Tuesday, July 28, 2009

अमेरिकेतील राहणीमान

इथे न्युअर्कच्या विमानतळावर हे नेहेमीचेच दृष्य.. पन्नास एक विमाने आज्ञाधारकपणे रांगेत वाट पहात उभी. दूरवरचा कंट्रोल टॉवर सांगेल ते निमूटपणे ऐकुन आपला उडण्याचा नंबर कधी येतोय याची वाट पहात थांबलेली. हे दृष्य पूर्वी पहाताना मला खूप मजा वाटली असती. परंतु दोन तास रांगेत उभे राहुन पुढच्या सहा तासांचा प्रवास अगदी नकोसा वाटत होता. पण "नाईलाजको क्या ईलाज" म्हणत मी विमाने पहात होतो. उडण्याची वेळ झाल्यावर एक एक विमान इंजिनांचा गडगडाट करून अर्ध्या मिनिटात आपल्या अजस्र पंखांचा पसारा घेउन आकाशात झेप घेत होते.

एकंदरीतच विमान हे प्रकरणच कोणाच्याही कल्पनाशक्तीला भुरळ घालेल असेच! लहानपणी पुण्यात सोमवारात रहाताना फक्त विमाने पाहण्यासाठी सायकलवरुन लोहगावच्या विमानतळावर आम्ही गेलेलो. त्यानंतर फर्ग्युसनमध्ये एनडीए ची स्वप्ने पाहिली आणि एसएसबीच्या इंटरव्हुला जाऊन त्यांचा चक्काचूर झालेला ही पाहिला. बरे झाले म्हणा ... माझा नेम तसा काही चांगला नाही. गोट्या कॅरम कधीच जमले नाही. क्रिकेट चा थ्रो तर ३०-४० अंश इकडे तिकडे होणार. उगाच सैन्यात जाऊन घोटाळा झाला असता!! जे होते चांगल्यासाठीच होते. पुन्हा डेहराडुनला जाऊनही धडकलो. परंतु एव्हाना माझा चेहेरा चांगलाच परिचयाचा झाला होता त्यामुळे मला पुण्याला परत पिटाळले. त्यानंतर आय ए एस च्या प्राथमिक परिक्षेतही उत्तिर्ण न होऊ शकल्यावर गुपचुप कंप्युटर मध्ये करियर करून आमची स्वारी अमेरिकेला आली. तात्पर्य काय तर ब्रेन ड्रेन वगैरी अगदी खरे नाही. अमेरिकेत अस्मादिकांसारखेही लोक आहेत जे काहीच जमले नाही म्हणुन इकडे आले!

असो... पण आता इथे आलोच आहे तर माझ्या मनात कायम असेच विचार चालू असतात की अमेरिकेत हे असेच का आणि तसेच का?

आज ती विमानांची रांग पाहून असेच विचार घुमु लागले मनात. जगात दोन चार अपवाद वगळले तर ५० विमाने रांगेत उभी आहेत उड्ण्यासाठी हे दृष्य दिसणे कठीण आहे. अमेरिकेत विमानप्रवास कारप्रवासापेक्षा स्वस्त आहे. हे खरोखरीच अद्भुत आहे की जिच्या निर्मितीसाठी अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, सामग्री, कच्चा माल आणि व्यवस्थापन वापरले जाते ती गोष्ट गहु तांदुळासारखी सामान्यांच्या आवाक्यात आणुन ठेवली आहे. प्रवासी विमान कंपन्या इथे फार पैसे कमवु शकत नाहीत कारण स्पर्धा अतिशय तीव्र आहे. आणि विमानेच नाही तर मोटारी, इलेक्ट्रॉनिक्स, अन्नपदार्थ, सेवा व्यवसाय सर्वच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा अगदी मुबलक वापर होतो. (किंबहुना त्यामुळेच उत्पादकता वाढुन क्रयशक्ती आणि वस्तुंची मुबलकता निर्माण होते). आता तर विमानात क्रेडिट कार्ड वापरून चहा कॉफी विकत घेता येते .. जमीनीपासून ३०००० फुट उंचीवर!! कार वॉश करायला गेलो तर तिथे यंत्रे कार धुतात. चित्रपट पाह्यचा म्हटले तर त्याचीसुद्धा वेंडिंग मशिन्स आहेत. ६-८ लेन्स चे २०-२५ मैल रस्ते १० - १२ महिन्यात तयार करतात. आठवड्यांमध्ये घरे बांधली जातात.

यादी बरीच मोठी आहे. सांगण्याचा अर्थ इतकाच की तंत्रज्ञान सर्वदूर आणि स्वस्त करून राहणीमान उंचावले आहे. तंत्रज्ञानाची उपलब्धता बर्याच देशांमध्ये आहे. मग अमेरिकेतच इतकी समृद्धी कशी? मला असे वाटते की भांडवलाद आणि बहुजनमुख समाजधारणा यांमुळे तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वदूर आणि स्वस्त झाला आहे. भांडवलवादामुळे इथे व्यवसाय करणे अतिशय सोपे आहे. आणि एकंदरीतच वृत्तीच अशी की कुठलीही गोष्ट खूप मोठया प्रमाणावर सर्वांंकडे कशी पोहोचवता येइल असा स्पर्धेचा अट्टाहास असतो.

