Sunday, January 17, 2010

हैती .. आणि इतर काही ...

 

सलोनी

 

हा काही फार चांगला आठवडा नव्हता. १२ जानेवारी विवेकानंद जयंती म्हणून मला नेहेमीच लक्षात असतो. परंतु यावर्षी हैतीमधील भूकंपामुळे पण लक्षात राहणार. कामावरुन घरी आलो तर हैतीमधील भूकंपाची बातमी ऐकली - एनबीसी न्यूजवर. तश्या जगात शंभर गोष्टी घडत असतात म्हणून ऐकल्या न ऐकल्यासारखे झाले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे गांभीर्य जाणवले. एक तर भूकंप ७ रिश्टर म्हणजे अगदीच तीव्र (किल्लारी ला झालेला ६.७ होता बहुधा).

 

पोर्ट ऑफ प्रिन्स या राजधानीच्या जवळपासच भूकंपाचा केंद्रबिंदु असल्यामुळे खूपच जीवितहानी झाली आहे. ३० लाख लोकसंख्या आहे हैतीची. पैकी ५०००० तरी मृत झाले असावेत. अमेरिकेच्या इतक्या जवळ असल्यामुळे साहजिकच अमेरिकेत तुफान सहानभूती आहे. परंतु निसर्गाचे बळच इतके मोठे की अमेरिकेच्या साह्यानंतरही खूप माणसांचे जीव वाचवणे शक्य नाही आहे.

 

माझा एक पूर्व(मराठित एक्स!)-सहकर्मचारी जाक्स जान (फ्रेंच नाव आहे) हा मूळचा हैतीचा आहे. त्याला इमेल टाकली. पण बहुधा तो तिकडेच गेला असावा. अजूनतरी उत्तर नाही.

 

आजच्या गोल्डन ग्लोबमध्ये हैती ला सह-अनुकंपा म्हणुन बऱ्याच तारे-तारकांनी रिबन्स लावल्या होत्या. बरे वाटले ते पाहुन.

 

गोल्डन ग्लोब्जचा विषय निघाला तर ... जेम्स कॅमेरॉनला अखेरिस गोल्डन ग्लोब मिळाले तर! सर्वोत्तम चित्रपट आणि दिग्दर्शन दोन्हीचे. त्याबद्दल भाषण करताना त्याने म्हटले ... "जगातील सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे समजावुन घेण्यासाठी १५० किंवा १५० मिलिअन वर्षे पुढे जाण्याची गरज नाही.(in reference to the original movie that takes place 150 or so years from now). आपण ते आपल्याभोवती पाहु शकतो आणि अनुभवु शकतो." विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

 

बाकी आज व्हायकिंग्जनी काऊबॉयज वर दणदणीत विजय मिळवला. ३४-३ !! पुढच्या रविवारी सेंट्स आणि व्हायकिंग्जच्या मॅचची प्रचंड उत्सुकता आहे. ब्रेट फार्व्ह मला सचिनसारखा वाटतो. अस्सल खेळाडु कलावंत आणि एकंदरीतच प्रतिभावंत ... सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ... ते त्यांची जी काही गोष्ट आहे ती इतकी सहज करतात की बस्स. एकाग्रता जरुर आहे. परंतु तणाव नाही. असो ...

 

Thursday, January 7, 2010

अवतार अर्थात ऍव्हंटार

सलोनीराणी

दोन आठवड्यांपूर्वी एक चित्रपट पाहिला. अवतार अर्थात ऍव्हंटार ... या अमेरिकन लोकांना सरळ शब्दोच्चार जमतच नाहीत. ऍ कुठेतरी आलाच पाहिजे. शरद तळवलकर असे साधे नाव वाचायले सांगीतले तर फेफरेच येईल यांना!!

असो .. अवतार हा मराठी/संस्कृत शब्द आहे. जेव्हा जेव्हा जगावर संकट येते तेव्हा परमेश्वर कुठलेतरी रूप धारण करुन पृथ्वीवर जन्म घेतो आणि मनुष्यजातीला संकटातुन वाचवतो अशी कल्पना. या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा हाच आहे. जेक सली हा पाय गमावलेला सैनिक नवे पाय लाऊन घेण्यासाठी लागणारे पैसे कमावण्यासाठी एका शास्त्रीय प्रयोगामध्ये भाग घेतो. त्याला एका नवीन ग्रहावर (पॅण्डोरा) जाऊन तिथल्या एका उद्योगासाठी एक कामगिरी पार पाडायची असते. कामगिरी अशी की स्थानिक लोकांकडे अनऑब्टेनिअम नावाचे एक मूल्यवान द्रव्य किंवा धातु असतो तो स्थानिक लोकांमध्ये मिसळुन जाऊन त्यांच्याकडुन हिरावुन घ्यायचा. स्थानिक लोक अतिशय उंच काटक आणि निळ्या रंगाचे असतात. तेव्हा त्यांच्यासारखी दिसणारे शरीरे शास्त्रज्ञ तयार करतात. विशिष्ट तंत्रज्ञान वापरुन जेक सुली त्या दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो - तस्मात्‌ चित्रपटाचे नाव अवतार! परंतु अवतार घेऊन जर त्या स्थानिक लोकांना लुटणार असेल तर मग तो अवतार कसला? त्यामुळे जेक सली हा अखेरिस स्थानिक लोकांच्या बाजुने लढतो आणि त्यांना लुबाडण्याचे प्रयत्न हाणुन पाडतो.

चित्रपट सुंदरच आहे. त्रि-मिती दृष्ये आणि संगणाकाची कमाल आहे. तसेच टर्मिनेटर, एलिअन्स, अबिस आणि टायटॅनिक सारखे अतिप्रसिद्धच नव्हे तर नवीन दिशा देणारे चित्रपट काढणाऱ्या जेम्स कॅमेरॉन चा हा चित्रपट... त्यामुळे चांगलाच असणार. परंतु तेवढेच असते तर या लेखाचे प्रयोजन नव्हते. ९-१-१ च्या घटनेनंतर अमेरिकन चित्रपट हे केवळ करमणुकप्रधान राहिले नाही आहेत. त्यांमध्ये बऱ्याचदा सूप्त अथवा उघड संदेश दडलेले असतात. ते समजुन घेण्यासाठी हा प्रपंच.

