सलोनी
सध्या एक पुस्तक वाचतो आहे. मेडलिन अल्ब्राईट या अमेरिकेच्या माजी "सेक्रेटरी ऑफ स्टेट" यांची स्वत: लिहिलेली स्मरणटीपणे (मेम्वार्स). काहीसे आत्मचरित्रासारखेच परंतु इथे भर एखाद्याने आयुष्यभर केलेल्या कामाविषयी जास्त असतो. सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्रसचिव. फरक इतकाच की अमेरिकेत कुठल्याच मंत्र्याला निवडुन येण्याची गरज नसते. राष्ट्राध्यक्ष इथे कोणत्याही लायक माणसाला मंत्री नियुक्त करु शकतात. त्यासाठी सेनेट (अर्थात लोकसभा) यांची संमती घ्यावी लागते.
मेडलिन अल्ब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव. त्यांना बिल क्लिंटन यांनी नेमले. भारत आणि अमेरिका त्यांच्याच कारकिर्दीत जवळ यायला सुरुवात झाली. त्यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंतसिंह होते. असो त्यामुळे मला मेडलिन अल्ब्राईट बद्दल आकर्षण होतेच.
तश्या सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. परंतु आज मी दोन छोटाश्या गोष्टी सांगणार आहे.
परराष्ट्र सचिव होण्याआधी मेडलिन अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या दूत म्हणुन काम करत होत्या. त्यामुळे जगात घडणार्या उलथापालथींमध्ये अमेरिकेची काय भूमिका असावी याला आकार देण्याचे मोठे काम त्यांनी पार पाडले. सोमालिया, हैती, रवांडा आणि युगोस्लाविया इथे चाललेली यादवी, किंवा पूर्व युरोप मध्ये पोलंड, चेकोस्लाव्हाकिया सारख्या देशांमध्ये समाजवादाकडुन लोकशाहीकडे होणारे सत्तांतर त्यांच्याच काळात घडले. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हा अतिशय तीव्र टीकेचा विषय आहे. कारण अनेकदा अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे स्वत:ची पोळी भाजुन घेताना जगात अस्थिरता माजवणारे असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु आपण हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे की वास्तविक जीवन म्हणजे हिंदी चित्रपट नसतो की जिथे एक नायक आणि एक खलनायक असेल. अनेक भल्या बुर्या आर्थिक, सामाजिक, राजकिय आणि संरक्षणविषयक समाजघटकांचे आणि समाजकंटकांच्या स्व-वर्चस्वासाठी चाललेल्या प्रयत्नांचा एक परिपाक म्हणजे वास्तविक जीवन. त्यामुळे टीकेला पात्र असले तरीही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये ही प्रकाशाचे अनेक किरण शोधले तर नक्की सापडतील.
तर युगोस्लाव्हिया या देशामध्ये समाजवादाकडुन लोकशाहीकडे ९०च्या दशकात सत्तांतर होत होते. हा देश प्रामुख्याने सर्ब, क्रोऍट्स, बोस्निअन आणि इतर काही लोकांचा बनलेला होता. हळुहळु सर्बिया, क्रोएशिया वेगळे झाले. बोस्निआची पण तीच वाटचाल चालली होती. बोस्निआ मुस्लिमबहुल होता. परंतु तिथे मुस्लिम, कॅथॉलिक आणि रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे लोक पिढयानुपिढ्या एकत्र नांदत होते. मात्र ९०च्या त्या धुमाकुळात हे सर्व बंध तुटु लागले. बोस्निआमध्ये राहणार्या सर्ब लोकांना सर्बियामधिल सर्ब लोकांनी फूस लावुन शस्त्रास्त्रे पुरवुन बोस्निअन मुस्लिमावर हल्ले सुरु केले. आणि बघता बघता हजारो निरपराध लोकांची हत्या होऊ लागली. युरोपमध्ये भारतासारखेच शेकडो वर्षांचे जुने प्रश्न, भांडणतंटे आहेत. मोठा इतिहास आहे. विभिन्न देशांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास, मत्सर आणि सूडाची भावना आहे. (इतिहासात बघता आपण भारतिय भारताबाहेर आक्रमणे करायला कधी बाहेर पडलोच नाही. आमचा दसरा अंगणातच! त्यामुळे आपल्याला युरोपिअन्स म्हणजे सरसकट एकच लोक असे वाटते. असो.) त्यामुळे जर सर्ब लोक मुस्लिम बोस्निअन्स ला मारत असतील तर "मला काय त्याचे" असे म्हणुन बरीच युरोपिअन राष्ट्रे गप्प बसली सुरुवातिला.
