सलोनी
काल खरेदी करण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो तर परत येताना फ़्रीवेवर ही गर्दी. "इतक्या रात्री ८ वाजता ही सर्व मंडळी कुठे चालली ... विशेषत: ख्रिसमस ईव्ह (सन्ध्याकाळी) ला?" माझा प्रश्न.
अमेरिकेत ख्रिसमस आणि थॅन्क्सगिव्हिंग या दोन दिवसांची पूर्वसन्ध्या असे दिवस आहेत की त्यादिवशी अमेरिकेतील सर्व कामे थांबतात. दूर दूर गेलेले लोक घरी परतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. ख्रिसमस ट्री सजवतात. घरातल्या फायरप्लेस (शेकोटी) समोर बसुन हॉट चॉकोलेटचा आस्वाद घेतात. गाणीही म्हणतात. शांत बसणे, काहीही न करण्याचा आस्वाद घेणे याइतके अन-अमेरिकेन दुसरे काहीही असू शकत नाही.... परंतु हे दोन सण असे आहेत की अमेरिकेतील सगळे कामकाज थंडावते. असो .. त्यामुळे मला प्रश्न पडला इतकी गर्दी कशी काय.
तेव्हा सोनबा अर्थात तुझी आई मला म्हणाली की ख्रिसमस च्या एकुण खरेदीपैकी ३९% खरेदी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला होते! अमेरिकेत खरेदीशिवाय काहीच साजरे होत नाही. ख्रिसमस तर विशेष सण. यादिवशी सांता या वयस्कर माणसाला की जो उत्तर ध्रृवावर राह्तो, सर्व अमेरिकेतील (आणि जगभरातील) लहान मुलांना खेळणी देण्याचे काम करावे लागते :-) सिद्धोबा इतकी वर्षे सांताच्या नादी लागला नव्हता. परंतु यावर्षी त्याच्या काही वर्गमित्रांचे पाहुन त्याने देखील त्याची एक यादी बनवली होती.
सिद्दोबाला नर्फ-फुटबॉल हवा होता कारण त्याच्या मित्राने क्विंटनने नर्फ-फुटबॉल मागीतला होता सांताकडे. परंतु त्या ट्रॅफिकला पाहुन हळुहळु माझ्या लक्षात आले की सिद्धोबाचा निरोप सांताकडे पोहोचला नाही अजून. एव्हाना तुझी आई मनातल्या मनात खुष झाली होती की बाबाचे उद्या काही खरे नाही कारण बाबाने सांताला सिद्धुची यादी पोहोचवली नाही आणि उद्या (ख्रिसमस) च्या दिवशी दुकाने बंद असतात.
"सिद्धु मी सांताला ई-मेल करतो आणि सांगतो."
"सांताकडे ईमेल आहे. आयफोन? ब्लॅकबेरी आहे?" - सिद्धु"हो. कदाचित ब्लॅकबेरी"
"त्याचा ईमेल काय" - सिद्धु
"सान्ता ऍट नॉर्थपोल डॉट कॉम" - इति आई.
"ओके मग मी घरी गेल्यावर इमेल लिहितो" - सिद्धु
"नाही लहान मुलांना ईमेल पाठवायची परवानगी नाही" - आई
"सिद्धु मी लिहिन ईमेल ... परंतु आता तो जगभर फिरतोय त्यामुळे त्याला ईमेल वाचता येईल की नाही माहीत नाही.
सिद्धुचा चेहेरा रडवेला झाला...
"पण मे बी त्याचा ब्लॅकबेरी आहे त्यामुळे मिळेल त्याला. तु काळजी करु नको उद्या नाही तर परवा तुला नक्की तुझ्या वस्तु मिळतील."
घरी पोहोचल्यावर मला प्रश्न पडला की आता सांता कुठे भेटणार? मी इंटरनेटवर शोध घेतला तर असे लक्षात आले की कुठल्याही टॉयजरस (खेळण्यांचे दुकान) मध्ये तो ९ पर्यंत भेटेल ! मी माझ्या एका मित्राला भेटायचे म्हणुन बाहेर पडलो. तो अर्थातच टॉयजरस च्या शेजारी रहात होता. मग मी तसेच टॉयजरस मध्ये सांता सापडतो का पाहिले, परंतु सांता तिथुन निघुन गेला होता. मग पुढे वॉलमार्ट मध्ये पाहिले. तिथे तर चतु:शृंगीपेक्षा जास्त गर्दी ... आणि वर सांता भेटला नाही ते वेगळे. परंतु तिथे कळले की २५ मैलावर असलेल्या दुसऱ्या एका टॉयजरसमध्ये नक्की सांता भेटेल! शेवटी मी गाडी तिकडे वळवली. आणि अखेरीस तिथे मात्र सांता भेटला. त्याला मी सिद्धुच्या नर्फ-फुटबॉलचा निरोप दिला आणि घरी आलो.