९-१-१ नंतर जनमत खवळलेले होते. शस्त्रे तयार करणाऱ्या कंपन्यांना युद्धाची चांगली संधी होती. इस्रायल समर्थकांना चांगली संधी होती की अरब राष्ट्रांचा काटा काढावा (नाहीतर टोक तरी मोडावे!). ऑईल कंपन्यांना संधी होती की अस्थिरतेचा फायदा घेऊन तेलाच्या किमती भरमसाठ वाढवुन नफा कमवावा. रिपब्लिकन पक्षाला चांगली संधी होती की युद्धे करुन आपले बस्तान चांगले बसवावे. आणि सर्व अमेरिकन उद्योगांना चांगली संधी होती की युद्धासाठी आणि नंतर सामग्री पुरवुन पैसे कमवावेत. जे उद्योग हे काहीच करत नव्हते ते रिपब्लिकन पक्षामार्फत "अमेरिका खतरेमे" जा एकीकडे जयघोष करत उद्योगांना पोषक (आणि सामान्यांना जाचक) असे नियम शिथील करत होते. या सर्वाचा परिपाक म्हणुन अखेरिस अफगाणिस्तान आणि नंतर इराक वर अमेरिकेने हल्ले केले आणि ती युद्धे अजूनही चालू आहेत. त्यामागचे सूप्त उद्देश वर नमूद केल्याप्रमाणे अजूनही कायम आहेत.

बऱ्याचदा असे म्हटले जाते की अमेरिकेने तेलासाठी इराक युद्ध केले. आणि ते खरे असले तरीही अर्धसत्यच आहे. खरी गोष्ट ही आहे वर म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टींचा तो एक परिपाक होता. जग हे खूप गुंतागुंतीचे आहे. तिथे एक खलनायक आणि एक नायक आणि एक नायिका नाही आहे. अनेक पात्रे आणि त्यांचे अनेक उद्देश असतात. त्यामुळे जगात जे काही भलेबुरे घडते ते या सगळ्याचा परिपाक असतो. या सर्व पात्रांपैकी इस्रायल समर्थक जे आहेत ते अर्थातच बव्हंशी ज्यु लोक असतात. ज्यु लोक अतिशय बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि धनवान आहेत. भारतात ज्ञान, साहित्य, कला, उद्योग, राजकारण या विषयांवर काही विशिष्ट समाजांची/जातींची जास्त पकड दिसते. परंतु एकच समाज चौफेर कामगिरी करताना सहसा दिसत नाही. अपवाद वेगळे. परंतु ज्यु समाज मात्र चौफेर प्रतिभावंत आणि यशवंत आहे. शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योगपति, राजकारणी, विद्वान, तत्वज्ञ ... काय नाही आहेत ज्यु समाजात प्रश्न पडतो. हॉलीवुड मध्ये सुद्धा बरेच ज्यु कलावंत आणि त्याहुनही अधिक निर्माते आहेत.

९-१-१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जे लोक मृत्यू पावले त्यात बव्हंशी ज्युच होते कारण वॉल स्ट्रीट वर देखील यशस्वी लोकांमध्ये ज्यु अग्रगण्य आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणुन इराक युद्धाचे ढोल जेव्हा वाजवले जाऊ लागले तेव्हा पारंपारिक डेमॉक्रॅट असणाऱ्या ज्यु समाजाने युद्धाबाबत रिपब्लिकनांना पाठिंबा दिला. या सर्वाचे प्रतिबिंब इथल्या प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रचारामध्ये तर उमटलेच पण अगदी चित्रपटसृष्टीदेखील त्यातुन सुटली नाही. पुढे वॉर ऑफ द वर्ल्ड सारखे अनेक चित्रपट निघाले जे परकियांविषयी द्वेष अथवा मत्सर निर्माण करतील. चित्रपट पाहणाऱ्याला वाटते की आपण एक काल्पनिक कथा पाहतो आहे. परंतु खरे तर कुठेतरी आपले ब्रेन-वॉशिंग (बुद्धिभेद) होत असते. अर्थात एका माणसाला जो बुद्धिभेद वाटेल दुसऱ्याला ती जागृति वाटू शकते. त्याला इलाज नाही. दुसऱ्या महायुद्धात गोबेल्सने अशी बरीच जागृति केली होती. परंतु महायुद्ध संपल्यानंतर लोकांना कळले की आपण फसवले गेलो आहोत. असो ... परंतु या भांडणात न अडकता फक्त हे स्वीकारावे की केवळ करमणुकीच्या पलिकडे जाऊन देखील काही उद्देश (राजकीय / सामाजिक / आर्थिक) काही माणसे चित्रपट बनवतात.

जेम्स कॅमेरॉन हा त्यातलाच एक.

परंतु एक नाही तर एकमेकाद्वितीयच. कारण असे की कॅमेरॉनने एकंदरीतच जगात सध्या जे अमेरिकेचे साम्राज्य पसरले आहे त्यावर अगदी उघड भाष्य केले आहे. मूल्यवान धातु आणि तो लुबाडण्यासाठी तयार असलेल्या कंपन्या आणि त्यासाठी युद्ध पुकारण्याची त्यांची तयारी.... जगभरात आणि अगदी अमेरिकेतही बऱ्याच लोकांना हे कळते आणि ते त्याला विरोध करतात देखील. परंतु मागच्या ८-१० वर्षात हा विरोध क्षीण वाटला आहे. इराक युद्धाच्या वेळी इतके उघड उघड खोटे आरोप करुन देखील कोणीही प्रमुख कलावंत, शास्त्रज्ञ अथवा पत्रकार यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला नाही. असतील तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. म्हणुन जेम्स कॅमेरॉनचे महत्व.