पुन्हा एकदा मला नॅनो गाडीचे कौतुक असे करावेसे वाटते की त्यांनी कल्पकता वापरुन मोटारीचे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले. अर्थात टाटा चे हे स्वप्न अगदीच निस्वार्थी नाही. आणि असूही नये. परंतु भारतात स्पर्धेचा अभाव असल्यामुळे किंवा आणि काही कारणांमुळे आपण किमान कष्टात कमाल पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो. नॅनोचे स्वप्न इतर उद्योगधंदे नाही पाहु शकत कारण त्यामागे अफाट कष्ट आहेत. त्याउलट राजकारण्यांना लाच देऊन व्यापारातील मक्तेदारी टिकवुन ठेवली तर किती सोपे !!

असो ... तर भारतात जसजशी स्पर्धा वाढेल तसतसे सरासरी राहणीमान उंचावेल.

तंत्रज्ञान त्यामानाने तांत्रिक बाब आहे. मनुष्याच्या कल्पकतेला जर आवश्यक ते प्रलोभन (इंसेन्टिव्ह) असेल तर तंत्रज्ञानाचा शोध लावणे अजिबात कढीण नाही. आवश्यकता आहे स्पर्धेतुन त्या तंत्रज्ञानाचे सर्वदूर उपयोजन होण्याची.

Monday, July 27, 2009

सहभावना (एम्पथी)

सलोनी

 

आज मी ज्या विषयावर लिहिणार आहे तो विषय आतापर्यंत लिहिलेल्या विषयांच्या तुलनेत समजायला तुला जास्त काळ लागेल. परंतु जर मोठे होऊन कुठल्याही क्षेत्रात तुला नेतृत्व करायचे असेल तर आवश्यक अश्या काही गोष्टी आहेत इथे. मी त्यात पारंगत आहे असे काही नाही. परंतु आपण कुठे कमी पडतो हे कळणे सुद्धा महत्वाचे असते.

 

अमेरिकेत मागील काही आठवडे इथल्या सर्वाच्च न्यायालयाच्या एका रिकाम्या जागेसाठी योग्य व्यक्तीचा शोध चालु आहे. भारतामध्ये राष्ट्रपति न्यायाधिशांची थेट नियुक्ति करतात. अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यक्ष कोणातरी सुयोग्य व्यक्तिचे नाव सुचवतात आणि इथली संसद (सेनेट) त्या व्यक्तिची शहानिशा करुन त्या निर्णयाला मंजुरी देतात. ही प्रक्रिया अतिशय अटीतटीची असते कारण देशाच्या समाजकारणावर दूरगामी होतील असे निर्णय हे न्यायाधीश देणार असतात. एकदा केलेली नियुक्ती आजन्म असते. अक्षरश: आजन्म. त्या न्यायाधीशांना कोणीही निवृत्त करू शकत नाही (अगदी राष्ट्राध्यक्ष सुद्धा). यामागची भूमिका अशी की न्यायाधीशांना कोणाचीही भीती न बाळगता न्यायदानाचे काम नि:पक्षपातीपणे करता यावे.

 

तर सध्या रिकाम्या असलेल्या जागेसाठी ओबामांनी एका लॅटिन अमेरिकन स्त्रीचे नाव सुचवले आहे. तिचे नाव जज सोनिया सोटोमायर. जज सोटोमायरकडे एका चांगल्या न्यायाधीशाकडे असावेत असे सर्व गुण आहेत आणि त्यांची नियुक्ती अगदी निश्चीत आहे. परंतु दोन गोष्टींबाबत मोठा वादंग झाला. खरे तर वादंग पेक्षा वादविवाद किंवा उहापोह झाला असे म्हणु आपण. कारण अमेरिकेत वाद असेल तरिही सभ्यतेची पातळी क्वचीतच सोडली जाते. वाटेल तसे आरोप प्रत्यारोप सहसा केले जात नाहीत. असो... तर ते दोन मुद्दे म्हणजे १) न्यायाधीशांमधील वंशाधारीत न्यायप्रदानक्षमता आणि २) न्यायदानामध्ये सहभावनेचे (एम्पथी) स्थान.