एव्हाना सिद्धोबाने खोली आवरली होती. जेवण केले होते. त्याच फळा स्वैपाकघरामध्ये आणुन त्यावर खडुने नक्षी काढली आणि सांताला शुभेच्छा लिहिल्या. आईला दुध आणि कुकीज ठेवायला सांगीतल्या. आणि मग तो झोपायला गेला.
रात्री मी पाठ दुखते म्हणुन फॅमिली रूम मध्ये झोपलो. साधारण पहाटेचे पाच वाजले असतील आणि मला असा भास झाला की घरात पावले वाजत आहेत. मी किंचीत उठलो पण मिट्ट काळोख होता. त्यामुळे कंटाळा केला. त्यानंतर एकदम ६:३० लाच जाग आली. अजुनही अंधारच होता. मी सवयीने अंधारात चाचपडत किचन बार पर्यंत गेलो. ब्लॅकबेरी चा हिरवा दिवा लुकलुकत होता. तो उचलला आणि पासवर्ड टाईप करायला लागलो ... माझ्या चेहेऱ्यावर अंधारात प्रकाश पडलेला ... आणि एकदम माझा दंड हलु लागला. काही शब्दही ऐकु आले. पण अजुनही मी झोपेत होतो. भूत बित कळण्याइतपतही शुद्धीवर नव्हतो!! हळुहळु मला थोडे थोडे कळु लागले ... सिद्धोबा मला सांगत होता ... "बाबा, सांता येऊन गेला. त्याने मला नर्फ फुटबॉल आणि बेसबॉलचा फिल्डिंग ग्लोव्ह दिला आहे."
"अरे वा!!!!" मी ऑस्कर मिळवण्याच्या जिद्दीने त्याच्याइतकेच आश्चर्यमुग्ध होऊन विचारले.... "कधी आला होता"
"मला वाटते सिक्स हवर्स बॅक... मला त्याच्या पायांचा आवाज आला. मी रात्रभर झोपलोच नाही"
"झोपलाच नाही" - मी
"नाही ... मे बी थोडा वेळ झोपलो. पण मला झोपच लागत नव्हती. पण सांताला पहायला बाहेर आलो ...पण तो नाही दिसला ..म्हणुन मी त्याचा मिल्क ग्लास शोधला ... टेबलावर नाही. डिशवॉशर मध्ये नव्हता .. सिंक मध्ये पण नाही. ... "
"कदाचीत त्याने हाताने धुवुन परत ठेवला असेल" - मी
"हं .... "
सांताने सिद्धु ला एक पत्र देखील लिहिले होते. सिद्धुला मी ते दाखवले. तो भलताच खुष झाला. परंतु त्या पत्रामध्ये सिद्धोबाला शुद्धलेखनाच्या दोन चुका आढळल्या. परंतु सांताला घाई असते असे म्हणुन मी फेटाळुन लावल्या. सिद्धोबाने फ्रीजच्या बाजुला लावलेली त्याची आणि तुझी यादी काढली.
"अरे हे काय आहे"
"माझी आणि सलोनीची यादी" - सिद्धू
"सलोनीची पण यादी होती" - मी हैराण होऊन ...
"हो. मी तिला क्लोद्स आणि खेळणी मागीतली होती"
"अरे पण हा तिचा पहिलाच ख्रिसमस असल्यामुळे सांताला अजुन ती माहित नाही ना" - मी ...
"ओ के ... नेक्स्ट टाईम.." - सिद्धु
मी हुश्श केले ..
मला एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद झाला..
असा हा तुझा पहिला ख्रिसमस.. खरे तर आम्ही ख्रिसमस ट्री पण आणणार होतो. पण राहुन गेले. सगळीकडे इतके छान वातावरण आहे त्यामुळे म्हटले आपण किरिस्ताव नसलो तरीही ख्रिसमस साजरा करायला काय हरकत आहे. ३३ कोटींमध्ये येशु ख्रिस्त अजून एक देव. जैसा देस वैसा भेस. बाकी आपण अगदी अमेरिकन लोकांसारखे सरावलेलो नाही .... पण जमेल तसा ख्रिसमस साजरा केला. मुख्य म्हणजे सांताकडे ईमेल असल्यामुळे सगळे कसे सुरळीत पार पडले.
6 comments:
ha ha ha...chan aahe...Aarushla kalayala lagala ki hi trick waparata yeil....
:-) aani tyaachyaa cheheryaavar jo aanand asel to agadi amulya asel !!
सही.. मस्त लिहिलय-
mahendraji dhanyavad!
mast aahe post :)
dhanyavad gouri!
Post a Comment