अवतार चित्रपटामध्ये दाखवलेली अनॉब्टेनिअम धातुची हाव ही केवळ एक प्रतिक आहे. वस्तुस्थिती ही आहे की अमेरिकेतील राहणीमान हे जगाच्या मानाने खूप कमालीचे वर आहे. ५% लोकसंख्या असलेला देश जगातील २५% उत्पादन वापरतो आहे. या सर्वासाठी जो कच्चा माल लागतो त्यावर नियंत्रण ठेवल्याशिवाय तो कच्चा माल योग्य किंमतीला मिळणार नाही. तेलावर असलेले नियंत्रण अगदी दिसते. परंतु अगदी दक्षिण अमेरिकेतील पाण्याची सरोवरे आणि जंगलांबरोबर आफ्रिकेतील आणि ऑस्ट्रेलिआतील खाणींपर्यंत हे नियंत्रण सर्वदूर पसरले असते. उगाच ५०-१०० विमानवाहु नौका आणि हजारो क्षेपणास्त्रे आणि विमाने तैनात केलेली नसतात. आर्थिक देवाणघेवाणीमागे राजकीय आणि शस्त्रांचे बळ आहे. उगाच का हवाई गुआम आणि भारताच्या दक्षिणेला दिएगोगार्सिआ, तसेच जपान, दक्षिण कोरिआ आणि आखात आणि युरोपमध्ये सैन्य तैनात केले? सुरक्षेचे कारण तितके खरे नाही आहे. अमेरिकेच्या सामर्थ्याला टक्कर द्यावी इतकी ताकत कोणातही नाही. आणि जरी असली तरीही जे थोडेफार बळकट आहेत त्यांना युद्ध हा पर्याय नाही हे कळते. त्यामुळे अर्थातच ही ताकत अमेरिकेच्या उद्योगजगताला भल्याबुऱ्या मार्गाने जगभरातुन कच्च्या मालावर पकड घेता यावी यासाठीच आहे.


आपण इतिहास विसरुन चालणार नाही. शेवटी ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी होती हे विसरुन चालणार नाही. आणि ती कंपनी इंग्लंडच्या राजाची हस्तक होती. आणि त्यांनी भारताच्या संपत्तेची प्रचंड लूट केली. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे दुष्काळ इंग्रजांच्या काळातच घडले. दुसऱ्या देशांना लुबाडुन स्वत: श्रीमंतीत राहणारे हे आधुनिक वाल्या कोळीच. आत्तासुद्धा तेच घडते आहे. फक्त फरक इतकाच आहे की आता जग एकमेकात इतके गुंतले आहे की राजसत्तेचा उद्योगविश्वावर तितका ताबा राहिला नाही आहे. पाश्चिमात्य देशांतील काही सुजाण नागरिकांना आणि संस्थांना हे कळत असते परंतु बव्हंशी नागरीक आपल्या रोजच्या जीवनात इतके दंग असतात की त्यांना या गोष्टींचा गंधही नसतो. जागतिकीकरणामध्ये नकळत कुठेतरी चांगल्या गोष्टी घडुन जातात कारण माणुस जातच मुळी समाजप्रिय आहे. जागतिकीकरणामुळे समाजाची व्याख्या आपले गाव, राज्य आणि देशाच्याही पलिकडे जात चालली आहे. आता हेच पाहा की एकप्रकारे अमेरिकी परराष्ट्र धोरण आणि उद्योगांवर इतकी उघड टीका करणार चित्रपट गेले दोन आठवडे इथे चित्रपटगृहामध्ये कमालीचा लोकप्रिय झाला आहे. १ अब्ज डॉलर्सच्या वर पैसे कमवले आहेत. एकंदरीत काय तर हे प्रश्न आपल्याला कळले पाहिजे परंतु त्यामध्ये कुठेही द्वेष करुन चालणार नाही कारण कोणाचा द्वेष करणार? दुर्बळांचा फायदा घेणारे लोक तुम्हाला कुंपणाच्या दोन्ही बाजुला सापडतील. तसेच मदत करणारे आणि बघेही दोन्ही बाजुला सापडतील. प्रश्न इतकाच आहे की आपली भूमिका काय आहे?

असो .. विषय गंभीर आणि खोल जरूर आहे. परंतु कधी तरी वाच मोठी झाल्यावर आणि तुला कळेल. कदाचित तुला पुढचे काहीतरी कळेल आणि म्हणशील बाबा काय बावळट होता. मला चालेल ! पण वाच हे नक्की.

Monday, January 4, 2010

हवाहवाई - भाग ३ स्नॉर्केलिंगची जीवघेणी मजा


ते हिरवे पाणकासव अखेरिस दिसले .... पंधरा एक मिनिटे आम्ही त्याचा पाठलाग करत होतो. ख्रिस मला बराच वेळ झाला ते कासव दाखवत होता. परंतु काही केल्या मला ते दिसत नव्हते. स्नॉर्केलिंग पहिल्यांदाच करत असल्यामुळे अजूनही पाण्यात तोंड घालुन तोंडाने त्या नळीतुन श्वास घेणे जमत नव्हते. आणि एकदा जर तोंडावरचा मुखवटा काढला की परत घालणेही थोडे अवघड जात होते. ख्रिस आणि दुसरा एक गोरा जोडीदार मात्र अगदी सराईतपणे त्याचा पाठलाग करत होते...


