सलोनीबाई
माऊईहुन परत येऊन ७ दिवस झाले परंतु अजुनही मन तिथेच आहे. अजुनही असेच वाटते आहे की सकाळी उठले की पहिली गोष्ट दृष्टीस पडेल ती म्हणजे घनदाट झाडांमधुन आकाशाकडे झेपावणारे, गवताच्या पात्यांसारखे माड आणि त्यांच्या पाठीमागे ढगांनाही भेदुन आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारा उत्तुंग हालेयाकाला पर्वत. अजुनही लाटांचे आवाज येत आहेत. अजूनही असेच वाटते की घराबाहेर गाडी काढली की वडांच्या रांगा समोर येतील. उसांची शेती दिसेल ... निळ्याशार पाण्याशेजारुन वळण घेत जाणारे रस्ते लागतील. माऊईचे सौंदर्य नुसते प्रेक्षणीय नाही तर भावनिक वाटले. कदाचित कुठेतरी भारताची आठवण झाली. रोजच्या दगदगीतुन विरंगुळा मिळाला, निर्भेळ आनंदाचा सहवास मिळाला, मातीचा वास मिळाला, मध्येच गोवा, मध्येच सह्याद्री, मध्येच घाटाचा सुगंध मिळाला !
तशी काही फार काही पूर्वनियोजित सहल नव्हती ही. मनात बर्याच दिवसांपासुन होते की हवाईला जायचे. दोन महिन्यांपूर्वी सहजच पाहिले तर सगळे काही जमुन आले. त्यातुन यावर्षी भारतभेटही नसल्यामुळे सुटीत काय करावे असा प्रश्न होताच. कॅलिफोर्निया, नेवाडा यापूर्वीच ५-१० वेळा फिरुन आलेलो. मेनलॅण्ड वर फ्लोरिडा आणि वायोमिंग वगळता मुख्य सर्व काही एव्हाना पाहुन झाले आहे. अगदी कोलोरॅडो राहिले होते ते ३ महिन्यांपूर्वी केले तुझ्याबरोबरच. कोलोरॅडोची मजा काही वेगळीच. १२००० फुटांच्या वर २०० शिखरे असलेले राज्य! ग्रॅण्ड कॅनियन तयार करणार्या कोलोरॅडो नदीचा उगम होतो त्या रॉकीज पर्वतांचे राज्य! निसर्गाचे मला नेहेमीच आकर्षण वाटले आहे. मग तो समुद्र किनारा असो किंवा ढाकबहिरीची पर्वत कपारी मधील गुहा. त्यामुळे कोलोरॅडो पहायला नक्कीच आवडले. तुझा पहिला विमान प्रवास. सहल तशी छानच झाली होती. परंतु कोलोरॅडोच्या प्रवासात कारचा खूपच प्रवास झाला. डेन्व्हर-रॉकिज माऊंटेन-डेन्व्हर-ऍस्पेन-ग्रॅण्ड जन्क्शन-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर असा १००० मैलांचा प्रवास ४ दिवसात केला (तुम्हा दोन नक्षत्रांना घेऊन) ! त्यामुळे निवांतपणा जरा कमी मिळाला. त्यामुळे त्याचवेळी ठरवले होते की पुढची सहल शांतपणे करायची. एकाच ठिकाणी जायचे आणि तंबु ठोकुन तिथेच रहायचे.