 

जज सोटोमायर यांनी पूर्वी कधीतरी न्यायाधीशांच्या एका संमेलनात असे म्हटले होते की "एखाद्या "विद्वान" श्वेतवर्णीय पुरुषापेक्षा एखादी "विद्वान" लॅटीन अमेरिकन स्त्री जज अधिक चांगले न्यायदान करु शकेल." अमेरिकेत समानतेचे तत्व हे दुहेरी आहे. कोणत्याही कृष्णवर्णीय अथवा अल्पसंख्याक व्यक्तीवर अन्याय होऊ नये याची काळजी जशी घेतली जाते त्याचवेळी बहुसंख्याक अथवा सबळ घटकांवर ही अन्याय होऊ नये अशी समाजाची रचना आणि धारणा बव्हंशी आहे. त्यामुळे सोटोमायर यांचे वरिल वक्तव्य वरकरणी पाहिले तर निषेध करण्यासारखेच आहे. त्यातुन असेच वाटेल की जज सोटोमायर वंश आणि लिंगानुसार भेदभाव मानणार्या आहेत. परंतु जज सोटोमायर यांनी त्यावर क्षमा मागीतली आणि आपला समानतेवर विश्वास आहे हे स्पष्ट केले. त्यांचे मूळ वक्तव्य हे पूर्वीच्या एका प्रसिद्ध न्यायाधीशाच्या वक्त्यव्याला दुजोरा देताना आणि त्या संमेलनाला आलेल्या लॅटिन अमेरिकन स्त्रीयांना स्फुर्ती देण्यासाठी केले होते. त्यामागच्या संदर्भाचा विपर्यास केला जातो आहे हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे स्पष्टीकरण सर्वसाधारणपणे सर्व संसदेला मान्य झाले.

 

परंतु त्या संदर्भावरुन पुढची चर्चा जास्त रंगली. संदर्भ होता - त्या मूळ वक्तव्याचा जिथे नुकत्याच निवृत्त झालेल्या सॅन्ड्रा डे ओकॉनर या एका न्यायाधीशांनी असे म्हटले होते की "न्याय देताना न्यायाधीशांचे आयुष्यविषयक अनुभव जितके जास्त तितके न्यायदान "विद्वत्तापूर्ण" सहभावनापूर्ण आणि म्हणुन अधिक चांगले होईल."

 

वाद या विषयावर होता की न्यायाधीशांनी न्यायदान करताना सहवेदना अथवा सहभावना ठेवावी का? ऍरिस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञाने कायद्याची (किंवा नियमांची) व्याख्या अशी केली आहे की - लॉ इज रिझन विदाऊट पॅशन (अर्थात, कायदा म्हणजे अभिनीवेशशून्य कारणमीमांसा आहे.). इथे भावनेपेक्षा तर्क महत्वाचा. लोकशाहीमध्ये न्यायदान हे नियमानुसार व्हावे अशी अपेक्षा. अन्यथा सोयिस्कररीत्या व्याख्या बदलल्या तर अन्याय सहन न झाल्याने अनगोंदी माजेल. त्यामुळे न्यायाधीशांनी नियमानुसार त्यांचे काम करावे आणि भावनिकपणा टाळावा अशी अपेक्षा. परंतु आयुष्यातील सर्वच प्रसंग नियमबद्ध करता येत नाहीत. महाभारतात त्यालाच "धर्मस्य गति सूक्ष्म:" म्हटले आहे. त्यामुळे अनेकदा न्यायाधीशांना कायद्याचा अर्थ लावावा लागतो. आणि इथे जर न्यायाधीशांनी समाजातील दु:ख आणि वेदना पाहिल्याच नसतील तर अन्याय होऊ शकतो. न्याय आंधळा असावा याचा अर्थ सर्व जण कायद्यापुढे समान असावेत. परंतु न्याय बहिरा अथवा संवेदनाहीन असावा का असा प्रश्न आहे.

 

ऍरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार अभिनिवेशशून्य असला तरीही सहभावनाहीन असावा का? बहुधा नाही. सांगणे कठीण आहे. सर्वच प्रश्नांना निश्चीत उत्तरे नसतात. आणि अनेकदा उत्तरांपेक्षा प्रश्न विचारला जाणे हेच खूप महत्वाचे असते. जिवंतपणाचे लक्षण आहे.

 

एकंदरीतच अमेरिकेच्या प्रगतीमागचे सर्वात मूळ कारण हे इथली न्यायव्यवस्था हेच आहे. अमेरिकाच नव्हे तर जगातील सर्वच यशस्वी आणि संपन्न राज्ये / राष्ट्रे आणि साम्राज्ये ही तुलनेनी कमी अन्यायकारक होती. जो राजा जितका अन्यायकारक तितका त्याचा लवकर अस्त हा इतिहासातिल नियम आहे. रामराज्य या संकल्पनेमागील अर्थ नेमका काय आहे? त्याउलट रावणराज्य कसे असेल असे विचारले तर सहसा आपण सर्वच हेच म्हणु की जिथे जीवाशीवाची शाश्वती नाही ते रावणराज्य! मोगलाई "मोगलाई" असूनही इतर इस्लामी बादशहांपैकी जास्त टिकली कारण तुलनेने मोगल राज्यकर्ते अधिक सहिष्णु होते !! यात "तुलनेने" हे समजुन घेणे महत्वाचे. शिवाजी राजांना जनतेने आपले का मानले ... त्यांच्या मृत्युनंतरही हे राज्य टिकावे अशी धडपड इथल्या माणसांनीच नाही तर कड्या कपारींनीही का केली? तर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि आपल्या धर्मानुसार श्री म्हणजे दुसरे तिसरे कोणिही नसुन आपणच आहोत. हे सर्वांचे राज्य आहे. इथे न्याय आहे म्हणुन ते चालवायचे आणि वाढवायचे. आज महाराष्ट्र पुढे का आणि अनेक नोबेल पदक विजेत्यांची जन्मभूमी बंगाल मागे का? कारण कम्युनिझमच्या नावाखाली अराजकताच आहे. कामगारांची सर्व समाजावर लोखंडी पकड आहे. मुक्त विचार मुक्त आचार यांना बंदी आहे.