माऊई स्नॉर्केलिंगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. स्नॉर्केलिंग म्हणजे पाण्यावर तरंगत राहुन पाण्यात तोंड घालुन समुद्रतळ आणि परिसर न्याहाळणे. हे करत असताना डोळ्यांवर आणि नाकावर एक मुखवटा वापरायचा असतो आणि एका नळीचे एक टोक तोंडात आणि दुसरे टोक पाण्याबाहेर ठेवुन तोंडाने श्वास घ्यायचा असतो. असे केल्यामुळे अगदी कमी श्रमात तासन तास न दमता समुद्रतळ मासे कासवे आणि कोरल्स बघता येतात. अर्थात यासाठी माऊईसारखा उथळ, शांत आणि जीववैविध्याने समृद्ध असा समुद्रतळ असला तर उत्तम. माऊईबद्दल बरेच ऐकुन होतो त्यामुळे स्नॉर्केलिंग करायला मी अतिशय उत्सुक होतो. आम्ही मोलोकिनी या एका समुद्रविवरामध्ये स्नॉर्केलिंगचे आरक्षण देखील केले .. परंतु माऊईला जायच्या दिवशीच सिद्धु इतका आजारी पडला की अगदी अर्जंट केअरमध्ये नेऊन ऍण्टीबायॉटिक्स घ्यावे लागले. त्यामुळे अगदी विमान उडण्याआधी २ मिनिटे फोन करून ते आरक्षण रद्द केले. तीन दिवस दुसऱ्या गोष्टी केल्यानंतर मात्र चौथ्या दिवशी मी ठरवले की अगदी मोलोकिनी नाही ... परंतु आमच्या रिसॉर्टच्या शेजारच्या बीचवर स्नॉर्केलिंग करायचेच. सकाळी ८ वाजता जाऊन स्नॉर्केलिंगचे सिद्धु आणि माझ्या मापाचे साहित्य आणले आणि १० च्या सुमारास उलुआ बीच वर गेलो.

पाणी तसे किंचीत थंड होते परंतु सुसह्य होते. मी आणि सिद्धु पाण्यात शिरलो. स्नॉर्केलिंगचा मास्क मी लावला तोंडावर परंतु पाण्यात गेलो की तो मास्क तोंडावरुन सुटायचा आणि नाकातोंडात पाणी जायचे. बराच वेळ तसे केले आणि शेवटी अर्धा एक लिटर खारे पाणी पिल्यानंतर मी मनात म्हटले की या गोष्टीचा नाद सोडुन द्यायला हवा. परत बीचवर आलो आणि ते साहित्य ठेवुन परतणार एवढ्यात आमच्या शेजारी बसलेल्या जोडीतला एक साठी उलटुन गेलेला माणुस (ख्रिस त्याचे नाव - मागुन कळले) मला म्हणाला, "व्हिजिबिलिटी कशी आहे?" - अर्थात समुद्रतळ दिसतोय का व्यवस्थीत.

"व्हिजिबिलिटी चांगली आहे - पण मला काहीच जमत नाहीए." - मी
"अरेच्च्या का?" - ख्रिस
"मला माहित नाही. माझा मास्क सैल होतो आहे आणि मग मी नाकाने पाणी पितोय!" - मी
"असं! बघु बर" - ख्रिस

ख्रिस आणि त्याची बायको दोघेही मला शिकवु लागले. आणि मग मला कळले की तोंडावरचा मुखवटा नाकाने श्वास घेऊन अगदी हवाबंद करायचा नसतो. फक्त लावायचा असतो. आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे नळीचे तोंडाकडचे टोक अगदी तोंडात पूर्ण घालायाचे असते.

"चल .. आपण पाण्यात जाऊन बघु." - ख्रिस थोड्या वेळाने मला म्हणाला.
"ओ के ... चल" - मी उत्साहात म्हणालो.

पाण्यात जाताना पायाला माश्यासारखे पंख पण लावले कारण त्यामुळे पोहायला अजूनच मदत होते आणि कमी श्रम होतात.

मी धीर करुन पाण्यात तोंड खुपसले आणि चमत्कार ! नळी तोंडात पूर्ण घातल्यामुळे अगदी व्यवस्थीत श्वास घेता येऊ लागला. ५-१०-२०-३० सेकंद झाले तरीही नाकातोंडात पाणी न जाता मी तरंगु शकलो! मग माझा घीर अजुनच वाढला. उलुआ बीचवर मध्येच एक खडकांची रांग (रीफ) समुद्रात जाते. अश्या कपारींमध्ये मासे येऊन राहतात. तिथे वनस्पतीही अधिक वाढतात. त्यामुळे आम्ही त्या रीफच्या अनुषंगाने समुद्रात आत आत जाऊ लागलो. समुद्रतळ देखील पाहण्यात प्रचंड मजा आहे. रंगीबेरंगी माश्यांबरोबर पोहोण्यात तर स्वर्गसुखच! त्याचा आनंद घेत घेत आमची स्वारी ख्रिसच्या मागोमाग चालली होती. तो अगदी पट्टीचा पोहोणारा होता. ते कळत होते. मला तो सारखा विचारत होता की सगळे ठिक आहे ना. एकदा मला स्नॉर्केलिंगचे तंत्र जमल्यानंतर मी काळजी न करता पाय मारत मारत पुढे चाललो होतो. एव्हाना आम्हाला एक अजून जोडीदार मिळाला होता. गोरा होता पण अमेरिकन नक्कीच नव्हता. जरुरीपेक्षा जास्त सौजन्य दाखविले की कधीही समजावे ही व्यक्ती अमेरिकन नाही. अमेरिकन त्याबाबतीत अर्थवट पुणेरी आहेत ... सौजन्याची ऐशीतैशी! परंतु पुणेकर मात्र शिष्टाचाराची पण ऐशीतैशी करतात ते भाग वेगळा!! असो ..

तर आम्ही तिघेही पुढे पुढे चाललो होतो. बराच वेळ झाला ख्रिस एक कासवांची जोडी दाखवत होता. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली हिरवी पाणकासवे होती ती. मला सुरुवातीला दिसली नाहीत. परंतु अखेरिस पाण्याच्या तळातुन सुरुवातीला अस्पष्ट आणि नंतर स्पष्ट होत गेलेले ते महाकाय कासव माझ्या डोळ्यासमोर अजुनही आहे. ६ फ़ूट व्यासाचे ते कासव होते. हळु हळु ते माझ्या अगदी जवळ आले... अगदी ४ फुटावर. आम्ही त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. किती अंतर गेलो ते कळले नाही. परंतु ते जसे अनाकलनीयरित्या पाण्याच्या तळातुन वर आले तसेच झपकन ते खाली जाऊ लागले आणि अखेरिस खालच्या अंधारात लुप्त झाले.