माऊई हे हवाई या राज्यातिल एक बेट. हवाई हे बेटांचेच राज्य आहे. चहुबाजुला ३००० मैलापर्यंत प्रशांत महासागर पसरलेला. मध्येच हे सृष्टीचे नंदनवन साकारलेले. एकाचवेळी समुद्र, पर्वत, बर्फ, वाळवंट, ज्वालामुखी अश्या अशक्य विरोधाभासांचा प्रत्यय देणारा प्रदेश. युगानुयुगे जपानी वर्चस्वाखाली राहिलेला पॉलिनेशियन्स लोकांचा प्रदेश. परंतु १८४८ पासुन अमेरिकेचा संबंध आला. तसा विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेची मालकी न्यु यॉर्क फ्लोरिडा पासुन कॅलिफोर्निआ वॉशिंग्टन पर्यंत तर पसरली आहेच परंतु त्याहीपलिकडे हवाई, अलास्का, गुआम आणि थेट हिंदी महासागरात दिएगो गार्सिआ पर्यंत पसरली आहे. पूर्वेला देखील फ्लोरिडाच्या पलिकडे प्युएर्तो रिको सुद्दा अमेरिकेचाच प्रदेश. खरे तर अमेरिका सुरुवातीला १३ राज्यांची (वसाहतींची) मिळुन बनली होती. मुख्यत: सध्याच्या न्युयॉर्क-वॉशिंग्टन भागात तिचे केंद्र होते. १८०३ मध्ये नेपोलियन कडुन त्याकाळातील लुईझियाना राज्य जेफरसनने अमेरिकेला जोडले. पुढे मन्रो या धोरणी राजनीतीज्ञाच्या शिकवणीकीनुसार अमेरिकेने प्रसरणाचे धोरण स्वीकारले. तेव्हापासुन एकापाठोपाठ टेक्सास, कॅलिफोर्निआ आणि मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला असलेला सर्वच भाग गिळंकृत केला किंवा जिंकला. पुढे रशिया कडुन अलास्का विकत घेतले. अतिशय दूरदृष्टी लाभलेले आणि विजीगिषु नेतृत्वाची देणगी अमेरिकेला कायमच मिळाली आहे. असो ... तर हवाईचा नेमका इतिहास वाचला नसला तरिही जपान आणि अमेरिकेच्या टक्करीची कल्पना येऊ शकते.
हवाईवर असलेला जपानी भाषा, वास्तुकला, संस्कृती यांचा प्रभाव ठायी ठायी जाणवतो. माऊई, हवाई, हालायेकला, लनाई, लहेना, हाना, कीहे, होकुलावे, माआलेआ अशी किती किती मुके घेऊ अशी नावे. जपानी पद्धतीची उभी आणि वळणदार छतांची घरे. वर्षभर २२-२५ अंश सेल्सिअस आणि आश्चर्यकारक म्हणजे आर्द्रता विशेष काही नसलेले हवामान. दुसरे आश्चर्य म्हणजे वडांची झाडे बेटावर पहिल्यांदाच पाहिले. इथले वड आपल्या मावळातल्या वडासारखे धिप्पाड वाटत नाहीत .... तर त्यांच्यामध्ये एक नक्षी, एक नृत्य एक गेयता जाणवते. जणुकाही समुद्राच्या लाटांसोबत आणि वाऱ्याच्या लहरींसोबत त्यांचेही हृदय द्रवल्यासारखे. समुद्र आणि वड हे दुसरे अद्भुत रसायन इथे पाहिले. आमच्या हॉटेलच्या बाहेरच एक अप्रतिम वड होता. त्याच्या खाली तासनतास घालवावेत. परंतु मोठा वड पाहिला तो लहेना गावामध्ये ३-४ एकरात पसरलेला. गावाच्या मुख्य चौकात या वडाचे चांगले संवर्धन केले आहे. मागच्या दोन एकशे वर्षात याच्या फांद्या सगळीकडे पसरल्या आहेत त्यांना ठिकठिकाणी आधार देऊन त्याचा परिसर वावरता येईल असा केला आहे. मला फर्ग्युसनमधील एक प्रसिद्ध १०० एक वर्षांचा वड आठवला. मैदानाच्या एका कडेला हनुमान टेकडीच्या खाली व्यायामशाळेला लागुन तो वड होता. आम्ही त्याच्या खाली बुद्दिबळ खेळत असू, अभ्यास आणि टवाळक्या केलेल्या ... त्याची मुळे जमिनीच्या वाहुन जाण्यामुळे उघडी पडलेली ... एका वादळात तो उन्मळुन पडला. ९२-९३ साल असावे. फर्ग्युसनचा कुठेतरी एक अंश गळुन पडला.
असो .... आज इथेच थांबतो .. दोन दिवसांनंतर पुन्हा लिहायला घेईन. परंतु हवाईची सहल अतिशय सुंदर झाली. ७ दिवसांनंतरही मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेते आहे.
क्रमश:
2 comments:
हवाहवाइ मस्त जमला आहे..
सुंदर .. लिहित राहा..
dhanyavad sachin!
Post a Comment