 

अमेरिका म्हणजे काही धुतल्या तांदळासारखी नक्कीच नाही. परंतु इतर देशांपेक्षा बरी आहे. तीच गोष्ट महाराष्ट्राची. न्याय, समता (गुणांना वाव), आचार विचार आणि कृतिचे स्वातंत्र आणि मानवी मुल्यांचे अधिष्टान ही समाजाच्या प्रगतीची चाके आहेत. मानवी मन, त्याच्या क्षमता आणि आकांक्षा ही त्याची इंजिन्स आहेत. आणि कल्पकता हे इंधन आहे. पाश्चात्यांची प्रगती साध्य करणे हे तसे सोपे आहे ... कारण अनेक भारतिय अमेरिकेत येऊन मोठमोठे पराक्रम करतातच. परंतु भारत देशच जर अमेरिकेसारखा अथवा अधिक समृद्ध आणि बलशाली करायचा असेल तर न्याय, समान संधी, स्वातंत्र्य खर्या अर्थाने प्रस्थापित केले पाहिजेत. समृद्धि आणि भौतिक प्रगती केवळ एक परिपाक आहे.

 

"सहभावना हवी की नको?" !!! खरेच ... भारतामध्ये ही असे प्रश्न विचारणारे खासदार जन्माला येवोत.

Tuesday, July 21, 2009

आघात

पुन:श्च मॉरिसटाऊनची वारी. हॉटेलमधुनच लिहितोय. इकडे आलो म्हणुन यावेळी प्रसादला फोन केला. प्रसाद आणि विभावरी (नावे मुद्दाम बदलली आहेत) हे आमचे खूप चांगले मित्र. मिशिगनहुन जेव्हा नोकरीसाठी पहिल्यांदा फिनिक्सला गेलो तेव्हा दोघांनी आम्हाला खूप मदत केली. अतिशय सरळमार्गी, उत्साही आणि बुद्धिमान जोडी! सिद्धुएवढाच एक छोटासा छोकरा - प्रणव. त्यामुळे आमची लगेच मैत्री जमली. भारतात कधीतरी परत जायचे आहे असे अमेरिकेत सर्वच मराठीजन म्हणत असतात. पुण्यामुंबईकडचे थोडे अधिक. परंतु काही काळानंतर सर्वांचा निश्चय डळमळु लागतो. प्रसाद आणि विभावरी जास्तच ठाम होते. १०-१५ वर्षे इकडे राहिले ... ग्रीन कार्ड मिळाले अगदी नागरीकत्वदेखील. परंतु त्यांनी इकडे घर काही घेतले नाही. २००५- ला परत जाणार असे ठरवले होते त्यांनी परंतु परत जाण्याचा निर्णय सोपा नाही. इकडे काही पाश (घर!) नसल्यामुळे कधीही एकदम मनात आले तर परत जाता येईल अशी आशा. नाही म्हणायला पुण्यात मात्र मध्यंतरी एक फ्लॅट घेतला त्याचा ताबा मे मध्ये मिळणार होता.

काल सहजच फोन केला तर प्रसाद म्हणतो ...."अरे तुला फोन करणारच होतो. मी महिनाअखेरिस भारतात कायमचा चाललो आहे. विभावरी आणि प्रणव भारतातच आहेत." मी थक्कच झालो. "अरे एकदम असे अचानक कसे ठरले सगळे? सामानाचे पॅकिंग ... गाडी विकणे .... नोकरी शोधणे ... सगळे कसे जमवणार आहेस? काय झाले तरी काय?" प्रसाद सांगु लागला, "वडिल आजारी आहेत म्हणुन तातडीने विभावरी प्रणवला घेऊन १५ जुन ला भारतात पोहोचली. आणि १६ जुनला तिचे वडिल वारले. नाही म्हणायला ओझरती भेट झाली." विभावरी आणि प्रसाद या धक्क्यामुळे एकदम भानावर आले. आयुष्यात खरेच काय महत्वाचे आहे? करियर ... पैसा ... की प्रियजनांचे सुख? विभावरीने निश्चय केला की आता अमेरिकेत परत जायचेच नाही. आता यापुढे इथेच भारतात आयुष्य आणि करिअर घडवायचे आणि आई आणि प्रसादच्या आईवडिलांबरोबर दिवस आनंदात घालवायचे. प्रणवला पुण्यात शाळेत घातले. विभावरी पुण्यातच नोकरी शोधते आहे कारण अमेरिकन कंपनीने ट्रान्सफर करायला नकार दिला. प्रसाद च्या कंपनीने मात्र पुण्यात बदली दिली.