खाली अंधार होता याचा अर्थ पाण्याची खोली ५० फुट तरी असावी. आम्ही तिघेही अगदी अचंबीत होत आपापले मुखवटे काढत एकमेकाना विचारु लागलो की कासव पाहिले का! मागे वळुन पाहिले तर समुद्र किनारा बराच लांब होता. खडकांची रांग देखील संपली होती.

"तुम्ही नशीबवान आहात. एवढे मोठे कासव पाहता आले!" - ख्रिस म्हणाला, " चला परत फिरु."


आम्ही सगळे परत वळलो. मुखवटे लावले आणि झपझप जाऊ लागलो. मी त्यांचे पाय पाण्यात पहात पहात जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण लवकरच त्यांचे माझ्या पुढे पोहोणारे पाय दिसेनासे झाले. म्हणुन मी अंदाज घेण्यासाठी पाण्याबाहेर तोंड काढले. बघतो तर समोर अथांग समुद्र. बीच कुठेच दिसत नव्हता. मी समुद्रात आत चाललो होतो. परत मागे वळलो आणि ख्रिसच्या दिशेने जाऊ लागलो. परत थोड्यावेळाने अंदाज घेण्यासाठी तोंड बाहेर काढले तर परत मी समुद्रात आत पोहोत चाललो होतो! एव्हाना त्यांच्या आणि माझ्या मध्ये बरेच अंतर पडले होते. मी तिसऱ्यांदा परत पाण्यात तोंड घातले आणि पाय मारु लागलो... परंतु एव्हाना कुठेतरी मन चुकचुकले होते. आणि एकदम नाकात खारे पाणी गेले. त्यामुळे एकदम मी मुखवटा काढला. परंतु इतका वेळ सराईतपणे स्नॉर्केलिंग करणारा मी ... आता मात्र थोडा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. मी पुन्हा पाण्यात तोंड घालुन जीवाच्या आकांताने पाय मारु लागलो. आणि उजव्या पोटरीत वात आला. तेव्हा मात्र मी मुखवटा आणि नळी पूर्ण बाजुला करुन फक्त पाण्यात स्थिर होण्याचा प्रयत्न केला. असे करताना बऱ्यापैकी श्रम होतात. आणि एका पायाच्या ताकतीवर पोहायचे म्हणजे तर अतीच. किनार किमान २०० मीटर तरी लांब होता. मला आता मात्र प्रसंगाचे गांभीर्य जाणवले. आपण योग्य त्या गोष्टी केल्या नाहीत तर जीव गमावु याची जाणीव झाली. बीच वर १०० एक माणसे असली तरीही २०० मीटर आतमध्ये कोणी धडपडले आहे हे ओळखणे सोपे नाही.

सुदैवाने ख्रिसने पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले. मी जमेल तितके मोठ्याने ओरडुन म्हणालो "हेल्प". एकच शब्द. "हेल्प". दुसऱ्यांदा मात्र ख्रिसला गांभीर्य कळले. तो झपझप हात मारत माझ्या दिशेने आला. मला मोठे आश्चर्य वाटले की तो १५ सेकंदात माझ्याजवळ पोहोचला.
"काय झाले?"
"माझ्या उजव्या पायात वात आला आहे"


ख्रिसने माझ्या दंडाला पहिले पकडले. मी त्याला स्पर्शही केला नाही कारण बुडणारा वाचवणाऱ्याला मिठी मारतो आणि दोघेही बुडु शकतात. त्याने मला थोडासा टेकु दिल्यामुळे मला थोडी उसंत मिळाली.

"तुला पाठीवर पडून पोहोता येईल?"
"हो"
"त्याने वात कमी होईल"
"ओ के"

मी पाठीवर पडलो. त्यामुळे विश्रांती देखील मिळाली आणि वात ही कमी झाला. ३०-४० सेकंद थांबल्यानंतर तो म्हणाला "तुला पोहोता येईल?" "हो" -मी. मग आम्ही हळु हळु पोहोत येऊ लागलो. एव्हाना बरेच खारे पाणी पिल्यामुळे परत स्नॉर्केलिंगचा मुखवटा घालुन पोहोणे मला शक्य नव्हते (किंवा धाडस झाले नाही). तरीही जमेल तसे पोहोत पोहोत आमची स्वारी किनाऱ्यावर आली. ख्रिसचा जीव नक्कीच भांड्यात पडला असणार आहे. परंतु तो निश्चल होता. जणु काही घडलेच नाही. त्याला अडचणीत आणल्याबद्दल मला लाज वाटत होती. मी त्याला दोन चार वेळा सॉरी म्हणालो. परंतु त्याने खांदे उडवले. तो म्हणाला "ते सगळे विसर. कासव पाहिले की नाही!! मजा आली ना... बस्स!"

मी कालच्या लेखात लिहिले तेच पुन्हा म्हणतो ... की धैर्य उदारता आणि सहजता ही या पश्चीमेच्या जगात खूप आहे. अगदी शिकण्यासारखे आहे. ख्रिसला मी अरे-तुरे लिहित असलो तरीही हा माणुस काही लहान नाही आहे. किमान ६०-६५ वर्षांचा तरुण आहे हा! व्हॅन्कुव्हर कॅनडा चा रहिवाशी आहे. त्याचे पुन:पुन: आभार मानुन आम्ही परत रिसॉर्ट वर परत आलो.

तसा मी कठीण प्रसंगात सहसा डगमगत नाही. कारण घाबरलो, डगमगलो तर विनाश अगदी नक्कीच आहे. त्यापेक्षा शांत डोक्याने प्रसंगाला सामोरे जावे. परंतु डगमगत नाही अशी फुशारकी मारण्यापेक्षा कठीण प्रसंग येऊन न देणे यातच खरा शहाणपणा आहे. स्नॉर्केलिंगची मजा आली खरी परंतु मला विचाराल तर एकट्याने स्नॉर्केलिंग करु नये आणि अगदी खोल पाण्यात आधाराशिवाय तर मुळीच करु नये. असो ... परंतु पुन्हा सुरक्षीतपणे हे मी करेन का ... सलोनीबाई ... ऍब्सोल्युटली येस!

