण असूनही आर्थिकदृष्ट्या मागे पडला आहे. संस्कृती आणि भाषा आर्थिक अधिष्ठानाशिवाय दुर्बळ होत जातात. आपले थोडेसे तसे काहीसे झाले आहे.
परंतु त्या चित्रपटात दाखवले तेवढे विदारक चित्र आहे की नाही कुणास ठाऊक. मला तर असे वाटते की मराठी उद्योजकांची संख्या वाढते आहे. मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत. आपण जरीही दुर्गोत्सव साजरा करू लागलो तरिही भारतभर आता गणेशोत्सवही साजरा होतो आहे. उत्तर वा दक्षिण भारताचा प्रभाव जरुर आहे परंतु मराठी संस्कृति टिकुन आहे.
नाही म्हणायला एकच गोष्ट मला खटकते ती म्हणजे महाराष्ट्रात इंग्रजीचे अगदी स्तोम माजलेले आहे. मोरेसाहेबांचा पहिलीपासुन इंग्रजीचा निर्णय स्तुत्य होता. त्याच्या जोडीला आपली भाषा रुजवण्यासाठी जे प्रयत्न दिसायला हवेत ते दिसत नाही. उदाहरणार्थ इंग्रजी बरोबर मराठी पण सक्तीचे करायला हवे होते. आज ते ऐच्छिक आहे. दुकांनाच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत. खाली इंग्रजी कन्नड हिब्रु काही पण लिहा. पण मूळ पाटी मराठीतच पाहिजे. राज्यकारभार मराठीतच पाहिजे. छत्रपतिंनी राजभाषाकोश का तयार केला आणि आपण अजूनही मंत्रालय आणि मुंबई महापालिकेचे कामकाज मराठीतुन करु शकत नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
असो ... बाकी चित्रपटाबाबत सांगायचे तर चित्रपट एकंदरीत चांगला पण अगदीच स्वप्नाळु वाटला. वास्तवाचे भान नसलेला होता. अगदी मनसे-पुरस्कृत आहे की काय अशी शंका वाटली. एक गोष्ट चांगली अशी की मराठी माणसाचे दोषही दाखवले. लाच घेणारे आणि मराठी माणसांवर अन्याय करणारे मराठी लोक दाखवले ते अगदी खरे आहे. त्यामुळे मूळ प्रश्न मराठीची गळचेपी की पैशाची सत्ता आहे असा पडतो. मांजरेकरांचे मांजरासारखे पाय मात्र अगदी बघवले नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे पात्र यामध्ये असण्याची काहीच गरज नव्हती. त्यातुन आपला पोकळपणाच व्यक्त होतो आणि आपण शिवाजी महाराज आणि अमराठी लोकांमध्ये हकनाक दुरावा निर्माण करतो. तसेच छत्रपतिंना हसण्याचा विषय बनवतो. चित्रपटाच्या नायकाचे कोणी सरदार आजोबा इतिहासातुन जिवंत होऊन येतात असे दाखवले असते तरिही चालले असते. किंवा सर्वात उत्तम म्हणजे नायकाच्या सहनशीलतेचा अंत होतो आणि तो अरे ला का रे म्हणायला सुरुवात करतो असे दाखवले असते तरिही चांगले वाटले असते.
असो ... परंतु तरिही चित्रपट चांगलाच वाटला.
No comments:
Post a Comment