काहींना हा निर्णय घाईचा वाटेल ... परंतु विभावरीची वेदना ही खूपच परिचयाची आहे अमेरिकेतील भारतियांना. काल कळते की आईला कॅन्सर झाला म्हणुन आजच्या फ्लाईटने भारतात धाव घेऊनसुद्धा आईचे अंतिम दर्शनसुद्धा मिळाले नाही असा मनीष, वडिल हृदयरोगाच्या झटक्याने गेले अशीच बातमी कळलेले राजेंद्र आणि राजा .. ही काही दूरची ऐकीव उदाहरणे नाही ... तर जवळच्या मित्रांच्या व्यथा आहेत. आणि आता विभावरी. त्यांच्या दु:खाच्या वेदना आपल्याही मनाला घायाळ करुन जातात.

प्रसाद विभावरी आणि प्रणव यांना भारतातील पुढील आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Sunday, July 19, 2009

मराठी माणसा - जागा हो !!!!!

सलोनीबाई

 

परवा तुझी आई म्हणाली म्हणुन एक मराठी चित्रपट पाहिला - "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय". खरेतर मी हा चित्रपट पाह्यला फार उत्सुक नव्हतो कारण १) चित्रपटाचे नाव मला आवडले नाही २) मराठी माणसांची महाराष्ट्रात कशी गळचेपी होते आहे याबद्दल रडगाणे मांडलेले मला विशेष आवडत नाही.

 

नावाबद्दल सांगायचे तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मला रुचत नाही. आपण कधीतरी "मी ज्ञानेश्वर कुलकर्णी बोलतोय" असा उल्लेख करु का? कधीच नाही. माधवराव पेशव्यांना आपण कधी "तो माधव" म्हणतो का? संत एकनाथ यांना आपण कधी तो एकनाथ म्हणतो का? मग शिवाजी, संभाजी, गोरा कुंभार, चोखोबा यांना एकेरी उल्लेख का करायचा. त्या मांजरेकरांनाच कर जोडुन विचारले पाहिजे. खरे तर जोडे मारुन विचारले पाहिजे असे म्हणायला पाहिजे कारण छ्त्रपतिंशिवाय मांजरेकरांचे महंमदवाडीकर १०-१५ पिढ्यांपूर्वीच झाले असते.

 

एकंदरीतच मला निवडकपणे एकेरी उल्लेख केलेला आवडत नाही. त्यातुन दुसर्या व्यक्तीप्रती अनादर व्यक्त होतो. याचे मूळ अर्थात आपल्या जातीव्यवस्थेत आहे. आपल्या समाजाने जातींच्या भिंती पाडायचे बरेच काम केले असले तरी कधी कधी अश्या सांकेतिक प्रतिध्वनींमधुन हे कळते की काम अजूनही अपूर्ण आहे.

 

अमेरिकेत आदरार्थी संबोधनच नाही. इंग्लिश भाषेतीलच ती त्रुटी कमी आणि खुबी जास्त आहे. अमेरिका तर विशेषत: अगदीच बहुजनमुख (एगॅलेटेरिअन) समाजधारणा आहे. आर्थिक विषमता जरुर आहे. परंतु समान संधीचे सुत्र बाळगले जाते त्यामुळे समाजात विषमता परंपरागत चालत येत नाही. सर्वच माणसे एकमेकांना आदराने वागवतात. केवळ शिष्टाचार आहे असे म्हणुन त्याकडे नाके मुरडण्यापेक्षा आपण शिष्टाचार म्हणुन तरी आपल्याकडच्या गरीब, असहाय लोकांना त्याच्या निम्मे जरी सन्मानाने वागवले तरी खूप बरे होईल. भारतात आपण विशिष्ट लोकांना अरे तुरे करुन त्यांच्या सन्मानावर घाला घालुन त्यांचा आत्मविश्वासच खच्ची करतो. एखाद्या दुकानदाराचे १०-१२ वर्षाचे पोरगे ५०-६० वर्षाच्या कामगाराला सहज अरे तुरे करताना दिसते. त्याउलट अनिरुद्ध दादा वडिलांचा २०० कोटींचा व्यवसाय असूनही ड्रायव्हरकाकांच्या पाया पडुन परिक्षेला जातो आणि दुकानातुन घरी येताना वडिलांच्या गाडीतुन न येता कोणाच्या तरी स्कूटर मोटरसायकल वरुन येतो. हीच आपल्या मराठी समाजाची ताकत आहे. उगाच महाराष्ट्र पुढे नाही गेला. सिंधी, मारवाडी लोक मुंबईत आले म्हणुन महाराष्ट्र प्रगत झाला हे केवळ अर्धसत्य . (खरेतर पाव सत्य!) म्हणायला पाहिजे. सिंधी गुजराती मारवाडी पंजाबी सगळीकडे गेले आहेत. दिल्ली, बंगळुर, चेन्नई, कलकत्ता ... सगळीकडे. परंतु महाराष्ट्रात जो कष्टाळु, प्रामाणिक आणि बहुजनप्रिय समाज आहे तो भारतात अन्यत्र खूपच कमी आहे. ज्ञानेश्वर तुकाराम शिवाजी महाराज शाहु महाराज ते गोखले आगरकर कर्वे कर्मवीर भाऊराव पाटिल फुले आंबेडकर नारायण सुर्वे कुसुमाग्रज .... किति किति नावे घ्यावीत. मराठी समाजाचा पाया व्यापक आहे. त्याचे अधिष्ठान सर्व समाजात आहे. केवळ कृष्णाच्या करंगळीवर गोवर्धन उचलला जाऊ शकत नाही. तिथे समस्त गोकुळजन आपापल्या काठ्या घेउन गेले तेव्हा गोवर्धन उचलला गेला.