Sunday, January 3, 2010

हवाहवाई - भाग २ माऊईदर्शन



हवाई तसे बेटांचेच राज्य ... चहुबाजुला प्रशांत महासागर त्यामुळे इथला बाज अगदी वेगळाच आहे. अमेरिकेत सहसा कुठेही जा आणि रहा ... सहसा सर्व सोयीसुविधा आणि रहाणीमान उपलब्ध असतात. मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांची दुकाने सर्व अमेरिकेभर उघडलेली असतात आणि एकाच पद्दतीने चालवलेली असतात. किंमती देखील सहसा सारख्याच असतात. एका शहरातुन दुसऱ्या शहरात गेलो तर फारसा फरक पडत नाही. मॅकडोनल्ड चा आकार रचना रंगसंगती खाद्यपदार्थ आणि त्या मागवण्याची पद्धत ... सगळ्या अमेरिकेत साधारण सारखी. परंतु हवाई हे अपवाद....

पहिल्याच रात्री विमानतळावरुन आमची स्वारी होटेलवर जायच्या आधी पिझ्झा फोनवरुन मागवला. जो पिझ्झा अमेरिकेत अन्यत्र १२-१५ डॉलर्सना मिळतो त्या पिझ्झासाठी हवाईत २०-२२ मोजावे लागले. प्रत्यक्ष ज्या दुकानात पिझ्झा घ्यायला गेलो ते दुकान अगदी हलाखीत होते. कदाचीत सध्याच्या मंदीचा परिणाम असे म्हणावे तर दुकानाचे ठिकाण आणि एकंदरीत फर्निचर इत्यादि गचाळ असण्याचे कारण नाही. मंदीमुळे किंमती कमी व्हायला हव्यात. नंतर जाणवले की हवाईत सर्वच गोष्टी तुलनेने महाग आहेत. आणि का असू नयेत. १०० मैलांचा प्रदेश करुन करुन किती वस्तु तयार करणार. त्यामुळे अक्षरश: मोजक्या वस्तु सोडल्या तर इतर सर्वच समुद्रमार्गे आयात कराव्या लागतात. त्यामुळे अर्थातच हवाईमध्ये जरीही खूप महागडी होटेल्स आणि इतर गोष्टी पर्यटकांसाठी उपलब्ध असल्या तरीही इथली स्थानिक जनता तुलनेने गरीबच आहे.

तात्पर्य काय तर उत्पादनाला पर्याय नाही आणि ... केवळ पर्यटनातुन श्रीमंती निर्माण होऊ शकत नाही. भारतात तरी काय ... आपण कॉल सेंटर चालवतो ... दुसऱ्या देशांची आयटी डिपार्टमेंट्स चालवतो ... परंतु आपले राहणीमान कमी आहे कारण आपण कमी वस्तु वापरतो कारण आपण वस्तुंचे कमी उत्पादन करतो. इतके साधे सोपे सरळ गणित आहे. असो ...

परंतु हवाई हे सर्वच अर्थाने वेगळे आहे ... अमेरिकेच्या राहणीमानाचे आक्रमण त्याच्यावर होऊ शकले नाही विशेष!

हवाईमुळे आम्हाला गोवादेखील भरभरुन आठवला. अगदी खरे सांगायचे तर सौंदर्याच्या बाबतीत गोवा कांकणभरही कमी नाही. हवाईमध्ये आपण डॉलर्स मोजतो इतकाच फरक. तोच खारा वारा ... तेच डुलणारे माड ... हेलकावणाऱ्या बोटी ..... समुद्रकिनाऱ्याचा वेध घेत जाणारे वळणदार रस्ते...आणि अकृत्रीम माणसे ... हो हेही खरेच ... अमेरिकेत लिप स्माईल खूप जास्त दिसते ... हवाईमध्ये उगाच हसणे नाही आहे. थोडेच परंतु मनापासुन हसणारी माणसे दिसतात. (खरे हसणे डोळ्यातुन असते ...माणुस खराखुरा हसतो तेव्हा डोळे चमकतात ... आणि डोळ्याच्या बाजुला घड्या पडतात! खरंच!)

तर यावेळी ठरवले होते की खूप ड्राईव्हिंग करायचे नाही. शक्यतो एका ठिकाणी ठाण मांडुन बसायचे. माऊई बेटावर त्याला तसाही पर्याय नाही. हवेली (पुणे) तालुक्याएवढे बेट आहे हे. साधारण ५०-५५ मैल पूर्व पश्चीम आणि १०-१५ मैल दक्षिणोत्तर पसरले आहे. आणि तेवढ्याश्या बेटावर १०००० फुट उंच असा हालायेकाला पर्वत आहे. तुलनेने सिंहगड साधारण ३००० फुट उंच असावा आणि समुद्रसपाटीपासुन ५००० फुट उंचीवर असावा. हालायेकालाला जाताना तुम्ही ठगांच्याही वर जाता. खाली माऊई आणि आसपासची इतर बेटे - लनाई, मोलोकाई काहुलावे दिसतात. दोन्ही बेटे माऊई तालुक्यातीलच आहेत. परंतु वस्ती कमी आणि सुविधाही कमी. परंतु अतिश्रीमंतांसाठी पंचतारांकित होटेल्स मात्र आहेत. सुदैव हे की माऊईत राहुनही तोच समुद्र, तीच शांतता, तेच सौंदर्य अनुभवायला मिळते. त्यासाठी अजुन कुठल्या निर्जन बेटावर जाण्याची गरज नाही. काहुलावे बेट दुसऱ्या महायुद्धात केवळ बॉम्बिंगचा सराव करण्यासाठी म्हणुन वापल्यामुळे पूर्णत: उध्वस्त झालेले आहे.

