ओबामा!! नावातच काही जादू आहे का, सलोनी ? खरे तर ४ वर्षांपूर्वी अगदी अनोळखी नाव होते हे। सर्वात पहिल्यांदा मी जेव्हा ओबामाला पाहिले आणि ऐकले तेव्हा जॉन केरी च्या डेमोक्रॅटिक नॉमिनेशन मध्ये भाषण करण्यासाठी म्हणुन आलेला एक नवोदित तरुण आणि इलिनोई राज्यातील एक सेनेटर होता तो। अमेरिकन राजकारणाच्या क्षितिजावर तो कुठेच जमेस नव्हता तेव्हा. परन्तु केरींच्या नॉमिनेशन निमित्त जे काही भाषण त्याने केले त्यावेळी आम्ही सर्व थक्क झालो। त्याची विचारसरणी, संवाद फेक आणि श्रोत्यांना खिळवुन ठेवण्याचे कसब अगदी असाधारण होते। मी बाहेर हॉल मध्ये टीव्ही पाहत होतो आणि रुपाली किचन मध्ये होती। मी तिला हाक मारून बाहेर बोलावले। ओबामाचे ते भाषण ऐकून आम्हा दोघांना अगदी बिल क्लिंटन ची आठवण आली। २००० मध्ये बिल क्लिंटन अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हा त्यांनी आमच्या विद्यापीठाला भेट दिली होती। मला तेच भाषण आठवले। राजकारणी माणसे म्हणजे भाषणे आलीच पाहिजेत। परन्तु काही काही माणसे ही थोडी जास्तच महान असतात .... विशेषतः क्लिंटन सारखी। क्लिंटन यांचे तेव्हाचे भाषण १०००० माणसांसमोर होते। परन्तु त्या गर्दीतील प्रत्येक माणसाला असेच वाटावे की हां माझ्याशिच बोलतो आहे। कसे जमते हे? १०००० माणसांना रस वाटेल असा विषय अशी मान्डणी अशी शब्द्फेक.... सर्वच काही अतर्क्य। ओबामाचे पण असेच आहे। त्यांचे ते पाहिले भाषण प्रचंड गाजले। आणि मागील ४ वर्षात स्टेट सेनेटर ते यू एस सेनेटर ते अध्यक्षपदासाठी पाहिले कृष्णवर्णीय उमेदवार ते अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत चा प्रवास! सगळेच अतर्क्य!!
परन्तु नीट विचार केला तर असे वाटते की समाजातील नेतृत्व ही त्या त्या काळाचीच गरज असते म्हणुन तसेच उदयास येतात। मागील ८ वर्षे अमेरिकेतील नेतृत्व हे अगदीच अकर्तृत्ववान आणि भांडवलदारान्च्या हातातील बाहुले आणि युद्धखोर बनले होते। बुश हे सर्वात अप्रिय अध्यक्ष म्हणुन पायउतार झाले। ७०% अमेरिकन लोकांना त्यांचे नेतृत्व शेवटी शेवटी मान्य नव्हते। आम्ही कधी कधी विनोदाने म्हणतो की उरलेले ३०% बहुधा झोपलेले असावेत। बुश हे ख्रिश्चन मुलतत्ववाद्यान्च्या आशिर्वादाने सत्तेवर आले होते। खरे तर त्यांची २००० सालाची निवडणुक देखिल वादग्रस्त होती। सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काहीच विशेष साध्य केले नाही। परन्तु ९११ च्या हल्ल्यांमुळे त्यांना युद्ध करायला एक चांगली संधि मिळाली आणि तिचा त्यांनी अगदी गैरफायदा घेतला। इराक वर खोटे आरोप करून काहीही करून हल्ले केले। ओसामा तर दूरच राहिला। ठराविक कंपन्यांना फायदा होईल अशी धोरणे स्वीकारली। गॅसचे (पेट्रोल) दर तर इतके वाढले की सामान्यांना दुचाकी वरून प्रवास करायची पाळी आणली। कैटरिना च्या वादळात त्यांची निष्क्रियता अगदी सिद्ध झाली। ३-४ दिवस न्यू ओरलियंस च्या जनतेला असामान्य (अमेरिकेच्या राहणीमानाच्या तुलनेत) हाल अपेष्टान्ना सामोरे जावे लागले। एक ना अनेक!
या सर्व गोष्टीन्मुळे अमेरिकन जनता अगदी कंटाळुन गेली होती। अणि त्यात सध्या चालू असलेल्या मंदी आणि आर्थिक उलथापालथिची भर पडली। या सम्पूर्ण वर्षामध्ये बुश यांच्या सरकारने काहीही साध्य केले नाही। मंदी थांबवण्यासाठी अथवा आर्थिक घड़ी बिघडू नये म्हणुन। अपेक्षेप्रमाणे त्यांनी जे जे केले ते अगदीच निरुपयोगी ठरले। त्यामुळे बुश यांच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांना काहीच साध्य करता आले नाही।
असो .... तर अशा वेळी ओबामा सारखा एक तरुण बुद्धिमान स्वच्छ आशावादी नेता उदयास येतो आहे यामुळे सर्व अमेरिकन जनता (आणि आम्ही सुद्धा!) अगदी मोहरून गेलो। युध्द महागाई राजकारणातील लाथाळ्यांमुळे सामन्यांचे प्रश्न तुंबुन पडलेले ... अश्या अवस्थेत ओबामा यांची अमेरिकेतील उत्तम आणि उदात्त्त गोष्टीना आवाहन करण्याची शैली यांना अमेरिकन जनता न भूलती तरच नवल।
त्यांच्या अध्यक्षपदाच्या प्रवासात अडथळे खूप आले। अगदी ते कृष्णवर्णीय असण्याचा मुद्दा, त्यांचे मुस्लिम नातलाग, त्यांचे गुरु जहालवादी असल्याचे आरोप, त्यांना पुरेसा अनुभव नसल्याचा मुद्दा। परन्तु ओबमांची बुद्धिमत्ता, तारुण्य, आशास्पद व्यक्तिमत्व, संयमित व्यक्तिमत्व, मूल्याधारित विचारसरणी, आणि सर्वाना बरोबर घेउन जाण्याची हातोटी यामुळे ते या सर्व अडथळ्यांना पुरून उरले।
अमेरिकेच्या या निवडणुकीत जगातील सर्व देशांना रस होता। अगदी अभूतपूर्व निवडणुक होती ही। अमेरिकेच्या इच्छा आकांशा आणि मूल्ये यांचे सर्व जगावर बरे वाईट प्रतिबिम्ब पडत असते। बुश यांच्या नेतृत्वाखाली जगाला अमेरिकेची अगदी काळी बाजू दिसली। ओबमांची इच्छा आहे की अमेरिकेने जगापुढे उत्तम आणि उदात्त उदाहरणे पुढे ठेवावीत। यात जरूरिपेक्षा जास्त आशावाद असेल ही .... परन्तु बुश ते ओबामा हे संक्रमण जगातील अनेक प्रश्नांची तीव्रता कमी करेल यात मला तिळमात्र शंका नाही।
No comments:
Post a Comment