 

बर्याचदा मला अमेरिकन आणि मराठी समाजामध्ये बरेच साम्य आढळते. आत्मविश्वास, समानता,न्यायप्रियता, कष्टाळुपणा, तुलनेने कमी भेदभाव या सर्व गोष्टी दोन्हीकडे दिसतात. अमेरिकेत सर्व जगातुन गुणवान लोक येउन त्यांच्या गुणांचे चीज करतात आणि अमेरिकेच्या श्रीमंतीत भर घालतात. भारतीय समाज हा अमेरिकेत सर्वात जास्त सधन आहे. परंतु ती सधनता इथे येउन निर्माण झाली आहे. त्याची कारणे अनेक आहेत. परंतु सांगायचा मुद्दा हा की जरी सरासरी अमेरिकन समाज अमेरिकेतल्या भारतियांपेक्षा गरीब असला तरीही इथल्या प्रगतीचा तोच पाया आणि तोच कळस आहे.

 

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठी समाज हा सरासरीने गुजराती, मारवाडी इत्यादिंपेक्षा गरीब असला तरीही तोच कारण आहे या सर्व प्रगतीचे.

 

फक्त एकच गोष्ट मराठी समाजात कमी आहे. आपण त्या सिंहासारखे आहोत की जो शेळ्यांच्या कळपात राहुन आपले सिंहपण विसरला आहे. आर्थिकदृष्ट्या अल्पसंतोषी असल्यामुळे इतर सर्व गुण असूनही आर्थिकदृष्ट्या मागे पडला आहे. संस्कृती आणि भाषा आर्थिक अधिष्ठानाशिवाय दुर्बळ होत जातात. आपले थोडेसे तसे काहीसे झाले आहे.

 

परंतु त्या चित्रपटात दाखवले तेवढे विदारक चित्र आहे की नाही कुणास ठाऊक. मला तर असे वाटते की मराठी उद्योजकांची संख्या वाढते आहे. मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत. आपण जरीही दुर्गोत्सव साजरा करू लागलो तरिही भारतभर आता गणेशोत्सवही साजरा होतो आहे. उत्तर वा दक्षिण भारताचा प्रभाव जरुर आहे परंतु मराठी संस्कृति टिकुन आहे.

 

 

नाही म्हणायला एकच गोष्ट मला खटकते ती म्हणजे महाराष्ट्रात इंग्रजीचे अगदी स्तोम माजलेले आहे. मोरेसाहेबांचा पहिलीपासुन इंग्रजीचा निर्णय स्तुत्य होता. त्याच्या जोडीला आपली भाषा रुजवण्यासाठी जे प्रयत्न दिसायला हवेत ते दिसत नाही. उदाहरणार्थ इंग्रजी बरोबर मराठी पण सक्तीचे करायला हवे होते. आज ते ऐच्छिक आहे. दुकांनाच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत. खाली इंग्रजी कन्नड हिब्रु काही पण लिहा. पण मूळ पाटी मराठीतच पाहिजे. राज्यकारभार मराठीतच पाहिजे. छत्रपतिंनी राजभाषाकोश का तयार केला आणि आपण अजूनही मंत्रालय आणि मुंबई महापालिकेचे कामकाज मराठीतुन करु शकत नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

 