पाच दिवसात खूप काही न ठरवता तो दिवस जिकडे नेईल तिकडे जायचे असेच काही ठरवले होते. रात्री उशिरा होटेलवर पोहोचल्यामुळे अंधारात कळले नव्हते आजुबाजुला काय आहे. परंतु सकाळी उठलो आणि व्हरांड्याच्या पूर्ण काचेच्या दरवाज्यातुन बाहेर गर्द झाडी इतकी सुंदर दिसली की तो अनुभवच घ्यायला हवा. अगदी विषुववृत्तासारखी घनदाट झाडे, त्यातुन मधुन आमच्या पाचव्या मजल्यापर्यंत आलेले अगदी पातळ असे माड ... पक्षांचा किलबिलाट आणि सुर्योदयाची चाहुल. अगदी जंगलात असल्यासारखे वाटले. मला ९९ साली मी कोस्टा रिका मध्ये राहिलो होतो तेव्हाची आठवण झाली. तिथे झाडी म्हणजे गर्दच असायची. अगदी विषुववृत्तीय प्रदेश असल्यामुळे सगळीकडेच ट्रॉपिकल फॉरेस्ट. शंभर पद्धतीची झाडे, वनस्पती एकाच जागी सुर्यप्रकाशासाठी चढाओढ करत वाढत असतात.


पहिल्या दिवशी व्हेल मासे पाहण्यासाठी म्हणुन बाहेर पडलो. हम्पबॅक व्हेल हे माऊई चे वैशिष्ट्य. अलास्का आणि कॅनडामध्ये उन्हाळ्यात क्रिल या झिंग्यांसारख्या प्राण्यांची मेजवानी खाऊन जाड झालेले व्हेल्स प्रजोत्पादनासाठी हिवाळ्यात ४००० मैल दूर हवाईला येतात. आम्ही गेलो तेव्हा व्हेल्सना पाहण्याचा ऋतु नुकताच सुरु झाला होता. परंतु तरीही आम्हाला काही व्हेल दिसले. एक व्हेल तर आमच्या पासुन वीस फूट अंतरावर आला आणि त्याने पाण्यातुन अर्धे अंग बाहेर काढुन उडी मारली. व्हेल्स हे मासे असले तरीही ते सस्तनी प्राणी आहेत ... त्यांना फुफुसे असतात त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्याना दर सहा मिनिटांनी पाण्याबाहेर यावेच लागते. त्यांचे एक एक फुफुस एखाद्या कपाटाएवढे असावे. जीभ साधारण एक टन वजनाची ... पंखांचा पसारा १५-२० फुट ... एकुन वजन ८०००० पाऊण्ड... सगळेच काही अजस्र. पुस्तकात माहिती वाचणे वेगळे ... परंतु प्रत्यक्ष समोर पाहणे ... यात खूप फरक आहे.


माऊईत दुसरी पाहिलेली आणि लक्षात राहील अशी गोष्ट म्हणजे आमचा हाना या गावापर्यंतचा प्रवास. हे आकर्षण हाना या गावापेक्षा त्या गावाला समुद्राच्या काठाकाठाने जाणाऱ्या रस्त्यावरच्या प्रवासासाठी जास्त प्रसिद्ध आहे. ३० मैलाच्या अंतरामध्ये ६०० वळणे घेता घेता सिद्दोबाच्या पोटातील पास्ता ३ वेळा बाहेर आला. डावीकडे समुद्र, उजवीकडे हिरवेगार पर्वत आणि त्यांमधुन येणारे पाण्याचे प्रवाह, गच्च झाडी... आणि आमचा चार चाकी रथ ... मजा आली. परत येताना तिसऱ्यांदा जेव्हा सिद्धोबाने उलटी केली तेव्हा जेव्हा पुन्हा थांबलो तेव्हा गडबडीत गाडी बंद केली परंतु ए सी हीटर चालु राहिला. त्यामुळे नंतर गाडी चालु करायला गेलो तर बॅटरी डेड. रात्रीचे ८ वाजलेले. रस्त्यावर चिटपाखरु नाही. चांदणे मात्र अगदी टिपूर! मी एका गाडीला हात केला ते आमच्यासारखेच प्रवासाला आलेले त्यामुळे त्यांच्याकडेही जंपर केबल नव्हती. त्यानंतर एका ट्रकला (जीप) थांबवले. हळुहळु अंदाज घेत तो थांबला. अंधारात निर्जन जागी कोण कोणावर विश्वास ठेवणार? सुदैवाने ती स्थानिक माणसे होती त्यामुळे त्यांच्याकडे जंपर केबल होती. त्यामुळे गाडी लगेच चालू झाली आणि आम्ही भुर्रकन रस्त्याला लागलो. अमेरिकेत जर कुठे अपघात झाला किंवा कोणी अडचणीत असेल तर लोक न थांबता निघुन जात नाहीत. २००६ डिसेंबरमध्ये एकदा आमची गाडी एका डोंगररस्त्यावर बर्फामध्ये गर गर फिरुन रस्त्याकडेला फेकली गेली तेव्हा एक बाई तिच्या गाडीतुन जात होती ती थांबली आणि म्हणाली की काळजी करु नका तिचा नवरा येऊन मदत करेल. आणि तो पठ्ठया आला पण. मदत केली आणि आम्ही आभार मानायच्या आत निघुनही गेला. असे धैर्य, अशी उदारता आणि अशी सहजता .. पाश्चात्यांची घेण्यासारखी आहे. आम्ही रस्त्याला लागलो ... कार रेण्ट्ल मध्ये कार परत दिली आणि नवीन गाडी घेतली. रोड टू हाना सुंदर होताच ... परंतु त्या अंधारात अडकल्याचा अनुभवामुळे भीषण सुंदर वाटला !!

क्रमश:



Friday, January 1, 2010

बाबा कॅण्ट डॅन्स साला!