परराष्ट्र संघात काम करताना मेडलिन अल्ब्राईट या घडामोडी अगदी जवळुन बघत होत्या. ही यादवी थांबवावी असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. त्यांनी त्यांच्यापरिने अनेक प्रयत्नही केले. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी नाटो या युरोपिअन संरक्षण संघटनेमार्फत सर्ब लोकांच्या शस्त्रसाठ्यांवर हल्ले केले. त्यामुळे सर्बांना जरब बसली आणि पुठे ही यादवी शमली ..... परंतु लाखो लोकांचा बळी घेऊनच.
नाटोच्या हल्ल्यासाठी निर्णयाप्रत येण्यासाठी त्यांना बर्याच लोकांचा पाठिंबा मिळवावा लागला. अश्याच एका बैठकीत जनरल पॉवेल हे अमेरिकेत नावाजलेले एक अधिकारि अश्या हल्ल्याचे काय परिणाम होतील यावर विश्लेषण सादर करत होते. प्रत्येकवेळी जनरल पॉवेल म्हणायचे की आपण असा हल्ला करु आणि त्याचे अमुक अमुक परिणाम होतिल. त्यांनी जे जे पर्याय समोर मांडले त्या सगळ्यांमध्ये त्यांनी निराशायुक्त स्वर लावला होता. अल्ब्राईट या अस्वस्थ झाल्या. हजारो लोकांची कत्तल होते आहे आणि आपण काहीच करायचे नाही या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या. परंतु पॉवेल ही फार मोठी व्यक्ती होती. राजदूत म्हणुन अल्ब्राईटकडे अधिकार होता परंतु विषयातले नैपुण्य वा अधिकार नव्हता. राजदूत होण्याआधी त्या एक साध्या प्राध्यापक होत्या. परंतु तरिही उद्वेगाने त्यांनी पॉवेलना विचारले, "जर या परिस्थितीत आपण काहीच करु शकत नाही तर आपण आपले सामर्थ्य कशासाठी राखुन ठेवतो आहोत?" त्यांच्या या प्रश्नामुळे असेल किंवा अन्य कशामुळे ... सुत्रे हलली आणि बचावात्मक हल्ल्यांना संमती मिळाली. या प्रसंगातुन मला मेडलिन अल्ब्राईट यांची बुद्धिमत्ता, धैर्य, नीती आणि तितकेच महत्वाचे म्हणजे कृतीशीलता दिसुन आली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
दुसरी गोष्ट बोस्निआतील दोन कुटुंबांची आहे - फेजिक आणि सोराक. फेजिल हे मुस्लिम कुंटुंब होते. सोराक सर्ब. तसे शेजारी परंतु फारशी ओळख नाही. यादवी सुरु झाली तरीही सोराक आपली जागा सोडुन गेले नाहीत. बोस्निअन पोलिसांनी केवळ सर्ब म्हणुन सोराकच्या मुलाला घेउन गेले. तो कधिच परत आला नाही. सोराकचा दुसरा मुलगा बोस्निअनविरुद्ध लढताना बळी पडला. सोराकची पहिली सून गर्भार होती. यथावकाश तिने एका बाळाला जन्म दिला. अवतिभोवती हल्ले चालुच होते. अन्न वस्त्र निवारा सर्वांचीच वानवा होती. कडाक्याची थंडी असल्यामुळे अन्नाचा अधिकच तुटवडा होता. त्यामुळे आईला दुध येत नव्हते. सोराक कुटुंबाने त्या बाळाला चहा द्यायचा प्रयत्न केला. परंतु दुधाअभावी ते बाळ जगु शकणार नाही हे निश्चित होते. फेजिक कुटुंबाकडे एक गाय होती. परंतु त्यांनी ती गावाबाहेर ठेवली होती कारण गावात सर्ब सैनिकांच्या हल्ले चालु होते. पाच दिवस झाले आणि बाळ अगदी मलुल होऊन गेले होते. आणि सोराक कुटुंबाच्या घराबाहेर पावले वाजली. दरवाजा उघडला तर फेजिक अर्धा लिटर दुध घेऊन उभे. सहाव्या दिवशी तेच घडले, आणि सातव्या आणि पुढचे ४४२ दिवस पुन्हा पुन्हा तेच जोपर्यंत सोराक कुटुंबीय बोस्निआ सोडुन सर्बियाला कायमचे जाईपर्यंत. बर्फ, थंडी आणि सर्बांच्या हल्ल्यांची पर्वा न करता निरपेक्ष भावनेने फेजिक दुध आणुन देत राहिले. युद्ध संपल्यावर टाईम्सच्या एका वार्ताहाराला फेजिक इतर निर्वासितांबरोबर छावणीत सापडले... घर उद्धवस्त झालेले आणि गाय तर कधीच मरुन गेलेली. वार्ताहाराने जेव्हा फेजिकना सांगीतले की तो सोराक दांपत्याला भेटला आहे तेव्हा फेजिक म्हणाले "बाळ काय म्हणतंय"?
No comments:
Post a Comment