असो ... बाकी चित्रपटाबाबत सांगायचे तर चित्रपट एकंदरीत चांगला पण अगदीच स्वप्नाळु वाटला. वास्तवाचे भान नसलेला होता. अगदी मनसे-पुरस्कृत आहे की काय अशी शंका वाटली. एक गोष्ट चांगली अशी की मराठी माणसाचे दोषही दाखवले. लाच घेणारे आणि मराठी माणसांवर अन्याय करणारे मराठी लोक दाखवले ते अगदी खरे आहे. त्यामुळे मूळ प्रश्न मराठीची गळचेपी की पैशाची सत्ता आहे असा पडतो. मांजरेकरांचे मांजरासारखे पाय मात्र अगदी बघवले नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे पात्र यामध्ये असण्याची काहीच गरज नव्हती. त्यातुन आपला पोकळपणाच व्यक्त होतो आणि आपण शिवाजी महाराज आणि अमराठी लोकांमध्ये हकनाक दुरावा निर्माण करतो. तसेच छत्रपतिंना हसण्याचा विषय बनवतो. चित्रपटाच्या नायकाचे कोणी सरदार आजोबा इतिहासातुन जिवंत होऊन येतात असे दाखवले असते तरिही चालले असते. किंवा सर्वात उत्तम म्हणजे नायकाच्या सहनशीलतेचा अंत होतो आणि तो अरे ला का रे म्हणायला सुरुवात करतो असे दाखवले असते तरिही चांगले वाटले असते.

 

असो ... परंतु तरिही चित्रपट चांगलाच वाटला.

Wednesday, July 15, 2009

शापित गंधर्व

प्रिय सलोनी

२ आठवड्यांपूर्वी मायकेल जॅक्सन नावाच्या एका महान कलाकाराचे अचानक निधन झाले. मी शुक्रवारी दुपारी ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो तेव्हा माझ्या ऑफिसबाहेर बसलेल्या काही बायका एकमेकींना सांगत होत्या की मायकेल जॅक्सनला एल.ए. (लॉस एंजेलस)च्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पहिल्यांदा असे वाटले की पुन्हा एकदा एमजे च्या मागे लागण्यासारखे इथल्या प्रसिद्धी माध्यमांना काहीतरी मिळाले असावे. ८० च्या दशकात यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या एमजे च्या मागे प्रसिद्धी माध्यमे ९० च्या दशकात हात धुवुन मागे लागली होती. एखाद्या शापित गंधर्वाप्रमाणे एमजे ची अवस्था होऊन गेली होती. त्याला झालेला त्वचारोग आणि त्यामुळे रंगहीन झालेली त्वचा याबद्दल वाट्टेल त्या वावड्या उठवल्या गेल्या. त्याने त्याचा रंग बदलुन घेतला इत्यादी. त्याच्या भपकेबाज पणावर अवास्तव टीका केली गेली. खरेतर भपकेबाज पणा हा त्याच्या व्यवसायाचाच एक भाग होता. सर्वच पॉप स्टार अतिशय झगमगाटीत रहात असत. परंतु एमजेच्या वाट्याला टीका खुपच जास्त आली. त्याच्ये दिवाळे निघाले आहे अश्याही अफवा निघाल्या होत्या. वस्तुस्थिती अशी आहे की एमजेने पैश्याचे अतिशय चांगले व्यवस्थापन केले. उदाहरणाच द्यायचे तर ७ कोटी डॉलर्सना घेतलेलया २५० गाण्यांचा संग्रह आत १ अब्ज डॉलर्स चा झाला आहे. त्याने संस्थांना भरपुर देणग्याही दिल्या. सर्वात जास्त संस्थांना देणग्या देण्याबद्दल एमजेची गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे. त्याची किमान ५०-१०० कोटी डॉलर्सची मालमत्ता आहे त्यापैकी तब्बल २०% त्याने मृत्युनंतर दान केली आहे. त्याच्या मृत्युपत्रातुन त्याचा आर्थिक जबाबदारपणा प्रकट होतो आहे. त्याच्या आर्थिक बेजबाबदारपणावर टीका करणार्यांची आता तोंडे बंद व्हावीत. एमजे ने प्लास्टिक सर्जरी जरुर केली आणि त्यापैकी काही फसल्यादेखील. परंतु त्यावरुनही त्याच्यावर अकारण टीका व्हायची. त्याच्या फेंदर्या नाकाची लहानपणापासुन सतत अवहेलना झाल्यामुळे एमजेला नाजुक सरळ नाकाचे आकर्षण होते. त्याने प्लास्टिक सर्जरी करुन नाक आपल्याला हवे तसे करण्याचा प्रयत्न केला. मला तरी त्यात काही वावगे वाटत नाही.

सर्वात किळसवाणा आरोप म्हणजे एमजेने लहान मुलांचे लैंगीक शोषण केले असा. एमजे ने आजारी आणि गरीब मुलांसाठी १२०० एकर जागेवर एक सुंदर करमणुक केंद्र अथवा उद्यान उभारले होते. वर्षाला ७ कोटी डॉलर्स खर्च करून ते उद्यान चालवले जात असे. त्यापैकी काही मुलांच्या पालकांनी एमजेवर असे आरोप केले. पुठे ते सर्व आरोप खोटे ठरले. परंतु या आरोपांनी मात्र एमजेचा धीर खचला आणि तो अमेरिका सोडुन बहारीन ला गेला. मागील ४-५ वर्षे तो अगदी अज्ञातवासातच होता. अलिकडे तो पुन्हा एकदा रंगमंचावर येण्याचा विचार करत होता, तेव्हा अचानक त्याचे निधन झाले.