 

सलोनीबाई

 

काल नव्या वर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ आमच्या एका मित्राकडे पार्टी आयोजित केली होती. तीन सिंधी, एक इडली सांबार आणि एक जय महाराष्ट्र अशी पाच कुटुम्बे होती! आता पार्टी म्हटले की आमच्या मराठमोळ्या आईला भारतात भलतेच काही वाटायचे सुरुवातीला. त्यामुळे ती मला बिचकत बिचकत काही सल्ले फोनेवर द्यायची कसे वागावे आणि वागु नये. परंतु वावगे वागण्याइतका बाबा धाडसी नक्कीच नाही. आमच्या पार्ट्या म्हणजे सगळ्या बायकांनी काही तरी खाद्यपदार्थ करुन आणायचे आणि नवरे मंडळींनी ताव मारायचा. ओले काही असेल तर पाणी, पेप्सी/कोक, ज्युस इत्यादि. बाकी वाईन ला दारु म्हटले तर सात्विक संताप व्यक्त करणारे काही मित्र होते खरे .. परंतु त्यांचा वाण तुझ्या आईने लागु दिला नाही.

 

असो तर .. खाणे आणि पिणे टीव्ही बघणे याव्यतिरिक्त गाण्याच्या भेंड्या भारताच्या आठवणी कमी पगाराबद्दल तक्रारी वगैरे नेहेमीचे उद्द्योग म्हणजे आमची पार्टी!

 

परंतु काल काही अजबच घडले. साधारण १०:३० ला राकेशची बायको दीपाली आणि राजीवची इडली नम्रता यांच्या आग्रहास्तव सर्व इस्त्रीयांनी पदन्यास अर्थात नृत्य करायला सुरुवात केली. सोनबा घाबरुन राकेशच्या आईशी गप्प मारू लागली. थोडाफार नाच तिने केला पण मला काही दिसला नाही. दीपाली अगदी सराईत पणे नाचु लागली ... नम्रताने तर पूर्ण अंग घुसळुन काढले .... अगदी मिहीर तिचा मुलगा लाजून गेला ... इतके ... सानुची बायको सानिया (ही स्पेन मध्ये वाढलेली परंतु पुण्यात जन्मलेली) एरवी फक्त गोड गोड हसणारी एकदम छान नाचू लागली. मला अगदी न्युनगंड व्हायला लागला पण मी तो ताबडतोब झटकुन टाकला.

 

आम्ही बापे मंडळी आपली कुवत ओळखुन सूज्ञपणे त्याच्याशी आपला संबध नाही किंवा चर्चेत किती गढून गेलो आहोत असे करत तिकडे जायचे टाळत होतो. परंतु बायामंडळींना आमचे जगातील समस्यासमाधानाचे प्रयत्न फारसे रुचले नाहीत आणि अखेरीस आमच्यातला एक बुरुज ढासळला. महेशला त्याच्या पार्वतीने म्हणजे मालिनीने हरण केले. महेशराव तर एकदम कॉलेजातल्या पोरांसारखे उड्या मारायला लागले. पतंग उडवले ... मोर पाहिले ... सर्वकाही करुन राहिले. त्यानंतर राकेशला आग्रह झाला .. राकेशने जमेल तितकी जमीन आपटुन घेतली ... त्यानंतर राजीव ने थोडेफार मूनवॉकिंग केले ... सुंदर केले. राजीव हा आर्थिक सल्लागार व्ह्यायच्या आधी क्रुझ शिप वर बार मॅनेजर होता. त्यामुळे नाच गाणे पिणे सर्व गोष्टी करुन तो आता निवृत्त झाला आहे. ( मला राजीव बद्दल विशेष आदर आहे ... आम्ही बाकी सगळे जण उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत आलो आहोत. परंतु राजीव फक्त दहावी-बारावी झाला आहे. त्याची पहिली नोकरी बंगळुर (बेंगालुरु)मध्ये वेटर म्हणुन होती. तिथुन आज हा माणुस अमेरिकेत येऊन स्थिरावला आहे. बायको नम्रताने अमेरिकेतुन एमबीए केले आहे. असो...) हे सर्व होत असताना सानुचा स्वान्तसुखाय डॅन्स चालला होता. तो डावीकडुन काहीतरी घेऊन उजवीकडे देण्याचा सराव करत होता. आता आमची पाळी होती. मी तुला कडेवर घेऊन भगवानदा इश्टाईल नृत्य केले. बाकी सर्वांच्या मानाने आपली अगदी गरिबाची भाकरी होती. पण काय करणार ..... बाबा कॅण्ट डॅन्स साला !!

 

तसा गणपतीच्या झांजा टिपऱ्या ध्वजदल इत्यादि पथकांमध्ये सहभागी झालो आहे ...नेतृत्वही केले आहे ... परंतु ते नाचणे काही खरे नाचणे नाही ... एकप्रकारे ते कवायती प्रकार आहेत. नृत्य मला येत नसले तरी एवढे कळते की खरे नृत्य आतुन यायला हवे. दादांच्या आईला रोहिणीताईंना मी एकदा म्हटलेसुद्धा होते की शास्त्रीय संगीताचा जसा आस्वाद घेता येतो तसा मला कथकचा नाही घेता येत. ते पढंत छान वाटते. घुंगुरे कपडे नर्तिकांचे पदन्यास गिरक्या आणि समेवर येऊन स्थिर होणे सगळे आवडते ... परंतु आस्वाद घेणे हे अजुन वेगळे आहे. आस्वाद घेण्यासाठी लय मनातल्या मनात पकडता यायला हवी. नादाबरोबर डोलता यायला हवे. माहीत नाही का होत नाही .... पण होत नाही हे खरे. दादांनी रोहिणीताई आणि शमाताईंच्या बऱ्याच सीडीज मला देऊन झाल्या आहेत. परंतु माझ्यात फारशी सुधारणा नाही. मला असे वाटते की "धिस इज अ सिरिअस डेफिशिअन्सी". सलोनी नाचता आणि गाता आले पाहिजे ... आपल्याला व्यक्त करता आले पाहिजे.

 

आता आमची आई म्हणेल की बाबा अगदीच नाचत नाही असे नाही... बायकोच्या तालावर चांगला नाचतो!

 

टुशे ...

 

परंतु ... द ट्रूथ इज ... बाबा कॅण्ट डॅन्स साला!