एमजे हा मला वाटते नक्किच सर्वोच्च पाश्चात्य संगीतकार होता. कृष्णवर्णीयांच्या वाटयाला येणारी उपेक्षा अवहेलना यांना भेदुन त्याने अमेरिकन संगीत क्षेत्राचे सिंहासन मिळवले. परंतु तो त्याहुनही महान ठरला ते त्याच्या गाण्यांमधुन जगातील वेगवेगळ्या प्रश्नांवर जे भाष्य केले त्यामुळे. मला तर वाटते की एमजे चे महत्व जगापुढे हळुहळु येइल आणि त्याच्यावरचे मळभ नक्किच कधितरी दुर होईल.

मॅन इन द मिरर, ब्लॅक ऑर व्हाईट, वी आर द वर्ल्ड, दे डोंट रिअली केअर अबाउट अश्या गाण्यांमधुन त्याने जगातील गरिबी, श्रीमंत राष्ट्रांचा मुजोरपणा आणि युध्दखोरपणा, वंशवाद यावर सडकुन टीका केली आणि वसुधैवकुटुंबकमता, प्रेम, शांती यांप्रती आपल्या सर्वांच्या वैयक्तीक जबाबदारीची जाणीव निर्माण केली.

अमेरिकेत कृष्णवर्णीयांनी यश मिळवले की काही ठरावीक मंडळी त्यांच्या मागे लागलीच म्हणुन समजावे. अगदी महंमद अली, मार्टीन ल्युथर किंग पासुन मायकेल जॅक्सन, ओप्राह विन्फ्री, कोबी ब्रायंट अश्या अनेक यशस्वी आणि प्रसिद्ध कृष्णवर्णीयांना यशाच्या शिखरावर असतानाही अवास्तव टीकेला सामोरे जावे लागले आणि अजुनही जावे लागते. कृष्णवर्णीयांसाठी वेगळे आणि अधिक कठिण निकष असतात असे अगदी नक्की जाणवते.

मायकेल जॅक्सन तर केवळ यशस्वी नाही तर प्रस्थापित व्यवस्थेचा टीकाकार होऊ पहात होता. अमेरिका तसा एक महान देश आहे. परंतु "सत्य" हे यांचे मुल्य नाही आणि ध्येयही नाही. स्वातंत्र्य हे अधिक महत्वाचे मानले आहे. परंतु सत्याशिवाय स्वातंत्र्य हे मृगजळच राहते अशी आपली धारणा यांच्या पचनी पडणे कठीण आहे. कुठल्याही सत्तेला सत्य हे सोयिस्करही नसते. आणि भांडवलवादी व्यवस्थेततर सर्वच गोष्टी विकत घेता येतात. सत्यदेखील. त्यामुळे इथे सत्याचा इतका विपर्यास होतो की मति गुंग होते. (बुद्धिस्तु मा गान्मम!). इराक वर २००३ साली केलेल्या आक्रमणाचा कोणत्याही विचारवंत आणि कलावंतांनी निषेध केला नाही. यातुनच त्यांची सत्तेपुढे लोळण घेण्याची वृत्ती दिसली. मायकेल जॅक्सनची संवेदनशीलता इतकी तीव्र होती की तिला सत्तेची बटीक होऊन राहण्याची गरज भासली नाही.

माझ्या मते मायकेल जॅक्सनने त्याची फार मोठी किंमत मोजली. दुर्दैवाने अमेरिकेत त्याच्या विरुद्ध कमालीचा अपप्रचार आहे. वैशम्य याचे वाटते की भारतीय वर्तमान पत्रे देखील त्यांचीच री ओढतात. स्वताचे संशोधन आणि मतमांडणी कुठेच दिसत नाही. असो तो एक वेगळाच विषय होईल.

परंतु मायकेल जॅक्सनच्या निर्भीडपणाला, भाबडेपणाला, आशावादाला आणि कलेला आपण शतश: प्रणाम करायला हवेत. खरोखरीच एक शापित गंधर्व आणि एक राजहंस होता तो.

ता.क. - परवा निळु फुलेंचे निधन झाले तेव्हाही अतिशय दु:ख झाले. कलावंत म्हणुन तर ते मोठे होतेच. परंतु त्यांनी केलेले सामजिक कार्यही अतिशय स्तुत्य आहे. एमजे काय निळु फुले काय किंवा अगदी डॉ. लागु काय. ही मंडळी खर्या अर्थाने महान आहेत. कलेची उपासना करता करता समाजाची जाणिव ठेवणारी आहेत. देशोदेशीचे हे वसु आहेत आणि म्हणुनच पृथ्वीला वसुंधरा म्हणतात.